जगातील प्रत्येक देशात, धर्मात अथवा जातीत रूढी आणि परंपरा यांचा पगडा दिसून येतो. यातील अनेक इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की जणू अनुवांशिकतेने त्या पुढच्या पिढीकडे जात राहिल्या. मला इस्लाम अथवा ख्रिश्चन धर्मातील रूढी काही माहिती नाहीत पण त्या नाहीतच असे म्हणणे फारच धाडसाचे होईल.
इस्लाम धर्म हा जेव्हा आखाती देशात स्थापन झाला त्यावेळची तिथली परिस्थिती काय होती? सर्व ठिकाणी टोळ्यांचे राज्य. त्यामुळे स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करायला युद्ध हे प्रमुख साधन. युद्धात जिंकल्यानंतर तेथील बायकांना पळवणे हे तर गृहीतच धरलेलं. स्त्रिया नजरेस पडू नयेत किंवा तरुण आणि वयस्क यातील फरक कळू नये म्हणून बुरख्याची रूढी निर्माण झाली असावी. तसेच जर एखाद्या भांडणात एका टोळीच्या माणसाने दुसऱ्या टोळीतल्या माणसाला मारले अथवा इजा केली तर त्याचा बदला म्हणून ती टोळी दुसऱ्या टोळीचा संपूर्ण नायनाट करू शकते. हे वाद थांबविण्यासाठी मग काय करायचे? त्याने तुझा डोळा फोडला का? तर तू त्याचा डोळा फोड; परंतु संपूर्ण टोळीला संकटात पाडू नको. Hence an eye for an eye was mainly to pacify disputes.
इस्लामी आक्रमकांचा इतिहास वाचला तर "उसे नेस्तनाबूत कर दो" असे वाक्य नेहमी वाचनात येते. पण तुम्हाला माहित आहे का की नेस्तनाबूत याची फोड "ना आवेस्ता ना बूत" अशी आहे. याचा अर्थ काय तर ना आवेस्ता (यहुदी आणि पारशी धर्म), ना बूत (बूत म्हणजे मूर्ती किंवा बुद्ध; म्हणजेच हिंदू आणि बौद्ध). याचा अर्थ इस्लाम सोडून बाकी धर्मांचा नायनाट करा.
दुसरा असाच एक शब्द आपण वापरतो, तो म्हणजे बेचिराख. पण तो खरा शब्द बेचिराग आहे. पूर्वी प्रत्येक वस्तीत, वाडीत, गावात दिवा (चिराग) लावला जायचा परंतु त्या वस्तीचा पूर्ण नायनाटच झाला तर दिवा लावायला कोणी शिल्लकच नाही अशा अर्थी तो शब्द आहे.
हिंदू धर्मात तर रूढी आणि परंपरा यांची रेलचेल आहे. आमच्या पिढीतील बहुतेकांनी त्यांच्या वाडवडिलांनी सांगितलेल्या गोष्टी जरी पटल्या नाहीत तरी पूर्णपणे झुगारून लावल्या नाहीत. असं का करायचं हे प्रश्न विचारले तेव्हा बहुतेक वेळी शास्त्र असे सांगते किंवा नाही केले तर काहीतरी अभद्र किंवा अशुभ होईल अशी भीती घालण्यात आली.
ह्याच्यावर मला एक वाचलेली गोष्ट आठवली.
दहा माकडांना एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले जिथे काही ठोकळे ठेवण्यात आले होते. पिंजऱ्याच्या वरच्या भागात माकडांना हवे असलेले खाणे होते. परंतु जेव्हा केव्हा एखाद्या माकडाने त्या ठोकळ्यांवर चढण्याचा प्रयत्न केला की संपूर्ण पिंजऱ्यात थंडगार पाण्याचा वर्षाव होत असे. काही काळानंतर दोन माकडे बदलण्यात आली त्यामुळे त्यांनी साहजिकच प्रयत्न केला तेव्हा इतर माकडांनी त्यांना खाली ओढले. कालांतराने दोन दोन करून सर्व माकडे बदलण्यात आली पण तरी सुद्धा असे आढळून आले की कोणीही त्या ठोकळ्यांवर चढण्याचा प्रयत्न केला नाही. It was in a way a behavioural transfer.
मग आपल्या रूढी आणि परंपरा ह्या अशाच प्रकारे शतकानुशतके चालू आहेत का? त्याच्या मागे काही लॉजिक किंवा शास्त्र आहे का? आणि महत्वाचे म्हणजे त्यातल्या काय गोष्टी सबळ आधाराच्या जोरावर आजही समयोचित अथवा सुसंबद्ध आहेत का? आजची पिढी ह्या सर्व गोष्टींना थोतांड म्हणून झुगारून देते किंवा दुर्लक्ष करते. त्यांना यातला खरा अर्थ आपण सांगू शकतो का? या रूढी जेव्हा निर्माण झाल्या तेव्हा त्याला काही अर्थ होता का?
म्हणून ठरवले की या गोष्टींचा अभ्यास करायचा आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी शोधून काढायची. आपल्या पूर्वजांनी अशा रूढी ठरवताना काहीतरी तर विचार केला असेल ना? हा विषय इतका मोठा आहे की जो एका लेखात मांडणे अशक्य आहे. आज आपल्याकडे सामाजिक, कौटुंबिक अथवा मृत्यू ह्याच्या संदर्भात इतक्या रूढी आहेत की ज्यांचा सखोल विचार करणे आवश्यक आहे.
त्यामुळे ही एक प्रकारे तीन ते चार लेखांची मालिका होईल पण तरी देखील मला असे वाटले की आपल्या सगळ्यांच्या समोर यायला हवे. आणि मुख्य म्हणजे आजच्या पिढीला सांगता यायला हवे की ह्या गोष्टींचा त्यावेळी काय संदर्भ होता? गंमत म्हणून या रूढी आणि परंपरा अस्तित्वात आल्या नाहीत.
तुम्हाला हे समजून घ्यायला आवडेल?
यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
#Dogma #Tradition #Heritage