मुसाफिर हूँ यारो !!

गेले तीन वर्षे मी सरमिसळ ह्या माझ्या ब्लॉगवर दर आठवड्याला किमान एक लेख लिहितो. माझ्या लेखांनी काही लोकांना आनंद दिला असेल तर काहींना लेख आवडले देखील नसतील. त्यात परत गेले आठ महिने हिस्ट्री कॅफे या ब्लॉगवर देखील आठवड्याला एक लेख पोस्ट करतो. त्यामुळे दर तीन दिवसांनी एक लेख तयार असावा लागतो. आजवर 225 लेख मी लिहिले आणि हल्ली तंत्रज्ञान असे आहे की कसलीही माहिती पुरवत असते. ह्या सर्व लेखांचे मिळून मी म्हणे अडीच लाख शब्द लिहिले. स्वतःलाच अविश्वसनीय वाटायला लागते. 

 

आजकालच्या गुगलच्या राज्यात कॉपी पेस्ट करून रोज लेखांचा रतीब टाकता येऊ शकतो. मला तसे कधीच करायचे नव्हते आणि नसेल. संशोधन करायला गुगलशिवाय पर्याय नाही हे जरी खरे असले तरी नुसत्या कॉपी पेस्टमध्ये कसली आली आहे मजा? त्याला लिखाण नाही म्हणता येणार. आणि हो, लेख नुसते खरडायचे नाहीत तर ते वाचनीय असायला हवेत. त्यामुळे मग संशोधनाला अभ्यास आणि वाचन याची जोड देणे अपरिहार्य असते.

 

या माझ्या प्रवासात मी थोडाफार यशस्वी झालो असे वाटण्याचे कारण लोकांनी बऱ्याच वेळा माझ्यावर प्रचंड स्तुतीसुमने उधळली. अथार्तच काही वेळा कठोर टीकाही झाली. But I must confess that I have received far more bouquets than brickbats.

 

कधी कधी लोकांच्या कौतुकाला काही मर्यादाच राहत नाहीत. कोणी सांगितले की तुमच्या व्यक्तिचित्रणात पु.ल. दिसतात, कोणी म्हटले तुमच्या लिखाणात आजच्या काळातील आचार्य अत्रे तर कधी व.पु. दिसतात. माझी हसून हसून पुरेवाट झाली. मला कोणाचाही अपमान नाही करायचा पण असे ऐकले की म्हणावेसे वाटते, अहो तुमचं डोकं ताळ्यावर आहे का? तुम्हाला कसं समजावू की पु.ल., अत्रे, व.पु. जर इंद्राचा ऐरावत अथवा राजा भोज असतील तर मी शामभट्टाची तट्टाणी किंवा गंगू तेली आहे. कुठे ते तळपते सूर्य आणि कुठे माझ्यासारखा परप्रकाशी काजवा; त्यांची अशी विटंबना नका करू.

 

असंख्य वाचकांनी माझ्याशी ई-मेल अथवा व्हाट्सऍप द्वारे थेट संपर्क साधला. माझ्या लिखाणाची अनौपचारिक शैली त्यांना आवडली आणि लिखाण वैविध्य व माहितीपूर्ण असल्याने भावले असे खूप जणांनी आवर्जून सांगितले. वाचकांचे प्रबोधन वगैरे करण्याचा माझा पिंड कधीच नव्हता पण तरीही ते झालं असेही खूप लोकांनी कळवले. जेव्हा लोक सांगतात की, तुझ्या पुढच्या लेखाची उत्सुकतेने वाट बघतो  तेव्हा नक्कीच खूप आनंद होतो आणि भारी देखील वाटते. वाचकांच्या स्तुतिसुमनांनी मी नक्कीच सुखावतो परंतु मी असे कुठेतरी वाचले होते की लेखकाला वाचकाच्या स्तुतीचे व्यसन जडता कामा नये आणि म्हणून या मोहापासून प्रयत्नपूर्वक दूर राहण्याचा मी आटापिटा करतो.

 

माझ्या काही लेखांवर टीका देखील झाली आणि त्याला माझी कधीच हरकत नव्हती परंतु जेव्हा जातीवाचक ट्रोलिंग होते तेव्हा मात्र मन विषण्ण होते. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की सवर्सामान्य माणसे निष्पक्ष राहण्याचा अथवा सुवर्णमध्य गाठण्याचा विचार करत नाहीत. आपण सोशल मीडियावर आहोत म्हणून लिहायलाच पाहिजे असा काही नियम नाही किंवा प्रत्येक गोष्टीवर आपण बोललंच पाहिजे असं देखील नाही पण बरेच जण 'आदत से मजबूर' असतात. असो. त्यांचं त्यांच्याजवळ.

 

मला पूर्ण कल्पना आहे की मी काही सिद्धहस्त लेखक नव्हे. मी डर्बीचा घोडा नसून वनात सैरभर फिरणारा घोडा आहे. त्यामुळे माझे लेख बऱ्याच जणांना विस्कळीत, भरकटलेले आणि फाटे फुटलेले वाटू शकतात की ज्याच्यात भरपूर विषयांतर असते.

 

2020 साल कोरोनाग्रस्त वर्ष म्हणून अख्ख्या जगाने अनुभवले. बहुतांश व्यवसाय ठप्प झाले तरी प्रत्येकाने स्वतःमध्ये कालानुरूप बदल करत परिस्थितीशी दोन हात केले. याला प्रकाशन क्षेत्रही अपवाद नव्हते. सारी माध्यमे, वृत्तपत्रे, नियतकालिके बंद झाली असल्यामुळे मनातील भावना अभिव्यक्त करायला मोबाईल किंवा लॅपटॉप हा माझ्यासारख्या अनेक नव-लेखकांच्या सृजनाचे आणि प्रकाशनाचे माध्यम बनला.

 

 

याच 2020 ची अखेर माझ्या दृष्टीने मात्र फारच सुरेल झाली. ग्रंथाली सारख्या प्रथितयश संस्थेमार्फत माझे छपाई ते लेखणी हे पुस्तक माझ्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या निमित्ताने प्रकाशित झाले हा जणू 'सोने पे सुहागा' योग.

 

माझे आजपर्यंतचे लिखाण हे स्फुट या सदरात मोडते कारण मी त्याला कुठल्याही विषयात बांधण्याचा प्रयत्न केला नाही. राजकारण हा एकच विषय मी जेवढा जमेल तेवढा टाळण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे भविष्यात काय? घाबरू नका, राजकीय लिखाण करण्याचा माझा विचार नाही कारण त्या विषयात मला काही कळत नाही आणि गतीही नाही. परंतु आता एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून भविष्यात पुस्तक लिहावे असा विचार मनात पिंगा घालतो आहे. मनात तीन-चार विषय आहेत; बघू त्यातला मला फायनली कुठला भावतो ते. आणि हो, एखादा विषय भावला तरी पुस्तक लिहिण्याएवढी माझी पात्रता आहे की नाही याची काहीच कल्पना नाही. लेख आणि पुस्तक यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. भविष्यात काय वाढून ठेवले आहे कुणास ठाऊक!! 

 

 

हे करत असताना देखील माझ्या सरमिसळ आणि हिस्ट्री कॅफे या ब्लॉगवरील आठवड्याचा ठोका मला चुकू द्यायचा नाहीये. असे इतक्या नियमितपणे लिखाण चालू ठेवणे हे एक मोठे दिव्य आहे. आणि हो, त्याचबरोबरीने नीरजाचे काम तर चालूच राहणार.

 

याचाच अर्थ गेल्या दहा वर्षात नव्हतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मी शारीरिक आणि मानसिक बिझी होणार आहे आणि हे एवढे मोठे शिवधनुष्य मी कसे काय पेलणार हे तो भगवंतच जाणे. But writing is extremely cathartic as it has given me extreme satisfaction and pleasure. गेल्या तीन वर्षांच्या लिखाणाने नुसतीच माझ्या आयुष्याला कलाटणी आणि नवसंजीवनीच नाही तर एक प्रकारे पुनश्च हरी ॐ करायची संधी दिली!! 

 

तेव्हा असेच भेटत राहू. लेख आवडले म्हणून कळवलेत तर आनंद होईल पण एक खास विनंती - लेख आवडले नाहीत तर मात्र नक्की सांगा म्हणजे मला सुधारण्याची संधी मिळेल.

 

धन्यवाद

 

@ यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

 

ता.क. - यापुढे माझ्या लेखाच्या तळाला तुम्हाला फेसबुक तसेच व्हाट्सऍपची लिंक उपलब्ध असेल ज्यायोगे तुम्हाला तो लेख थेट शेअर करता येऊ शकेल.

Leave a comment



Rajiv Naik

4 years ago

यशवंत तुझे लेखन नेहमीच संतुलित असते त्यामुळे कधी जरी ते पटले नाही तरी एक नवा दृष्टिकोन नक्कीच देते.

लिखते रहो, हम पढते रहेंगे 👍

Hemant Marathe

4 years ago

👍 व्यक्ती तितक्या प्रकृती - Would be title of you new book. 😀

अशोक प्रभू

4 years ago

All the best for your future plan of writing book.I am confident that you will fulfilling your ambition.
God bless you always.

Be safe and take care.

प्रकाश लवेकर

4 years ago

तुमचे लिखाणात मन मोकळं शब्दांकन । मनापासून आवडते । मी माझ्या मित्राना ही पाठवतो । त्यांचेही प्रतिसाद आपण काही भावणारे वाचले असे असतात ।

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS