सामाजिक कार्याचे आंतरिक समाधान

आपण सर्वजण आपपल्या परीने आणि कुवतीनुसार सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करत असतोच.. त्याच भावनेने आम्ही सुद्धा सुमारे ८ वर्षांपूर्वी नीरजा ह्या संस्थेची स्थापना केली..

नीरजा ह्या संस्थेमार्फत खेडेगावात पाणी व्यवस्थापनाविषयी जागरुकता निर्माण करावी, त्यासाठी तांत्रिक साह्यता द्यावी व गावातील लोकांची मनोवृत्ती बघून अर्थसहाय्य करावे अशी कामाची रूपरेषा होती आणि आहे.. सुरुवातीच्या काळात आलेल्या अनंत अडचणींमुळे आम्ही पहिल्या ४-५ वर्षात काही विशेष काम करू शकलेलो नाही.. परंतु आम्ही जिद्द किंवा हिम्मत सोडली नाही.. सुदैवाने गेल्या ३-४ वर्षात ही परिस्थिती बदलू लागली आणि तेथील गावकऱ्यांचा आमच्या बोलण्यावर आणि आमच्या शुद्ध हेतूबद्दल हळूहळू विश्वास बसू लागला.. तसेच मित्र, नातेवाईक आणि सामाजिक संपर्कातील लोकांकडून देणग्याही मिळू लागल्या त्यामुळे आमच्या कामाला एक जोरदार गती मिळाली..

आमच्या दृष्टीने पाणी ही समस्या मुळापासून सोडवायची असेल तर जलपुर्नभरण व जलसंवर्धन (रेनवाॅटर हार्वेस्टिंग) याशिवाय दुसरा पर्याय नाही.. ह्याच उद्देशाने नीरजा संस्था विक्रमगड व तलासरी या मर्यादित क्षेत्रात आपल्या परीने गेली २-३ वर्षे काम करीत आहे..

आम्ही मार्च २०१६ मध्ये बोरांडा गावातील पवारपाड्यात गेलो.. साधारणपणे ६०-७० वस्ती असलेला पाडा.. तेथील आदिवासांनी आजपर्यंत पाड्यात ना कधी बोअरवेल बघितली ना कधी विहीर.. थोड्या अंतरावर एक खड्डा केलेला होता जिथे खाली एखादा जिवंत झरा असावा.. खड्डा शेवाळ्याने भरलेला पण पिण्याच्या पाण्याचा तो एकमेव स्रोत.. पावसाळ्यात तर पाणी इतके गढूळ असते की विचारता सोय नाही.. असले दूषित पाणी पिऊन कायम वेगवेगळे आजार होतात.. मुंबईपासून फक्त ११० किमी वरील ही भयावह परिस्थिती बघून मन पार उद्विग्न झाले.. आजूबाजूच्या पाड्यांवर थोड्याफार प्रमाणात हीच स्थिती.. नीरजा संस्थाच काय पण अशा १० संस्था उभ्या राहिल्या तरी कमीच.. आभाळच फाटलं तर कुठे कुठे ठिगळं लावायची? ह्या लोकांच्या आयुष्यात कधी आणि कसा फरक पडणार?

तेव्हा असे लक्षात आले की पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणे ही पहिली प्राथमिक गरज आहे.. ह्यातून रिचार्जेबल बोअरवेल करून त्यावरती हातपंप बसवून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे असा प्रकल्प राबवण्याचे ठरवले.. आम्हांला हे सांगायला आनंद होतोय की नीरजा संस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात ३३ ठिकाणी अशा बोअरवेल करून देण्यात आल्या.. त्यातील २४ बोअरवेल विक्रमगड तालुक्यात, ८ तलासरी तालुक्यात आणि १ वाडा तालुक्यातील वावेघर येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात.. या कामांमध्ये आम्हाला श्री प्रताप कामत यांनी बहुमोल मदत केली.. सोबत विक्रमगड आणि तलासरी तालुक्याचा नकाशा जोडला आहे ज्यायोगे आम्ही नक्की कुठेकुठे पोहोचू शकलो याचा आपणास अंदाज येईल..

२०१६-१७ या आर्थिक वर्षात साधारणपणे रुपये पाच लाखाची कामे झाली तर मागील २०१७-१८ या आर्थिक वर्षात रुपये १० लाखाची कामे करण्यात आली.. तर येत्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे लक्ष्य हे रुपये १५ लाख इतके ठरवले आहे..

परंतु आम्हाला एवढेच करत रहायचे नाहीये.. आमचा मुख्य उद्देश हा जलसंवर्धनाच राहणार आहे.. आम्ही सध्या कुंर्झे गावातील धुमाड पाड्यातील झिरपीची वाडी येथे एक मोठा Check Dam (बंधारा) बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.. हा बंधारा प्लांज वेंटेड असून ५० फूट लांब व २.५ फूट रुंद (वरती) व ४ फूट रुंद (खाली) बांधला जाणार आहे.. बंधाऱ्याला १० ते १५ फूट लांब संरक्षक भिंत घालण्यात येईल.. हा बंधारा बांधल्यामुळे मागे साधारण १०० मीटर पर्यंत पाणी साठणे शक्य होईल.. ह्या बंधाऱ्याचे कामाचा मुहूर्त काल १७ मे रोजी श्रीफळ फोडून करण्यात आला आणि प्रत्यक्ष कामाला आज सुरुवात होईल.. या बंधाऱ्याचे काम प्रामुख्याने Xoriant Solutions Pvt Ltd या कंपनीच्या CSR Contribution मधून होणार आहे..

सदर बंधारा पुढील १५-२० दिवसात पूर्ण करण्यात येईल.. बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकणार आहे.. पुढे जाऊन त्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करण्यात पण मदतीचा हात देण्याचा मानस आहे.. बघू काय काय जमतंय ते.. बंधारा पूर्ण झाला की आपल्याला सर्वांना ते सांगीनच..

ही बंधारा घालण्याची जागा.. 👆👆

बंधारा घातल्यामुळे पाणी मागे जमा होऊ शकण्याची जागा.. 👆👆

तसेच ह्या वर्षीच्या पावसाळ्यानंतर पाटील पाडा येथे १२० मीटर लांब x ७५ मीटर रुंद, साधारण खोली २.५ मीटर ह्या आकाराचा तलाव करणे (साधारण २.५ एकर) असाही एक मोठा प्रकल्प विचाराधीन आहे.. असे केल्याने साधारण ३० एकर जमीन ओलिताखाली येऊन तेथील जमिनीतून दोन पिके घेता येतील..👆

दुसऱ्याच्या आनंदाने आपल्याला जो आनंद आणि समाधान मिळते त्याची गोडी काही औरच असते व आम्ही ही गोडी चाखत आहोत.. आपण किंवा आपला मित्र परिवार या आमच्या आनंद अभियानात सहभागी होऊ इच्छित असलात तर संपर्क करा:

यशवंत मराठे - 98200 44630

सुधीर दांडेकर - ‭98231 33768‬

ई मेल: neerajaysm@gmail.com

आजपर्यंत आमच्या बरोबर सहभागी झालेल्या अन्य सर्वजणांचे मनःपूर्वक धन्यवाद..

Bhagwat Snehal

Bhide Shrikant

Dandekar Deepak

Dharap Satish

Dharap Sneha

Kulkarni Madhavi

Kulkarni Saylee

Manohar Prabodh

Dr. Nadkarni Nitin

Dr. Nadkarni Shradhha

Prabhudesai Vidyadhar

Sukhtankar Paresh

Thakar Chinmay

#neeraja #RainwaterHarvesting

Leave a comment



Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS