बॉलिवूड मध्ये अनेक प्रसिद्ध दिग्दर्शक होऊन गेले. कमाल अमरोही, के आसिफ, बिमल रॉय, हृषिकेश मुखर्जी, गुरुदत्त, यश चोप्रा, राज कपूर, गुलझार ही काही वानगीदाखल नावे. पण या सर्वांपेक्षा आगळावेगळा आणि कलंदर दिग्दर्शक म्हणजे गोल्डी.
विजय आनंद (22 जानेवारी 1934 - 23 फेब्रुवारी 2004), ज्याला गोल्डी म्हणूनही ओळखले जाते, जो निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, एडिटर आणि अभिनेता होता.
अनेक तरुण बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शकांसाठी, “गोल्डी” हा कायमच बॉस राहिला आहे. त्याचे कथा कथन कौशल्य आणि गाण्याच्या सीक्वेन्स शूट करण्यातील त्याच्या प्रभुत्वाबद्दल ते अचंबित होतात. काहींनी त्यांना असलेली गोल्डीबद्दलची भुरळ अगदी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. श्रीराम राघवनचा जॉनी गद्दर त्याला समर्पित आहे आणि अनेक बारीक गोष्टींमधून गोल्डीला सलाम ठोकला आहे. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये प्रशिक्षित झालेल्या या दिग्दर्शकाकडून झालेला हा सन्मान खूप मोठा आहे कारण सर्वसाधारणपणे त्याने इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा आणि सत्यजित रे यांचे कौतुक करावे अशी अपेक्षा आहे. पण राघवन आणि त्याच्या समवयस्क दिग्दर्शकांनी भले ह्या आंतरराष्ट्रीय दिग्गज्यांचे काम बघितले असेल, पण व्यावसायिक हिंदी चित्रपटाची भाषा आणि त्यातील बारकावे शिकण्यासाठी त्यांनी गोल्डीची गाणीच पुन्हा पुन्हा पाहिली असतील. कारण अखेरीस त्यांना बॉलीवूडमध्ये काम करायचे होते आणि त्यामुळे गोल्डीच्या कामाचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्यांना नक्कीच फायदा झाला असेल.
गोल्डीने जरी फक्त 16 चित्रपट दिग्दर्शित केले असले तरी, सात वर्षांच्या कालावधीत त्यांनी पाच असाधारण चित्रपट केले ज्यामुळे खऱ्या अर्थाने त्याच्या चाहत्यांमध्ये गोल्डी कल्ट मजबूत झाला. नौ दो ग्यारह आणि काला बाजार हे चित्रपट जरी मनोरंजक आणि जबरदस्त गाण्यांनी भरलेले असले तरी, 1970 च्या दशकात वयात आलेल्या लोकांच्या आठवणीत ते राहणे जरा कठीण आहे. पण ते पाच चित्रपट - तेरे घर के सामने (1963), गाईड (1965), तिसरी मंझिल (1966), ज्वेल थीफ (1967) आणि जॉनी मेरा नाम (1970) - चाहत्यांच्या आणि हिंदी चित्रपटाच्या संपूर्ण पिढीच्या आणि इतर निर्माता दिग्दर्शकांच्या कायम स्मरणात राहतील.
खरं म्हणजे या पाच चित्रपटांच्या प्रभावाबद्दल कोणीतरी लिहायला हवे. मला आठवते की आम्ही संपूर्ण कुटुंब 'तेरे घर के सामने' हा चित्रपट फक्त त्यातील गाण्यांसाठी दर 3 महिन्यांनी व्हिडिओ कॅसेट भाड्याने घेऊन पहायचो. तीसरी मंझिल, ज्वेल थीफ आणि जॉनी मेरा नाम हे आमचे कॉलेजला दांड्या मारून पाहण्याचे आवडते चित्रपट होते आणि आजही ते माझे सर्वकालीन फेव्हरिट सिनेमे आहेत. उत्तम गाणी आणि स्वतः गोल्डीचे अफलातून संकलन (editing) असलेल्या या सर्व चित्रपटांनी प्रेक्षकांना विचार करण्याची संधी दिली नाही किंवा पापणीही लवू दिली नाही. हे तीन चित्रपट आम्ही मित्रांनी कधीही न कंटाळता अनेक वेळा पाहिले असतील. तीसरी मंझिल किंवा ज्वेल थीफ यातील रहस्य कळल्यानंतर देखील प्रेक्षक पुन्हा येत होते यातच गोल्डीचे मोठेपण होते. लिव्ह-इन रिलेशनशिप दाखविणारा गाईड हा काळाच्या खूप पुढे असणारा चित्रपट होता.
मी गोल्डीच्या मोठ्या मनाची एक गोष्ट ऐकली आहे. पब्लिसिस्ट आणि गोल्डीचा मित्र, अमरजीत गोल्डीसोबत चेतन आनंदच्या घरी राहत असे. एकदा, गोल्डी आजारी पडला आणि अमरजीतने त्याला प्रेमाने सांभाळले. तो त्याला सूप पाजायचा, त्याचे पाय चेपायचा आणि ताप देखील चेक करायचा. गोल्डीने त्याला दिग्दर्शक करण्याचे वचन दिले होते. पुढे गोल्डीने हम दोनो (1961) ची तपशीलवार स्क्रिप्ट लिहिली ज्यामध्ये एंट्री, एक्झिट, कॅमेरा प्लेसमेंट हे सर्व काही ठरवून दिले जेणेकरून अमरजीतला दिग्दर्शन करताना अडचण येऊ नये. पण तरी देखील अमरजीतला ते जमत नव्हते. शेवटी गोल्डीने चित्रपट दिग्दर्शित केला पण वचनानुसार अमरजीतला दिग्दर्शनाचे श्रेय दिले.
- तेरे मेरे सपने अब एक रंग है मधील उगवत्या सूर्याबरोबर जागृत होणारे प्रेम..
- पल पल दिल के पास मध्ये कागदावरील स्वप्ने..
- दिल का भंवर मधील प्रेमाचा अनोखा अविष्कार.. एक सुंदर चित्रित केलेले गाणे. दिल्लीची अनुभूती मिळावी म्हणून कुतुबमिनारमध्ये चित्रीकरण करण्यात आले. देव-नूतन ही जोडी मित्र म्हणून वर चढते पण जेव्हा ते खाली येतात तेव्हा ते प्रेमी असतात.
- एक घर बनाऊंगा या गाण्यात कॅमेरा ट्रिक्स होत्या - नूतन व्हिस्कीच्या ग्लासमध्ये दिसते. मग देवचा सहाय्यक ग्लास मध्ये बर्फाचा तुकडा टाकतो आणि नूतन थंडीने शहारते.
- नौ दो ग्यारहमध्ये आजा पंछी अकेला है हे चित्रपट एका मर्यादित जागेत (एक खोली आणि एक शौचालय!) चित्रित करण्यात आले होते.
- रिम झिम के तराने (काला बाजार) देव आनंद आणि वहिदा रेहमान यांच्या छत्रीखालील अव्यक्त प्रेमामुळे लक्षात राहते.
- हम दोनोने अल्ला तेरो नाम आणि अभी ना जाओ छोड कर ही अमर रत्ने दिली.
त्याच मुळे गाण्यांच्या सर्जनशील चित्रीकरणाने गोल्डीच्या चित्रपटाची कथा पुढे सरकत असे. तो एकदा म्हणाला होता, “माझा कॅमेरा गाणे ऐकतो आणि माझ्यासोबत फिरतो”. लॉंग शॉट्स, रम्य पार्श्वभूमी आणि तीव्र विरोधाभास याचा वापर करून गोल्डी गद्यातील कविता बाहेर काढत असे. गोल्डी निःसंशयपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक होता. दिग्दर्शक म्हणून त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत त्याने critical acclaim आणि व्यावसायिक यशाचा आनंद लुटला. खरं तर गोल्डीची गणना all time greats मध्ये व्हायला हवी होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. बऱ्याच दिग्दर्शकांचे कदाचित त्याच्यावर प्रेम असेल आणि हिंदी चित्रपटांबद्दल बोलताना त्याचा उल्लेख नक्कीच होत असेल परंतु दुर्दैवाने, इतर अनेकांना मिळालेला आदर त्याला दिला जात नाही.
बॉलीवूडच्या महान दिग्दर्शकांपैकी एक - विजय आनंद (गोल्डी).
@ यशवंत मराठे