आजकाल आपल्याकडे एक फॅशन झाली आहे की जे काही हिंदू आहे ते वाईट, टाकाऊ परंतु इतर धर्मियांच्या अगदी बारीकसारीक गोष्टींचे उदात्तीकरण करायचे. आणि मुख्य म्हणजे सत्य असत्य पडताळून बघायचेच नाही कारण राजकारणी लोकांना अशा कंड्या पिकवून स्वतःच्या मतांची पोळी भाजून घ्यायची असते.
महाराष्ट्र म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध सगळीकडे जोडला जातो आणि मग त्यांच्या बाबतीतील अनेक घटना सांगितल्या जातात. त्यांच्याविषयी काही गैरसमज पसरवले जातात, मुद्दाम म्हणा, किंवा अज्ञानामुळं म्हणा. उदा. शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली; त्यांनी मशीदींना इनामं दिली; शिवाजी महाराजांच्या सैन्यात १ लाख मुसलमान होते. वगैरे वगैरे. एक लाख ! याची सत्यता कशी तपासायची?
शिवचरित्र म्हटले की इतिहासकार गजानन मेहेंदळे ह्यांचे नाव फार आदराने घेण्याची गरज आहे. त्यांचा भारत इतिहास संशोधक मंडळातीळ जवळपास पाच दशके शिवचरित्राचा अभ्यास आहे. त्यांनी सुमारे अडीच हजार पानांचे शिवचरित्राचे मराठीत दोन भाग लिहिले; ज्याचे संदर्भच मुळी 7000 आहेत. इंग्रजीत पण एक शिवचरित्र त्यांनी लिहिलंय, त्याच्यात सुमारे हजार एक पानं आहेत.
आता ते काय म्हणतात ते बघूया..
शिवाजी महाराजांनी कधीही, कुठंही मशीद बांधली नाही. तुम्हाला बाकी कोणीही सांगितलं तरी माझ्याकडं पाठवून द्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, अशी एक लोकांची समजूत आहे, की त्यांनी मशीदींना इनामं दिली. त्यांनी जर दिली असती तर मी दिली असती म्हणून सांगितलं असतं. एखाद्याला वाटू शकेल की द्यायला हवी होती; पण ते त्याचं मत झालं. मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांनी दिली का नाही दिली? शिवाजी महाराजांनी मशिदीला नवीन इनाम करून दिलं असा कागदाचा एक कपटा सुद्धा नाही. तुम्हाला कोणीही काहीही सांगितलं तरी ते खोटं आहे. मी शिवचरित्रविषयक सर्व कागदपत्रं वाचलेली आहेत. सर्व.. मराठी, फ़ारसी, पोर्तुगीज.. त्यांनी कुठल्याही मशिदीला कधीही, नवीन इनाम करून दिलं नाही. मी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका, नवीन इनाम दिलं नाही. मला कागदपत्रांच्या रुपानं माहिती आहे की एखाद्या मुसलमान बादशहानं हिंदु मंदिराला नवीन इनाम करून दिलं, असं सहसा आढळत नाही. मग जी इनामं चालू राहिली ती कशी राहिली? त्यांच्या (बादशहांच्या) पदरी हिंदू सरदार असायचे. हिंदू कारकून असायचे. शेवटी आपल्या घरचा नोकर असला तरी त्याला नाही दुखवता येत. त्यानं काम नीट करायला पाहिजे असेल तर सांभाळून घ्यायला लागतं. हे हिंदू परस्पर ही इनामं चालू ठेवायचे म्हणून मुसलमानी आमदानीत काही हिंदू इनामं चालू राहिली. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा काही दोन तीन मशिदी अशा आहेत की ज्यांची इनामं चालू होती. म्हणजे पूर्वीपासून चालत आली ती. नवीन कुठलंही दिलं नाही.
शिवाजी महाराजांची उक्तीच सांगायची तर त्यांचा भाऊ आहे व्यंकोजी, त्याला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, की मी तुर्कांना (तुर्क हा शब्द मुसलमान अशा अर्थी वापरला जातो; आजही तंजावरी मराठीत मुसलमानांना तुरुक म्हणतात) मारतो, आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत तर तुझा विजय कसा काय होईल? ते होणं शक्य नाही. शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ, नार्व्याला गोव्याजवळ आहे; ते पोर्तुगिजांनी पाडलं होतं, पूर्वी मुसलमानांनी पाडलं होतं, अनेकांनी पाडलं होतं. त्याचा जिर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. वास्तविक पुण्यात त्यांना देवळं बांधायला भरपूर जागा होती. तिथलंच कशाला बांधायचं? तुम्ही जसं हट्टानं पाडलं, तसं मी ते हट्टानं बांधणार; म्हणूनच बांधलेलं आहे ते. मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. कर्नाटक तेव्हा म्हणायचे, आज तमिळनाडू आहे तो. तेथे तिरुवण्णामलाई, तिथे देऊळ आहे; शोणाचलपतीचं. ते पाडलेलं होतं; शिवाजी महाराजांनी ते हट्टानं परत बांधलं. तुम्हाला म्हणायचं तर हट्टी म्हणा; पण परत बांधलं.
आता त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते सांगतो. अलि अदिलशाहानं पाठवलेलं फ़र्मान आहे; कान्होजी जेध्यांना पाठवलेलं. मी ते फ़र्मान वाचलयं, मूळ फ़र्मान पाहिलयं, फ़ार्सी मध्ये आहे, मला फ़ारसी येतं, त्या फ़र्मानात त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांमुळं (म्हणजे त्यांनी शिवाजी म्हटलंय कारण ते त्यांच्या फ़र्मानांमध्ये शिव्या देऊनच बोलतात, ते काही शिवाजी महाराज म्हणत नाहीत पण आपण म्हणावं, की शिवाजी महाराजांमुळं) मुसलमानी धर्माची वाढ खुंटलेली आहे आणि म्हणून मी अफ़झल खानाला त्यांच्याविरुद्ध पाठवलंय असं त्या फ़र्मानात म्हटलंय..
आता त्यांच्या बाजूचे लोक, काय म्हणतात ते सांगतो. संभाजी महाराजांचं दानपत्र आहे; संस्कृतमध्ये आहे. त्यांना संस्कृत येत होतं. त्या दानपत्रावर त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेला श्लोक आहे. हे दानपत्र कुणाला पहायचं असेल तर टिळक रोडला एस.पी. कॉलेज आहे, त्याच्या मागच्या बाजूला शिक्षण प्रसारक मंडळीचं कार्यालय आहे, तिथं पूर्ण दानपत्राचा फोटो छापला गेलेला आहे. त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडलांचं वर्णन करतात. त्यावेळी अशी पद्धत होती की दानपत्रामध्ये आपल्या पूर्वजांची प्रशंसा करणं, त्यांचं मोठेपण सांगणं. त्यात असं म्हटलंय, माझे वडील “म्लेंछक्षयदीक्षित” होते. कुमारवयातच म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंछांचा क्षय करण्याची, नाश करण्याची दीक्षा यांनी घेतलेली आहे. असं कोण म्हणतं?? असं संभाजी महाराज म्हणतात ! पण आजकाल लोकं जे आहेत ते वेगळाच अर्थ सांगतात. परंतु संभाजी महाराज वेगळं सांगतात, आणि आपल्याला संभाजी महाराजांवर विश्वास जास्त ठेवला पाहिजे. गोव्याजवळ हाडपोळण या गावी संभाजी महाराजांचा एक अधिकारी होता; त्याचा शिलालेख आहे. त्याच्याकडं गावकऱ्यांनी काही कर माफ़ करण्याची विनंती केली आणि ती मान्य केली गेली याचा एक शिलालेख आहे; काय म्हटलंय त्या शिलालेखात? (त्या शिलालेखाचा फ़ोटो कमल गोखल्यांच्या संभाजी महाराजांच्या चरित्रात छापलेला आहे.) त्यात असं म्हटलंय की आता हे हिंदू राज्य झालेलं आहे !
आता तुलनेनी तटस्थ असे लोक काय म्हणतात, ते सांगतो. हेन्री रेव्हिंग्टन बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल, त्यांनी पन्हाळ्यावर महाराजांवर तोफ़ा डागल्या होत्या. त्या हेन्री रेव्हिंग्टननं शिवाजी महाराजांना पाठवलेलं पत्र आहे जे इंग्लिश रेकॉर्ड्ज ऑन शिवाजी या पुस्तकात ते पत्र छापलंय. पत्राची सुरुवात शिवाजी महाराजांना जनरल ऑफ़ द हिंदू फ़ोर्सेस असे संबोधण्यात आले आहे. म्हणजे हिंदू सैन्याचे अधिपती ! हिंदू सेनाधिपती ! असं कोण म्हणतो? इंग्रज मनुष्य म्हणतो. फ़ार हुशार होता तो आणि महाराजांना ओळखून होता. इंग्रजांचं राज्य भारतात पुढं मागं कधीतरी स्थापन करता येईल अशी स्वप्नं पहिल्यांदा पडलेला इंग्रज म्हणजे हेन्री रेव्हिंग्टन. तो इतका हुशार होता की त्याने महाराजांना ओळखलं होतं. तो म्हणूनच त्यांना जनरल ऑफ़ द हिंदू फ़ोर्सेस, हिंदु सैन्याचे अधिपती म्हणतो
आता विचार करूया की शिवाजी महाराजांच्या पदरी कोण कोण मुसलमान होते? त्यांची संख्या काय होती? त्यांच्या पदरी 1657 सालपर्यंत 4-5 मुसलमान होते. एक होता सिद्दी अंबर बगदादी; हा हवालदार होता पुण्याचा. जैना खान पिरजादे हा सर हवालदार होता म्हणजे आजच्या परिभाषेत कलेक्टर होता. बेहेलिम खान हा बारामतीचा हवालदार होता. परंतु 1657 नंतर यांचा कुठेही नामोल्लेख आढळत नाही. त्यानंतर मात्र एक सुद्धा मुसलमान मुलकी अधिकारी नेमण्यात आला नाही. काही लोक खूप पुकारा करतात की नूर खान बेग होता. नूर बेग हा सरनौबत होता. तो ही या 10 मार्च 1657 च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो. त्यानंतर नूर खान बेग कुठेतरी अदृष्य झाला. आता सिद्धी हिलाल. तो महाराजांकडं येऊन जाऊन होता. कधी अदिलशाहीतही होता, पण तो होता कोण मुळात? तो होता खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र. क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम, पण मुलाप्रमाणे घरात वाढवलेला. त्याला क्रीतपुत्र म्हणतात. तुम्हाला मला प्रश्न पडेल की त्याला हिंदू का नाही करून घेतलं? बरोबर आहे का नाही? तर अडचण अशी होती की त्या काळामध्ये जो जन्मानं हिंदू नाही त्याला हिंदू करता येत नव्हतं. एकोणीसाव्या शतकापर्यंत असा एकही माणुस नाही की जो जन्मानं हिंदू नाही त्याला हिंदू केलं.
एकाएकी कुणी एक मुसलमान आणि ख्रिश्चन आलाय आणि तो म्हणलाय मला हिंदू करा, ते शक्य नव्हतं. कारण प्रश्न असा असायचा की त्याला जात कोणती द्यायची? हिंदू धर्मातली कुठली ही जात म्हणायचे आमच्याकडे हा नको. त्यामुळं एखादा तयार झाला तरी त्याला करता येत नव्हतं.
नेताजी पालकराच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे, नेताजी जन्मानं हिंदू होता. त्याला जबरदस्तीनं बाटवलं, त्याला हिंदू करता येतं. जो जन्मानं हिंदू नाहीच, किंवा ज्याचे वाडवडील पण हिंदू नाहीत त्याला हिंदू करता येत नव्हतं. नाहीतर सिद्दी हिलाल तो हिंदूच झाला असता. आता त्यांचे दोन नौसेनाधिपती, नौदलाचे अधिकारी मुसलमान होते. एक होता दौलतखान आणि दुसरा दर्यासारंग. त्या दर्यासारंगाला महाराजांनीच 1679 साली अटक केली.
जेव्हा भारत 1947 साली स्वतंत्र झाला त्यानंतर 10 वर्षं भारतीय नौदल आणि भारतीय हवाई सेना यांचे प्रमुख ब्रिटिश होते; भारतीय नव्हते. कारण आपल्याकडं एवढे अनुभवी त्या क्षेत्रातले लोक नव्हते. इंग्रजांनी तेवढी वरची पदं आपल्याला दिलीच नव्हती. हीच परिस्थिती महाराजांच्या नौदलाच्या बाबतीत होती की त्यावेळेला आपल्याकडे एवढे अनुभवी अधिकारी नव्हते म्हणून हा दौलतखान होता. त्यांच्या नियंत्रणात होता आणि त्यानंतर मात्र आंग्रे आणि धुळुक होते, बाकी परत मुसलमान अधिकारी दिसत नाही; कधीही नाही. एकदाच तो सुरुवातीला होता, आपल्या लोकांना ट्रेनिंग मिळेपर्यंत, तेवढचं; नंतर नाही. जेव्हा महाराजांनी अफ़झलखान वध केला तेंव्हा त्यांचे जे 10 अंगरक्षक होते त्यात एक मुसलमान होता. सिद्दी इब्राहिम त्याचं नाव, त्याची स्थिती थोड्या बहुत प्रमाणात सिद्दी हिलाल प्रमाणेच स्थिती होती. आता मदारी मेहेतर, ते खोटं आहे, खो आणि ट.. खोटं !! त्यात एक टक्का सुद्धा सत्यता नाही.
तेव्हा अशी काही मोजकी नावे सोडली तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान अधिकारी कोणीही नव्हते. त्यांचा फ़ार्सी क्लार्क होता कारण फ़ार्सी लिहायला कुणीतरी लागतं. त्याचे नाव होते काझी हैदर परंतु तो 1682 साली संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला जाऊन मिळाला. तेव्हा काझी हैदर याला कसं काय महाराजांचा प्रामाणिक माणूस म्हणायचं?
त्यामुळे जेव्हा लोक भलत्याच काहीतरी गोष्टी सांगू लागतात तेव्हा जे खरं आहे ते सांगणं हे इतिहासकाराचं काम आहे आणि तेच मी करत असतो.
गजानन मेहेंदळे
त्यामुळे निदान ह्यानंतर तरी सत्यता पडताळून बघितल्याशिवाय ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. अशा गोष्टी पसरविण्यात ज्यांचा हात आहे त्यांचा अंतस्थ हेतू लक्षात घ्या; उगाच बळी पडू नका.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com