शिवजयंती

आपल्या देशात कुठल्याही गोष्टीवर वाद आणि राजकारण होऊ शकतं याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे शिवजयंतीचा घोळ.

शिवाजी महाराजांचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध द्वितीया (शके १६८४) येत असे. पण जेव्हा नंतर त्यांचे जन्मसाल १६२७ की १९३० असा प्रश्न इतिहासकारांना काही बखरींमुळे येऊ लागला तेव्हा आणखीन वाद वाढू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने १९६८ साली इतिहासकारांची एक कमिटी बनवली ज्याचे अध्यक्ष एम एन दीक्षित होते. कमिटीच्या इतर सदस्यांमध्ये बाबासाहेब पुरंदरे, दत्तो वामन पोतदार, जी एच खरे, एन आर फाटक आणि अप्पासाहेब पवार अशी विद्वान मंडळी होती. ह्या कमिटीने सर्वानुमते अशी सहमती दर्शविली की महाराजांचा जन्म हा फाल्गुन वद्य त्रितीयेचा (शके १६८६) आहे. जेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया नक्की झाली आणि त्यानुसार जर महाराजांच्या जन्माच्या वेळी ग्रेगोरियन कॅलेंडर प्रचलित असते तर त्यांचे जन्मसाल १६३० हे देखील नक्की आणि फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती.

परंतु आज ज्या ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर महाराजांच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात जुलियन दिनदर्शिका अधिकृत होती. जुलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो. (मी लिहिलेला ग्रेगोरियन कॅलेंडरचा इतिहास या लेखात हे विस्तृतपणे मांडण्यात आले आहे). त्यामुळे महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते.

भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार व्यवहार होऊ लागले. ज्यांचा जन्म भारतात ग्रेगोरियन कॅलेंडर लागू करण्यापूर्वी झालेला आहे की ज्या काळात सारे व्यवहार तिथीने होत असत त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात. उदा. ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवाजी महाराज सुद्धा. परंतु महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरूषांचा जन्म ग्रेगोरियन कॅलेंडर भारतात लागू झाल्यानंतर झाला त्यामुळे त्यांची जयंती तारखेने करतात.

असाही एक संदर्भ मिळतो की महाराजांच्या या तिथीबद्दल लोकमान्य टिळकांनी देखील १९१६ च्या भारतीय इतिहास संशोधक मंडळाच्या वार्षिक सभेत हमी दिली होती आणि महाराष्ट्र सरकारने हा वाद १९६८ साली संपवला. अशी इतकी स्पष्ट परिस्थिती असताना देखील २००१ साली महाराष्ट्र सरकारने एक नवीन वाद निर्माण केला आणि असे जाहीर केले की सरकारी जयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्यात येईल. असा निर्णय माझ्यामते पूर्णपणे राजकीय आहे ज्याला कसलेही लॉजिक नाही.

छत्रपती शिवाजी महाराज हे असे महापुरुष होऊन गेले की आज ३३२ वर्षे झाली तरीही त्यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे. आजही आपण त्यांच्या काळासंदर्भात त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा विचार करायला लागतो तेव्हा त्यांनी किती प्रतिकूल स्थितीत हा पराक्रम केला याचा अचंबा वाटतो. शिवाजी महाराज त्या प्रदेशात रहात होते तो प्रदेश आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता आणि त्या मध्ययुगीन राजवटींमध्ये सुलतानांच्या विरोधात बंडावा करणे म्हणजे प्राणाशी गाठच असायची. डोळे फोडणे, मालमत्तेची राखरांगोळी करून जबर दंड बसवणे, कुटुंबांसह जाळून हत्या करणे, तोफोच्या तोंडी देणे, कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारणे किंवा घोड्यांच्या पायांना बांधून फरपटत नेणे अशा अमानुष शिक्षा दिल्या जात असत. अशा शिक्षा भोगण्यापेक्षा त्या सुलतानांच्या पायाशी शरण जाणे परवडेल अशी मानसिकता समाजता होती, पण शिवाजी महाराजांनी अशाही स्थितीत परकियांची राजवट उलथून टाकून स्वत:चे राज्य निर्माण करण्याचा पण केला. हे त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असते. एकदा असा निर्धार केल्यावर कितीही संकटे आली तरीही आपल्या ध्येयापासून राजे कधीही विचलित झाले नाहीत हा त्यांचा असामान्य गुण. कारण राजेच निश्चयापासून ढळले असते तर सारे सहकारीही बिथरले असते. महाराजांनी आपल्या सवंगड्यात स्वराज्य स्थापनेचा ध्येयवाद इतका पक्का रुजवला होता की, जरी शिवाजी महाराजांचे काही आप्तच त्यांचा विरोधात असले तरी त्यांचे सहकारी कधीही ढळले नाहीत.

शिवाजी महाराजांनी नुसतेच स्वराज्य स्थापन नाही तर अक्षरश: मूठभर सहकार्‍यांच्या मदतीने त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याचे इतिहासदत्त कार्य केले. आणि त्यासाठी लागणारी धीरोदात्त वृत्ती, संकटाशी मुकाबला करण्यासाठी करावे लागणारे बिनचूक नियोजन आणि त्या नियोजनप्रमाणे काम पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन हे गुण त्यांच्या ठायी होते म्हणूनच हे शक्य झाले. त्यांच्या अंगी असलेल्या या गुणांचा अभ्यास, विश्लेषण आणि अनुकरण करणे आजही आवश्यक आहे.  

मध्ययुगामध्ये अनेक राजे, महाराजे आणि सुलतान होऊन गेले. त्या प्रत्येकाशी तुलना केली तर शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराने फारसे मोठे नव्हते. परंतु त्यांच्या समकालीन असलेल्या कोणत्याही सुलतानापेक्षा किंवा शहापेक्षा शिवाजी महाराजांचे पोवाडे जास्त गायिले जातात. त्याचे सर्वात मोठे कारण होते शिवाजी महाराजांची प्रजाहितदक्षता. प्रजेला सवलती देणारा राजा ही संकल्पनाच त्या मध्ययुगामध्ये क्रांतीकारक ठरलेली होती. म्हणूनच शिवाजी महाराजांविषयी असे म्हटले जाते की, राजे तर अनेक होऊन गेले, पण त्यातल्या कोणत्याही राजाला प्रजेने देवाचा अवतार मानलेले नव्हते. शिवाजी महाराजांना मात्र जनतेने देवाचा अवतार मानलेले होते. महाराजांनी त्यांच्या अतिशय अल्प कारकिर्दीत सुमारे १११ किल्ले बांधले आणि सुमारे ४९ किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. शिवाजी महाराज सोडल्यास एकाही हिंदू राजाने शस्त्रागार आणि सशस्त्र सेना उभी केली नाही. तसेच आरमाराचे महत्व ओळखणारा भारतातील पहिला आणि बहुदा शेवटचा राजा!

शिवाजी महाराजांचे कार्य आणि ही वैशिष्ठ्ये यांचा आजच्या राज्यकर्त्यांनी एकदा तरी विचार केला आहे का? आपले आजचे राज्यकर्ते प्रजाहितदक्षतेचे कर्तव्य सोडून बाकी सगळ्या वाईट गोष्टी करायला लागले आहेत आणि त्यामुळे राजे आरामात जगत आहेत आणि प्रजा मात्र अनेक संकटांशी मुकाबला करत भरडली जात आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या राज्यकर्त्यांनी एवढे चिंतन केले तरी प्रजा त्यांना दुवा देईल. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्या राजाचे कर्तृत्व संपूर्ण देशाला अभिमान वाटावे असे आहे आणि जे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल याचा विचार करण्याऐवजी त्यांच्या जन्म तारखेचा वाद घालणारे हे राजकीय पुढारी खरंच कपाळकरंटे आहेत. आज सुद्धा महाराज कुठच्या समाजाचे होते आणि त्यांची इतर समाजाबद्दल काय भावना होती यावर ही नेते मंडळी हिरीरीने पुढाकार घेऊन समाजातील दुही वाढवण्याचे काम मात्र चोख करतात. हीच तर आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका आहे हे निर्विवाद सत्य. आणि या शोकाची परिणीती काय तर आपल्या एवढ्या मोठ्या हिंदुबहुल खंडप्राय देशावर जवळजवळ ७५० वर्षे, आधी मुसलमान आणि मग इंग्रज, यांच्या गुलामीची वेळ आली.
 
 
ही राजमुद्रा आहे शिवाजी महाराजांची.

“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।”

हे शब्द आहेत राजमुद्रेतले, जे शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचे प्रतीक आहे. त्यांचा अर्थ देखील किती स्फूर्तिदायी आहे ते बघा.

प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातो, आणि सारे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.

शिवकल्याण राजा

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।

नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती। पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।

आचरशील, विचारशील, दानशील।धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।

शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा

गोब्राह्मण प्रतिपालक, प्रतापी पुरंदर, क्षत्रीकुलावतंस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय

 

यशवंत मराठे

 

#ShivajiMaharaj #ShivJayanti #शिवाजीमहाराज #शिवजयंती

Leave a comment



Vishakha Bhagvat

6 years ago

I think we as a race like to create controversy and then, like to keep it alive for many years. Shivaji Maharaj's birth date is a classic example.... Needless to add, it is well written as always.

C. T. Ghan

6 years ago

Now present media thrive on controversies only. In fact much unrest is created by media with repeating such matters often.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS