विम्बल्डन

माझा लहानपणापासूनचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. त्याच्या खालोखाल आता फुटबॉल आणि टेनिस. मी काही खेलाडू नव्हे आणि ते माझ्या शरीरयष्टीकडे बघून तसा विचार करण्याचा सुद्धा वेडेपणा कोणी करणार नाही. गेल्या काही वर्षात माझे क्रिकेटचं वेड खूपच कमी झालंय. हल्ली मला बघायला टेनिस आणि फुटबॉल जास्ती आवडतात.

माझा टेनिस या खेळाशी पहिला खरा संबंध १९८० साली झालेल्या विम्बल्डन फायनल मुळे आला. जवळजवळ ४ तास चाललेली ती मॅच आजही विम्बल्डन मधील एक क्लासिक समजली जाते. बियाॅन बोर्ग हा त्यामुळे माझा पहिला टेनिस हिरो. त्यानंतरची एकही विम्बल्डन फायनल मॅच मी बघणे चुकवलेले नाही. कोणाला सांगून पटणार नाही पण मला विम्बल्डनच्या १९६८ पासून २०१८ पर्यंतच्या विजेत्यांची नावे तोंडपाठ आहेत.

मी एक प्रकारे जणू विम्बल्डन हिरवळीच्या प्रेमातच पडलो. तेव्हापासून एकच गोष्टीचा मनाला ध्यास लागला होता की विम्बल्डन तिथे जाऊन बघायची. पण कशी? तिकीट कोण देणार? माझा एक मित्र टेनिस सर्किटवर अंपायर म्हणून जगभर फिरत असतो. तो विम्बल्डनला ही अंपायर म्हणून असतो त्यामुळे मी हात धुवून त्याच्या मागे लागलो. त्याचं म्हणणं होतं की विम्बल्डन जर खरं अनुभवायचं असेल तर पहिल्या आठवड्यातच जायचे. विम्बल्डनला एकंदर १९ कोर्ट्स आहेत. सेंटर कोर्ट आणि कोर्ट १ ते ३ यांना शो कोर्ट्स म्हटले जाते. त्या कोर्ट्स वर मानांकित खेळाडू खेळतात पण पहिल्या आठवड्यातील त्यांचे सामने बऱ्याच वेळेला खूप एकतर्फी होतात. या कोर्ट्सचे तिकीट खूप महाग असते आणि मिळणे पण फार कठीण. त्यामुळे त्याने असे सुचवले की मी तुम्हाला कोर्ट ४ ते १९ याचे तीन दिवसांचे ग्राऊंड तिकीट देतो. किंमत फक्त २० पाऊंड. त्यात तुम्ही संपूर्ण दिवसभर कुठल्याही कोर्टवर जाऊ शकता. खूप चांगले सामने बघायला मिळतात आणि ते तिकीट मी तुम्हाला देऊ शकतो. आम्ही लगेच हो म्हटले आणि तयारीला लागलो.

आता थोडी विम्बल्डनची माहिती घेऊया. काही जणांना ती ठाऊक असेल पण बऱ्याच जणांना ऐवढी कल्पना नसेल म्हणून हा खटाटोप.

विम्बल्डन ही आज नैसर्गिक हिरवळी वर खेळवली जाणारी एकमेव मोठी स्पर्धा. त्याची वर्षभर निगा राखली जाते आणि स्पर्धेच्या वेळी मोजून ८ मिमी उंच कापली जाते.

पूर्वी बहुतेक स्पर्धा या हिरवळीवरच खेळल्या जायच्या. जेव्हा डॉन बज याने १९३८ साली पहिल्यांदा चारही स्पर्धा जिंकली तेव्हा त्यातील तीन हिरवळीवर खेळल्या जात असत. अगदी १९६९ पर्यंत, जेव्हा रॉड लेवर चारही स्पर्धा जिंकल्या तेव्हा देखील तीन हिरवळीवर खेळल्या गेल्या होत्या. परंतु नंतर हिरवळीची निगा राखणे कठीण झाल्यामुळे आज अशा स्पर्धा दुर्मिळ झाल्या आहेत.

विम्बल्डन ही जगातील सर्वात जुनी आणि सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची मानली जाणारी टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा. ही स्पर्धा अनेक परंपरांमुळे कायम चर्चेत असते. काहींची स्तुती होते तर काही परंपरांची खिल्ली उडविण्यात येते.

  1. विम्बल्डन ही अशी एकच स्पर्धा आहे की जिथे एटीपी नामांकने विचारात घेतली जात नाहीत. तिथे आधी मिळवलेले हिरवळीवरील विजय हे प्रामुख्याने विचारात घेतले जातात.

2. बऱ्याच जणांना विसंगत, अनाकलनीय अथवा दिखाऊ वाटते तरी देखील विम्बल्डन खेळाडूंना संबोधताना खास काळजी घेतात. बाकी सर्व स्पर्धांमध्ये मेन्स आणि वूमन्स असे म्हटले जाते पण विम्बल्डन मध्ये त्या जंटलमन आणि लेडीज स्पर्धा म्हटल्या जातात. २००८ पर्यंत स्कोरबोर्ड वर देखील मिस अथवा मिसेस अशी शीर्षके असायची जी १० वर्षांपूर्वी गाळण्यात आली परंतु आज देखील सामना चालू असताना चेअर अंपायर स्कोर सांगताना त्याचा वापर करतात. पण गमंत म्हणजे पुरुषांना मिस्टर म्हणून संबोधण्यात येत नाही.

3. विम्बल्डनमध्ये सामने कधी आणि कसे खेळवायचे याचे नियम देखील काटेकोरपणे पाळले जातात. गत वर्षीचा पुरुष विजेता हा त्या वर्षीची पहिली मॅच सेंटर कोर्ट वर खेळणार. दोन आठवड्याच्या या स्पर्धेत मधल्या रविवारी सामने खेळवले जाणार नाहीत (खरं म्हणजे रविवार हा प्रेक्षकांच्या दृष्टीने आवडता दिवस पण नाही म्हणजे नाही). महिलांचे चारही उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) सामने दुसऱ्या मंगळवारी आणि पुरुषांचे चारही उपांत्यपूर्व सामने दुसऱ्या बुधवारीच खेळवले जाणार.

4. पूर्वी सर्वच स्पर्धांमध्ये पांढरे कपडे घालण्यात येत परंतु कालांतराने विम्बल्डन सोडून बाकी सर्व ठिकाणी रंगीत कपडे चालतात पण विम्बल्डन मध्ये नाही म्हणजे नाही.

२०१३ साली रॉजर फेडरर याने भडक नारंगी (orange) रंगाचे सोल असलेले बूट घातले तेव्हा विम्बल्डन अधिकाऱ्यांनी हे परत चालणार नाही अशी सक्त ताकीद दिली आणि पुढच्या सामन्यात घालू दिले नाहीत (यात पुढील गंमतीचा भाग असा त्या Nike कंपनीच्या बुटांना मिळालेल्या प्रसिद्धीमुळे दोन दिवसात त्यांच्या ऑनलाईन स्टोअर्स मधून तसे सगळे विकले गेले).

5. दर वर्षी चार ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळल्या जातात ज्या अमेरिकन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन म्हणून ओळखल्या जातात परंतु विम्बल्डनला ओपन असे संबोधण्यात येत नाही. विम्बल्डन हे विम्बल्डनच राहणार - कायम. तसेच विम्बल्डनच्या सेंटर कोर्टला असलेले वलय ही देखील एक परंपराच आहे.

6. विम्बल्डन असे म्हटले की दोन गोष्टी प्रामुख्याने चर्चिल्या जातात. पहिली स्ट्राबेरी क्रीम आणि दुसरी पिंम्स कप (Pimms) हे जीन मिश्रित पेय.

जे नाते हॉट डॉगचे अमेरिकेतील बेसबॉल स्टेडियम मध्ये आहे त्यापेक्षा जास्त जिव्हाळ्याचे नाते स्ट्राबेरी क्रीमचे विम्बल्डनशी आहे. गेल्या वर्षी २८००० किलो स्ट्राबेरी आणि ७००० लिटर फ्रेश क्रीम याचा फन्ना उडाला. तसेच पिंम्स ह्या पेयाचा खप सुमारे एक लाख.

विम्बल्डन मधील काही गंमतीशीर गोष्टी:-

१. दर सात ते नऊ गेम्स नंतर टेनिस बॉल बदलण्यात येतात कारण त्यांचा आकार योग्य तोच रहावा. पूर्ण स्पर्धेदरम्यान साधारण ५४२५० बॉल्स लागतात. जे बॉल्स वापरण्यात येत नाही ते रेफ्रिजरेटेड कंटेनर मध्ये ठेवण्यात येतात ज्यायोगे ते उत्कृष्ठ स्थितीत राहतील.

२. २०१० साली विम्बल्डन मध्ये सगळ्यात जास्त काळ चाललेला सामना खेळण्यात आला. अमेरिकेच्या जॉन इसनर याने फ्रांसच्या निकोलस महुत याचा ११ तास आणि ५ मिनिटांनंतर पराभव केला. हा सामना तीन दिवसांच्या कालावधीत खेळण्यात आला. विजयाचा स्कोर होता ६-४, ३-६, ६-७, ७-६, ७०-६८ (शेवटचा सेटच मुळी ८ तास ११ मिनिटे चालला होता).

३. अमेरिकेच्या टेलर डेंट या खेळाडूने ताशी २३८ किमी वेगाने सर्वात वेगवान सर्व्हिस केली आणि महिलांमध्ये व्हीनस विलियम्सने ताशी २०५ किमी असा विक्रम नोंदवला.

४. टेनिस खेळणाऱ्या खास करून महिलांना तोंडाने मोठा आवाज (Loud Grunt) करण्याची सवय आहे. २००९ मध्ये रशियाच्या मारिया शारापोवाचा हा आवाज १०५ डेसिबल्स एवढा मोठा होता - वेगात जाणाऱ्या मोटरसायकलशी त्याची तुलना होऊ शकली असती.

असो.

तर आम्ही १० जून २०११ ला लंडनला प्रयाण केले. पहिला एक आठवडा स्कॉटलंडची ट्रिप करून १८ तारखेला परत लंडनला आलो. विम्बल्डन हे साऊथफिल्ड्स स्टेशनपासून १० मिनिटे चालण्याच्या अंतरावर आहे. जवळपास असलेल्या हॉटेलच्या किंमती वाचून गरगरायला झाले. त्यामुळे थोडे लांब असलेल्या अर्लस् कोर्ट इथे हॉटेल बुक केले. तिथेही किंमती जास्तच होत्या पण दुसरा पर्याय नव्हता. १९ तारखेला जाऊन आमची तिकिटे घेऊन आलो.

अखेरीस २० जूनला माझे विम्बल्डनला जायचे स्वप्न साकार झाले. साऊथफिल्ड्स स्टेशन बघण्यासारखे बनवले होते. स्टेशनचे दोन्ही प्लॅटफॉर्म विम्बल्डनच्या हिरवळीप्रमाणे तयार करण्यात आले होते.

आत मध्ये शिरलो आणि अवाक होऊन बघतच बसलो. समोरच एक मोठा स्क्रीन होता ज्यावर १९ कोर्ट्स वर दिवसभरात कुठले कुठले सामने आहेत याचा गोषवारा होता ज्यायोगे आपण ठरवू शकतो की आपल्याला कुठल्या मॅचेस बघायच्या आहेत.

आम्ही एक यादी बनवली आणि निघालो.

आपण भारतीय त्यामुळे आपल्या खेळाडूंचे आपल्याला जर जास्तीच कौतुक. नक्की हरणार असे माहित असून सुद्धा सानिया मिर्झा आणि सोमदेव देवबर्मन यांचे सामने बघायला गेलो, तिथे उभे राहून ओरडलो पण थोड्या वेळातच दोन्ही सामने संपले. मग या कोर्टवरून त्या कोर्टवर अशा वाऱ्या चालू झाल्या. बहुतेक सामने उभे राहूनच बघावे लागतात कारण या ओपन कोर्ट्स वर बसण्याच्या खुर्च्या अगदीच मोजक्या. पहिल्या दिवशी चालून चालून आणि उभे राहून पायाचे अक्षरशः तुकडे पडायची वेळ आली. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पाऊस पडायला लागला. आम्ही एका बेंचवर छत्री घेऊन बसून राहिलो. बसायला मिळाल्यामुळे बरं वाटत होतं त्यामुळे पाऊस वाढला तरी जागा सोडली नाही. थोड्या वेळाने अचानक प्रचंड थंडी जाणवू लागली आणि त्याचे मुख्य कारण पाणी बुटाच्या आत जाऊन मोजे भिजले आणि त्यामुळे त्रास होऊ लागला. मोजे काढून टाकले पण थंडी काही कमी होईना. काय करावे ते कळेना पण तेवढ्यात असे कळले की आता आज पुढील सामने होणार नाहीत. वाईट वाटायच्या ऐवजी आनंद झाला आणि हॉटेलवर परत गेलो.

तिसऱ्या दिवशी मस्त कडकडीत ऊन पडले त्यामुळे खुशीत स्टेडियमवर गेलो. तिथे एका बाजूला एक टेकडीसमान उंचवटा आहे ज्याला विम्बल्डन हिल्स असे म्हणण्यात येते. तिथे हिरवळीवर भरपूर गर्दी कारण तिथे टीव्हीचा प्रचंड मोठा स्क्रीन ज्यायोगे तुम्हाला सेंटर कोर्ट वगैरे वर चाललेल्या महत्वाच्या मॅचेस बघता येतात. तिथे तर नुसती धमालच धमाल.

ज्या माझ्या मित्रामुळे आम्हाला तिकिटे मिळाली होती तो दुपारी भेटला. मला म्हणाला, तुम्हाला अर्धा तास कोर्ट नंबर दोन मध्ये मी पाठवू शकतो. आमचे काय बल्ले बल्ले.

अशा तऱ्हेने आमचे विम्बल्डन मधील अविस्मरणीय तीन दिवस संपले.

आता एकच स्वप्न की जे म्हणजे जर कधी भविष्यात जमले तर सेंटर कोर्टवर फायनल नाही जमली तर सेमी फायनल बघायचीच. बघू जमतं का ते.

यशवंत मराठे

#tennis #wimbledon #federer

Leave a comment



Sudhir Dandekar

5 years ago

Nice article

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS