एक काळा दिवस!! कधी नव्हे ते एका राजकीय बातमीने सुन्न! "नमस्ते सदा वत्सले" प्रार्थना म्हणणारा विकला गेला.
ज्या अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याविरोधात भाजपावाल्यांनी इतका आवाज केला आणि त्यांच्याच बरोबरीने फडणवीस आता राज्य करणार. भ्रष्टाचाराचा मेरुमणी एका रात्रीत सत्वशील होणार. धरणात मूतणारे आणि अत्यंत माजोरडे अजितदादा उपमुख्यमंत्री होणार हे मला आधी माहीत असते तर मी NOTA च केले असते.
पवारांनी सेनेला फसवलं की भाजपने पवारांचा अतोनात द्वेष करणाऱ्या नमोभक्तांना?
नुसता तमाशा झालाय राव !!
सगळेच कसे संशयाच्या धुक्याखाली.
फडणवीस आणि अजित पवार यांनी मध्यरात्री राज्यपालांना बहुमत आहे हे कसे सिद्ध केलं? राज्यपालांनी अचानक रात्री राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस कशी केली? ती काही तासांच्या आत मान्य कशी काय झाली? राज्यपाल आणि राष्ट्रपती काय रात्रभर जागे होते का की ज्यामुळे पहाटे ५.४५ ला ती उठवली गेली? काहीतरी महान संकट घोंगावत असल्यासारखा सकाळी ७.३० वाजता शपथविधी का उरकला? तसे असेल तर राज्यपाल हा एक रबर स्टॅम्प आहे हे मान्य करावे लागेल आणि मग ते पद हवं कशाला? रद्दबादल करून टाका कारण सगळं जर केंद्र सरकारच्या मर्जीनुसार सगळं घडणार असेल तर राज्यपाल कशाला हवेत?
या सगळ्या घाणेरड्या राजकारणाचा जाहीर निषेध. हो, मी तेवढंच करू शकतो, कारण मला विचारतो कोण?
सगळ्या राजकीय घडामोडीतून फक्त एवढेच सांगता येईल की सर्व नैतिकतेच्या विचारांना तिलांजली देत इथून पुढे फक्त सत्ता केंद्रस्थानी ठेवून राजकीय पाऊले उचलली जाणार. कसले हिंदुत्व?? आणि कसले पुरोगामीत्व?? इथून पुढे कुठलाही पक्ष ना पुरोगामी विचारांचा, ना प्रतिगामी विचारांचा, ना सावरकरांच्या विचारांचा, ना गांधींच्या विचारांचा आणि ना शाहू, फुले, आंबेडकर किंवा शिवछत्रपतींच्या विचारांचा. फक्त सत्ता केंद्रस्थानी ठेऊन चाललेली ही धडपड आहे. भाजपा समर्थक मात्र नाचतायेत की मोदी आणि शाह ही द्वयी कशी महान आहे; असेल बुवा!
मुख्यमंत्री पदाचा हट्ट होता भाजपाचा की शिवसेनेचा हेच समजेनासे झाले आहे. शब्दांचे खेळ अजून चालूच राहतील की शिवसेनेने हट्ट सोडला नाही वगैरे वगैरे.. पण भाजपाने त्यांचा हट्ट कसा पुरा केला हे दिसलं. भाजपा शिवसेनेला विचारात होती की हिंदुत्वाशी नातं नसलेल्यांशी हातमिळवणी केलीत म्हणजे हिंदुत्व सोडणार का? मग यांना कोणी विचारायचं की ज्या अजितदादांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही अशा वल्गना केल्यात त्त्यांनाच उपमुख्यमंत्री करताना कुठे थोडीशी तरी लाज वाटली का? मग आता भाजपा पुढे काय करणार? सगळा सिंचन घोटाळा बासनात गुंडाळून, सुरनळी करून कुठे सारणार? ज्या अजितदादांनी या राज्याच्या बँकेची शरेआम लूट केली त्यांना आता क्लीन चीट देऊन पवित्र करणार का? आज सगळ्यात आनंदी अजित पवार व प्रफुल्ल पटेल असतील कारण सगळ्या चौकशा थांबणार. ते आता परत निर्धास्त होऊन नवीन घोटाळे करायला मोकळे. भ्रष्टाचार झिंदाबाद ! सगळी नैतिकता गेली तेल लावत.
भाजपाला शिवसेनेवर कुरघोडी केल्याचा आनंद नक्कीच मिळेल पण त्याचे भविष्यात दूरगामी परिणाम काय होतील याचा कोणी विचार केला आहे का? कारण आज ज्या मतदाराने शिवसेना भाजप युतीला मतदान केले तो आपल्या पदरात काय पडलं याचा विचार करत बसला असेल. तो पुढच्या निवडणुकीच्या वेळी काय करेल कोणी सांगावं?
राजदीप सरदेसाईचे एक ट्विट वाचण्यात आले जे मला खूप पटले.
Moral of events in Maharashtra:
The BJP should never again lecture on corruption, the Cong should not lecture on secularism and the Sena should not sermonise on Hindutva. And NCP? Well, what does one say about the Pawars now!! There is only ideology in politics.. OPPORTUNISM!
पण फक्त राष्ट्रवादीला दोष देण्यात काय अर्थ आहे? सगळे राजकीय पक्ष संधिसाधूच आहेत. एकही अपवाद संपूर्ण भारतात सापडणार नाही.
एकाही चतुर, अभ्यासू, हुशार पत्रकाराला, अगदी त्या राजदीप सरदेसाईला सुद्धा या घटनेची चाहूलही लागली नाही, यावरून या क्षेत्रात अजून चांगल्या पत्रकारांची किती आवश्यकता आहे हे ही लक्षात आलं पण त्याचबरोबर सध्याच्या पत्रकारितेच्या मर्यादाही कळल्या. याचा कोणी विचार करणार आहे का? माझ्या मते राजकारण या पत्रकारांना कधी कळलेलेच नाही कारण अगदी १९७९ च्या सिंहासन सिनेमात देखील शेवटी पत्रकार वेडा झालेला दाखवलाय आणि आज देखील कुठे फरक पडलाय? सगळे पत्रकार गपगार झालेत, कारण त्यांना कळलंच नाहीये की हे काय झालं आणि कसं झालं? त्यांच्या सगळ्या सूत्रांची ऐशीतैशी झालीये; अगदी पार भुस्काट झालंय त्या सूत्रांचे.
भाजपावाले म्हणतील की ठकास ठक व्हावे लागते आणि राजकारणात अशा तडजोडी कराव्या लागतात. हो ना, मग निदान नैतिकतेचे पाढे तरी आम्हाला ऐकवू नका. शेवटी असं वाटतं की मी ही अशी भडास काढणार आणि काहीतरी खरडणार. प्रश्न मोठा भविष्यातील आहे की यापुढे कोणाला मत देणार? सगळेच महालोभी आणि सत्तालंपट.
पण एकच अपेक्षा की निदान येणाऱ्या तरुण पिढीने आता तरी हे सर्व लक्षात घेऊन कुठल्याच पक्षाचे भक्त होऊ नये किंवा कुठल्याच पक्षाचे वैरी होऊन वाद/भांडण करू नये. कारण हे राजकारणी कोडगे आहेत; त्यांना शाटमारी फरक पडत नाही.
पण मी सर्व राजकीय पक्षांचे खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही महिन्याभरात मला खूप शहाणं केलंत आणि मनःपूर्वक एकच अपेक्षा की हे शहाणपण पक्ष पक्ष करून भांडणाऱ्या सर्व तरुणांना पण मिळो.
यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com