आपल्या भारत देशाएवढा ढोंगीपणा जगात दुसऱ्या कुठल्या देशात नसेल. आपण गप्पा तर मोठ्या मारतो आणि आपल्या दैदिप्यमान भूतकाळाबद्दल गुणगान गाताना आम्ही थकत नाही. परंतु प्रत्यक्षात काय दिसते?
इंग्रजीसह जगातल्या अनेक भाषांत मद्यावर कथा, कविता, नाटक असे ललित साहित्य सापडते. दारू पिणे हे काही फार मर्दुमकीचे किंवा फुशारकी मारण्याचे काम नक्कीच होऊ शकत नाही, पण त्याचबरोबर जगातला एक फार मोठा वर्ग मद्यपान करतो, हेही विसरता येणार नाही. परंतु भारतीय समाजात दांभिकता ठासून भरली आहे. त्याचाच परिपाक म्हणजे पूर्वी मराठी कविता म्हटली की लगेच समाज प्रबोधन, सामाजिक बांधिलकी किंवा फार तर फार प्रणय हाच दृष्टिकोन ठेवला जायचा. या पलीकडे देखील मराठी कविता भावनांचे अनेक तरंग दाखवू शकते हे साठीच्या दशकात बहुदा माहीतच नव्हते.
आता तुम्हाला एक आचरटपणाचा कळस असलेली गोष्ट सांगतो. गदिमांसारखा प्रतिभावंत कवी आणि गीतकार मराठी भाषा समृद्ध करायलाच देवाने पाठवला असावा आणि त्यांच्या गीतांना सुधीर फडके यांचे स्वर आणि संगीत असा दुग्धशर्करा योग जुळून येऊन सुद्धा एखाद्या गीताची कशी पार वाट लागते ते बघा.
धुंद येथ मी, स्वैर झोकितो मद्याचे प्याले |
याच वेळी तू असशील तेथे बाळा पाजविले ||
गदिमा रचित आणि सुधीर फडके यांनी गायलेले हे एक अतिशय सुमधुर आणि भावपूर्ण गीत आहे. मद्य घेतानाची तरल अवस्था आणि धुंदावस्थेत असूनही घरात असलेल्या बाळाची आणि त्याच्या आईची काळजी, असे दुहेरी पातळीवरील वर्णन आहे. मद्य सेवन करणारा "मी" धुंद होत असताना सुद्धा शुद्धीवर आहे. एकाच वेळी मद्याचा आस्वाद चालू आहे पण त्याचबरोबर कुटुंबाची काळजी आहे. मद्याच्या नशेत एका मद्यप्याने केलेले हे प्रकट चिंतन आहे. ही क्षणिक उपरती आहे की त्याला झालेला साक्षात्कार, कोण जाणे! पण दारू चढली की निदान तेवढा वेळ तरी माणसे बहुधा खोटे बोलत नाहीत, असे पाहण्यात आले आहे. म्हणूनच ‘In vino veritas’ (in wine, there is truth) असे प्लिनी द एल्डर याने इसवी सन 77 मध्येच लिहून ठेवले होते. दारूच्या नशेत लोक काय वाटेल ते बरळतात, रडतात, पश्चात्ताप व्यक्त करतात, भांडतात, हसतात, आणि मनात दडलेली गुपिते बाहेर काढतात.
सुधीर फडके यांचा हा तळीराम या अशा मद्यजन्य पश्चात्तापाच्या मूडमध्ये असताना हे हृदयस्पर्शी शब्द उद्गारतो. ते ऐकून दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते किंवा अन्य कर्मठ गांधीवादीसुद्धा खरं म्हणजे हेलावून जायला हवे होते, पण आपल्या देशात तसे होत नाही. तत्कालीन सनदी अधिकाऱ्यांच्या नोकरशाहीने ‘धुंद येथ मी, स्वैर झोकितो’ या गाण्याला आकाशवाणीवर वाजविण्यास बंदी घातली.