मित्र का शत्रू?

भारत आणि पाकिस्तानच्या ह्या लष्करी अधिकार्‍यांच्यात काही साम्य आहे असे दुरान्वयाने तरी वाटेल का? त्यांची नावे वाचाल तर थक्क व्हाल. लेफ्टनंट जनरल साहिबजादा याकूब, जनरल ए.एम. याह्या खान, जनरल टिक्का खान, ब्रिगेडियर हिसाम एल एफेंडी, जनरल पी.पी. कुमारमंगलम आणि लेफ्टनंट अभय सिंग. 
 
 

वर:- जनरल कुमारमंगलम, जनरल टिक्का खान, ले. अभय सिंग खाली:- जनरल याह्या खान, ब्रि. हिसाम अल एफेंडी, साहबजादा याकूब

 
1942 साली रोमेल्सच्या आफ्रिका कॉर्प्स यांनी भारतीय मोटर ब्रिग्रेड यांचा गझालाच्या युद्धात नामोहरम केले आणि भारतीय सैन्याचे 17 अधिकाऱ्यांना युद्धकैदी म्हणून इटलीमधील अवेर्सा येथे डांबण्यात आले. परंतु त्यावेळी कोणीही कल्पना देखील केली नसेल की भविष्यात त्या अधिकाऱ्यांची कारकीर्द किती दैदिप्यमान असेल. हे सर्व अधिकारी वेगवेगळ्या धर्माचेच नाही तर सर्वस्वी भिन्न अशा संस्कृतीशी नाळ जोडलेले होते. 
 

दुसऱ्या महायुद्धातील मध्य आणि दक्षिण इटलीमधील युद्धकैदी छावण्या

 
सुरुवातीला या सर्वांना नेपल्सच्या उत्तरेस 15 किलोमीटर अंतरावरील अवेर्सा येथे POW इटालियन छावणी क्रमांक PG 63 मध्ये बंदिवासात ठेवण्यात आले होते. PG ही इटालियन भाषेत Prigione di Guerra म्हणजेच (युद्धाचा तुरुंग) ची आद्याक्षरे होती. इटलीमध्ये ऍक्सिस राष्ट्रांच्या (जर्मनी, इटली आणि कालांतराने जपान व इतर काही देश यांचे गठबंधन) युद्ध कैद्यांसाठी अनेक छावण्या होत्या आणि PG 63 मध्ये भारतीय अधिकारी आणि सैनिकांना ठेवण्यात आले होते. जनरल याह्या वगळता, वरील सर्व अधिकारी तिसऱ्या भारतीय मोटार ब्रिगेडमध्ये कार्यरत होते ज्यांच्यावर लढाईच्या पहिल्याच दिवशी जर्मन आफ्रिका कॉर्प्सने कब्जा केला. शेवटच्या क्षणी लढाईत उतरलेले असतांना आणि रोमेलच्या तीन सशस्त्र तुकड्यांचा हल्ला झेलण्या इतपत पुरेशी तयारी आणि साधन सामग्रीचा अभाव असतांनाही ते मोठ्या धैर्याने सामोरे गेले आणि दोन तासांच्या अवधीत 50 जर्मन आणि इटालियन रणगाडे उद्ध्वस्त केले. (एके ठिकाणी अंदाजे 80 रणगाडे होते अशी नोंद आहे). ह्यापैकी बहुतेक रणगाडे युद्धभूमीवर प्रथमच तैनात केल्या गेलेल्या व रणांगणावर थेट लक्षावर भडीमार करण्याची क्षमता असणार्‍या दुसऱ्या भारतीय फील्ड रेजिमेंटच्या, 25-pdr (तोफानी) ते नष्ट केले होते. मोटर घोडदळ रेजिमेंटच्या 2-pdr ह्या रणगाडा भेदी शस्त्राने (जे ट्रकवर बसविलेले असे आणि त्याला 'पोर्टीज' म्हणत) देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणली.
 
 

1944 साली जर्मनीत युद्धकैदी असलेले ले. अभय सिंग आणि ले. साहबजादा याकूब

 
सुमारे 17 अधिकारी आणि 670 VCO (व्हाइसरॉय नियुक्त उच्चाधिकारी) आणि इतर श्रेणीतील भारतीय अधिकार्‍यांना युद्धकैदी करण्यात आले परंतु पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे सैनिकांना सोडून देण्यात आले. अधिकाऱ्यांना PoW च्या (कारागृहाच्या) मागील बाजूच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते त्यानंतर त्यांना तेथून इटलीला पाठवण्यात आले. त्यांच्यामध्ये लेफ्टनंट साहबजादा याकूब (त्यांचे मित्र त्यांना जेकब म्हणत), 18 व्या घोडदळाचे सिग्नल अधिकारी (नंतर लेफ्टनंट जनरल तसेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री झाले), 11 व्या घोडदळाचे PAVO लेफ्टनंट हिसम अल एफेंडी (प्रसिद्ध पोलो खेळाडू व नंतर पाकिस्तान सैन्यातून ब्रिगेडियर म्हणून निवृत्त झालेले), आणि दुसऱ्या फील्ड रेजिमेंटचे लेफ्टनंट ए. एस. नरवणे (नंतर भारतीय लष्करातील मेजर जनरल), आणि लेफ्टनंट टिक्का खान (नंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख, 1972-76 पर्यंत) हे दोघे. टिक्का खानचे बॅटरी कमांडर मेजर पी.पी. कुमारमंगलम (नंतर लष्करप्रमुख, भारतीय लष्कर, 1967-70 पर्यंत), यावेळी त्यांच्या कब्जातून सुटून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांच्या तीन तोफा परत मिळवण्यासाठी परतले. तथापि, एका महिन्यानंतर, त्यांना एका जोरदार कारवाई दरम्यान कैद करण्यात आले. 05 जून 1942 च्या सुमारास लेफ्टनंट याह्या खान (नंतर ते जनरल आणि पाकीस्तानचे अध्यक्ष झाले) यांनाही बंदी बनवण्यात आले, तेव्हा 4/10 बलुच ही त्यांची तुकडी, 10 व्या भारतीय पायदळ ब्रिगेडचा एक भाग होती, ज्याच्यावर ऍक्सिस राष्ट्रांनी कॉलड्र्नच्या लढाईत कब्जा केला.
 
 

Major General A S Naravane

मेजर जनरल ए.एस. नरवणे (भूतपूर्व लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचे काका) त्यांच्या “ए सोल्जर्स लाइफ इन वॉर अँड पीस” ह्या आत्मकथनात, पीजी 63 कॅम्पमधील त्यांचे अनुभव कथन करताना सांगतात की कुमारमंगलम (त्याचे कुटुंबिय आणि मित्र त्याला ‘के’ म्हणत) या सर्वात वरिष्ठ भारतीय अधिकार्‍याची, कॅम्प सिनियर ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली होती आणि त्यांचे कॅम्प अॅडज्युटंट याह्या खान होते. टिक्का खान कॅम्प क्वार्टरमास्टर होते. पीजी 63 मध्ये भारतीय वैद्यकीय सेवेतील अनेक तरुण डॉक्टर होते. त्यापैकी एक होते कलकत्त्याचे डॉ. सत्येन बसू, ज्यांनी 1960 मध्ये त्यांच्या युद्धकाळातील अनुभवांवर आधारित, “ए डॉक्टर इन आर्मी ” ह्या शीर्षकाअंतर्गत काही लेख लिहिले होते जे प्रकाशित नाही झाले. PG 63 मधील वास्तव्यादरम्यान, लेफ्टनंट 'Y' शी त्यांची मैत्री झाली आणि लेफ्टनंट 'Y' बद्दलचे त्यांचे मत (आणि ते  साहबजादा याकूबच्या संदर्भात बोलत आहे ह्याचा काहीसा अंदाज लावावा लागतो) असे होते: “ले. 'Y' हा मला भेटलेल्या सर्वात हुशार तरुण मुलांपैकी एक होता. त्याचा जन्म भारतातील एका शाही कुटुंबात झालेला असून प्रारंभिक शिक्षण R.I.M.C. राष्ट्रीय लष्करी महाविद्यालयात झाले होते. त्यामुळे त्याची लष्करात कारकीर्द होणे हे सुनिश्चित होते. तो ज्या घोडदळ रेजिमेंटमध्ये कार्यरत होता त्यात त्याने स्वत:ला एक सक्षम अधिकारी म्हणून सिद्ध केले होते. पण त्याच्या प्रतिभेला हे पूरक क्षेत्र नव्हतं असं मला खात्रीपूर्वक वाटे. 22 व्या वर्षी तो उत्तम पोर्ट्रेट काढत असे. संगीत आणि नृत्याचा तो दर्दी होता. दोन महिन्यांत त्याने फ्रेंच भाषेचे ज्ञान वाढवले होते व तो आता अस्खलितपणे बोलत होता आणि जर्मन भाषेतही त्याने प्रभुत्व मिळवले होते. ज्ञान प्राप्ती हा जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे ह्या अॅरिस्टॉटलच्या विधानाशी तो सहमत होता असे दिसते, कारण बहुतांश वेळ तो त्याच्या खोलीत काहीतरी पुस्तक किंवा इतर वाचण्यात घालवत असे. आणि तरीही त्याची विनोदबुद्धी तीव्र होती. त्यांच्या पूर्वीच्या छावणीतील एका प्राध्यापकाने दिलेल्या मानसशास्त्रावरील व्याख्यानांचा एकत्र अभ्यास करताना माझी त्यांच्याशी मैत्री झाली. पण तो त्याचा प्रेमळ स्वभाव होता ज्यामुळे मी त्याचा मित्र बनलो. जेव्हा मी या घोडदळातील अधिकारी, लेफ्टनंट 'Y' बरोबर मनमोकळ्या गुजगोष्टी करीत असे, त्यावेळेस त्याला कसे काय वाटते ते विचारले असता, या तुरुंगातील काही क्षण हे त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी असल्याचे त्याने मला संगितले. यापूर्वी, इतका चिंतामुक्त तो कधीही जगला नाही आणि पुस्तकांच्या माध्यमातून आत्मशोध घेता आला असे त्याने व्यक्त केले. इतर पुस्तकांव्यतिरिक्त, साहबजादा यांनी जर्मन भाषेतील फॉस्ट आणि टॉल्स्टॉयचे ‘युद्ध आणि शांती’ हे रशियन भाषेतील पुस्तक, समजण्यास सोपे जावे म्हणून जवळ इंग्रजी अनुवाद ठेवून वाचून काढले .

 

18 व्या घोडदळाचे आणखी एक अधिकारी ज्याला साहबजादा याकूबसह पकडण्यात आले, ते होते लेफ्टनंट अभय सिंग. कोटा संस्थानातील मंत्री KCIE, मेजर जनरल सर ओंकार सिंग यांचे ते धाकटे चिरंजीव, सुरुवातीला त्यांना अवेर्सा येथील PG 71 मध्ये ठेवण्यात आले होते, परंतु मे 1943 मध्ये, रोमच्या पूर्वेला 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या Avezzano (अवेझानो) मधील PG 91 ह्या तळावर हलवण्यात आले. अखेरीस ते इटलीच्या ईशान्य किनार्‍यावरील रिमिनीजवळील छावणीत इतरांसोबत सामील झाले. सप्टेंबर 1943 मध्ये इटलीने शरणागती पत्करल्यावर उडालेल्या गोंधळात, इतर शेकडो जणांप्रमाणे, एफेंडी, याह्या, अभय, ‘के’  आणि याकूब यांनी सुटका करून घेतली. जर्मन सैनिकांची गस्त टाळत, जंगलात लपत छपत ते किनारपट्टी आणि अल्पाईन पर्वतराजींच्या उतारा दरम्यांनच्या भागात गेले. साहबजादाला इटालियन भाषा अवगत असल्याने, त्यांना काही सहृदय शेतकऱ्यांकडे आश्रय मिळू शकला. मध्येच एकदा याह्या आणि एफेंडी इतरांपासून वेगळे झाले आणि सुमारे 400 किलोमीटर अंतर पायदळी तुडवल्यावर पुढे गेल्यावर, आगेकूच करणार्‍या भारतीय बटालियनशी त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी याह्या यांच्या फक्त एका पायात बूट शिल्लक होता. हिसाम अखेरीस त्याच्या रेजिमेंटमध्ये सामील झाला, जी भारतात परत पाठवली होती आणि तेथून मग बर्मामध्ये लढाईवर गेला. याह्या दिल्ली येथे लष्कर मुख्यालयात तैनात झाला.

 

इतर तिघांना एका परोपकारी इटालियन शेतकरी कुटुंबाने काही महिन्यांसाठी आश्रय दिला होता. त्यांच्यावर कोणी पाळत ठेवून आहे हे कळून येईपर्यंत त्यांना ठेवून घेतले होते आणि येऊ घातलेल्या संकटाचा इशाराही पाहुण्यांना दिला. ते निसटून जाण्यापूर्वी, घरातील महिलेने तिचा सोन्याचा हार काढला आणि शुभेच्छा म्हणून त्यांना भेट दिला. काही दिवसांनंतर, एका अंधाऱ्या रात्रीकेघसरून पडला आणि त्याच्या पायाचा घोटा फ्रॅक्चर झाला. त्याने साहबजादा आणि अभय सिंग यांना, त्याला तिथेच सोडून पुढे जाण्याची विनंती केली, मात्र ते त्यांच्या मित्राला सोडण्यास तयार नव्हते - आणि जानेवारी 1944 मध्ये जर्मनांनी त्यांना पुन्हा ताब्यात घेतले. त्या सर्वांना जर्मनीतील PoW छावणीत स्थानांतरित करण्यात आले आणि ‘K’ ला लुफ्टवाफे (जर्मन वायुसेना) द्वारे चालविल्या जाणार्‍या, बर्लिनच्या आग्नेय दिशेला 160 किलोमीटर अंतरावर असणार्‍या स्टॅलाग लुफ्ट III मध्ये ठेवण्यात आले. वुडन हॉर्स (1950) आणि ग्रेट एस्केप (1963) या चित्रपटांमध्ये, दोन जगप्रसिद्ध पलायनांचे चित्रिकरण झालेले ठिकाण म्हणून ही छावणी प्रसिद्ध आहे. ( ग्रेट एस्केप मध्ये प्रसिद्ध अभिनेते स्टीव्ह मॅक्वीन ह्यांची भूमिका होती.) तीन वर्षे बंदिवासात राहिल्यानंतर युद्ध संपल्यावर हे तीन अधिकारी भारतात परतले.

 

या कथेला पुढे दोन मजेदार कथांची जोड आहे. 

 
1966 मध्ये, PG 63 कॅम्पचे वरिष्ठ अधिकारी आणि कॅम्प अॅडज्युटंट पुन्हा भेटले. कमांडर-इन-चीफ असलेले लेफ्टनंट जनरल याह्या खान यांनी दिल्लीला भेट दिली आणि त्यांचे स्वागत पी.पी. कुमारमंगलम ह्यांनी केले. ते १९६५ च्या युद्धानंतर भारतीय लष्करप्रमुख (COAS) बनले होते. 
 
तसेच साहबजादा याकूब परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी, त्यांना आणि इतरांना युद्धादरम्यान आश्रय देणार्‍या इटलीतील कुटुंबाला भेट देण्याचे ठरवले. ती एक भावनिक पण आनंदी पुनर्भेट होती.
 
 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री साहबजादा याकूब यांच्या इटली भेटीच्या वेळी त्यांनी तुरुंगातून पलायन केल्यावर त्यांना आसरा देणाऱ्या महिलेच्या मुलीबरोबर.

 
फ्रायडे टाईम्स या पाकिस्तानातील वर्तमानपत्रात मेजर जनरल सय्यद अली हमीद यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये या सर्व बहादूरांची रोमहर्षक कहाणी कथित केली; अगदी त्यांच्या कारकिर्दीच्या परमोच्च बिंदूपर्यंत. त्या लेखाचा आधार घेऊन ही ब्लॉग पोस्ट एकत्र बांधली आहे. 
 
आता, तुम्ही म्हणाल की यात काय खास आहे? अशा कथा तर अनेक असतील. कदाचित असाही प्रश्न पडेल की मी हे तुम्हाला का सांगतोय? 
 
याचे मुख्य कारण की हा अशा काळाचा चित्रदर्शी वृत्तांत आहे जेव्हा भारतीय आणि पाकिस्तानी, हिंदू आणि मुस्लिम, पठाण आणि तमिळ ह्यांच्यात केवळ मैत्री नव्हती तर अतूट ऐक्य होते. हाकाळ असा होता जेव्हा आपण एक होतो, एकच सैन्य म्हणून लढलो होतो आणि सर्वात जवळचे मित्र होतो. दुर्दैवाने, ते जग कायमचे हरवले, दूर गेले.
 
फाळणीने आपल्याला दुभंगले, त्यात राजकारणी सतत अंगार फुलवीत आग पेटती ठेवत आहेत. नवीन पिढ्या मोठया झाल्या पण त्या केवळ एकमेकांना दुर्लक्षून नव्हे तर एकमेकांचा तिरस्कार आणि द्वेष करीत.
 
गेले ते दिन गेले. कालाय तस्मै नमः!! 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com 
 
 
 
Thanks to Prashant Naik for his inputs
 
 
 
 
 

Leave a comment



गीता कॅस्टलिनो

10 months ago

खूप informative लेख
खरंच sadly.... कालाय तस्मै नम:

दिलीप सुळे

10 months ago

फार छान माहिती दिल्याबद्दल आभार,

Rajendra Phadke

10 months ago

ते जग का दुरावले ? आपण - हिंदूंनी - नेहमीच सर्व परकीयांना मुक्तपणे प्रवेश दिला, त्यांचे स्वागतच केले. जरी त्यांनी आपल्याला लुटलं, आपल्यावर अत्याचार केले, सक्तींनी धर्मांतरं केली. त्यामुळे ब्रिटिशांची 'फोडा आणि झोडा' ही युक्ती समजून न घेता, सत्तेच्या हव्यासापायी मुसलमानांचे लांगुलचालन करून, शेवटी भारताचे विभाजनसुद्धा मान्य केले. त्यात धर्माच्या आधारावर विभाजन झाले असतानाही उर्वरित भारतात 'सर्वधर्म समभावाचा' भोंगळपणा कायम ठेवला. जगाच्या इतिहासात सर्वात भीषण अश्या नरसंहारावर अहिंसेचा हेकट आग्रह काय म्हणून ? ह्या सगळ्याचा निष्कर्ष - गांधींना 'महात्मा अथवा राष्ट्रपिता' म्हणू नये. नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कशा प्रकारे झाले - काँग्रेस कार्यकारिणीने केलेली सरदार पटेलांची बहुमताची निवड गांधींनी उपोषणाचे अस्त्र वापरून कशी बदलायला लावली, हा सगळं इतिहास शाळेत शिकवला पाहिजे.

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS