काही महिन्यांपूर्वी स्थलांतरित मजूर हा एक ज्वलंत विषय होता. खरं तर सर्व महानगरांच्या हा कायमचाच ऐरणीचा प्रश्न आहे आणि राहील. कोरोना महामारीमुळे बरेच मजूर त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी धडपडत होते कारण एकच - मरण येणार असेल तर ते माझ्या जवळच्या माणसांमध्ये असताना येऊ दे. एकदा ही महामारी आटोक्यात आली की परत या लोकांचे लोंढे शहराकडे धाव घेतील.
आपण कधी विचार करतो का की हे लोकं स्थलांतर का करतात? जर त्या लोकांना त्यांच्या प्रदेशात रोजगाराच्या संधी आणि सुखसोयी मिळत असतील; तसेच कायदा सुव्यवस्थेची खात्री असेल तर स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून कोण बाहेर पडेल? उन्हें क्या पागल कुत्ते ने काटा है? परंतु या गोष्टी त्याला मिळत नाहीत म्हणून त्याला पर्याय शोधावाच लागतो. म्हणूनच सर्वसाधारणपणे स्थलांतरित माणसे जोखीम स्वीकारणारी असतात. चांगले आयुष्य जगता यावे म्हणून घरदार सोडून दूर प्रदेशात जातात. त्यामुळे त्यांचा मुख्य उद्देश हा पूर्णपणे व्यावहारिक असतो आणि त्यात काही गैर नाही.
आपल्याला आज मुंबईत या लोकांना भय्ये म्हणायची सवय झाली आहे. परंतु प्रश्न असा आहे की हे परप्रांतीय बाहेर जेवढी कामे करतात तेवढी त्यांच्या स्वतःच्या राज्यात करतात का?
तर त्याचे ठामपणे उत्तर देता येईल - नाही.
आज आपण भारतीय लोक अमेरिका आणि युरोपच्या नजरेतून भय्येच आहेत. आणि तेच आपण बाहेर असताना जेवढी कामे करतो तेवढी इथे भारतात असलो तर करतो का? तर त्याचेही उत्तर नाही असेच आहे. म्हणजेच स्थानिक असताना काम करायची टंगळमंगळ करायची आणि बाहेरच्या लोकांनी येऊन तीच कामे केली की आमच्या पोटावर गदा आणली असे बोंबलत फिरायचे. आणि गंमत म्हणजे हीच परिस्थिती जगभर आहे. आज सिलिकॉन व्हॅली मध्ये ज्या प्रमाणात भारतीय आणि चीनी लोकं काम करतात तेवढे काम करायची किती अमेरिकन लोकांची तयारी असते. तयारी असली तरी त्यांच्याकडे तेवढे शिक्षण पण नसते. अरे, पण मग ती कामे कोण करणार?
पण यातून एक गोष्ट सिद्ध होते की आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणे ही बऱ्याच वेळेला यशाची पहिली पायरी असते. आज भारतातील मोठ्या तसेच कंप्यूटर कंपन्या यांच्या नवीन Management Cadre ला त्यांच्या स्वतःच्या शहरातून निवडून दुसऱ्या शहरात पाठवतात; उदा. दिल्लीचा मुलगा चैन्नईला किंवा मुंबईचा कलकत्त्याला इत्यादी; ज्यायोगे ह्या मुलांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याशिवाय पर्यायच राहत नाही. जी गोष्ट देशांतर्गत तीच गोष्ट परदेशी जाण्याला पण लागू होते. It is also sometimes referred to as ‘Paranoid Optimism’ because that’s what the immigrants go through.
आता बघूया यशस्वी उद्योगपतींची उदाहरणे. ज्यांना First Generation Entrepreneur असे संबोधले जाते त्या सर्व लोकांनी केलेले श्रम, कष्ट, घेतलेल्या रिस्क हे त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडले नाहीत तर शक्यच होणार नाही. त्यांची काहीही करायची तयारी असते.
तसेच आता आपल्या देशातील जी साम्राज्ये होती त्यांच्या संस्थापक राजांचा विचार करून बघा. राज्य स्थापन करताना आलेल्या प्रचंड अडचणींचा त्यांनी सामना केला नसता तर ते राज्य उभेच राहिले नसते. शिवाजी महाराज त्यांच्या वडिलांप्रमाणे आदिलशाही, निजामशाही किंवा मुघलांचे मांडलिक म्हणून सहज राहू शकले असते पण त्यांनी ते जोखड झुगारून दिले म्हणूनच हिंदवी स्वराज्य उभे राहिले.
त्याचप्रमाणे भारतात जी पहिली पिढी राजकारणात आली त्यांनी खूप खस्ता खाल्या, लढे दिले तेव्हा ते कुठे एका पातळीवर पोहचू शकले. मी गेल्या 15-20 वर्षांतील राजकारण्यांबद्दल बोलत नाहीये कारण ते वेगळ्याच मार्गाने तिथे पोहोचले आहेत. अगदी कोणाचेही उदाहरण घ्या; लालू यादव, मुलायम सिंग, शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्या आधीची पिढी काही राजकारणी नव्हती. ते स्वतःच्या कष्टाने मोठे झाले. आता मोठे झाल्यावर त्यांचे नैतिक अधःपतन झाले आणि ते भ्रष्टाचारी झाले हा आरोप त्यांच्यावर होतो परंतु ही गोष्ट आत्तापुरती बाजूला ठेऊया. पण त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि घाम गाळला हे त्यांचा राजकीय विरोधक देखील अमान्य करू शकत नाही.
पण आता मला तुमचे लक्ष एका वेगळ्याच गोष्टीकडे वळवायचे आहे. काही समाजशास्त्राच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती खूप यशस्वी होते तेव्हा त्याच्या नंतरच्या तिसऱ्या पिढीद्वारे त्याचा ऱ्हास सुरु होतो. काही लोकं त्याला Migrant Syndrome असे संबोधतात. जेव्हा एखादी व्यक्ती नवीन ठिकाणी अथवा नवीन क्षेत्रात स्थलांतरित झाली असते तेव्हा अनेक कारणांमुळे ती आपल्या जुन्या आयुष्याकडे परत जाऊ शकत नाही. अशी जाणीव झालेली व्यक्ती मग कुठचीही शारीरिक अथवा आर्थिक जोखीम घेण्यास तयार होतात ज्यायोगे ते अधिकाधिक साध्य करून मिळालेल्या यशाला अजून बळकटी देऊ शकतील. बऱ्याच वेळेला त्यांची पुढची पिढी त्यांच्या या संघर्षाची साक्षीदार असते आणि त्यामुळेच ती पिढी ते यश टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. परंतु सर्वसाधारणपणे तिसऱ्या अथवा चौथ्या पिढीला त्या संघर्षाची सुतराम कल्पना नसते. त्यांना सगळंच आयतं मिळालेले असते. त्यामुळे त्यांची जोखीम घेण्याची मानसिकता अजिबात नसते आणि मग हळूहळू मग ते कमावलेले यश, नाव, इभ्रत कमी होऊ लागते आणि ऱ्हासाला सुरुवात होते.
याचे अनेक दाखले आपण उद्योगधंद्यात, राजकारणात आणि इतर अनेक क्षेत्रात पडताळून बघू शकतो. इथेही आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर न पडण्याची वृत्ती हे प्रमुख कारण आहे.
त्यामुळे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर या कम्फर्ट झोनचे जोखड झुगारून द्यावेच लागेल अन्यथा आहात त्याच्यात समाधान मानावे लागेल.
@ यशवंत मराठे