तुम्हाला वाटेल महाराजांवर इतक्या लोकांनी इतके विपुल संशोधन आणि लेखन केले आहे की मी आता वेगळं असं काय सांगणार? हे माझे लिखाण महाराजांचे मोठेपण कशात आहे आणि त्यांचा वारसा त्यांच्या पुढील पिढ्यांनी कसा जतन केला आणि त्याचे ह्या भारतवर्षावर कसे दूरगामी परिणाम झाले हे कथित करण्याचा माझा एक थोटा प्रयत्न आहे.
माझ्या वाचनात डॉ. एम. सी. नंजुंदा राव (Nanjunda Rao) यांचा वेदांत केसरी या मासिकात नोव्हेंबर 1914 मध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख आला. हा लेख डॉ राव यांचा स्वामी विवेकानंदांशी शिवाजी महाराजांसंबंधी झालेल्या संवादाचा गोषवारा होता. ते असे म्हणतात की जेव्हा ते स्वामीजींच्या एका भाषणाला गेले तेव्हा स्वामी असे म्हणत होते.
“भारतात गेल्या सहस्त्रावधी वर्षाच्या इतिहासात जन्माला आलेल्या राजांपैकी शिवाजी हा सर्वश्रेष्ठ हिंदू राजा होता, जो प्रत्यक्ष भगवान शिवाचा अवतार होता, त्याच्याविषयीची भाकिते त्याच्या जन्मापूर्वीच केली गेली होती; म्लेच्छांच्या तावडीतून सुटका करणारा हिंदूंचा तारणहार म्हणून त्याच्या आगमनाची महाराष्ट्रातील सर्व संत-सज्जन आणि महात्म्यानी उत्सुकतेने वाट पाहिली होती. आणि, जो विनाशकारी मोगलांच्या सैन्याला उध्वस्त करून, पायदळी तुडवल्या गेलेल्या धर्माचे पुनरुत्थान करण्यात यशस्वी झाला” - स्वामी विवेकानंद
शिवाजी महाराजांची थोरवी सांगताना पुढे स्वामी विवेकानंद, कविराज भूषणाचे कवन उद्धृत करतात.
दावा द्रुमदंड पर चित्ता मृग झुंड पर,
भूषण बितंड पर जैसे मृगराज हैं ।
तेज तम अंशपर काह्न जिम कंसपर,
त्यॊंमिलेच्छवंसपर शर शिवराज हैं ॥
(जसा वणवा जंगलातील झाडांना वेढून टाकतो, चित्ता हरणाच्या कळपावर तुटून पडतो, सिंह गजराजावर हल्ला करतो, ज्याप्रमाणे प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराचा नाश करतो, कृष्ण कंसाचा नाश करतो, तसा हा शिवाजी राजा कपटी म्लेंच्छ वंशाचा नाश करतो)
विवेकानंदांचे भाषण ऐकून विस्मयचकित झालेल्या डॉ. राव यांनी त्यावेळी असा प्रश्न विचारला की आजची (म्हणजे त्या काळातील) भारतातील शाळकरी मुले, जो इतिहास शिकतात त्यातून असे शिकवले जाते की शिवाजी हा एक धूर्त, तत्वशून्य लुटारू, उपटसुंभ, डाकू आणि विश्वासघातकी खुनी होता. तो एक केवळ नशिबान मुलगा होता, जो आपल्यासारखे चार सवंगडी गोळा करुन आणि धूर्तपणे, दगलबाजी करून राज्य स्थापित करण्यात यशस्वी झाला. मग एवढ्या स्तुतीला शिवाजी महाराज पात्र आहेत का? आणि महाराष्ट्राबाहेरील लोकांच्या मनात त्यांच्याविषयीची प्रतिमा एवढी संदिग्ध का आहे?
स्वामी विवेकानंद: भारतीय संस्कृतीची कहाणी हजारो वर्षांची असली तरी आपल्याला शिकविला जाणारा भारताचा इतिहास हा परदेशी लोकांनी लिहिलेला आहे. मराठ्यांचा इतिहास लिहिणारे परदेशी लेखक ना पक्षपातीपणा झटकुन टाकू शकत नाहीत, ना शिवाजी महाराजांच्या प्रज्ञेचे पैलू, त्यांची महानता व त्यांच्या कृतींमागील खरा लोककल्याणकारी हेतु समजून घेऊ शकत. त्यांच्या ह्या धारणेबद्दल आपण त्यांना दोष देऊ शकत नाही कारण कमी अधिक प्रमाणात, ती, असे मुस्लिम इतिहासकार की ज्यांनी द्वेष आणि आकसापोटी शिवरायांची नेहमीच निर्भत्सना केली, त्यांच्या लिखाणावर आधारित आहे. तथापि, असे अनेक मराठी इतिहासकार वा बखरकार आहेत की ज्यांनी पौराणिक आदर्शाला जागून, शिवरायांकडे, मुस्लिम धर्मांधांच्या अत्याचारांपासुन भक्तांना सोडवण्यासाठी आणि हिंदु धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी परमेश्वराने घेतलेला अवतार म्हणून पाहिले आहे. साहजिकच परदेशी लेखकांनी मुस्लिम इतिहासाला जास्त महत्त्व दिले आणि मराठी बखर/इतिहासकारांनी लिहिलेल्या वृत्तांताला अंधश्रद्धा मानली. परंतु सुदैवाने औरंगजेब, शिवाजी आणि विजापूरच्या राजांच्या इतिहासाशी संबंधित अनेक स्वतंत्र इंग्रजी आणि पोर्तुगीज हस्तलिखिते आहेत. ती मराठा इतिहास/बखरकारांच्या वृत्तांताला पुष्टी देतात. तथापि, शालेय शालेय अभ्यासक्रमात शिकवल्या जाणार्या पाठ्यपुस्तकातून भारताचा अभिमानास्पद आणि जाज्वल्य इतिहास वगळण्यात आला आहे. त्याचा बराचसा भाग भारताचा अत्यंत एकांगी इतिहास वर्णन करतो. भारतभूमीच्या इतिहासाबद्दल देशभक्तीची भावना असणारे तरुण जर अशी हस्तलिखिते शोधून त्यांचा अनुवाद करण्यासाठी संशोधन करतील तर मराठ्यांची सार्वभौम सत्ता स्थापन करण्यात मोलाचे कार्य करणार्या शिवाजी महाराजांची थोरवी सत्याच्या प्रकाशात अधिक लख्ख होईल आणि त्यामुळे भारताच्या खर्या इतिहासाबद्दलच्या आपल्या ज्ञानात मोलाची भर पडेल.
त्या लेखाची लिंक खालीलप्रमाणे:
https://theseer.in/shivaji-represented-the-true-consciousness-of-the-nation-swami-vivekananda/
हे वाचल्यावर असे वाटले की आपण महाराष्ट्रातील लोकं शिवाजी महाराजांना देवत्व देऊन, शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरी या उक्तीनुसार, निवांत झालो आहोत. महाराजांचे मोठेपण आपल्याला खरंच कळले आहे का? आणि मुख्य म्हणजे मोठेपण आहे कशामध्ये?
माझ्या पुढच्या पिढीला महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची निदान एक झलक तरी आपल्याला देता यावी या भावनेने लिहायला सुरुवात केली. परंतु मग लक्षात आले की हे एका लेखात मांडणे अशक्य आहे. त्यातून दोन लेखांचा उगम झाला जो मी पुढील दोन आठवड्यात आपल्यासमोर सादर करीन.
© यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
(या तसेच पुढील दोन लेखात कुठेही छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख झाला असेल तर तो लिखाणाच्या ओघात आहे. माझ्या मनात महाराजांबद्दल नितांत आदर आहे)