मला बऱ्याच वेळा अनेक लोक विचारतात की मी राजकारणावर का लिहीत नाही? काही जण मी लिहावं असा आग्रह धरतात कारण त्यांना माझे मत जाणून घ्यायचे असते. आता मी कोणी राजकीय विश्लेषक अथवा अभ्यासक किंवा पत्रकार नाही त्यामुळे आपल्या मताला काय किंमत असा प्रश्न मला नेहमीच पडतो. पण गंमत म्हणजे मी लिहावं असे आग्रह करणाऱ्या लोकांप्रमाणेच असेही खूप जण आहेत की जे मी कधीच राजकारणावर लिहीत नाही म्हणून माझं कौतुक करतात.
आपल्या देशात कुठच्याही निवडणुका जवळ आल्या की राजकारणाला ऊत येतो; अगदी ग्रामपंचायत ते लोकसभा कुठचीही असो. आता बंगाल, केरळ येथे निवडणूका होऊ घातल्या आहेत त्यामुळे आपण आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या, आयाराम गयाराम यांची मांदियाळी रोज बघतोच आहोत. निवडणुका जिंकणे हा एककलमी कार्यक्रम असल्यामुळे नीती-अनीती, भ्रष्टाचार याकडे संपूर्ण कानाडोळा केला जातो आणि जात राहणार. माझ्या दृष्टीने राजकारण ही एक प्रचंड सर्वव्यापी दलदल आहे. आमच्या व्यवसायामुळे भ्रष्टाचार मी खूप जवळून बघितलाय. आपण स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही अशी या लोकांची पैसे खायची कुवत आहे. पण जेव्हा त्यातल्या अनेक तथाकथित सन्माननीय चेहऱ्यांना भाषणात, पेपरात आणि टीव्हीवर जेव्हा चारित्र्य, सेवाभाव आणि भ्रष्टाचार विरोधात तावातावाने बोलताना बघतो तेव्हा हसावं की रडावं तेच कळेनासे होते. या त्यांच्या अभिनयाला गोल्डन ग्लोब अथवा ऑस्कर सारखे पारितोषिक नाही ही त्यांची शोकांतिका आहे.
भारतीय माध्यमे खऱ्या अर्थानं स्वतंत्र कधी होती का असा प्रश्न मला नेहमीच पडतो. माध्यमांचा एक मोठा वर्ग सातत्याने सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच राहिलेला आहे. आजच्या काळात त्याचे पूर्ण नैतिक अधःपतन झाले आहे एवढंच. माध्यमे आणि राजकारणी पक्ष यांनी मिळून एक नवा राष्ट्रवाद जन्माला घातला आणि माध्यमे राष्ट्रवादी कोण याची खमंग चर्चा रोज तारसप्तकात करत बसलेली असतात. गेल्या वर्षभरात टीव्ही वरील चर्चा पाहिल्या तर, प्रवासी कामगारांचे स्थलांतर या विषयावर झालेली चर्चा वगळता बहुतेक सगळ्या चर्चा या भारत-पाकिस्तान.. हिंदू-मुसलमान.. काश्मीर या भोवतीच फिरताना दिसतात. आज निष्पक्ष म्हणावा असा एकही पत्रकार राष्ट्रीय पातळीवर दिसत नाही.
जी गोष्ट पत्रकारांची तीच सर्वसामान्य माणसांची. एक कट्टर मोदी भक्त तर समोरचे कडवे मोदी द्वेष्टे. कुठल्याही जीवित व्यक्तीला कधीही देवत्व देऊ नये असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा बरेच गुण जास्त असतील पण तरी देखील ते देखील एक मनुष्यच आहेत. To err is human या उक्तीनुसार त्यांच्याकडूनही काही चुका घडत असतील आणि त्यावर टीका करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना असायला काहीच हरकत नाही. परंतु माझा आक्षेप एकच आहे की पोटतिडीकेने वाईट शोधणारे, काही चांगलं घडलं तर मूग का गिळून बसतात? तसेच मोदी भक्त ज्या हिरीरीने त्यांच्या चांगल्या गोष्टी मांडत असतात, त्याच्या काही प्रमाणात तरी, जर एखादी गोष्ट नाही पटली तर व्यक्त होताना का दिसत नाहीत? दोन्हीही गोष्टी दुर्दैवी आहेत. त्यात परत डावे आणि उजवे हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून चालू असलेले गुऱ्हाळ आहेच. कोणी निष्पक्ष राहण्याचा अथवा सुवर्णमध्य गाठण्याचा विचार देखील करत नाही.
सोशल मीडिया आहे म्हणून लिहायलाच पाहिजे असा काही नियम नाही. प्रत्येक गोष्टीवर आपण बोललंच पाहिजे असं नाही किंवा आपणच बोललं पाहिजे असंही नाही. कालचा पेपर आज रद्दी होतो; त्यामुळे आपल्या बोलण्याला किंमत काय याचा विचार तरी करा. बरं, ज्यांच्याबद्दल आपण घसा फाटेपर्यंत बोंबलणार किंवा हात दुखेपर्यंत लेखणी चालवणार त्यांना या अशा वांझोट चर्चा अथवा पोस्टमुळे काही फरक पडतो का? आपण उगाच ताकद, वेळ वाया घालवत असतो आणि ते राजकारणी तिथे मजेत असतात. त्यांना एक टक्का देखील फरक पडत नाही. मला तर हल्ली सोशल मीडिया आणि माध्यमे यावरील खंडीभर अर्थतज्ज्ञ आणि स्ट्रॅटेजिस्ट बघून आश्चर्याने तोंडात बोटं घालायची वेळ येते. इंटरनेटवरून माहिती कॉपी पेस्ट करणे म्हणजे अभ्यासक अशी नवीन व्याख्या झालीय की काय अशी शंका येते.
मी लिहीत नाही कारण मला त्यातलं काहीही कळत नाही, आणि चुकून अथवा न राहवून राजकारणावर एखादी पोस्ट लिहिलीच तर लगेच त्यावर सहमत आणि असहमत लोक कमेंटचा पाऊस पाडतात. आणि हो, काही नाही तर ट्रोलिंग तर होणारच. या सगळ्यांना कोण उत्तरे देत बसणार? त्यातून हलकासा, मुद्देसूद विरोध पण सहन होत नाही. आपण व्यक्त नाही झालो तर जाब विचारायला कोणी येणार नाहीये.
बऱ्याच वेळेला लोकं हौस म्हणून मोदी, शहा, राहुल वगैरे लोकांवर पोस्ट पाडत राहतात; का लिहितात तेच कळत नाही. पण काहीही म्हणा; लोकांची रेंज अफाट असते, मानलं पाहिजे. कोणी ट्रम्पला सल्ले देतो, कोणी पुतीन कसा हुकूमशहा आहे हे सांगतो, कोणी किम जोंग कसा ठार वेडा आहे असे प्रतिपादन करतो तर कोणी मार्केल कशी चुकतेय याचा उहापोह करतो; हसून हसून मुरकुंडी वळायची वेळ येते. अरे आपल्याला विचारतो कोण?
मला माझी कुवत माहित आहे त्यामुळे राजकारणावर लिहिणं मला जमत नाही.
© यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com