तुम्हाला असं कधी जाणवलं आहे का एखादी धून, एखादं गाणं आपल्याला इतकं भारावून टाकतं की पुढचे काही दिवस तेच स्वर अथवा संगीत आपल्याला खुणावत राहतं. मनातून जाता जात नाही.
अगदी त्याचप्रमाणे एखाद्या संगीतकाराचे होत असेल तर आपण समजू शकतो पण एखादा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक असा वेडापिसा होत असेल का? आपल्याला ऐकून माहित असेलच की राज कपूर याला संगीताचे प्रचंड आवड होती, ज्ञान होते आणि ध्यास होता. त्याच वेडाची आणि ध्यासाची ही एक अनोखी कहाणी.
उतारवयात दम्याने ग्रासलेल्या राज कपूर यांनी आयुष्यातील शेवटच्या काही महिन्यांमधल्या जवळपास प्रत्येक मुलाखतीमध्ये त्यांच्या लाडक्या ‘मेरा नाम जोकर’च्या ‘जीना यहॉं, मरना यहॉं’ या गाण्यातल्या काही ओळी आवर्जून उद्धृत केलेल्या आहेत -
कल खेल में, हम हों न हों, गर्दिश में तारे रहेंगे सदा,
भूलोगे तुम, भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा !
तर या गाण्याच्या इंटरल्यूडमध्ये, आणि बाकीच्या अनेक गाण्यांमध्येही, राज कपूरची खास सिग्नेचर धून येऊन गेलेली आहे. राज कपूरच्या डोक्यात सतत वाजत राहणारी ही धून, मुळात आलीय तरी कुठून..??
सन १८८० मध्ये रोमेनियाच्या लष्कराचे ‘बॅन्ड कंडक्टर’ जोसेफ (आयन) इवानोविच यांनी बुखारेस्टमध्ये एक अजरामर वॉल्ट्झ धून तयार केली आणि सुरांमध्ये बांधली. तिचं नाव आहे - ‘वेव्ह्ज ऑफ दी डॅन्यूब’. ही मूळ धून नंतर असंख्य ठिकाणी वापरली गेली, तिच्यामध्ये प्रासंगिक बदलही होत गेले. ही धून अनेक चित्रपट दिग्दर्शकांना भुरळ घालून गेलेली आहे. ती वापरलेल्यांमध्ये जोसेफ वॉन स्टर्नबर्गचा ‘डिसऑनर्ड’, अकिरा कुरोसावाचा ‘स्ट्रे डॉग’, अमीर कुस्तुरिकाचा ‘व्हेन फादर वॉज अवे ऑन बिझनेस’, अशी काही उल्लेखनीय नावं सांगता येतील.
या ट्यूनचा चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध आविष्कार, अल जोल्सन (‘दी जाझ सिंगर’ या जगातल्या पहिल्या बोलपटाचा नट) या लोकप्रिय अभिनेता/ गायकाच्या बायोपिक, (द जोल्सन स्टोरी, १९४६) मधला, “द अनिव्हर्सरी सॉन्ग” हा आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना, ‘जॉल्सनच्या अनिव्हर्सरी पार्टीमध्ये त्याचा मुलगा (भूमिका: लॅरी पार्क्स) काही तरी गातो’, असा शॉट हवा होता. जॉल्सनच्या डोक्यात डॅन्यूब वेव्ह्जची धून होती. ती त्याने गुणगुणून दाखवली आणि पुढच्या ४५ मिनिटांत शॉल चॅप्लिन या प्रसिद्ध ऑस्कर विजेत्या संगीतकाराने अनिव्हर्सरी सॉन्गचे शब्द लिहिले. धून तशीही तयार होतीच, परंतु शॉलने तिला शब्दही बहाल केले, असं म्हणता येईल.
राज कपूरने मूळ वॉल्ट्झचं ध्वनिमुद्रण ऐकण्याआधी ‘द जोल्सन स्टोरी’ पाहिला आणि तेंव्हा पहिल्यांदा त्याने ही धून ऐकली होती, असं त्याच्या व्हायोलिनीस्ट, सुप्रसिद्ध जोआकिम सॅन्टन मिनेझिस, यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलेलं आहे. राज कपूर या ट्यूनने पार संमोहित होऊन गेला. संगीतकार शंकर-जयकिशन जोडीने ही धून शिवरंजनी रागामध्ये मस्तपैकी गुंफून टाकली परंतु राज कपूर त्या ट्यूनमुळे इतका पागल झाला होता की त्याने ती त्याची कलाकृती, बरसात (१९४९) चित्रपटासाठी, चक्क चोरून वापरली.
त्याच जोआकिम यांनी ‘बरसात’ चित्रपटासाठी सोलो म्यूझिक पीसेस व्हायोलीनवर वाजवलेले आहेत. बरसात मधला ‘छोड गये बालम’च्या आधीचा क्लब हाऊसचा सीन आठवतोय? त्या शॉटमध्ये ही धून व्हायोलीनवर वाजवताना जो मिनेझिस आपल्याला पडद्यावर दिसतात.
बरसात अफाट यशस्वी झाला, पण यथावकाश गोरी मंडळी कॉपीराईटचं भूत घेऊन त्याच्या मागे हात धुवून लागली आणि द ग्रेटेस्ट शोमन राजसाब यांनी त्या ट्यूनचे, शब्दांसकट सगळे, कॉपीराईट्स १९५० च्या दशकात खरेदीच करून टाकले. त्या काळात त्यांनी त्यासाठी तब्बल ३५,००० रूपये मोजले होते, तसं त्यांनी शंकर जयकिशन यांनी नमूद केले होते.
त्या नंतर आरकेच्या अनेक चित्रपटांमध्ये ही धून वाजताना ऐकू आलेली आहे. राज कपूरमधल्या व्यावसायिक निर्मात्याने त्याच्या गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळण्याची खात्री वारंवार करून घेतली. जिस देश में गंगा बहती है (१९६०), संगम (१९६४), मेरा नाम जोकर (१९७०), बॉबी (१९७३), धरम करम (१९७५), बीवी ओ बीवी (१९८२), अजून बाकीही काही असतील, या सर्व चित्रपटांमध्ये एकतर पार्श्वसंगीत म्हणून किंवा गाण्याच्या मध्यंतरातील इंटरल्यूड्स म्हणून ‘द अनिव्हर्सरी सॉन्ग’ची धून, नाही नाही आता मालकीची असलेली ‘आरके सिग्नेचर धून’, वाजलेली आहे.
यूट्यूब वर 'द अनिव्हर्सरी सॉन्ग' नक्की ऐका:
आयन इवानोविच यांची मूळ वॉल्ट्झ धून, "वेव्ह्ज ऑफ दी डॅन्यूब", इथे ऐकू शकाल:
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com