आज जर आपल्याला कोणी विचारले की भारतातील सर्वात श्रीमंत संस्था कोणती? तर क्षणार्धात एकच उत्तर मिळेल - पारसी पंचायत. त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा अंदाज त्यांना तरी पूर्णपणे असेल की नाही हे शंकास्पद आहे. पण पारसी समाजाची आपल्याला खरंच किती माहिती असते? पारसी अग्यारी, ऑगस्ट महिन्यातील पतेती हा सण या व्यतिरिक्त आपल्याला पारशी समाजाबद्दल फारसं काही माहीत नसतं. खरं तर अल्पसंख्य असूनही कुठलाही धार्मिक उन्माद न करता अतिशय शांततेत राहून आपली आणि देशाची प्रगती करणाऱ्या या समाजाचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच.
पारसी हा शब्द उच्चारल्यावर पहिला काय विचार मनात येतो? मला तर नेहमी एक श्रीमंत, हॅपी गो लकी, आनंदी, तोंडाने थोडासा शिवराळ, डोक्यावर छोटी टोपी असलेला मनुष्य डोळ्यासमोर येतो. आपली मोटरसायकल किंवा गाडीची स्वतःच्या मुलाप्रमाणे (मारो डिकरो) काळजी घेणारा म्हातारा पारसी बावा मुंबईत दिसणे ही काही पूर्वी फार दुर्मिळ गोष्ट नव्हती. (पारश्याच्या सेकंड हॅन्ड गाडीला पूर्वी प्रीमियम मिळत असे; आता माहित नाही)