वैफल्य आणि विमनस्कता

एक काळा दिवस!! कधी नव्हे ते एका राजकीय बातमीने सुन्न! "नमस्ते सदा वत्सले" प्रार्थना म्हणणारा विकला गेला.

ज्या अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याविरोधात भाजपावाल्यांनी इतका आवाज केला आणि त्यांच्याच बरोबरीने फडणवीस आता राज्य करणार. भ्रष्टाचाराचा मेरुमणी एका रात्रीत सत्वशील होणार. धरणात मूतणारे आणि अत्यंत माजोरडे अजितदादा उपमुख्यमंत्री होणार हे मला आधी माहीत असते तर मी NOTA च केले असते.

पवारांनी सेनेला फसवलं की भाजपने पवारांचा अतोनात द्वेष करणाऱ्या नमोभक्तांना?

नुसता तमाशा झालाय राव !!

सगळेच कसे संशयाच्या धुक्याखाली.

फडणवीस आणि अजित पवार यांनी मध्यरात्री राज्यपालांना बहुमत आहे हे कसे सिद्ध केलं? राज्यपालांनी अचानक रात्री राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस कशी केली? ती काही तासांच्या आत मान्य कशी काय झाली? राज्यपाल आणि राष्ट्रपती काय रात्रभर जागे होते का की ज्यामुळे पहाटे ५.४५ ला ती उठवली गेली? काहीतरी महान संकट घोंगावत असल्यासारखा सकाळी ७.३० वाजता शपथविधी का उरकला? तसे असेल तर राज्यपाल हा एक रबर स्टॅम्प आहे हे मान्य करावे लागेल आणि मग ते पद हवं कशाला? रद्दबादल करून टाका कारण सगळं जर केंद्र सरकारच्या मर्जीनुसार सगळं घडणार असेल तर राज्यपाल कशाला हवेत?

या सगळ्या घाणेरड्या राजकारणाचा जाहीर निषेध. हो, मी तेवढंच करू शकतो, कारण मला विचारतो कोण?

सगळ्या राजकीय घडामोडीतून फक्त एवढेच सांगता येईल की सर्व नैतिकतेच्या विचारांना तिलांजली देत इथून पुढे फक्त सत्ता केंद्रस्थानी ठेवून राजकीय पाऊले उचलली जाणार. कसले हिंदुत्व?? आणि कसले पुरोगामीत्व?? इथून पुढे कुठलाही पक्ष ना पुरोगामी विचारांचा, ना प्रतिगामी विचारांचा, ना सावरकरांच्या विचारांचा, ना गांधींच्या विचारांचा आणि ना शाहू, फुले, आंबेडकर किंवा शिवछत्रपतींच्या विचारांचा. फक्त सत्ता केंद्रस्थानी ठेऊन चाललेली ही धडपड आहे. भाजपा समर्थक मात्र नाचतायेत की मोदी आणि शाह ही द्वयी कशी महान आहे; असेल बुवा!

मुख्यमंत्री पदाचा हट्ट होता भाजपाचा की शिवसेनेचा हेच समजेनासे झाले आहे. शब्दांचे खेळ अजून चालूच राहतील की शिवसेनेने हट्ट सोडला नाही वगैरे वगैरे.. पण भाजपाने त्यांचा हट्ट कसा पुरा केला हे दिसलं. भाजपा शिवसेनेला विचारात होती की हिंदुत्वाशी नातं नसलेल्यांशी हातमिळवणी केलीत म्हणजे हिंदुत्व सोडणार का? मग यांना कोणी विचारायचं की ज्या अजितदादांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही अशा वल्गना केल्यात त्त्यांनाच उपमुख्यमंत्री करताना कुठे थोडीशी तरी लाज वाटली का? मग आता भाजपा पुढे काय करणार? सगळा सिंचन घोटाळा बासनात गुंडाळून, सुरनळी करून कुठे सारणार? ज्या अजितदादांनी या राज्याच्या बँकेची शरेआम लूट केली त्यांना आता क्लीन चीट देऊन पवित्र करणार का? आज सगळ्यात आनंदी अजित पवार व प्रफुल्ल पटेल असतील कारण सगळ्या चौकशा थांबणार. ते आता परत निर्धास्त होऊन नवीन घोटाळे करायला मोकळे. भ्रष्टाचार झिंदाबाद ! सगळी नैतिकता गेली तेल लावत.

भाजपाला शिवसेनेवर कुरघोडी केल्याचा आनंद नक्कीच मिळेल पण त्याचे भविष्यात दूरगामी परिणाम काय होतील याचा कोणी विचार केला आहे का? कारण आज ज्या मतदाराने शिवसेना भाजप युतीला मतदान केले तो आपल्या पदरात काय पडलं याचा विचार करत बसला असेल. तो पुढच्या निवडणुकीच्या वेळी काय करेल कोणी सांगावं?

राजदीप सरदेसाईचे एक ट्विट वाचण्यात आले जे मला खूप पटले.

Moral of events in Maharashtra:

The BJP should never again lecture on corruption, the Cong should not lecture on secularism and the Sena should not sermonise on Hindutva. And NCP? Well, what does one say about the Pawars now!! There is only ideology in politics.. OPPORTUNISM!

पण फक्त राष्ट्रवादीला दोष देण्यात काय अर्थ आहे? सगळे राजकीय पक्ष संधिसाधूच आहेत. एकही अपवाद संपूर्ण भारतात सापडणार नाही.

एकाही चतुर, अभ्यासू, हुशार पत्रकाराला, अगदी त्या राजदीप सरदेसाईला सुद्धा या घटनेची चाहूलही लागली नाही, यावरून या क्षेत्रात अजून चांगल्या पत्रकारांची किती आवश्यकता आहे हे ही लक्षात आलं पण त्याचबरोबर सध्याच्या पत्रकारितेच्या मर्यादाही कळल्या. याचा कोणी विचार करणार आहे का? माझ्या मते राजकारण या पत्रकारांना कधी कळलेलेच नाही कारण अगदी १९७९ च्या सिंहासन सिनेमात देखील शेवटी पत्रकार वेडा झालेला दाखवलाय आणि आज देखील कुठे फरक पडलाय? सगळे पत्रकार गपगार झालेत, कारण त्यांना कळलंच नाहीये की हे काय झालं आणि कसं झालं? त्यांच्या सगळ्या सूत्रांची ऐशीतैशी झालीये; अगदी पार भुस्काट झालंय त्या सूत्रांचे.

भाजपावाले म्हणतील की ठकास ठक व्हावे लागते आणि राजकारणात अशा तडजोडी कराव्या लागतात. हो ना, मग निदान नैतिकतेचे पाढे तरी आम्हाला ऐकवू नका. शेवटी असं वाटतं की मी ही अशी भडास काढणार आणि काहीतरी खरडणार. प्रश्न मोठा भविष्यातील आहे की यापुढे कोणाला मत देणार? सगळेच महालोभी आणि सत्तालंपट.

पण एकच अपेक्षा की निदान येणाऱ्या तरुण पिढीने आता तरी हे सर्व लक्षात घेऊन कुठल्याच पक्षाचे भक्त होऊ नये किंवा कुठल्याच पक्षाचे वैरी होऊन वाद/भांडण करू नये. कारण हे राजकारणी कोडगे आहेत; त्यांना शाटमारी फरक पडत नाही.

पण मी सर्व राजकीय पक्षांचे खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही महिन्याभरात मला खूप शहाणं केलंत आणि मनःपूर्वक एकच अपेक्षा की हे शहाणपण पक्ष पक्ष करून भांडणाऱ्या सर्व तरुणांना पण मिळो.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Dada

4 years ago

बाळ यशवंता
शांत हो
तसे पण फडणवीस पडणारच आहेत
मग तू तुझ्या आत्मघातकी चांगुलपणाचा ढिंडोरा पिटायला मोकळा होणारेस
निवडणूका हा एक अतिशय महागडा खेळ आहे मित्रा
तो खेळ खेळून मुख्यमंत्री पद निरागसपणे सोडून देणं म्हणजे
तुझ्या भाषेत एक घरकुल बांधून दुसर्याला रहायला देण्यासारखं आहे
तू जर अर्जुन असतास तर भगवंतांनी गीता सागितल्यावरही कुरूक्षेत्रावरून पळून गेला असतास
सगळे लोक तुझ्यासारखे नाहीत हे भाजपाचं सुदैव

V Rao

4 years ago

Please don't jump to conclusions. Have faith in goodness. There must be some good and valid motive for taking this step. Just remember how BJP had supported the Mufti government in J & K and then what was the final result you see today? It must be another Krishnaniti for something better for justice. I would like to wait and watch before judging them and spreading poison against our own good people. Sometimes results speak better than actions.

Mast kalandar

4 years ago

पार्टी विथ डिफरन्सचा अर्थ
.
अाता भाजपदेखील Party with Difference राहिलेली नाही अशा अाशयाची पोस्ट पाहण्यात अाली. भाजपकडून काही अपेक्षा असतात म्हणून असा उद्वेग वाटणे साहजिक अाहे. पण त्या भरात काही जण नोटाला मत दिले असते तर बरे झाले असते असा निष्कर्ष काढून काही जण मोकळे होताना दिसतात.

मात्र प्रत्यक्ष परिस्थिती काय अाहे?

अाजवर पार्टी विथ डिफरन्स असताना त्यांना मते मिळत असत का? इतरांपेक्षा वेगळे असल्याचे नुसतेच कौतुक करून घेत विरोधी पक्षात बसण्यात काय मतलब?

अाताही दोन्हीकडचे शीर्षस्थ नेतृत्व पाहिले तर त्यातील फरक कळू शकतो. भाजपचे अाताचे नेतृत्व जशास तसे या स्वरूपाचे अाहे. हे व विरोधक यांच्यात मोठा फरक अाहे. Party with difference चा अर्थ बदलला अाहे तो एवढाच. अापण अहिंसा कशाला म्हणतो? अहिंसेच्या पुचाटपणाच्या कल्पनेपोटी संरक्षक दलांची सुसज्जता न करता परकी अाक्रमणाला बळी पडणे ही अहिंसा की सुसज्जता करून स्वत:चा बचाव करण्याचे सामर्थ्य प्राप्त केलेले असतानाही इतरांवर स्वत:हूम अाक्रमण न करणे ही अहिंसा? तसेच अाता अाहे. अापण एकट्यानेच साधनशुचितेच्या कल्पना बाळगण्यामुळे कायम बवावात्मक रहात लोकशाहीचा विधिनिषेधही नसलेल्यांना सत्तेसाठी मोकळे रान देत देश लुटण्याचा मुक्त परवाना देणे ही पार्टी विथ डिफरन्सची भोंगळ कल्पना तुम्हाला मान्य अाहे का?

अाजूबाजूला गिधाडे व लांडगे वावरत असताना अापण अाजही वाजपेयी काळात रमत उसासे सोडत राहणे योग्य नाही. यांनी वाजपेयींचे काय केले होते हेही अाठवता येईल. एका मताने त्यांचे सरकार पडतानाच्या प्रामाणिकपणाची देशाला केवढी किंमत चुकवावी लागली हे अापण पाहिले नाही का? आता ज्या लांडग्या-गिधाडांबद्दल म्हटले त्यांच्यापैकीच काही वाजपेयींचे सरकार पाडण्यात अाघाडीवर होती हे अाठवते का?

हे पटायला कठीण जाईल. पण अाहे हे असे अाहे.

अातापुरते बोलायचे तर युतीत निवडणूक लढून व्यवस्थित बहुमत मिळवले होते. पण साथीदाराच्या डोक्यात व्यभिचार अाल्यावर राज्याला वार्‍यावर सोडणे अालेच. अशा परिस्थितीत अाधीच्या धोरणांमध्ये सुसंगती राहण्यासाठी सुत्रे हातात ठेवणे भाग अाहे. त्यासाठी काही अप्रिय वाटणार्‍या गोष्टी कराव्या लागणार. त्याला इलाज नाही. भाजपने निकाल लागल्या लागल्या युतीतील अापल्या सहकार्‍याची साथ सोडून स्वत:हून आधीच तसे केले असते ते निश्चित पटण्यासारखे झाले नसते. मात्र अागळीक कोणी केली? तेव्हा किमान जशास तसे वागणे भाग अाहे. जे चालले अाहे ते योग्य नाही हे अापण म्हणतो तरी. पण ज्यांनी मस्तवालपणातून सत्तेसाठी व्यभिचार केला त्यांच्या पाठिराख्यांना त्यात काही गैर वाटत नाही. यांच्या इतर दोन नव्या सहकारी पक्षांना तर यात काहीच नवीन वाटण्यासारखे नाही.

बाकी यांनी साठ वर्षात केले ते तुम्ही दहा वर्षात केले असे लोकशाहीची थट्टा करण्याच्या संदर्भात म्हणणेही योग्य नव्हे. यांनी हे साठ वर्षात केले असे नाही तर हे लोक साठ वर्षे हेच करत अाले अाहेत. मनात येईल तशी सरकारे भाजीपाल्यासारखी बरखास्त करणे, घटनेत मनमानी पद्धतीने बदल करणे अाणि न्यायपालिकेशी खेळण्याचे यांचे प्रकार पाहिलेत तर या देशात लोकशाही होती यावर विश्वास बसायचा नाही. तुमचे तुम्हालाच हा प्रश्न पडेल.

युतीतील एका पक्षाच्या नेत्याचे डोके फिरल्यावर इतरांनी त्याचा फायदा न घेतल्यासच नवल. वर म्हटल्याप्रमाणे यावर भाजप शोधत असलेला अजित पवारांच्या स्वरूपातील उपाय पटण्यासारखा वाटत नसला तरी तसे केले नसते तर लगेच पुन्हा निवडणूक घेतली जाण्याची शक्यता होती का? याच विश्वासघातक्यांबरोबर लांडग्या-कोल्ह्यांच्या पक्षांचे सरकार अाले असते तर या विश्वासघातक्यांमधला एक दिवटा तरी मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचा अाहे असे तुम्हाला वाटते का? म्हटल्याप्रमाणे राज्याच्या जनतेशी अशी दगाबाजी भाजपने केली नव्हती हे विसरले नाही तरी बरेच सोपे होईल. अजित पवारांची मदत घेत विश्वासघातक्यांचा सामना करणे हा संक्रमणाचा तात्पुरता कालखंड अाहे. अाता ज्यांनी विश्वासघात केला त्यांच्याबरोबर गेली किमान पंचवीस वर्षे हिंदुत्वाच्या समान धाग्यावरून त्यातली वीस वर्षे पडती भूमिका घेतली होती. मात्र वेळ अाल्यावर या विश्वासघातक्यांनी ती हिंदुत्वाची झूल कशी फट म्हणता फेकून दिली हे अापण पाहिले नाही का? अशा स्थितीत पर्यायी व्यवस्था उभी करताना काही वेळ लागेल की नाही? की एकट्याच्या बळावर पुढच्या निवडणुकीत लगेच बहुमत मिळणे शक्य होणार अाहे? तसे न करता सत्तेबाहेर बसण्याचे औदार्य दाखवणे हा विश्वासघातक्यांशी वागण्याचा उपाय होऊच कसा शकतो? या निमित्ताने विश्वासघातकी भोंदू बाजुला झाले व भाजपला मोकळा श्वास घ्यायला मिळाला हे कितीतरी अधिक महत्त्वाचे अाहे.

तेव्हा संयम ठेवा. एकूण परिस्थिती उबग येण्यासारखी अाहे हे खरे; मात्र त्यास तुमचा पक्ष भाजप जबाबदार नाही हे खरे अाहे की नाही? जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने मेहबुबा मुफ्तींशी सरकार स्थापन करणे अाणि येथे विश्वासघातकी पक्षाने इतर विरोधी पक्षांबरोबर सरकार स्थापन करणे यातील फरक काही मुर्खांना काही केल्या कळत नाही. किंवा कळूनही इतर काही बोलण्यासारखे नसल्याने त्यांना निर्लज्जपणे तेच बोलत राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र तुम्ही त्यांच्यापैकी अाहात काय?

काही मनाविरूद्ध किंवा 'अनैतिक' घडत असेल तर सत्तेसाठी प्रयत्न न करता सरळ विरोधी पक्षात बसा अाणि पुढच्या वेळी निवडणुकीत बहुमत प्राप्त करा असे म्हणणे फार सोपे. परंतु लोकशाहीचे अाताचे स्वरूप मतदाराचे मत मिळवण्यापुरते मर्यादित नाही. मतदानापलीकडे तिला गेल्या साठ वर्षांमध्ये काय भयानक स्वरूप दिले गेले अाहे हाच तर अापल्या उद्वेगाचा विषय अाहे ना? निवडणूकपूर्व युती करून बहुमत मिळवल्यावरदेखील युतीतील साथीदार दगाबाजी करत उकिरडे फुंकण्याचा व्यभिचार करतो अाणि अापण मतदार त्याविरूद्ध काही करू शकत नाही हेच लोकशाहीचे विकृत स्वरूप अापण सर्वांनी अाता पाहिले ना? म्हणूनच तर एकदा मत दिल्यानंतर मतदार हतबल असतो असे अापण म्हणतो ना? हे अापण केव्हा लक्षात घेणार? हा प्रकार सगळेच वाहतुकीचे सिग्नल तोडतात तर अापणही का तसे का करू नये असे म्हणण्याइतका उथळ नाही. परंतु कोणाच्या अशा नियम तोडण्यामुळे अापल्या जीवाला धोका निर्माण होऊ लागला तरी अापण असेच गप्प बसायला हवे का? तसे केलेले चालेल का?

हे सर्व होण्यासाठी अाज सकाळी सर्वोच्च न्यायालय देत असलेली दिशा पाहणे अाणि येऊ घातलेला विश्वासमतदर्शक प्रस्ताव या पायर्‍या ओलांडायच्या अाहेत अाणि हे सारे सुरळीत पार पडेल अशी अाशा करू.

तूर्त पार्टी विथ डिफरन्सवरून तुमची स्वत:ची कल्पना भ्रष्ट होऊ देऊ नका अाणि यावरून इतरांकडून होणार्‍या दुष्प्रचाराला बळी पडू नका. 'हमाम में सब नंगे हैं' असे म्हणणे हादेखील अशाच दुष्प्रचाराचा दुसरा प्रकार अाहे हेही लक्षात असू दे. एवढे केलेत तरी पुरे.

जातीय अाधारावर निवडणूक प्रचार करण्यास नकार देत पराभव पत्करणार्‍या पं. दीनदयाळ उपाध्याय अाणि संसदीय साधनशुचिता पाळणार्‍या अटलबिहारी-अाडवाणींसारखा समृद्ध वारसा तुम्हाला लाभलेला अाहे. मात्र त्यावरून अाताच्या परिस्थितीत बचावात्मक होण्याची गरज नाही. ठामपणे प्रतिवाद करा. काळे धन निर्माण होऊ नये याकरता विविध उपाय योजणारा, पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावर भर देणारा, सत्ता राहिल की नाही याची पर्वा न करता देशात जीएसटी लागू करणारा, कलम ३७० व ३५अ रद्द करणारा, देशाच्या संरक्षणासाठी प्रथमच पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करण्याची इच्छाशक्ती दाखवत ते प्रत्यक्षात अाणणारा, ट्रिपल तलाकविरूद्ध कायदा करणारा, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्ससारखा महत्त्वाचा प्रकल्प राबवण्याची इच्छा दाखवणारा, देशाची संरक्षणदले सुसज्ज करणारा, शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत मुलभूत उपाययोजना करण्याचे धाडस दाखवणारा, कल्पनाही करता येणार नाही अशी देशवासियांसाठी अायुष्मान भारतसारखी योजना अमलात अाणणारा, लष्करी कर्मचार्‍यांसाठी वन रँक वन पेन्शनसारखी योजना अमलात अाणण्याचे धाडस दाखवणारा, घरोघरीच्या महिलांचे शेगडीच्या धुरामुळे शरीरावर होणार्‍या विपरित परिणामांची काळजी करणारा, महिलांना स्वत:च्या मालकीचे शौचालय देण्याचा विचार अमलात अाणणारा, घरोघरी वीज अाणि त्याहीपेक्षा पाणी नेण्याचे अतिशय शिवधनुष्य पेलण्याचा संकल्प सोडणारा, रामजन्मभूमीसारखा देशाच्या चितीशी संबंध असलेला क्लिष्ट प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती दाखवत ते प्रत्यक्षात अाणणारा अाणि अशा अाणखी कितीतरी गोष्टी तुमच्या-अामच्यासाठी करणारा व करण्याची इच्छाशक्ती असलेला पक्ष 'पार्टी विथ डिफरन्स' असाच असतो याची खात्री असू द्या. अाणखी करण्यासारखे बरेच अाहे तेदेखील होईल याची खात्री अाहे कारण इच्छाशक्ती अाहे. खटकणार्‍या गोष्टीही निश्चितपणे अाहेत हे कोण नाकारू शकेल! पण त्यादेखील हळूहळू दूर होतील. मात्र अाता हे सारे एकीकडे अाणि तुम्हाला खटकणार्‍या गोष्टी कोणत्या यांची तुलना करून तर पहा.

राजेश कुलकर्णी
२५ नोव्हेंबर २०१९

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS