भन्नाट वावटळ

मुंबईत मराठी माणूस म्हणजे घाटी. मराठी माणसात धडाडी नसते; तसेच त्याची रिस्क घेण्याची तयारी नसते किंवा ताकद नसते असा एक सर्वसाधारण समज आहे. हा समज फारसा काही चुकीचा नाही. गेल्या काही वर्षात आयटी इंडस्ट्रीमुळे फरक पडला असेल पण सत्तरीच्या दशकात मराठी माणूस म्हणजे कारकून. पैशाचे पाठबळ नाही त्यामुळे आहे ते राखून ठेवण्याची मानसिकता. त्यातून परत सट्टेबाजी असा शब्द काढला तरी पळ काढण्याची परिस्थिती. परंतु या सर्व गोष्टींना पुरून उरलेली एकच व्यक्ती माझ्या खूप जवळून पाहण्यात आहे आणि ती म्हणजे रामदादा. एका सर्वसामान्य कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबातील ह्या माणसाने त्याच्या आयुष्यात जे काही मिळवले त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्याला किती मोठे मानसिक अथवा आर्थिक टेन्शन असायचे हे तो माझ्या वडिलांशी बऱ्याच वेळा बोलायचा म्हणून मला थोडीफार कल्पना आहे एवढंच. पण बाहेरच्या व्यक्तीला कधी थांगपत्ता पण लागणार नाही असे त्याचे व्यक्तिमत्व आणि धडाडी. 
 
राम दांडेकर म्हणजे माझा सख्खा मावस भाऊ, माझ्या आईच्या सगळ्यात मोठ्या बहिणीचा मुलगा. त्या काळी भावंडांमध्ये असणारे अंतर आणि लवकर होणारी लग्न यामुळे रामदादा (पुढे फक्त राम असे म्हणेन) माझ्या आईपेक्षा फक्त साडेतीन वर्षांनी लहान आणि माझ्यापेक्षा जवळजवळ १६ वर्षांनी मोठा होता. त्यामुळे त्याचं बालपण मला माहित असणं शक्यच नाही. पण मी जे काही ऐकून आहे त्यानुसार तो अतिशय हूड होता. त्याच्या हूड स्वभावामुळे तो कुठल्या शाळेत नीट टिकलाच नाही. त्याच्या वडिलांनी त्याला हॉस्टेल मध्ये ठेवण्याचा पण २-३ वेळा प्रयत्न केला पण हा प्रत्येक वेळी तिथून धूम ठोकून परत यायचा. त्यामुळे शेवटचा प्रयत्न म्हणून त्याला आमच्या आजीकडे आवासला पाठवला. बराच काळ तो आवासला राहिल्याने स्वतःच्या मामा मावश्याचं ऐकून तो आजीला आई आणि स्वतःच्या आईला लीलाताई म्हणू लागला.
 

तो जेमतेम मॅट्रिक पास झाला आणि वडिलांनी ओळखीने बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्लार्कची नोकरी मिळवून दिली. तो एकुलता एक मुलगा आणि वडिलांची सांपत्तिक स्थिती चांगली, त्यामुळे रामवर तशी काहीच जबाबदारी नव्हती. त्याला कुठून काय वाटलं आणि कोण कारणीभूत झालं त्याची कल्पना नाही पण तो रेसकोर्सवर जाऊ लागला. आणि त्याचं नशीब प्रचंड बलवत्तर त्यामुळे तो कायम तिथे जिंकतच राहिला. तिथे गेल्यामुळे असेल कदाचित पण त्याचं इंग्रजी बोलणं एकदम सफाईदार झालं. दिसायला तर तो हँडसम होताच. एक-दोन जाहिरातीत, अगदी कोलगेट सुद्धा, त्याने मॉडेल म्हणून काम केलं होतं. नक्की माहित नाही पण बहुदा १९६८ च्या आसपास बँक ऑफ अमेरिकेची टाइम्स मध्ये officer recruitment साठी जाहिरात होती. त्याला कल्पना होती की आपण अर्ज केला तर तो केराच्या टोपलीत जाणार. त्याने माहिती काढली की बँकेचा कोणीतरी मोठा अधिकारी ताज मध्ये राहतोय. तो सरळ ताजला गेला आणि त्या अधिकाऱ्याला भेटला आणि मला ती नोकरी तुम्ही कशी द्यायला पाहिजे हे पटवून देऊ लागला. त्याच्या व्यक्तिमत्वावर असेल, इंग्रजी बोलण्यावर असेल पण तो अधिकारी फिदा झाला आणि रामला ती नोकरी मिळाली. ग्रॅज्युएट नसलेला, एका बँकेत ज्युनिअर क्लार्क असलेला राम अचानक एका जागतिक बँकेत ऑफिसर झाला. ज्या अधिकाऱ्याला राम भेटला होता तो तर त्याच्या प्रेमातच पडला होता. त्या अधिकाऱ्याचं नाव नक्की माहित नाही (बहुतेक रुडोला), पण तो पुढील ५-६ वर्षात बँकेचा प्रेसिडेंट झाला आणि रामच्या लग्नाला खास अमेरिकेहून आला कारण त्याचं म्हणणं एकच - My son is getting married.

 

१९७०-७२ च्या सुमारास त्याचे बाळासाहेब ठाकरेंशी कसे काय तारे जुळले त्याची कल्पना नाही पण तो अगदी त्यांच्या घरचाच असावा इतका त्यांच्या जवळ गेला. त्याच्यामुळे बाळासाहेबांशी आमच्या कुटुंबाचेही खूप चांगले संबंध होते. माननीय बाळासाहेब आमच्या घरी जेवायला देखील २-३ वेळा येऊन गेले. साधारण तेव्हाच त्याने बँक ऑफ अमेरिकेची नोकरी सोडून एकदम दोन-तीन कंपन्या चालू केल्या. ऑफिस कुठे तर ओबेरॉय हॉटेल मध्ये. गर्जना पब्लिसिटी, ऑन द स्पॉट सर्विस अशा त्या कंपन्या. त्याने त्या काळी इतक्या मराठी मुलांना नोकऱ्या मिळवून दिल्या त्याची गणतीच करता येणार नाही. बरं हे करण्याबद्दल कोणाकडून कधी पैसे घेतले नाहीत. त्यामुळे हा जिथे जाईल तिथे कोणी ना कोणीतरी असा असायचाच की ज्याच्या दृष्टीने राम म्हणजे एक देवच. बरं हे सगळं करताना रेसकोर्सवर जाणं आणि जिंकणं चालूच होतं. त्याच्याशिवाय क्रिकेटवर बेटिंग चालूच असायचं, त्यावेळी फुटबॉल अथवा टेनिस एवढं पॉप्युलर नव्हतं नाहीतर त्याने त्यावरही बेटिंग केलं असतं. In my opinion he was born speculator. त्याचे पत्याचे २-३ क्लब होते. गिरगावात एक छोटं रेस्तराँ पण होतं. नंतर बाळासाहेबांचा मुलगा, बिंदूमाधव याच्या भागीदारीत ताडदेवला ड्रम बीट नावाने रेस्तराँ चालू केलं.

 

त्याने काय काय केले नाही? रेस कोर्स बुकी, फिल्म प्रॉडक्शन, हॉटेल, रेस्तराँ, केमिकल फॅक्टरी, पत्ते क्लब, कार रेंटल सर्व्हिस आणि बऱ्याच गोष्टी ज्या मला माहित सुद्धा नसतील. खरं सांगायचं तर तेव्हा त्याला जरी विचारलं असतं तरी तो गोंधळून गेला असता. 

 

रेसकोर्स बुकींमध्ये असलेली सिंधी, मारवाडी आणि गुजराथी लोकांची मक्तेदारी तोडून तो बुकी असोसिएशनचा प्रेसिडेंट पण झाला. त्याच्यामुळे आम्हाला पण डर्बी रेसला जायचा चान्स मिळायचा, ऑफ कोर्स, नुसतंच बघायला.

 

त्याचे नशीब कसे बेफाम होते याचा एक छोटा किस्सा. १० सप्टेंबर १९७९ रोजी तो आमच्या घरी आला असता त्याला कळले की माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. माझ्या वडिलांवर त्याचं खास प्रेम. बाबांना म्हणाला, सुरेशभाऊ किती वर्षे पूर्ण झाली? ४१ असं कळल्यावर त्याने एक फोन केला. हा जोक वाटेल पण फोन वर तो काय बोलला तर - राम, चार एक पाच - आणि फोन ठेऊन दिला. दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांना फोन की काल मी ओपनला चार आणि क्लोजला एक असा आकडा खेळलो होतो आणि पाच हजार रुपये लावले होते आणि मी पंचेचाळीस हजार जिंकलो आहे तेव्हा आज परत एक पार्टी झालीच पाहिजे.

 

 

तो बेफाम आयुष्य जगला. त्याचे आयुष्य एका एखाद्या खुल्या पुस्तकाप्रमाणे होते. जे काही केले ते छातीठोकपणे आणि बिनधास्त. लपवाछपवीचा मामलाच नाही (His life was like a open book; nothing hidden). स्कॉच प्यायचा ती देखील ब्लू लेबल. रेडियो क्लबचा मागचा दरवाजा हा फक्त याच्यासाठी होता कारण तो बरोब्बर त्याच्या घरासमोर होता. सकाळी रेडियो क्लब मध्ये जाऊन पत्ते, मग दुपारी रेसकोर्स, संध्याकाळी बाकीची उस्तवार. कधीही कुठल्या पार्टीत गेला आणि त्याची छाप पडली नाही हे शक्यच नव्हते. लोकांना आकर्षित करून घेण्याचे त्याच्याकडे बहुदा लोकचुंबक होते. मनाने अत्यंत दिलदार; किती लोकांना त्याने मदत केली असेल हे त्याच्या कुटुंबाला तर सोडाच पण त्याला देखील नीट लक्षात राहिले नसेल. 

 

कालांतराने त्याचं बाळासाहेबांशी काहीतरी होऊन फाटलं आणि दोघे एकमेकांपासून पार दुरावले. पण त्याच्या मुलगी, रुपश्री हिच्या लग्नाच्या वेळी स्वतः त्यांच्या घरी गेला आणि म्हणाला की मुलीला आशीर्वाद द्यायला तुम्ही यावं अशी आत्यंतिक इच्छा आहे आणि ते देखील पूर्वीचं सर्व विसरून लग्नाला आले.

 

२००५ साली असेल कदाचित, माझा मित्र श्रीराम दांडेकर बंगलोरहून मुंबईला येत होता. फ्लाईट मध्ये वेळ घालवायला त्याने शेजारच्या व्यक्तीशी गप्पा मारायला सुरुवात केली. याचे नाव ऐकल्यावर त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आदर एकदम वाढला. पण लगेचच त्याने रेसचे कोल बुक काढून काहीतरी बोलायला सुरुवात केली. श्रीरामला आधी काही कळलंच नाही हे काय चाललंय. मग त्याच्या लक्षात आलं की तो माणूस याला श्रीराम दांडेकर ऐवजी राम दांडेकर समजत होता. नंतर श्रीराम मला म्हणतो, च्यायला तुझा भाऊ बराच फेमस आहे रे.

 

 

३१ जानेवारी २०१० रोजी हे वादळ म्हणा अथवा तुफान म्हणा, शमलं. कुलाब्यातील आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की दांडेकर साहेबांचे पार्थिव स्मशानापर्यंत न्यायची जबाबदारी आमचीच आहे. फुलांनी सजवलेल्या ओपन ट्रक मधून "राम दांडेकर अमर रहे" असे बॅनर लावून एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याची व्हावी तशी अंतिम यात्रा झाली.

 

आम्ही मावस-मामे भावंडं कधीही भेटलो तरी रामचा विषय निघाला नाही किंवा त्याची आठवण काढली नाही असं होतंच नाही. मला कल्पना आहे ते सगळे म्हणतील की, अरे ह्या रामच्या एवढ्याच आठवणी काय लिहिल्यास? हा तर त्याच्या व्यक्तिमत्वाचा फक्त छोटासा पैलू आहे. बरोबर आहे; पण किती आणि काय काय लिहू हा मोठा प्रश्नच होता. माझा आपला एक थोटा प्रयत्न.

 

रेडियो क्लबच्या चौकाचे, राम दांडेकर चौक म्हणून नामकरण काही वर्षांपूर्वी करण्यात आले आणि या झंझावाती व्यक्तीचा एक छोटासा का होईना, पण कायमस्वरूपी असा या शहरावर एक ठसा उमटवला गेला.

 

 

 

@ यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

 

Leave a comment



प्रकाश भावे

6 years ago

मराठे उद्योग भवनमधे असताना व्यक्ती बघितली होती....काही पैलू माहीत होते...पण अधिक बरेच आज समजले.
तुमच लिखाण दिवसेंदिवस बहरत चाललय...मोठा बगीचा पहायला मिळावा हीच इच्छा आणि सदिच्छा!

Vaidehi Deshpande

6 years ago

वा यशवंत सुंदर लिहिले आहेस.सचित्र डोळ्यासमोर उभे राहिले .अनेक शुभेच्छा.!!

Shubhada jahagirdar

6 years ago

Yashwant got to know certain things of ramdada which I was ignorant about. You have done justice by expressing
Ram Daderkars multitasking personality. He had impacted many people in many ways. He was a born leader

mangalanil

6 years ago

रसरशीत आणि जिवंत ! कोल्हापूरच्या मिसळी सारखं ! सारखं अधून मधून लाल भडक ,तिखट

mangalanil

6 years ago

रस्सा ओतलाय तुम्ही !मस्त एकाद्या मराठी मानसाचं अस आयुष्य ! खूप छान !

Deepsk

3 years ago

कोणाच्या नशिबात काय आहे हे कर्ताकरविताच जाणे. आपल्या कुटुंबियांबद्दल आमचा आदर वाढतोच आहे. जगावर काहीतरी ठसा उमटवणाऱ्यांबद्दल मला आदर आहे.

Sadhana Sathaye

3 years ago

Khup chaan lihilays. Kasala bhannat ani bahuayami vyaktimatva👍

सुधीर जोगळेकर

3 years ago

क्या बात है, यशवंत..
तुझ्या व्यक्तीचित्रणांचंच स्वतंत्र पुस्तक व्हायला हवं.. पण तू आता पॉडकास्ट सुरू कर, व्यक्तींवरचे...
यशवंत 61 बहार आणतो आहे...

Sneha Dharap

8 months ago

खरोखरच झंझावाती आयुष्य आणि व्यक्तिमत्त्व.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS