चारसो बीस:
भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार जो कोणी दुसऱ्याला फसविण्याचा गुन्हा करतो त्याला दंड आणि सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. हा अजामीनपात्र, कायद्याने चौकशी करण्याजोगा गुन्हा आहे.
चंबळ खोरे:
चंबळ हा सर्वसाधारणपणे लुटारू आणि दरोडेखोरांसाठी कुप्रसिद्ध आहे. विस्तीर्ण पसरलेले खडकाळ क्षेत्र जे राजस्थान मधील बारन, कोटा, सवाई माधोपूर, करौली, धौलपूर जिल्हे, उत्तर प्रदेश मधील आग्रा, फिरोजाबाद, इटावा, औरिया या जिल्ह्यांमधील काही विभाग आणि मध्य प्रदेशातील भिंड, मुरैना आणि शिवपूर जिल्ह्यांचा समावेश आहे.
चंबळ म्हटले की पहिल्यांदा मनात काय येते ते म्हणजे अराजकता आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव असलेला भारताचा एक भाग जिथे आपल्यावर कधी जायची वेळ येऊ नये. परंतु दारिद्र्य आणि शेतजमीनवर होणारी अतिक्रमणे यामुळे ग्रामस्थ लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. जात हा या भागातील आणखीन एक कुप्रसिद्ध पैलू. लोकसंख्येच्या एक चतुर्थांश दलित लोकसंख्या असून सहरिया आदिवासी देखील महत्त्वपूर्ण गट आहे. राजपूत आणि गुर्जरांसारख्या सरंजामदार ठाकुरांनी निषाद व कुर्मिससारख्या निम्न जातींविरूद्ध केलेल्या जातीय अत्याचाराने बऱ्याच लोकांना गुलामगिरी करण्यास भाग पाडले. त्यातूनच फूलन देवी आणि मानसिंग सारखे दरोडेखोर तयार झाले.
आता मला सांगा सर्वसाधारण पापभिरू माणूस या क्षेत्रातील व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न करेल? नाही ना? तुम्हाला प्रश्न पडेल की चारसो बीस, चंबळचे खोरे आणि माझा संबंध काय? तर ऐका ही माझी आपबिती.
आम्ही जून 1998 च्या आसपास आमचे एक मुद्रण यंत्र या क्षेत्रात विकले. त्याच्या सर्व्हिसची जबाबदारी आमच्या दिल्लीच्या डीलरची होती. त्याच्याकडून नीट सेवा मिळत नाही असा दावा करून ग्राहकाने दिल्लीहून एका खाजगी मेकॅनिकला बोलावले. त्या मेकॅनिकने मशिनकडे बघून म्हटले की हे 1990 चे मॉडेल आहे. (आपल्याला हिंदुस्थान मोटर्स, मॉरिसचे 1948 चे मॉडेल, कंपनी बंद होईपर्यंत अम्बॅसेडर नावाने विकत होते, असो). ज्याने मशीन विकत घेतले त्याचा असा समज झाला की आम्ही त्याला सेकंड हँड मशीन विकले आहे. त्याने असा आरोप करणारे पत्र पाठवले. त्याला आम्ही एक्ससाईज गेट पासची कॉपी पाठवली की ज्यात त्या मशीनचा नंबर, त्या कस्टमरचे नाव सर्व गोष्टी नमूद होत्या. आमच्या दृष्टीने शंकेचे निरसन झाले. Chapter Closed.
परंतु आम्हाला आमचा ग्राहक काय चीज आहे याची कल्पना नव्हती. त्याचे पोलीस आणि न्यायालयीन व्यवस्था यांच्याशी खूप घनिष्ट संबंध होते आणि ज्याच्या जोरावर वेगवेगळ्या कंपन्यांकडून पैसे उकळणे हा त्याचा आवडता छंद होता. मारुती उद्योग या कंपनीला सुद्धा त्याने त्रास देऊन पैसे काढले होते त्यामुळे आम्ही तर काय मच्छरच. त्याने IPC 420 खाली पोलिसांकडे तक्रार केली, FIR करून घेतला आणि कोर्टात दावा ठोकला. अजामीनपात्र गुन्हा असल्याने माझ्या विरुद्ध अटक वॉरंट घेऊन तिथले पोलीस मुंबईत दाखल झाले. तेथील पोलीस SP ने इथल्या DCP ची ओळख काढून सहकार्य द्यायला सांगितले.
सगळीकडून बरोब्बर सेटिंग करून पोलीस आमच्या ऑफिसमध्ये 30 जून 1999 रोजी येऊन थडकले. तुम्हाला अटक करून मोरेनाच्या कोर्टात हजर करायला घेऊन जायचे आहे असे सांगण्यात आले. मला खरं सांगायचं तर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षातच आले नाही. आधी वर्दी दादर पोलीस स्टेशनला द्यायची होती. तेथील इन्स्पेक्टरांना DCP साहेबांनी फोन केला असल्यामुळे ते काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. आमचा काय संबंध? ते तुम्हाला न्यायला आलेत तेव्हा तुमचं तुम्ही बघा. त्यांच्या प्रोटोकॉल नुसार मला प्रथम इथल्या मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करायचे होते. तोपर्यंत आम्हाला कधी वकिलाची गरजच भासली नव्हती आणि त्यातून आता criminal lawyer पाहिजे. एक दोन ठिकाणी बोलून वकील ठरवला. एखादा दिवस वाईट असला की सगळ्या गोष्टी उलट्याच होतात. मॅजिस्ट्रेट कोर्टात आमचा वकील न्यायाधीशांशी काहीतरी वकिली मुद्द्यावर भांडला.
नशीबच xx.
झालं, साहेब चिडले तिथून आलेल्या पोलिसांना म्हणाले, आप इन्हे ले जा सकते हैं. माझी तर बोलतीच बंद झाली. काय करावे सुचेना.
काहीतरी विचार करायला वेळ हवा म्हणून मी त्या पोलिसांना सांगितले की आपण आजची रात्र मुंबईतच राहू, उद्या ठरवू कसे जायचे ते. ऐकायला तयार नव्हते पण अखेरीस मान्य केले (कसे ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही). पण ते म्हणाले, साब आप घर नही जा सकते. आली का आता पंचाईत! त्या दिवशी आमच्या घरी जेवायला पाहुणे येणार होते. शेवट गयावया करून सांगितले की फक्त तासभरासाठी घरी जाऊन येतो. घरी गेलो, त्या पाहुण्यांना काहीतरी लोणकढी थाप मारली आणि गुपचूप थोडे कपडे बॅगेत घालून निघालो. साहजिकच माझे आई-वडील आणि बायको टेन्शनमध्ये. पण करणार काय? माझी दोन्ही मुलं तशी लहान होती, त्यांना काहीच समजले नाही.
दादरमधील एका हॉटेलमध्ये दोन रूम बूक केल्या. एकात तिथून आलेले दोन पोलीस आणि दुसऱ्यात मी. माझ्या भोपाळमध्ये राहाणाऱ्या मित्राला फोन केला तर तो नशिबाने मुंबईत होता. तो मला भेटायला हॉटेलवरच आला. म्हणाला, काय वाट्टेल ते झालं तरी तू उद्या जायचं नाहीस. त्यामुळे आता राजकीय आजाराचे नाटक करावेच लागेल. छातीत दुखते असे सांगून उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचे. त्यानेच त्या पोलिसांशी पटवापटवी केली. मग त्या पोलिसांनीच आम्हाला त्या ग्राहकाची कुंडली सांगितली. म्हणाले, साब आपका बहोत बुरे आदमी से वास्ता पडा है.
मग रात्री माझ्या डॉक्टरला फोन. जायचे तर कुठल्यातरी प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये जायला हवे. मग त्याच्याच ओळखीने सकाळी तिथे गेलो. तोपर्यंत मला माहित नव्हते की मी मला Bradycardia आहे (पल्स साठ पेक्षा कमी); त्यात त्यांना माझ्या ECG मध्ये variation वाटले (जे वस्तुतः पहिल्यापासूनच होतेच) म्हणून मला सरळ ICU मध्ये ऍडमिट करण्यात आले. ते पोलीस सुद्धा चकित झाले आणि थोडे चिंताग्रस्त झाले. मला म्हणाले, साब आपको सचमुच प्रॉब्लेम है ऐसा दिखाई दे रहा है. तिथल्या डॉक्टरांनी असे लिहून दिले की हा माणूस अजून पंधरा दिवस तरी प्रवास करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी आमच्या ग्रेट वकिलाने कोर्टात टेंपररी बेल मागायच्या ऐवजी असे सांगितले की मी वैद्यकीय कारणामुळे जाऊ शकत नाही. न्यायाधीश म्हणाले, ठीक आहे, the case is adjourned for 15 days. आता नवीन पंचाईत झाली.
मी फिट आहे असे म्हणू शकत नाही, हॉस्पिटल मधून घरी जाऊ शकत नाही. पुढचे पंधरा दिवस मला काहीही होत नसताना मी हॉस्पिटलमध्ये, आणि दरवाज्यावर दादर पोलीस स्टेशनचा एक हवालदार. क्या सीन था वो! डॉक्टर पण मला म्हणू लागला अरे, तुला काहीच होत नाहीये, आता मी काय करू? परंतु माझा नाईलाज होता. अक्षरशः हातापाया पडून सांगितलं, काहीतरी शक्कल लढवा, पण मला आत्ता वाचवा. डॉक्टर ओळखीचा होता हेच त्यावेळचं एकमेव नशीब. बरं तिथे घरी माझी मुले बायकोला विचारत होती की बाबा कुठे आहे? हॉस्पिटल सांगितले असते तर भेटायला जाऊ म्हणाले असते. सगळीच पंचाईत.
या कालावधीत माझा भाऊ आणि आमचा एक सिनियर कलीग मध्यप्रदेश मध्ये जाऊन काही मार्ग निघू शकतो का याचा प्रयत्न करत होते पण सगळीकडून चक्का जाम. दिवस उलटत होते पण उजेडाचे नामोनिशाण नव्हते. त्यावेळी माझ्या मनात एकच विचार होता - आपण या ग्राहकाला मुद्दामून अथवा अनवधानाने सुद्धा अजिबात फसविलेले नाही. त्यामुळे घाबरून गांगरून जाण्याची काय गरज? पण तरी देखील एक अनामिक चिंता होतीच आणि वारंवार वाटत होतं - why me?
मला परत मुंबई सेशन्स कोर्टात पंधरा जुलैला हजर व्हायचे होते. वडिलांनी एका नामवंत वकिलांची भेट घेतली. ते म्हणाले मी टेंपपरी बेल इथे मिळवून देईन पण पर्मनंट बेल तुम्हाला मोरेना इथे जाऊनच घ्यावा लागेल. आणि माझ्या एका वेळच्या appearance चे मी पस्तीस हजार रुपये (1999 साली) घेईन.
हो म्हणण्याशिवाय दुसरा काही पर्याय होता?
काही महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि अंदाजी पंधरा जूनच्या आसपास आमचा फॅमिली डॉक्टर यादव अदितीला म्हणाला की बाबांची जी काही मेडिकल फाईल आहे ती एकदा मठात जाऊन स्वामींच्या चरणी ठेव. तोपर्यंत आम्हाला स्वामी समर्थ कोण हे ही माहित नव्हते त्यामुळे दादरच्या मठात जाण्याचा संबंधच नव्हता. तरी देखील अदिती त्याने सांगितल्यानुसार ते करून आली होती. साधारण १२-१३ तारखेला अदितीला अचानक त्या गोष्टीची आठवण झाली आणि डुबते को तिनके का सहारा या विचाराने तिने माझ्या केसची फाईल स्वामींच्या चरणी ठेवण्याचे ठरविले. अदितीने ती फाईल त्यांच्या चरणी ठेवली आणि पुढचा घटनाक्रम मात्र थक्क करणारा होता. अक्षरशः पुढच्या दिवशी आशेचा पहिला किरण दिसला आणि मध्य प्रदेश मधील एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या मालकांची ओळख निघाली. त्यांनी त्यांच्या ग्वाल्हेरच्या निवासी संपादकाला भेटण्यास सांगितले त्यानुसार माझा भाऊ त्यांना जाऊन भेटला. आता मालकाकडूनच आदेश आला असल्यामुळे वसंतचे हार्दिक स्वागत झाले. ते म्हणाले अरे, कसल्या माणसाच्या भानगडीत पडलात? हा असल्या उचापत्या करण्यात माहीर आहे. असो.
त्यांनी मोरेनामधील सगळ्यात सिनियर वकिलांना फोन लावला आणि म्हणाले ये हमारे साहब की रिश्तेदार पार्टी है और ये मामला जल्द से जल्द निपटना चाहिये. तेव्हा लक्षात आलं की या वृत्तपत्रांची काय ताकद असते ते. नंतर लगेच चक्र जोरात फिरायला सुरुवात झाली. इथे पंधरा तारखेला वकिलांनी सांगितल्याप्रमाणे मला टेंपररी बेल मिळाला पण असे सांगण्यात आले की बावीस तारखेच्या आत मी मोरेनाच्या कोर्टात हजर व्हायचे. परंतु वरून दबाव आल्यामुळे आता तो ग्राहक पूर्ण वरमला. सांगून पटणार नाही पण त्याने मोरेना न्यायालयात काम करणाऱ्या एका माणसाला निरोप घेऊन मुंबईला पाठवला की मराठे साब, आप चिंता मत करो. मामला रफा दफा हो जायेगा. तोपर्यंत ग्वाल्हेरच्या माणसाने मोरेनात पूर्ण सेटिंग लावले होतेच.
पंधरा जुलै ते एकवीस जुलै या कालावधीत मला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे रोज दादर पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी लावायला लागत होती. किती लाजिरवाणी गोष्ट असेल याचा विचार करून बघा. मी तर विसरता विसरू शकत नाही. खाया नही, पिया नही पर ग्लास तोडा, बारा आना अशी परिस्थिती.
अखेरीस बावीस जुलैला मी मोरेनात पोहोचलो. आधी मोरेना पोलीस स्टेशन. मला तिथल्या इन्स्पेक्टरने सांगितले की त्या ग्राहकाने केस बंद करायची असे सांगितले आहे. पण पोलिसांचा वेगळाच प्रॉब्लेम होता. वरिष्ठांच्या दबावाला बळी पडून त्यांनी केस तर रजिस्टर केली पण आता जर ती केस खोटी आहे असे म्हटले तर मग FIR का केला म्हणून पोलिसांवर कारवाई होणार. त्यामुळे त्यांनी अशी विनंती केली की मी आता अजून ही केस ताणू नये. ते कोर्टात असे सांगतील की गुन्हा सिद्ध करायला काहीही पुरावे मिळाले नाहीत म्हणून केस खारिज करावी. माझी या गोष्टीला अजिबात तयारी नव्हती कारण मी जो अपमान सहन केला, मानसिक त्रास भोगला त्याची शिक्षा त्या ग्राहकाला मिळावी असा माझा आग्रह होता. परंतु आता पोलिसच विनंती करतायेत त्यामुळे ती पूर्ण धुडकावून पण लावता येईना. शेवटी विचार केला की आपला हा प्रांत नव्हे; सहीसलामत सुटतोय यात धन्यता मानावी आणि त्यांचे म्हणणे मान्य करावे. परंतु एका गोष्टीवर मात्र मी ठाम राहिलो की कुठच्याही परिस्थितीत मला त्या ग्राहकाला भेटायचं नाही आणि मी आता ते मशीन त्याच्याकडे ठेवणारच नाही. आम्ही ते मशीन विकलेल्या किंमतीला परत घेऊ, त्यामुळे जे नुकसान होईल ते भोगू पण आम्हाला असा ग्राहक नकोच.
हे सगळं बोलून आणि ठरवून आम्ही कोर्टात पोहोचलो. माझ्या बरोबरीने आरोपी म्हणून आलेल्या एक एक व्यक्ती बघून माझा थरकापच उडाला. कोणाला बेड्या घातलेल्या, कुणाला साखळदंडाने बंदी बनविलेला, सगळे राकट, चेहऱ्यावर घावाचे व्रण असलेले, भरघोस मिश्या. आठवलं तरी अंगावर शहारा येतो.
माझ्या केसचा नंबर कितवा होता ते माहित नाही पण आम्ही गेल्यापासून पंधरा मिनिटात केसचा पुकारा झाला. पर्मनंट बेल आधी घेतला आणि पोलिसांनी पुढील चार दिवसात कागद submit करतो असे सांगितले. अर्ध्या तासात आम्ही बाहेर पडलो. पुढील पंधरा वीस दिवसात सगळ्या गोष्टी पूर्ण करून त्या केसवर पडदा पाडण्यात यश आले.
तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा आयुष्यातील गोष्टी यशस्वी आणि मनासारख्या घडत असतात तेव्हा एक प्रकारे मी पणाची भावना अनवधानाने बळावत असते. परंतु असा एखादा मोठा फटका बसला की लक्षात येते; आपल्या हातात काहीच नाही. परंतु अशा घटनांमधूनच आयुष्याला भविष्यात वेगळी कलाटणी (transformation) मिळते.
माझी किंवा आमच्या कंपनीची काहीही चूक नसताना सुद्धा या दिव्यातून मला जावे लागले. नंतर खूप वर्षे देखील मला हे कोणाला सांगण्याची हिंमत नव्हती. Terrible psychological trauma. पण त्याच बरोबरीने असा विचार मनात येतो की सुदैवाने आमच्या ओळखी निघाल्या आणि मी सुखरूपपणे त्यातून बाहेर आलो. पण असे किती दुर्दैवी असतील की जे अशा चक्रातून बाहेर पडूच शकणार नाहीत आणि पडलेच तर सुटकेसाठी किती मानसिक यातना आणि आर्थिक नुकसान सोसावे लागेल याच्या कल्पनेने सुद्धा अंगावर शहारा येतो. त्यामुळे आपण स्वतःला नशीबवान म्हणावे आणि देवाचे आभार मानावे.
आणि हो, त्याचबरोबरीने माझा मित्र सुहास, सिनियर कलीग मिलिंद, डॉ. दीपक, डॉ. प्रदीप, भोपाळ मधील कै. कोल्हटकर, वृत्तपत्र मालक श्री. माहेश्वरी, निवासी संपादक श्री. शुक्ला, मोरेना न्यायाधीश श्री. समादिया यांचे जितके आभार मानावे तितके थोडेच.
आज जरी तो सर्व प्रसंग आठवला तर वाटते की त्यावेळी मी हा मनस्ताप कसा काय भोगला? आणि मग आपोआपच स्वामी समर्थांचे स्मरण होते. त्यांना लगेच मनःपूर्वक नमस्कार करतो. (जो आत्ताही केला)
।। श्री स्वामी समर्थ ।।
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
#Morena #Cheating #420 #Police