आमच्या कौटुंबिक व्यवसायातून मी वयाच्या पन्नासाव्या वर्षीच निवृत्त होण्याचा निर्णय घेतला कारण समाजाप्रतीचे आपले ऋण फेडावे हा त्यामागचा विचार होता.
2010 साली नीरजा ही संस्था सुरु केली की जी पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात सार्वजनिक जलपुनर्भरणाची (community rainwater harvesting) कामे करते. परंतु जानेवारी 2018 ला अशी परिस्थिती आली की संस्थेचे काम सुरळीत चालू आहे त्यामुळे फावल्या वेळात मन गुंतवायची गरज भासू लागली. आधी आयुष्यात कधीही एकही अक्षर लिहिलेले नसताना मी कसा काय लिखाणाचा विचार केला हे एक मोठे आश्चर्यच आहे.
मार्च 2018 मध्ये सरमिसळ नावाने मी ब्लॉग सुरु तर केला पण विषय कसे सुचणार हा यक्षप्रश्न होता. परंतु सुदैवानं विषय सुचत गेले आणि मी लिहीत राहिलो. आजपर्यंत व्यक्तिचित्रणे, इतिहास, संस्कृती, तत्वज्ञान, चालू घडामोडी, प्रवास वर्णने, बालपणीच्या आठवणी अशा अनेकविध विषयांवर मी मराठी आणि इंग्रजीमधून जवळपास 175 लेख लिहिले. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये मी हिस्ट्री कॅफे नावाने नवीन ब्लॉग सुरु केला ज्याचा मुख्य उद्देश नवीन पिढीला भारताचा इतिहास, संस्कृती आणि वारसा याची तोंडओळख व्हावी ज्यायोगे त्यांची या विषयाबद्दल उत्सुकता, जिज्ञासा जागृत होईल. हे दोन्हीही ब्लॉग WordPress ह्या माध्यमाद्वारे मी publish करत होतो.
परंतु गेले एक दोन महिने असे जाणवत होते की ह्या माध्यमाच्या काही मूलभूत मर्यादा आहेत आणि ज्या दूर करणे माझ्या हातात नव्हते. त्यामुळे मग आपल्या ब्लॉगसाठी स्वतःची वेबसाईट असणे गरजेचे होऊन गेले. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माझ्या Sarmisal.in आणि Historycafe.in ह्या दोन वेबसाईट लाँच करताना मला अतिशय आनंद होत आहे. या पुढे तुम्हाला नवीन लेख पोस्ट केल्यावर या वेबसाईटची लिंक पाठविण्यात येईल. या सुरुवातीच्या काळात काही अडचणी (teething troubles) येऊ शकतात त्यामुळे जरा सांभाळून घ्या ही प्रेमाची विनंती.
दुसरी एक अत्यंत आनंदाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. तुम्हा सर्वांना ग्रंथाली प्रकाशन या ख्यातनाम संस्थेची मी ओळख करून देण्याची काहीच गरज नाही. 1974 पासून कायमच ही संस्था नवोदित मराठी लेखकांना व्यासपीठ देत आली आहे. अशा या प्रतिथयश संस्थेने माझ्या निवडक मराठी लेखांचे पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. माझ्या मनात संमिश्र भावनांनी गोंधळ उडाला आहे. मी आणि लेखक? अजूनही पटत नाही.
माझ्या करियरची सुरुवात आमच्या कौटुंबिक व्यवसायापासून झाली आणि भारतात ऑफसेट प्रिंटिंग मशीन उत्पादन करणारी पहिली कंपनी आमची होती. आमच्या मुद्रण यंत्राद्वारे आम्ही लोकांना छपाई करण्याची सुलभता प्रदान केली. त्यानंतर समाजकार्य आणि ते चालू असतानाच लिखाण या क्षेत्रात मी स्वतःला झोकून दिले. त्यामुळे ही एक प्रकारे माझी दुसरी किंवा तिसरी इनिंग असे म्हणावे लागेल. त्याला अनुसरून माझ्या आगामी पुस्तकाचे नाव छपाई ते लेखणी असे मी नक्की केले आहे. या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (बहुदा १ डिसेंबर रोजी) होण्याचे ठरत आहे. या माझ्या प्रवासात तुम्हा सर्वांचे योगदान खूप मोठे आहे कारण तुम्ही कायमच मला प्रोत्साहन देत आले आहात. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार मानणे ही जरी औपचारिकता वाटली तरी ते आभार अत्यंत मनःपूर्वक आहेत.
चार्ली चॅप्लिन ह्यांचे एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे - the deeper the truth in a creative work, the longer it will live. त्याच सच्चेपणाने मी आजवर लिहीत राहण्याचा प्रयत्न करत आलो आहे आणि करत राहीन.
पुढे भविष्यात Podcast करणे, स्वतःचा YouTube चॅनेल असे जरा महत्वाकांक्षी विचार आहेत. बघू कसं काय काय जमतं ते.
|| श्री स्वामी समर्थ ||
© यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com