एक अस्वस्थ करणारा अनुभव
चित्रपटाची सुरुवात महात्मा गांधींच्या एका वाक्याने होते - “आपले स्वप्न (Vision) पूर्णत्वाने साकार होऊ शकत नाही किंवा ते इतरांना आपण पटवून देऊ शकत नाही म्हणून, काहीच प्रयत्न ना करणे ही केवळ प्रगतीत अडथळा आणणारी वृत्ती आहे,” हीच संकल्पना चित्रपटातील नायकाच्या "मोहन" या नावामागे दडलेली आहे.
हा चित्रपट सामाजिक परिवर्तन आणि न्यायाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या मूल्यांच्या पुनरुज्जीवनाचे समर्थन करतो. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची भारतातील पायाभूत सुविधा, निरक्षरता आणि जाती भेदभाव या विषयी सुस्पष्ट प्रकाश टाकतो. या चित्रपटाची प्रेरणा बक्षी यांच्या बापू कुटी या पुस्तकातील कथांमधून मिळाली; तसेच अरविंदा पिल्लारामरी आणि तिचा नवरा रवी कुचिमंची या दोन अनिवासी भारतीयांच्या खेड्यांमध्ये टिकाऊ सुधारणा घडवून आणण्याच्या कामातून मिळाली.
त्यामुळे कथानक आणि संवाद हे परंपरा, समाजव्यवस्था, सामाजिक न्यायाची निकड आणि वंचित वर्गाचे सक्षमीकरण असे अनेक संघर्ष प्रतिबिंबित करतो. पारंपारिक मूल्यांची वैधता आणि जागतिक संदर्भामुळे बदलणारी मूल्ये आणि व्यक्तीपेक्षा समुदाय कसा महत्वाचा आहे याची चपखल मांडणी करण्यात आली आहे. परंतु ते करताना सामाजिक उन्नतीसाठी व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेऊन तोडग्यावर लक्ष केंद्रित करावे लागते हे अधोरेखित करतो.
राष्ट्रीय महत्वाच्या गोष्टी सुरेख पद्धतीने दाखविण्यात आल्या आहेत.
शिक्षण: प्राथमिक शिक्षण हा जरी महत्वाचा विषय असला तरी वेगवेगळ्या कारणाने शाळा सोडून जाणारी मुले आणि दलित समाजातील मुलांना मिळणारी सापत्न वागणूक या अडचणींच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची नायिका, गीता, हिने शिक्षणाचा प्रसार कसा करायचा?
जातीवाद: आजही करोडो भारतीय जनता सामाजिक बहिष्कृत की ज्यांना शिक्षण आणि आरोग्य यांच्यसारख्या मूलभूत सेवेस नकार दिला जातो. सिनेमा बघताना सुद्धा निम्न जातीच्या ग्रामस्थांनी चित्रपट उलटाच पाहिले पाहिजे. जी 'जात' नाही ती "जात" हे नागडे सत्य आपल्याला दिसते.
महिला सबलीकरण: पुरुष प्रधान भारतीय समाजात लैंगिक असमानता सर्वत्र पसरलेली आहे. कुटुंबातील महिलांना मूलभूत शिक्षणाला देखील नकार दिला जातो. गीता हे उत्कृष्ट उदाहरण आहे - तिला सन्मान आणि स्वातंत्र्याने जगायचं आहे, परंतु होऊ घातलेला नवरा आणि त्याचे कुटुंब तिच्या निवडींशी सहमत नाही आणि म्हणून ती लग्नाचा प्रस्तावच धुडकारून लावते.
गरीबी आणि विषमता: आज करोडो लोकं दोन वेळा पोटभरीचे जेऊ शकत नाहीत अशा भीषण दारिद्र्यात जगतात. शेतकर्यांची अश्रूमय शोकांतिका हरिदास या शेतकऱ्यामार्फत ज्या परिणामकारक पद्धतीने मांडली गेली आहे तशी भारतीय चित्रपटात क्वचितच बघायला मिळाली आहे.
आधुनिकता विरुद्ध परंपरा: भारत सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी असल्यामुळे त्याचा आधुनिक विचारसरणीशी संघर्ष होत असतो. मोहनच्या एका स्वगतात भारत जगाचा सर्वश्रेष्ठ देश का नाही हे निर्णायकपणे स्पष्ट करतो. - “जब भी हम मुकाबलें में दबने लगते है.. तो हम एक ही चीज़ का आधार लेते हैं.. संस्कार और परंपरा.”
बाल मजूर: चित्रपटात एक चित्रण आहे जेथे स्थानिक रेल्वे स्टेशनवर मोहन एका दहा वर्षाच्या मुलाकडून पाण्याचा कप घेतो. हा एक हृदय हेलावून टाकणारा प्रसंग आहे, जिथे प्रेक्षकाला देखील आपले अश्रू रोखून धरणे फार कठीण होऊन जाते.
गावकरी चित्रपट बघत असताना ब्लॅक आऊट होतो तेव्हा मोहन त्या संधीचा फायदा घेऊन गाणे आणि नाच यांच्यामार्फत आकाशातील तारे, पाण्याचे थेंब आणि इंद्रधनुष्याचे रंग यांची प्रतीके वापरून लोकं एका सूत्रात कसे बांधले जाऊ शकतात हे दाखवतो. टेलिस्कोपद्वारे गावकऱ्यांना आकाशतत्वाशी जोडले जाण्याचा एक रोमांचक अनुभव देतो.
परंतु पुढील एका उत्सवाच्या वेळी जेव्हा वीज जाते तेव्हा लोकांची अनास्था आणि पराभूत मनस्थिती मोहनला भयंकर त्रास देते. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहून काहीही उपयोग नाही हे पटवून देण्यासाठी समाजाला संघटित करून तो जवळच्या ओढ्याच्या पाण्याचा वापर जलविद्युत प्रकल्पासाठी केल्यास संपूर्ण गावाला कशी वीज मिळेल हे सिद्ध करण्याचा चंग बांधतो. अशा प्रकारे मोहन एक बाहेरची व्यक्ती ना राहता, तो त्या गावाच्या सामाजिक जीवनाचा एक घटक होतो.
सुशिक्षित, यशस्वी अनिवासी भारतीय (एनआरआय) यांना हा चित्रपट नॉन-रिटर्निंग इंडियन असे नवीन नामनिधान करतो. चांगल्या जीवन पद्धतीसाठी सुशिक्षित लोकांचे स्थलांतर अर्थात ब्रेन ड्रेन हा संवेदनशील विषय ही चित्रपटाची प्रमुख थीम आहे. “अपनी चौखट का दिया.. giving light to neighbour's house"
परंतु मोहन परत येतो आणि असे जीवन निवडतो जे बहुतेक अनिवासी भारतीयांना कल्पना करणेही अशक्य आहे.
शाहरुख खानचा सर्वोत्कृष्ट अभिनय असलेला हा सिनेमा आहे हे वादातीत आहे.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com