मृत्युपत्र

दचकलात? अहो, दचकायला काय झालं?

मृत्युपत्र असा शब्द काढला की सर्वसामान्यांच्या मनात एक प्रकारची भीती, अढी असते.

तुम्हाला माझ्या माहितीत घडलेली दोन उदाहरणे सांगतो.

1. माझ्या नात्यातील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व वयाच्या नव्वदीच्या आसपास काळाच्या पडद्याआड गेले. मुंबई, पुणे, कर्नाटक, गुजरात अशा अनेक ठिकाणी शेकडो एकर जमिनी, स्वतःचा व्यवसाय आणि बरंच काही. त्यांना दोन मुलगे आणि दोन मुली. त्यांच्या एका मुलाचा मला काही दिवसांनी फोन आला की अरे अप्पांनी मृत्युपत्रच बनविलेले नाही तर आता काय करू? मी थक्कच झालो की एवढी प्रचंड श्रीमंती आणि व्यवहारातील एवढा कर्तबगार माणूस आणि मृत्युपत्र का नाही बनवले? अनाकलनीय वाटले. पुढे त्या मुलांना सगळे सुरळीत करताना इतका त्रास झाला की विचारता सोय नाही.

2. साधारणपणे माझ्याच वयाच्या माझा एक भाऊ मला एकदा भेटायला आला आणि म्हणाला की मला मृत्युपत्र करायचे आहे तेव्हा मला थोडी मदत कर. मी त्याला माझ्या मृत्युपत्राचा ड्राफ्ट दिला आणि म्हटलं, बघ तुला काय करायचे आहे ते ठरव. त्यानंतर बऱ्याच वेळा तो माझ्याकडे यायचा. काही दिवसांनी म्हणाला, अरे मला ना खूप दडपण आलंय. मी मृत्युपत्र बनवायला घेतल्यापासून मी आता लवकरच मरणार असे वाटायला लागलंय. मी थक्कच झालो; नुसतं मृत्युपत्र बनवताना सुद्धा मृत्यूची भीती?

तेव्हा एकदम लक्षात आलं की माणसे मृत्युपत्र बनवणे का टाळत असतात किंवा पुढे ढकलत असतात? या जगातील प्रत्येक मानवाला सगळ्यात जास्त भीती कशाची असेल तर ती मरणाची असते. आपल्या जवळच्या माणसाच्या मरणाने होणाऱ्या दुःखाची भीती आणि काळजी असणे स्वाभाविक आहे. पण मी बोलतोय ते आपल्या स्वतःच्या मरणाबद्दल.

मी या जगात असणार नाही; मग माझ्या बायको, मुलांचं काय होईल हा चिंतेचा घोर. माणूस जर बिझनेस मध्ये असला तर मग काळजीचा डोंगरच. माझ्या पश्चात धंद्याचं काय होणार? कोण बघणार? कोणी बघायला हवं? वगैरे वगैरे प्रश्न भंडावून सोडतात. पण खरं म्हणजे आपण या जगात नसणार ही कल्पनाच माणसाला पोखरून टाकते.

नीट विचार केला तर ही भीती अनाठायी आहे. कोणाचंही कोणावाचून अडत नाही; मग तो देश असो, धंदा असो वा कुटुंब असो. Nobody is indispensable in this universe. पण हे सर्वसाधारणपणे वळत नाही. आपल्या मरणाने आपल्या जवळच्या लोकांना (कुटुंब, मित्र, नातेवाईक) थोडाफार त्रास होईलही पण त्याला काळ हे एकमेव औषध असते.

त्यामुळे मृत्युपत्र या विषयावर माणसाच्या मनात प्रचंड गैरसमज असतात. परंतु आजच्या बदलत्या परिस्थितीत मृत्युपत्र बनवून ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. श्रीमंत लोकं त्याच्या बिझिनेसमुळे बहुतेक वेळा मृत्युपत्र बनवतात पण मध्यमवर्गीय लोकांना त्याची गरज वाटत नाही किंवा महत्व लक्षात येत नाही. याची काही प्रमुख कारणे:

1. आमची मुले गुणी आणि समंजस आहेत ती माझ्या मिळकती वरून नक्कीच आपापसात नक्कीच भांडणार नाहीत.

2. मृत्युपत्र श्रीमंतांनी बनवायचे असते, माझ्याकडे काय मोठी इस्टेट आहे की मी माझे विल किंवा मृत्युपत्र करावे?

3. मृत्युपत्र करून मी एका मुलाला किंवा मुलीला कमी जास्त दिल्यास माझ्या मृत्यूनंतर माझी मुले मला दोष देतील.

4. मी मेल्यानंतर कुठल्याही कारणास्तव माझ्या मुलांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज किंवा तिरस्कार निर्माण होणार असेल तर कशाला हवी ही भानगड?

5. माझ्याकडे इस्टेट म्हणजे माझा सोसायटीत असलेला राहता फ्लॅट. मी माझ्या बायकोच्या नावावर कधीच नॉमिनेशन करून ठेवले आहे. माझ्या पश्चात नॉमिनेशन प्रमाणे आमच्या सोसायटीची कमिटी माझ्या पत्नीच्या नावावर फ्लॅट करेल. मग मला मृत्युपत्र करायची गरजच काय?

6. मी मस्त धडधाकट आहे. अजिबात इतक्यात मरण्याची शक्यता नाही मग कशाला उगाच मृत्युपत्र बनवायचे? आणि डोक्याला घोर लावून घ्यायचा?

आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मरण कधीही सांगून येत नाही. आपल्या पश्चात आपली मुले कशी वागतील कोणीही सांगू शकत नाही. आपल्या पश्चात केवळ तुमची पत्नी आणि एखादाच मुलगा किंवा मुलगी जरी असेल तरी त्यांना मृत्युपत्र नसेल तर अनंत अडचणींना तोंड द्यावे लागेल ह्याचा विचार करा. श्रीमंतानीच विल करायचे असते हा सर्वात मोठा गैरसमज आहे. आज जागेच्या किमती भरमसाट वाढत आहेत त्यामुळे तुमच्याकडे अगदी कितीही कमी संपत्ती असू दे, आज मुंबईसारख्या ठिकाणी तुमच्या राहत्या घराची आजची किंमत करोडो रुपये असू शकते याचा विचारच कोणी करत नाही.

त्यामुळे मृत्युपत्र करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मृत्युपत्र सरळ साध्या व सोप्या भाषेत लिहावे ज्यायोगे कुठचाही संदेह राहणार नाही आणि अनावश्यक गुंतागुंत टळेल. आणि सर्वात महत्वाचे मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या स्वकष्टार्जित मालकीच्या संपत्तीचा आणि वडिलोपार्जित संपत्तीचा संपूर्ण तपशील असायला हवा.

मृत्युपत्र केल्यास त्याची गुप्तता ठेवणे गरजेचे आहे की नाही ही सर्वस्वी वैयक्तिक बाब आहे. वारसांना आपल्याला काय मिळणार किंवा काय मिळणार नाही हे समजल्यामुळे जर त्यांच्या वागणुकीत फरक पडेल अशी शंका असेल तर त्यांना नाही सांगितले तरी चालते. एका गोष्टीची न विसरता काळजी घ्यायला हवी की मृत्युपत्र बनविताना आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी असलो तर मृत्युपत्राला कोणी आव्हान करण्याची शक्यता कमी. दुसरा महत्वाचा मुद्दा ज्यामुळे लोक मृत्युपत्र बनवणे टाळतात आणि ते म्हणजे परिस्थिती सारखी बदलत असते. नक्कीच बदलते पण लक्षात ठेवा की आपण आपल्या आयुष्यात कितीही वेळा इच्छा पत्र करू शकतो किंवा आधी केलेल्या मृत्युपत्रात कितीही वेळा बदल करू शकतो. प्रत्येक पुरुषाने मृत्युपत्र करताना आपल्या पश्चात आपल्या पत्नीचा इंटरेस्ट व्यवस्थित प्रोटेक्ट होईल ह्याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे ज्यायोगे तिला मुलांवर अवलंबून राहायला लागू नये. त्यामुळे पत्नीला मृत्युपत्रात लाईफ इंटरेस्ट देऊन तिच्या पश्चात सर्व मुलांमध्ये समप्रमाणात वाटणी केल्यास सगळ्यात चांगले ज्यायोगे वाद होणार नाहीत. मृत्युपत्र करतांना वकिलाची मदत घ्यावी अशा मताचा मी आहे कारण त्यामुळे केलेल्या मृत्युपत्रात कमीतकमी त्रुटी राहतील.

माझ्याबाबतीत बोलायचं तर मी वयाच्या चाळीसाव्या वर्षीच मृत्युपत्र बनवून टाकले. माझी मुले सज्ञान झाल्यानंतर त्यांना स्पष्ट सांगितले ज्यायोगे भविष्यात गोंधळ होऊ नये असा माझा प्रयत्न. नक्की काय होईल ते फक्त त्या भगवंताला माहित.

त्यामुळे कळीचा मुद्दा काय? प्रत्येकाने मृत्युपत्र बनविलेच पाहिजे अन्यथा उगाचच पुढच्या पिढीला कोर्टकचेऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागतील. मला मृत्युपत्र बनवून वीस वर्षे झाली आणि कदाचित मी अजून वीस वर्षे जगेन पण आपल्या पश्चात काय व्हावे याची काळजी घेतली असल्याने मी बिनधास्त आहे. तसेच तुम्ही देखील टंगळमंगळ न करता मृत्युपत्र बनवा आणि उरलेले आयुष्य निवांत जगा!

चिअर्स !!! 🥃🥃

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Death #Will #Probate #मृत्यू #मृत्युपत्र

Leave a comment



Deepak

4 years ago

अगदी बरोबर. घरातल्यांना स्वतःच्या आर्थिक स्थिती बद्दल बोलणे, त्यांना समजावुन सांगणे जरुरी आहे. मृत्युपत्र बनवणे जरुरी आहे कारण कोणी उपटसुंभ तुमच्यापश्चात खोटे दावे करुन तुमच्या कुटुंबाकरता अडचणी निर्माण करु शकतो. मृत्युपत्र बनवा पण आपली संपत्ती आपल्याच नावावर ठेवा. प्रत्यक्षात काय होईल ते ईश्वरच जाणतो पण आपण आपले काम करावे. फळ भगवंतावर सोडावे.

Ashok Prabhu

4 years ago

CHEERS !.............

S.G.Vaidya

4 years ago

Thanks for drawing attention on this important but nelected topic. Good hints.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS