हम नही सुधरेंगे!!

अमेरिकन शेती खात्याने एक विशेष कार्यक्रम 2011 पासून हाती घेतला आहे. गावोगावी फिरून प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांच्या शेतकऱ्यांचे ते प्रबोधन करीत आहेत.

रासायनिक शेती, म्हणजे कृत्रिम खते व किटकनाशके आणि ट्रॅक्टर जेथे वापरला जातो तेथे मोठ्या प्रमाणावर जमिनीतील सेंद्रिय पदार्थ (म्हणजेच मुळांचे व अन्य वनस्पती व प्राण्यांचे कुजणारे किंवा कुजलेले अवशेष) नष्ट होऊन जातात. अशी जमीन कितीही चांगली आणि सकस असली तरी काही वर्षांतच अनुत्पादक होते. म्हणजेच तिच्यातील सजीवांची संख्या घटत जाते. ही झाली जमिनीतील जीवांची विषबाधा.

जमिनीवर पडणारे मृत प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष कुजवून त्यांना मातीचे फूल (म्हणजेच ह्युमस) बनवणारी गांडुळे, वाळवी, मुंग्या व इतर प्राणी तसेच विवीध प्रकारच्या बुरशा आणि इतर सुक्ष्मजीव नाहीसे होतात. मातीची सच्छिद्रता नाहिशी होते. तिचा रंग तिच्या आधीच्या रंगापेक्षा खूपच फिकट होतो. अशी माती कॉंक्रिट सारखी कडक व मजबूत वाटते. कोरडी असताना ती तशी असते सुध्दा त्यामुळे मुळांची वाढ खोलपर्यंत होत नाही. ही माती पाणी पिऊ शकत नाही. त्यामुळे ती पिकाचे नीट संगोपन करू शकत नाही.

पण प्रत्यक्षात ती माती ठिसूळ असते. पाणी लागताच तिचा सगळा कडकपणा निघून जातो व तिची धूप होण्यास सुरूवात होते. पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी अशा मातीत मुरू शकत नाही. उत्पादन कमी होते. पाण्याच्या जास्त पाळ्या द्याव्या लागतात. मुळांची लांबी आणि खोली कमी असल्यामुळे जास्त खते दिल्याशिवाय उत्पादन येत नाही. उत्पादन खर्च वाढत जातो आणि उत्पन्न मात्र घटत जाते. या सर्वांचा परिणाम नापिकी आणि शेतकरी कर्जबाजारी होणे हा होतो.

हे सर्व अमेरिकी शेतकी खात्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी नैसर्गिक शेती पध्दतींमधे काय घडते त्याचा अभ्यास केला. तेथील माती सच्छिद्र व सजीव दिसते. ती पाणी पिऊ शकते व प्यायलेले पाणी हळुहळू खूप वेळापर्यंत पिकाला देऊ शकते. सेंद्रिय पदार्थ शोषून घेऊ शकते. पिकांच्या मुळांना वाढायला, खोल आणि दूरवर जायला मदत करते. विविध जीवांच्या आंतरक्रियेमुळे वनस्पतिंच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती निर्माण करते. या सर्वांची माहिती ते त्यांच्या शेतकऱ्यांना देत आहेत.

आपले पूर्वज अशीच निसर्ग स्नेही शेती करत होते. ऋषी पंचमीचा स्वयंपाक करताना आपण, ट्रॅक्टर सोडाच, बैलांच्या सुध्दा श्रमाची उत्पादने वापरत नव्हतो हे आपण जवळ जवळ विसरूनच गेलो आहोत. कधी होणार आपण शहाणे? कधी करणार आपल्याच पूर्वजांच्या ज्ञानाचा उपयोग? आणि ती ही आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षित भविष्याकरता? का वाट पहात बसणार कोणी अमेरिकन त्याचे पेटंट घेईपर्यंत?

आता विचार करूया; माती म्हणजे काही फक्त दगडांची भुकटी नाही. दगडांवर ऊन-पाऊस आणि जीव-जंतू व वनस्पती आणि प्राणी यांचा वर्षानुवर्षे परिणाम होऊन आणि विविध सूक्ष्म जीव व वाळवी, गांडूळे, मुंग्या, डोंगळे, ढालकिडे आणि विविध प्रकारच्या बुरश्या या सर्वांच्या आंतरक्रिया यांचा समावेश असतो. या सर्व जीवांना आवश्यकता असते ती पोषक परिस्थितीची. ही पोषक परिस्थिती त्यांना अन्न, पाणी, आर्द्रता आदी सर्व बाबी पुरवते. तसेच विषारी पदार्थांचे विष कमी करण्यास उपयोगी असते. आधुनिक मानवाच्या शेती पद्धतीत कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके इत्यादीचा वापर सुरू झाला. ही सर्व नाशके विषेच होत. या विषांनी उपयुक्त जीव ही मारून टाकले. ही झाली मातीतल्या जीवांची विषबाधा.

डॉक्टर जगदीशचंद्र बोसांनी वनस्पतीलाही जीव असतो, भावना असतात, त्यांनाही विषारी पदार्थांनी त्रास होतो हे सप्रमाण सिद्ध केले. तोपर्यंत सर्व पाश्च्यात्य शास्त्रज्ञ मात्र वनस्पतींना निर्जीव भावनाहीन समजत असत. तसेच कालपरवा पर्यंत मातीलाही सजीव म्हणून महत्व देणे पाश्चात्य शास्त्राला समजत नव्हते. पण माती सजीव आहे आणि तिला विषांचा त्रास हा होतोच.

जमिनीतील जीवांचे कुपोषण /उपोषण

आधुनिक शेतीत जमिनीतील जीवांचे कुपोषण होत आहे आणि त्यांना उपाशीही राहावे लागत आहे. आधुनिक शेतकरी शेत एकदम स्वच्छ ठेवतो. पाश्चात्य शास्त्रज्ञ आणि तिकडून शिकून आलेल्या भारतीय शास्त्रज्ञांनी तशी शेताची स्वच्छता लोकांच्या मनावर बिंबवली आहे. ही स्वच्छता करताना आधीच्या पिकाचे काहीही भाग मातीत राहणार नाही याची काळजी घेतली जाते. हे भाग जाळून नष्ट केले जातात. खरे तर हे सर्व भाग जमिनीतील जीवांचे अन्न असतात. ते अन्न त्यांना न मिळाल्याने ते जीव उपाशी राहतात.

शेणखत, हिरवळीचे खत, लेंडी खत आणि इतर सेंद्रिय खते ज्या प्रमाणात शेतात टाकायला हवीत त्या प्रमाणात ती टाकली जात नाहीत. त्यामुळेही हे जीव उपाशी आणि कुपोषित राहतात. जमिनी मृतप्राय होतात.

यावर उपाय आहे आणि तो श्री सुरेश देसाई, सौ करूणा आणि श्री वसंत फुटाणे, सावे गुरुजी, राजेंद्र भट. मोहन शंकर देशपांडे, श्री अ दाभोलकर, सुभाष पालेकर आणि अशा अनेक शेतकऱ्यांनी नैसर्गिक, जैविक, सेंद्रिय, आच्छादनाची, परमाकल्चर शेती करून वरील आजारावर उपचार करता येतो हे सिद्ध केले आहे. हिरव्या किंवा वाळलेल्या वनस्पतींचे आच्छादन जमिनीतील जीवांना पोषण आणि चौरस आहार देते. धनकवडीच्या माधवी सावंत यांनी तर कमालच केली. त्यांनी त्यांच्या इमारतीच्या छतावर केवळ नारळाच्या शेंड्या आणि फणसाच्या पाल्याच्या तीन इंच थरावर अतिशय सुंदर बाग बनवली आहे. अशा शेतांना आणि बागांना सिंचनाचे पाणी ही खूप कमी लागते.

सद्य काळातील जागतिक तापमान वाढीच्या काळात सामान्य शेतकरी, नागरिक, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यावरण तंत्रज्ञ, पर्यावरण नियामक आणि स्थानिक स्वराज्य संस्था काय करू शकतात ?

शेतकरी

आज बऱ्याच ठिकाणी फायदेशीर नाही परंतु नाईलाज म्हणून बरेच शेतकरी शेती करतात. पुढची पिढी या पारंपरिक क्षेत्रात येण्यास नाखूष असते कारण शेतकऱ्याची पत या समाजात नाही. आजूबाजूच्या वीट भट्ट्यांमुळे कामाला मजूर मिळत नाहीत. अनेकदा असे लक्षात येते की काहीतरी पैसे मिळावे म्हणून शेतकरी त्यांच्या शेतातील माती या भट्ट्यांना विकतात. अशा जमिनीचे कालांतराने काय होणार? एक नापीक खडकाळ जमीन. या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल शेतकऱ्यांनी वरील दिलेल्या उदाहरणांची चक्क नक्कल करावी. त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. पाणी कमी लागेल आणि शेतीत कृत्रिम रसायने वापरणे कमी अथवा पूर्ण बंद करणे देखील शक्य होईल. स्वतःच्या कुटुंबाकरिता लागणारे बहुतेक सर्व अन्नधान्य, कडधान्य, शक्य झाल्यास तेलबिया सुद्धा आपल्या शेतात वाढवाव्या. शहरी बडेजावातील पोकळपणा जाणून घेऊन शहरांची नक्कल किंवा शहरी नातेवाईकांची नक्कल करण्याचे टाळावे. आपण आपल्या वावराचे राजे व सेवक या वृत्तीने राहावे. पुढील थोड्याच वर्षात तुम्हाला त्याचे फायदे दिसू लागतील.

नागरिक

नागरिकांनी शेतकऱ्यांशी दोस्ती करावी आणि त्यांना शेतमालाला रास्त भाव द्यावा. शहरे ही पूर्णपणे परजीवी आहेत. शहरात ना अन्नधान्य तयार होत ना भाजीपाला ना दूधदुभते. शहरी बैठी जीवनशैली व चुकीचे आहारविहार मोठया प्रमाणावर अनारोग्य निर्माण करतात आणि पैशानी आरोग्य विकत घेता येत नाही. छोट्या छोट्या कृत्यांमधून होणारा पाणी, अन्न, कागद, ऊर्जा, यांचा अपव्यय टाळावा.

उद्योजक आणि कारखानदार

यांनी स्वतःची जबाबदारी ओळखून चुकीच्या पद्धतीने विषारी द्रव्ये हवा, पाणी, माती अन उत्पादने यांमध्ये घालणे बंद करावे. पर्यावरण शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि नियामकांच्या योग्य सल्ल्यानुरुप वागावे आणि आपल्या उत्पादनाची कर्ब पदचिन्हे (कार्बन फूट प्रिंट) कमीत कमी ठेवावी.

पर्यावरण शास्त्रज्ञ

अमेरिकेतील युएसइपीए (USEPA) नी दिलेल्या मानकांचाच उदो उदो न करता आजच्या परिस्थितीतून अधिक चांगले कसे करता येईल याचा विचार करावा. आपल्या समोर असलेल्या प्रश्नांना सोप्या किफायतशीर पद्धतीने कसे सामोरे जावे याचा विचार व संशोधन करावे.

पर्यावरण तंत्रज्ञ

यांनी सोपे परिणामकारक तंत्रज्ञान वापरून इतरांना शिक्षण देण्याची तयारी दाखवावी. फक्त महागडे इंपोर्टेड तंत्रज्ञानच चांगले असा विचार न करता समयोचित तंत्रज्ञान वापरावे ज्यायोगे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

पर्यावरण नियामक

आपल्या शेतकऱ्यांना शेताकरता नत्र, स्फुरद, पालाश व इतर वनस्पती पोषकांची गरज आहे. ओल्या कचऱ्यात ही पोषके आहेत. ओल्या कचऱ्याला समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहण्याची दृष्टी नियामकांनी तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योजक, कारखानदार आणि सामान्य नागरिकांनाही द्यावी. असे प्रकल्प अनेकांनी केले आहेत आणि ज्यांची माहिती सर्वदूर पोहोचवावी.

शेतकऱ्याशी मैत्री

शेतकऱ्याशी मैत्री करणे, निसर्गाशी व जंगलांशी मैत्री करणे म्हणजे फ्रेंडशिप विथ फार्मर आणि फ्रेंडशिप विथ फॉरेस्टस्. शेतकऱ्याशी मैत्री म्हणजे ग्रामीण भारताची शहराची मैत्री.

आपण शहरी किंवा निमशहरी लोक, नेहमी आपल्याला अनावश्यक असे अनेकानेक पदार्थ कचरा म्हणून घराबाहेर फेकून देतो. आपल्या घरांना आवार, परसू अशा काही जागा नसतातच. तो कचरा कुठेतरी जातोच. ही 'कुठेतरी' नावाची जागा शक्यतोवर आपल्या वस्ती पासून खूप दूर असेल अशी व्यवस्था करण्याचा आपण सामुहिक लोकशाही प्रयत्न करतो. आपल्याला कदाचित ती जागा दूर असल्यामुळे त्याचा त्वरित त्रास होत नाही पण तो कचरा 'डंपिंग ग्राउंड' किंवा 'क्षेपणभूमी' नामक ठिकाणी पडून राहतो किंवा जाळला जातो. पाऊस पाण्यात सडतो, हवेबरोबर उडतो. आपल्या कचऱ्याचा तिथल्या स्थानी लोकांना खूपच जाच होतो, त्रास होतो. तसेच त्यामुळे भूगर्भातील पाणी अशुद्ध होते, विषारी होते. हवा विषारी होते. रोगराई पसरते. मग त्या कचऱ्याचा उपद्रव कचरा उत्पादक शहरी लोकांना सुद्धा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या होऊ लागतो.

शेतकरी, सेंद्रिय उत्पादन घेऊ शकत नाहीत याचे कारण त्यांच्या मातीतील सेंद्रिय कर्ब खूप कमी झाला आहे. यामुळे शहरी लोकांना सुद्धा चांगला आरोग्यपूर्ण भाजीपाला व विषमुक्त अन्न मिळणे दुरापास्त झाले आहे.

असा कचरा वाट्टेल तसा घराबाहेर फेकून न देता त्याचे योग्य वर्गीकरण केल्यास त्यापासून होणारे त्रास कमी करता येतात. उलट त्यापासून संसाधन निर्मिती करता येते. ओला कचरा वेगळा एकत्र करून त्याला शेतकऱ्यांच्या शेतात अथवा दगडाळ मुरमाड जमिनीवर नेऊन त्यातील पदार्थांचे विविध जीवाणू कल्चर वापरून अथवा न वापरता नैसर्गिकरित्या विघटन करून त्यापासून नैसर्गिकरीत्या सेंद्रिय कर्ब वाढवता येतो.

मात्र या कचऱ्यात अशाच वस्तू एकत्र केल्या पाहिजेत ज्या कुजून खत बनू शकतील. उदाहरणार्थ निवडलेल्या भाजीपाल्याची देठं, शहाळं, पेपर, माशांचे खवले, काटे, हाडे इत्यादी नैसर्गिकरित्या विघटन होणाऱ्या वस्तूच हव्यात. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या बाटल्या, पत्रा, काच, प्लास्टिक, सॅनेटरी नॅपकिन सारख्या कोणत्याही वस्तू त्यात येऊ देऊ नयेत.

वरील प्रमाणे वर्गीकरण केलेल्या वस्तू मैत्री केलेल्या शेतकऱ्याच्या शेतात नेल्या जाऊ शकतात. त्यावर योग्य प्रक्रिया करून त्याचं खतात रूपांतरण करणे व त्यापासून भाजीपाला निर्माण करणे हे त्या शेतकरी मित्रांचे काम असेल. शेतकरी मित्राच्या शेतात निर्माण झालेला भाजीपाला हा सेंद्रिय भाजीपाला असेल ज्यावर कोणतीही रासायनिक फवारणी झाली नसेल. असा भाजीपाला मिळणे हा शहरी लोकांचा फायदा. तसेच रासायनिक खत न वापरल्यामुळे केमिकल मुक्त अन्न मिळेल आणि शेतकऱ्यांची उन्नती होऊ शकेल. अशी आहे फ्रेंडशिप विथ फार्मस संकल्पना.

फ्रेंडशिप विथ फॉरेस्टस्

ओल्या कचऱ्याचे व्यवस्थित वर्गीकरण केल्यानंतर त्याचा जंगल वाढीसाठी सुद्धा वापर करता येऊ शकतो. वर्गीकरण केलेला ओला कचरा जंगलात योग्य पद्धतीने टाकल्यामुळे तेथे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर जमिनीवर ते आच्छादनाचे काम करते. त्यामुळे जमीन जास्त तापत नाही. कचऱ्याचे जेथे आच्छादन असेल तेथे नैसर्गिक खत मिळते. असे केल्यास ओल्या कचऱ्याच्या विघटनासाठी लागणाऱ्या जागेची बचत होईल व उजाड जंगल जमिनींना सुद्धा नवसंजीवनी मिळेल. ओल्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल. तसेच तेथे येणाऱ्या पावसात आणखीन जास्त प्रमाणात वनस्पती निर्माण होतील.

शहरे आणि गावे यांनी डम्पिंग ग्राऊंड बाबत एकमेकांशी संघर्ष करून जंगले व पर्यावरणाच्या उरावर बसण्याऐवजी अशा प्रकारे समन्वयाने वागले तर शहर, गाव, शेती व जंगल सगळ्यांचं भलं होईल.

सांडपाण्याशी मैत्री

शेतकऱ्यांची वनस्पती पोषकांची गरज आणखी एका पद्धतीने पुरवता येऊ शकते. मानवी वापरातून निर्माण होणारे सांडपाणी या पोषकांनी परिपूर्ण असते. ते जर एका चौरस मीटरला एक किंवा दोन लिटर या मापाने ओसाड जमिनीवर किंवा शेतावर पसरले तर त्यातून शेताला सेंद्रिय कर्ब आणि पोषके सुद्धा मिळतील. यामुळे दुर्गंधी व प्रदूषण निर्माण न होता उजाड जमिनींना सुद्धा नवसंजीवनी मिळेल. रासायनिक खत न वापरल्यामुळे नदी ओढे यांचे पाणी प्रदूषित होणे टळेल. यातून वने, उपवने आणि जंगल निर्मिती सहज होऊ शकते.

स्थानिक स्वराज्य संस्था

गावात ग्रामपंचायत आणि शहरांमध्ये नगरपंचायत, परिषद, किंवा महापालिका या स्वराज्य संस्थांनी हे ध्यानात घ्यायला हवे की जगण्यासाठी अन्नच लागते आणि ते स्वच्छ, शुद्ध असले तर आरोग्यदायी असते. यामुळे आपले कायदे असे करावे की जे पर्यावरण स्नेही असतील. असे कायदे न पाळणाऱ्यांना शिक्षा आणि पाळणाऱ्यांना पारितोषिके द्यावी. आपल्या गावाचे शहराचे किंवा महानगराचे तारणहार आपणच आहोत हे जाणून ते उत्तरदायित्व निभवावे. खोट्या महागड्या यंत्रणा बसवून त्या चार-पाच महिन्यात नादुरुस्त होऊन जनतेचा पैसा आणि पुढील पिढ्यांची संसाधने वाया जाणार नाहीत यावर लक्ष द्यावे.

एअर कंडिशनिंग

घरे आणि कार्यालये थंड करण्याचे तंत्रज्ञानच जगाला तापमान वाढीकडे नेते आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटाने या बाबत सर्वांचे डोळे उघडणारे संशोधन मांडणारा परिणामकारक विडिओ यु ट्यूब वर "द क्रुएल आयरनी ऑफ एअर कंडिशनिंग" या नावाने आहे

https://www.youtube.com/watch?v=fbhLBBcm2Fg

ज्या अमेरिकेनी जगाला यांत्रिक आणि रासायनिक शेती शिकवली. तीच अमेरिका आता त्यांच्या शेतकऱ्यांना रासायनिक व यांत्रिक शेतीचे दुष्परिणाम समजावून देते आहे. ते सुधारत आहेत. आपण कधी सुधारणार?

https://youtu.be/q1aR5OLgcc0

फक्त हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच लोक प्रत्यक्षात जीवनशैली बदलून 100% पर्यावरणस्नेही होऊ शकतात हे मान्य करावेच लागेल. पण आपल्यासारख्या इतरांना त्याची निदान जाणीव तरी आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळात परिणामकारक निर्णय घेतले नाहीत तर विनाशाकडे चाललेली आपली वाट अजून द्रुतगतीने मार्गक्रमण करेल.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

(with Technical Inputs from Dr. Ajit Gokhale, Natural Solutions)

जर तुमच्यापैकी कोणालाही जर या अभियानात सहभागी होण्याची इच्छा असेल तर तुम्ही डॉ. अजित गोखले यांच्याशी संपर्क करू शकता.

ajit.naturalsolutions@gmail.com

Leave a comment



Deepak Vaidya

4 years ago

For Air conditoning a superior low cost forced convection using assisted natural cooling ican be used for big complexes. Below ground at 2-3 meter level soil is cooler than air. A tunnel is made at 2-3 mtr deprh with sprinking of water in it. An induced air draft is made to take cool air to the areas to be cooled. Exhaust from this is mixed with surrounding hot air as input to cooling tunnel. NIIT university at Nimrana Rajasthan ia using this techniqe to cool all buldings in their complex including hostels. This is very economical and environment friendly,low maintainance to run system as electrical load is very less. My son studied there so I know. Air is healthy and it is slightly moist compared to dry air from conventional airconditioners.

Your article is very nice & informative

Ashok Prabhu

4 years ago

अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे.
ह्या लेखाच्या प्रती प्रत्येक ग्राम पंचायत तसेच स्वराज्य संस्था यांच्याकडे पोचल्या पाहिजेत,जेणेकरून या सूचना काही प्रमाणात अमलात आणता येतील.
डॉक्टर गोखले साहेबाना आणि आपणास खुप खुप धन्यवाद.

सुरेश गो वैद्य

4 years ago

लेख फार चांगला आहे। धन्यवाद। श्री मोदी मुख्य मंत्री असताना कृषि विभागातील सर्व Phd व M Sc लोकानां मुख्यालयातून जिल्हा व तहसील मधे बदली करुंन सर्व जमिनीचे सर्वेक्षण करुंन ह्या बाबत बरेच काम केले होते। त्या विषईची माहिती कृपया द्यावी

Dilip Patwardhan

4 years ago

Hats off to you for comprehensive coverage

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS