दुसरं मधाचं बोट म्हणजे आरक्षण!!! महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन बासष्ठ वर्षे झाली; त्यातील दहा वर्षे सोडली तर कायमच काँग्रेसचे राज्य होते. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचार, घोटाळे जरी होत असले तरी त्यावेळच्या काँग्रेसमध्ये सुसंस्कृतता निश्चितपणे होती. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की सुसंस्कृतता असली आणि जवळपास सर्व मुख्यमंत्री एकाच समाजाचे असले तरी देखील त्यांच्यातील आर्थिक दुर्बल घटकांना आज आरक्षणाची आस लागली आहे आणि ते देखील सरसकट सर्वांसाठी मागितले जात आहे. सर्व सत्ता, सहकार क्षेत्र, शेती, शिक्षण संस्था त्यांच्याच ताब्यात असताना आपल्याच समाजावर अशी वेळ यावी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. परंतु, आरक्षण हा विषय राजकीयदृष्ट्या आता इतका संवेदनशील झाला आहे की कोणाचीही त्याच्या विरुद्ध आवाज उठवायची हिंमत नाही.
या सगळ्याला जबाबदार कोण? फक्त नेते नव्हे तर राजकीय पक्षही. आणि त्याच बरोबरीने मतदार सुद्धा. जोपर्यंत मतदार जागरूक होत नाही, तोपर्यंत हा रसातळ थांबणार नाही. नोवडून येण्याची क्षमता आणि टोळीशाही हेच जर निकष असतील तर मग हा अधःपात अटळ आहे. मतदारांनी जागरूकपणे मतदान केलं तरच या घसरणीला आळा बसेल. उमेदवारांची कार्यक्षमता, मूल्ये आणि वर्तन यांचा विचार व्हायला हवा. नुसत्या लोकप्रियतेवरून मतदान करणे थांबवायला हवे. मतदारांनी आपली जबाबदारी पार पडली तरच राजकारणाला पुन्हा रुळावर आणता येईल. नुकतीच मी डॉ श्रीराम लागू यांची एक जुनी मुलाखत ऐकली. त्यांचे असे ठाम मत होतं की आपले राजकारणी नालायक आहेतच परंतु त्याचे कारण सगळा समाजच गढूळलेला आहे. याचा मी काढलेला निष्कर्ष म्हणजे " We get what we deserve”.
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला!!
परंतु फक्त मतदारांवर खापर फोडून काय उपयोग? कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा रुळावर आणायचे असेल तर मुळापासून बदल घडायला हवेत. राजकीय पक्षांनी आपली प्राथमिकता ठरवावी लागेल. सत्तेसाठी कोणालाही जवळ करायचं की मूल्याधारित राजकारण करायचं? नेत्यांनी आपलं वर्तन सुधारावं, पक्षांनी मूल्याधारित उमेदवार निवडावेत आणि मतदारांनी जागरूकपणे मतदान करावे. अन्यथा, हा असा वांझोट खेद व्यक्त करणं आणि तक्रारी करणं हा केवळ शब्दांचा खेळ ठरेल.
गढूळ झालेलं राजकारण आता स्वच्छ करायची वेळ आली आहे. जोपर्यंत सर्व नेते, पक्ष आणि मतदार एकत्र येऊन प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत हा तळ स्वच्छ होणार नाही. आता वेळ आहे आत्मपरीक्षणाची, जबाबदारी स्वीकारण्याची आणि बदल घडवण्याची. नाहीतर महाराष्ट्राचे राजकारण असंच रसातळाला जाईल आणि सामान्य माणसाचा मतदान प्रक्रिया आणि लोकशाहीवरील उरलासुरला विश्वास पूर्णपणे उडून जाईल.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
या लेखातील काही भाग हा सौ सीमा मराठे (संपादक, किरात साप्ताहिक) यांच्या लेखातून घेतला आहे त्यामुळे त्यांचे मनःपूर्वक आभार.