मॅटिनी

मॅटिनी सिनेमे हा हृदयात कोरून ठेवलेला एक सुखद कप्पा आहे. मॅटिनीला लागलेले चित्रपट बघणे, हा त्या काळात एक अत्यंत जिव्हाळ्याचा भाग होता. त्यात एक कैफ होता आणि जो आम्ही पुरेपूर अनुभवला.

 

आमची १० वी एसएससी ची दुसरी बॅच आणि त्यावेळी कॉलेजमध्ये ११ वी ची सोयच नव्हती त्यामुळे आमची ११ वी शाळेतच झाली. बदल एवढाच घडला की हाफ पॅन्टच्या ऐवजी फुल पॅन्ट झाली आणि आम्हाला बालमोहनसारख्या टिपिकल मराठी शाळेत इंग्रजी माध्यमातून शिकवण्यात येणार होतं. मराठी शिक्षक अचानक इंग्रजीत शिकवणार आणि आम्हाला ते कळणार.. सगळाच आनंदी आनंद. पण एक गोष्ट घडली की आम्हाला अचानक मोठं झाल्याचा आभास निर्माण झाला.

 

त्यामुळे अधूनमधून शाळेतून बुट्टी मारून सिनेमाला जाणे हे मर्दुमकीचे लक्षण वाटू लागले. शिवाजी पार्क पररसरात मुख्यत्वे करून नऊ सिनेमा थिएटर्स होती. बादल, बिजली, बरखा, रिव्होली, सिटीलाईट, पॅराडाईज, प्लाझा, कोहिनूर आणि श्री सिनेमा. यातील रिव्होलीमध्ये बऱ्याच वेळेला साऊथ इंडियन चित्रपट लागत असत त्यामुळे आमच्या लिस्टमधून ते फार लवकर बाद झाले. सिटीलाईट आणि पॅराडाईज तशी एक प्रकारे टुकार थिएटर्स त्यामुळे ती देखील आमच्या लिस्टमधून वगळली गेली. प्लाझा आणि कोहिनूर म्हणजे मराठी चित्रपटगृहे ज्यात आम्हाला कोणालाच फारसा इंटरेस्ट नव्हता त्यामुळे त्यांच्यावर देखील फुल्ली. त्यामुळे आमचा सगळा संचार उरलेल्या ४ थिएटर्समधेच होता. तशी टिळक ब्रिजच्या पलीकडे बरीच थिएटर्स होती पण एवढ्या लांब जायचे म्हणजे बसचा खर्च होणार म्हणून मग नकोच.

 

 

साधारण ४०-५० वर्षांपूर्वीचा हा कैफ आज आठवताना एक जाणवते की, केवळ चित्रपट, नट नट्या इतकेच मर्यादित नव्हते पण त्याही सोबत इतर अनेक गोष्टी होत्या. आज मॅटिनीचा काळ इतिहास जमा झाला आहे. परंतु गोठवलेले ते क्षण अजूनही ताजे आहेत. आज मागोवा घेताना त्याचे पडसाद आणि आठवणी अजूनही तितक्याच टवटवीत आहेत. आणि ज्या वयाच्या साठीतही जिव्हाळ्याच्या तर आहेतच पण उर्जा देणाऱ्या देखील आहेत. 

 

मॅटिनीला आम्हाला अगदी देव आनंद, राज कपूर आणि दिलीप कुमार या त्रिकुटापासून शम्मी कपूर, राजेश खन्ना, शशी कपूर, धर्मेंद्र, जितेंद्र, किशोर कुमार, मेहमूद, राजकुमार आणि ते अगदी राजेंद्र कुमार, मनोज कुमार, सुनील दत्त आणि विश्वजित पर्यंत कोणाचेही चित्रपट चालत असत. आराधना, दो रास्ते, इत्तेफाक, शिकार, पडोसन, ब्रह्मचारी, राम और श्याम, हमराज, मेरा साया, प्यार किये जा, गुमनाम, संगम, प्रोफेसर, हाफ तिकीट, जंगली, इव्हिनिंग इन पॅरिस, कोहिनूर, फर्ज, वक्त, शतरंज, हम दोनो, अलबेला, तुमसा नही देखा, नौ दो ग्यारह, चोरी चोरी, सीआयडी, नया दौर, श्री ४२०, आवारा, काला बाजार, बीस साल बाद, गंगा जमना, कश्मीर की कली, प्यार का मौसम, तीन देवीयां, वो कौन थी, यकीन, साधू और शैतान ही काही वानगीदाखल नावे. आणि हो, जॉनी मेरा नाम, ज्वेल थीफ, तिसरी मंजिल, तेरे घर के सामने, चलती का नाम गाडी, बॉबी, शोले असे काही सिनेमे किती वेळा बघितले याचा हिशोब मांडणेच कठीण; अगणित वेळा. या चित्रपटांचा सीन आणि सीन पाठ असायचा पण त्यात एक प्रकारचे थ्रिल वाटायचे. 

 

गंमत म्हणजे रहस्यप्रधान चित्रपट देखील अनेक वेळा बघताना तेवढीच मजा यायची. एकदा आठवतंय की तिसरी मंजिल या सिनेमात प्रेमनाथची एंट्री झाल्या झाल्या कोणीतरी एक जण ओरडला "हाच खुनी आहे".. तेव्हा सिनेमा पहिल्यांदाच बघायला आलेला एक सरदारजी इतका चिडला की त्याने त्या मुलाच्या कानाखाली एक मस्त जाळ काढला आणि तो थिएटर मधून निघून गेला.

 

या अशा स्वप्नभरल्या भावनिक शाली अंगावर घेऊन दिवस फुलपाखरासारखा जायचा. हा असा होता तो मॅटिनीचा काळ!

 

हा काळ होता भन्नाट गाण्यांचा. भगवान दादांचा 'अलबेला', शम्मी कपूरचा 'तिसरी मंजिल', देव आनंदचा 'ज्वेल थीफ', राज कपूरचा 'श्री 420', दिलीप कुमारचा 'कोहिनूर' या चित्रपटांच्या गाण्यांवर पडद्यावर पैसे उधळले जात. प्रेक्षक पडद्यासमोर डान्स करत असत. तो एक 'प्रेक्षणीय सीन' असायचा.

 

 

आता मुळी थिएटर मधील चित्रपट ही संस्कृतीच संपली आहे. प्रेक्षकांचा सहभाग, दाद देण्याची पद्धत हे जवळपास नाहीच. इंटरव्हल झाल्यावर येणारा थंड पेयांच्या बाटल्यावर ओपनर फिरवल्यावर येणारा आवाज आता नाही, गरम शेंगांचे कोन नाहीत. इंटरव्हल संपल्यावर वाजणारी घंटा, बऱ्याच थिएटर्समध्ये सीट समोर येणारा खांब, आतला काळोख, पडदा सरकतानाचा होणार आवाज, सगळे अजून मनात साठवलेले आहेत. हा कैफ मल्टीप्लेक्स मध्ये नाही, का नाही सांगता येत नाही. मॅटिनीचं एक वेगळेपण होतं, अगदी प्रांजळपणे सांगायचं तर ते होते "एक वेडेपण".

 

आपल्या सीटचा वेध घेत बसल्यावर उशीरा आलेल्या प्रेक्षकाचा एक प्रश्न ठरलेला, "किती वेळ झाला सुरू होऊन?" या प्रश्नाला खरं काही अर्थ नसायचा. शेजारचे उत्तर देखील ठराविक साच्यातले असायचे "आत्ताच टायटल संपली".

 

आज सगळे बदलले आहे. सर्वत्र मल्टिप्लेक्सनी थिएटर्स व्यापून टाकली आहेत. सिंगल स्किन थिएटर्स शोधून देखील सापडत नाही आणि खास करून शहरांमध्ये तर नाहीच. आता तर टीव्ही, मोबाईल वर देखील चित्रपट आहेत. आणि त्यामुळे मॅटिनी ही संस्थाच संपली.

 

पूर्वी काळाबाजारवाले हा देखील एक अविभाज्य भाग होता या सगळ्या संस्कृतीचा!! पण खरं सांगायचं तर मॅटिनीला काळाबाजार फारसा नसायचा. त्यामुळे सिनेमा खिशाला परवडेल अशा बजेट मध्ये साजरा व्हायचा. आज मल्टीप्लेक्स मध्ये सिनेमा बघणे ही एक अत्यंत खर्चिक बाब झाली आहे. चार लोकांच्या कुटूंबाने एकत्र सिनेमा बघणे म्हणजे पॉपकॉर्न, कोल्ड ड्रिंक धरून माणशी हजार रुपये कुठ्ठे गेले कळत पण नाही.

 

प्रत्येक रसिकाच्या आणि विविध शहरांमधील सिनेमाच्या आठवणी विविधरंगी आहेत आणि असतील. परंतु माझ्या पिढीतील प्रत्येकाच्या हृदयातील एक कप्पा मॅटिनीने व्यापलेला असेल यात काडीमात्र शंका नाही. भविष्यात जेव्हा सिनेमाचा इतिहास लिहिला तर तो "मॅटिनीच्या" उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकणार नाही

 

असे होते आमचे "मॅटिनी" आख्यान.

 

@ यशवंत मराठे 

Leave a comment



दिलीप सुळे

5 months ago

अप्रतीम लेख, तारुण्यातील दिवस आठवले. वा क्या बात है.

Sunil Gaitonde

5 months ago

You said it. खरंच जुन्या आठवणींना उजाळा दिलास. काय होते ते दिवस! आता जनरेशन गॅप म्हणायचं आणि मूग गिळून गप्प बसायचं.

Prashant Naik

5 months ago

jमस्त लिहिले आहे. आपल्या कॉलेज च्या आठवणी जाग्या झाल्या. आपले त्या काळातले पब कल्चर म्हणायला हरकत नाही . कारण फक्त तरुण वर्ग ह्या वेळेस सिनेमा बघायला मोकळा असायचा . त्या नंतर इराणी हॉटेल मध्ये चहा आणि एक सिगरेट ती पण २ किंवा ३ जणात मिळून .

Sneha Dharap

5 months ago

It remined old and golden memories.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS