सहजीवन

नमस्कार मंडळी. तुमच्यातील काही लोकांना वाटले असेल की मी गायब कुठे झालो? पण हो, काही जणांना मी त्रास न दिल्याचा कदाचित आनंद देखील झाला असेल.

सध्या राजकारणाने संपूर्ण सोशल मीडिया व्यापून टाकला आहे. दुसरा कुठचाही विषय मांडायचा ठरवले तर वाटतं की वाचणार अथवा ऐकणार कोण? मतांचे इतके polarisation झाले आहे की लोकं कशातून काय शोधतील हे तो भगवंत देखील सांगू शकणार नाही. त्यामुळे काय बोलावं अथवा लिहावं हा एक मोठा गहन प्रश्नच आहे. आणि हो मी काही एखाद्या विषयातील मोठा तज्ञ नाही की ज्याचं लोकांनी कौतुकाने वाचावं अथवा ऐकावं.

आता वयानुसार थोडी फार अक्कल आणि अनुभवातून शहाणपण येतं असं मानलं जातं परंतु मी असेही ऐकले आहे की Maturity is inversely proportional to age. आता हे बरोबर असेल तर मग सगळं संपलंच, नाही का? असो, तर जरा आजच्या विषयाकडे वळूया.

गेल्या काही वर्षात, घटस्फोटांचे प्रमाण खूप वाढले आहे. पूर्वी हा शब्द सहसा ऐकिवात येत नसे पण हल्ली सर्रास कानी पडतो. सरसकट आजच्या पिढीला दोष देणे अत्यंत चुकीचे ठरेल पण मग काय कारणे असतील? असा काय फरक पडला?

आधीच्या पिढीमध्ये सर्वसाधारणपणे ठरवून लग्न होत असत आणि त्यावेळी मुलगा आणि मुलगी या दोघांनाही हे लग्न निभावून न्यायचे आहे हे सुरुवातीपासूनच तत्वतः मान्य असायचं. दोन अनोळखी जीव एकत्र येऊन ठोकरा खात मार्गक्रमण करत असत. त्यामुळे काही गोष्टी नाही पटल्या तरी compromise गरजेचा आहे हे ठामपणे मनावर बिंबवलेले असे. त्यात देखील मुलींना financial independence जवळपास नसे त्यामुळे मग नाईलाजाने का होईना, दिवस ढकलले जायचे. दुसरा काही पर्याय नाही म्हणून लग्न बंधन टिकवून ठेवायचे, बस्स..

त्यामुळे प्रश्न उदभवतो की लग्न करायच्या अथवा ठरवायच्या आधी काय बघावे?

आर्थिक स्थैर्य आणि करियर

Financial Stability आहे की नाही ह्याचा विचार करणे यात कसलाही कमीपणा नाही किंवा तो स्वार्थही नाही. पैशाचे सोंग कधीही करता येत नाही. प्रेमात प्रेम कालवून खाता येत नाही. करियर करणारी मुलगी असावी अशी इच्छा असणे चूक नाही परंतु मग त्या बरोबरीने घरच्या कामांची जबाबदारी देखील शेअर करण्याची तयारी पाहिजे. तिथे नवरा अथवा बायको असा भेदभाव चालत नाही. कधी कधी एखादी व्यक्ती कमी कमावणारी असू शकते पण त्याचे ध्येय (vision) काय आहे? त्याच्यात लाथ मारून पाणी काढण्याची धमक आहे का? हे बघणे महत्वाचे आहे. पुढे काय होणार आहे अथवा करियर मध्ये काय करायचे आहे यांच्याविषयी न बोलणे त्याच्याहून मोठी चूक असूच शकत नाही. परदेशी स्थायिक व्हायला आवडेल; भारतातच राहायला आवडेल; हरकत नाही पण याविषयी एकमेकांशी बोला. करियरमध्ये एखादी मोठी संधी येते त्यावेळी काय करणार? एकमेकांसाठी आपण शहर बदलायला तयार असू का?

पण त्याच वेळी स्वप्न इतकी देखील मोठी असू नयेत की जी पूर्ण करणे अशक्य झाल्यामुळे स्वतःचीच चिडचिड व्हावी. आपल्याला आपण नेहमीच बरोबर आहोत असे वाटते पण त्यामुळे जर तब्येतीची हेळसांड होत असेल तर काय उपयोग? आजच्या जगात physical and mental burn-out is for real. जर मनाला आनंद आणि समाधान मिळत नसेल तर व्याप कमी करायची तयारी हवी.

व्यसने

या गोष्टीबाबत नीट संवाद घडायला हवा. जर आपल्या जोडीदाराने कुठचेही व्यसन करून चालणार नसेल तर त्याचा सुरुवातीलाच विचार करणे गरजेचे आहे. कालांतराने मग ही बाब अतिशय अडचणीची ठरू शकते.

संस्कृती

लग्न करताना जात पात बघावी की नाही हा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे. पण संस्कृती जुळते की नाही हे बघणे अत्यंत महत्वाचे आहे. ती 100% जुळायलाच हवी नाहीतर हल्लीच्या Big Fat Indian Wedding च्या जमान्यात लग्नाचा event मोठ्या दिमाखात होतो किंवा काही वेळेला destination wedding देखील होते. त्यात कोणाची हरकत असायची काहीच गरज नाही परंतु त्यानंतरचे जे आयुष्य आहे तिथून खरी सहजीवनाला सुरुवात होते. खाणे, कपडे, स्वच्छता, उठणे-बसणे याच्या पद्धती, देवपूजा, भक्ती, उपासतापास तसेच घरात काय काय गोष्टी पाळल्या जातात? त्या घरातील संस्कृती कशी आहे? त्यांची philosophy काय आहे? आणि माझ्या घरातील संस्कृतीशी ती मिळतीजुळती अथवा जवळपास जाणारी असेल तरच नवरा बायको दोघांना बदल स्वीकारणे सोपं जाईल.

कलह

अनादी कालापासून जग हे पुरुषांचे राहिले आहे. मला मान्य आहे की ते हळूहळू बदलत आहे पण त्याचा वेग फारच कमी आहे. झालंय काय लहानपणापासून आई सांगत आली की बाबांना विचारून सांगते. खरं म्हणजे वेळ मारून नेण्याची ती एक पळवाट असते पण मुलांना ते कळत नाही. त्यांना वाटते की बाबा म्हणजे Ultimate Authority. म्हणून पण असेल किंवा सवयीने असेल किंवा आत्मविश्वास कमी असेल म्हणून पुरुषाचा एक होकार आला की बरं वाटत असावे.

घरात आई वडील महत्वाचे आहेत आणि असतात पण बाजू कुणाची घ्यायची हा मोठा गहन प्रश्न असतो. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आई वडील कायम नसणार, मुलं मोठी होऊन उडून जाणार; बायकोच शेवटपर्यंत साथ देणार असते म्हणूनच तिला Life Partner असे म्हटले जाते.

भांडणे होणे अपरिहार्य आहे. पण भांडणाला Expiry Date असलीच पाहिजे. त्याच दिवशीची. दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद असू नयेत. अंगावर धावून जाणे, मोठ्याने बोलणे, शिवीगाळ करणे, दुसऱ्याच्या नातेवाईकांना त्या भांडणात ओढणे, शारीरिक मारहाण should be simply unacceptable.

संवाद

प्रत्येक नात्यात अहंकार आणि stress तर डोकावतोच. त्यामुळे सगळ्यात महत्वाचे काय तर एकमेकांमधील संवाद. बसून बोललंच पाहिजे. Talk and share is the key to a better relationship. कारण लक्षात ठेवा की घटस्फोट होण्याचे मुख्य कारण म्हणजे एकमेकांत बोललंच जात नाही.

व्यसनांच्या आहारी जाणे, बाहेरख्यालीपणा, मारहाण अशा गोष्टींमुळे काही वेळेला घटस्फोट घेणे अनिवार्य होऊन जाते. परंतु खूप वकील सांगतात की अनेकदा घटस्फोटाचे कारण इतके तकलादू किंवा क्षुल्लक असते की त्यावर फेरविचार करणे सहज शक्य असते. आजच्या मुली financially independent होता आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु त्याच्या जोरावर छोट्याशा गोष्टींवरून संसार मोडीत काढणे हे बरोबर नाही. आणि हो, मुलाच्या अथवा मुलीच्या आईवडिलांनी आपल्या मुलांच्या संसारात अजिबात ढवळाढवळ करू नये. गरज असेल तेव्हा सपोर्ट जरूर करावा पण दैनंदिन जीवनात डोकावू नये.

मला कल्पना आहे की मी कुणी Marriage Councillor नव्हे पण आयुष्यातील अडतीस वर्षे संसार केला असल्यामुळे काही गोष्टी लक्षात येत असतात, जाणवत असतात, अनुभवलेल्या असतात आणि त्याच्या आधारे हे थोडेसे ग्यान देण्याचा एक छोटा प्रयत्न. आजच्या पिढीतील निदान काही मुलांनी अथवा मुलींनी हे ऐकले तरी माझा हा प्रयत्न यशस्वी झाला असे मला वाटेल.

All the best!!

यशवंत मराठे
@yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Ranjit Mehta

4 months ago

Yeshwanta,
This write-up can be used as a basic guide for couples which are about to tie the knot!

Madhav Tembe

4 months ago

The points you have made are the basic foundations of a successful marriage. But it is my apprehension that the marriage concept may be overtaken by the Live in Relationship. This is particularly among the "Educated" and "Well to Do" amongst us.

Rajendra Phadke

4 months ago

अरेच्चा - हे तर माझेच विचार आहेत. 
पण लिहायला बसलो तर कागदावर उतरवता येतील का?
थोडक्यात सांगायचं तर, झक्कास लिहिलंय !!

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS