कथा - कॅलेंडरची

कुठच्याही कालगणनेचा विचार करा आणि अंदाज करायचा प्रयत्न करा की ती कशी तयार झाली असेल? त्याच्या मागे काही शास्त्रीय आधार आहे की ती अशीच गंमत म्हणून बनवली गेली? जरा त्याच्या खोलात गेलात तर मात्र लक्षात येईल की ती किती जटिल आहे आणि ती तयार करताना खगोल शास्त्रज्ञांना किती अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले असेल.

 

कालगणना अथवा कॅलेंडर म्हणजे अनेक शास्त्रज्ञांचा शेकडो वर्षांचा अभ्यास आणि अगणित चुकांमधून घेतलेला बोध याची मांडणी असते. आज संपूर्ण जगात ग्रेगोरियन कॅलेंडर हे सर्वमान्य कालगणनेचे एकक आहे. परंतु आज वापरले जाणारे ग्रेगोरियन कॅलेंडर 1572 साली तयार करण्यात आले. पण मग त्याच्या आधी कोणती कालगणना होती? आजचे ग्रेगोरियन कॅलेंडर हे प्राचीन काळच्या रोमन कॅलेंडरची सुधारित आवृत्ती आहे.

 

रोमन कॅलेंडर कसे होते, त्याच्यात कालमापन कसे केले जात होते आणि त्यात कसे फेरफार होत गेले आणि त्या घटनांचा कालानुक्रम कसा होता याचा वेध घेण्याचा हा एक प्रयत्न.

 

तत्पूर्वी, काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

 1. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे एक परिभ्रमण म्हणजे एक वर्ष

 2. एक वर्ष म्हणजे नेमका किती कालखंड? तर, शास्त्रीय आकडेमोडीनुसार एक वर्ष म्हणजे 365 दिवस, 5 तास (0.20833  दिवस), 48 मिनिटे (0.03333 दिवस) आणि 46 सेकंद (0.0005324 दिवस). म्हणजेच एक वर्ष = 365.242192 किंवा 365.2422 दिवस

3. कालानुरूप ऋतुचक्राशी अथवा कालचक्राशी सांगड घालणे ह्यालाच कॅलेंडर अद्ययावत करणे म्हणता येईल

4. वर्षाचा कालखंड हा दशांश / अपूर्णांक दिवसांचा असल्याने पृथ्वीचा एक वर्षाचा कालावधी कॅलेंडरमध्ये जुळवणे कठीण आहे. 

 

आता एका वर्षातील काही तास, दुसर्‍या वर्षातील काही तास ह्याची एकत्र मोजमाप करणे म्हणजे शुद्ध वेडेपणा ठरेल, नाही का? आपले सगळे मानवी व्यवहार हे दिवसांच्या परिमाणावर आधारित आहेत. त्यामुळे आपल्या कॅलेंडर वर्षाचा पृथ्वीच्या वर्षाशी, विविध पद्धतीने मेळ घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. त्यामुळे अशी अनेक कॅलेंडर्स, तसेच कालमापनाच्या अनेक पद्धती पूर्वापार अस्तित्वात होत्या. एकदा वरील संकल्पना समजून घेतली की कॅलेंडर कसे विकसित होत गेले हे समजून घेणे सोपे जाईल.

 

इसवी सन पूर्व 753

रोम्युलस ह्या सम्राटाने रोम शहराची तसेच रोमन साम्राज्याची स्थापना केली. त्याने कालगणनेची एक पद्धत विकसित केली ती रोम्युलस कॅलेंडर म्हणून ओळखली जाते. कशी होती ती? ऐकायला आता गमंत वाटेल पण त्याच्यात एक वर्ष फक्त 304 दिवसांचे होते आणि हो, मुख्य म्हणजे त्याला कोणताही शास्त्रीय आधार नव्हता. एका वर्षाचे 10 महीने होते. महिन्यांची नावे आणि दिवसांची संख्या खालीलप्रमाणे होती:

पहिला महिना - मार्टियस (मार्च) = 31
दुसरा महिना - एप्रिल (एप्रिल) = 30
तिसरा महिना – मायस (मे) = 31
चौथा महिना - जुनिअस (जून) = 30
पाचवा महिना - क्विंटिलीस (जुलै) = 31
सहावा महिना - सेक्स्टिलिस (ऑगस्ट) = 30
सातवा महिना - सप्टेंबर = 30
आठवा महिना - ऑक्टोबर = 31
नववा महिना - नोव्हेंबर = 30
दहावा महिना - डिसेंबर = 30
एकूण दिवसांची संख्या = 304

 

 

या कालगणनेत डिसेंबर नंतरचे दिवस मोजले जात नसत कारण कडाक्याच्या थंडीमुळे सर्व व्यवहार ठप्प होत असत. वसंत ऋतूचे आगमन हा वर्षारंभ समजला जात असे. आणि म्हणूनच नवीन वर्षाची सुरुवात मार्चपासून होत असे. अशास्त्रीय पद्धतीने बनवलेले असे दुसरे कोणते कॅलेंडर नव्हते आणि नाही. परंतु, गंमतीचा भाग असा ह्यातील 8 महिन्यांची नावे सध्याच्या कॅलेंडर मध्ये वापरली गेली आहेत. ही नावे कशी पडली हे पाहणे ही रंजक ठरेल.

 

मार्टियस म्हणजे मार्स ही रोमन लोकांची युद्ध देवता होती. रोमन हे युद्धातील जेते म्हणून प्रसिद्ध असल्याने वर्षाच्या पहिल्या महिन्याचे नाव मार्टियस – मार्स - मार्च असे ठेवले गेले. मार्च महिन्यातील 21 तारखेला सूर्य विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धात प्रवेश करतो आणि थंडी संपून, वसंत ऋतु प्रारंभ होतो. कडाक्याच्या थंडीचा  पराजय करण्यासाठी सूर्याने आगेकूच केली आहे ह्या रुपकात्मक अर्थाने ह्या महिन्याला हे नाव देण्यात आले.

एप्रिलीस- व्हीनस ही ग्रीक देवता प्रेम व सौंदर्य ह्याचे प्रतीक समजली जाते. तिला अफ्रोडाइट असेही म्हटले जात होते. रोमन बोलीला ग्राम्य भाषेत अफ्रोडाइटला Aprilis किंवा एप्रिल म्हणतात. वसंत ऋतुच्या आगमनाने संपूर्ण युरोपातील सृष्टी सौंदर्याने बहरून जात असल्याने ह्या महिन्याला हे नाव दिले असावे.  

मायस (मे) - ऍटलस ह्या रोमन देवाच्या मुलीचे नाव, माईया होते आणि हे नाव महिन्यासाठी देण्यात आले.

जुनिअस (जून) - ज्युपिटर हा ग्रीकांचा महादेव म्हणून ओळखला जात असे. ह्याची पत्नी ज्युनो हिच्या नावावरून ज्युनीयस किंवा जून हे नाव ह्या महिन्याला दिले गेले.

 

क्विंटिलीस ते डिसेंबर म्हणजे सरळ सरळ पाच ते दहा.

जूनच्या पुढील महिन्यांना कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण नावे दिली गेली नसल्याने आपण गमतीने असेही म्हणू शकतो की त्यांच्याकडच्या देवदेवता संपल्या. (त्यावेळी त्यांनी आम्हा भारतीयांना विचारले असते तर आपण तर कितीतरी नावे त्यांना दिली असती. असो, विनोदाचा भाग सोडून देऊ).

 

मात्र, रोम्यूलस कॅलेंडर मध्ये शास्त्रीय दृष्टीकोनाचा पूर्ण अभाव असल्याने त्यात सुधारणा करणे अतिशय आवश्यक होते. 

 

इसवी सन पूर्व 715

ह्या वर्षी रोमन साम्राज्याच्या गादीवर रोम्यूलस नंतर नुमा पॉम्पिलियस (Numa Pompilius) बसला. त्याने दरवर्षी कालगणना करण्यासाठी, सल्लागार म्हणून धर्मगुरूंची समिती गठन केली. त्याच्या अध्यक्षाला पॉन्टिफेक्स मॅक्सिमस (Pontiphex Maximus) हा किताब देण्यात आला. आज देखील व्हॅटिकन सिटीमधील कॅथलिक ख्रिश्चनांचे आदरणीय पोप ह्याचं नावाने ओळखले जातात.

 

ह्या समितीने खालील सुधारणा केल्या.

फेब्रुवारी आणि जानेवारी हे 28 दिवसांचे दोन महिने डिसेंबर नंतर जोडण्यात आले, ज्यामुळे एका वर्षाचे 56 दिवस वाढले. परंतु, रोमन लोकांना सम संख्येचे वावडे असल्याने रोम्युलस कॅलेंडरच्या 30 दिवसांच्या महिन्यातून प्रत्येकी एक दिवस वजा करून जानेवारी महिन्यात एक दिवस वाढवून तो 29 दिवसांचा करण्यात आला.

 

अशा रितीने वर्षाचे दिवस ह्याप्रमाणे झाले..
मार्टियस, एप्रिलिस, मायस, जुनियस (4 महिने X 31 = 124 दिवस)
क्विंटिलिस, सेक्स्टिलिस, सप्टेंबर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर (6 महिने X 29 = 174 दिवस)
फेब्रुवारी 28 दिवस
जानेवारी 29 दिवस
एकूण दिवसांची संख्या = 355

 

आता चांद्र वर्ष 354 दिवसांचे असल्यामुळे या कालगणनेत एका वर्षात एक दिवस अतिरिक्त होता. ऋतूचक्राशी मेळ घालण्यासाठी, नुमा पॉम्पिलियसने अर्सिडोनियस म्हणून ओळखला जाणारा अतिरिक्त महिना जोडण्याची तरतूद केली. तथापि हा अतिरिक्त महिना कधी आणि कसा घ्यावा हे ठरविण्याचा अधिकार पॉन्टिफेक्स मॅक्सिमसला देण्यात आला. नुमा पॉम्पिलियसचे कॅलेंडर इसवी सन पूर्व 450 पर्यंत अस्तित्वात होते.

 

इसवी सन पूर्व 450 

 

या वर्षी सल्लागार समितीने रोमन कॅलेंडरमध्ये सुधारणा केल्या आणि अतिरिक्त महिने कसे घ्यावेत हे ठरवले. त्यांनी महिन्यांचा क्रमही बदलण्याचे ठरवले आणि म्हणून डिसेंबर नंतर जानेवारी आणि फेब्रुवारी हा वर्षाचा शेवटचा महिना ठरला. सम वर्षात 22 आणि 23 दिवसांचा अतिरिक्त महिना घेण्याचे ठरले.

म्हणून:-

पहिले वर्ष (विषम संख्या) = 355 दिवस
दुसरे वर्ष (सम संख्या) = 377 दिवस
तिसरे वर्ष (विषम संख्या) = 355 दिवस
चौथे वर्ष (सम संख्या) = 378 दिवस
दिवसांची एकूण संख्या = 1465  दिवस
म्हणून प्रतिवर्ष सरासरी दिवस = 1465/4 = 366.25

परंतु याचा अर्थ असा की ह्या कॅलेंडरमध्ये, एका वर्षात 365.2422 दिवसांपेक्षा 1 दिवस अधिक होता. या एका दिवसाच्या फरकामुळे, धर्मगुरूंच्या समितीपुढे प्रचंड गुंतागुंत निर्माण झाली.

 

ज्युलियन कॅलेंडर

हे कॅलेंडर इसवी सन पूर्व 45 ला अस्तित्वात आले.

इसवी सन पूर्व 63 मध्ये ज्युलियस सीझरची पोंटिफेक्स मॅक्सिमस (धर्मगुरूंचे प्रमुख) म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यामुळे कालगणनेबाबत निर्णय घेणाऱ्या समितीचा तो अध्यक्ष बनला. तथापि, रोमन साम्राज्यातील अंतर्गत कलहामुळे त्याने कॅलेंडरच्या मुद्द्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. इसवी सन पूर्व 48 मध्ये सीझर इजिप्तला गेला आणि क्लियोपॅट्राच्या प्रेमात पडला. तो साधारण वर्षभर अलेक्झांड्रिया मध्ये राहिला. त्यांच्या वास्तव्यादरम्यान, त्याने काल आणि ऋतुचक्र मापनाच्या इजिप्शियन पद्धती अभ्यासल्या. इजिप्शियन शास्त्रज्ञांच्या लक्षात आले होते की एक वर्ष हे 365.25 दिवसांचे असते आणि म्हणून त्यांच्याकडे 365 दिवसांचे एक वर्ष असून त्यात प्रत्येकी 30 दिवसांचे 12 महिने होते व प्रत्येक महिन्यातील शेवटचे 5 दिवस उत्सव साजरे करण्यासाठी राखलेले होते. त्यांचा आठवडा 10 दिवसांचा होता. इजिप्तचा सम्राट, टॉलेमी याने इसवी सन पूर्व 240 मध्ये सर्वप्रथम प्रस्तावित केले की, दर 4 वर्षांनी 5 ऐवजी 6 दिवस उत्सवासाठी राखून 0.25 दिवसांची तफावत भरून काढावी. तथापि, धर्मगुरूंनी ह्या संकल्पनेला पाठिंबा दिला नाही आणि त्याचा प्रस्ताव फेटाळला गेला. परंतु आज आपण हे मान्य केले पाहिजे की टॉलेमी ह्याने लीप वर्षाची संकल्पना सर्वप्रथम मांडली.

 

सीझरने इजिप्शियन गणितज्ञ, सोसिजीन्स यांना कॅलेंडर अद्ययावत करण्यासाठी आमंत्रित केले. सोसिजीन्सच्या सूचनेनुसार, पृथ्वीच्या 365.25 दिवसांच्या परिभ्रमण काळाशी मेळ घालण्यासाठी रोमन कॅलेंडर 365 दिवसांचे बनले आणि प्रत्येक चौथे वर्ष 366 दिवसांचे झाले. तथापि, इसवी सन पूर्व 46 मध्ये (स्प्रिंग इक्विनॉक्स) वसंत संपात दिवसाशी सांगड घालण्यासाठी, एका वर्षातील दिवसांची संख्या 445 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आणि सगळ्याचा बोजवारा उडाला आणि म्हणूनच इसवी सन पूर्व 46 हे गोंधळाचे वर्ष (Year of Confusion) म्हणून ओळखले जाते.

 

इ.स. पूर्व 47, इ.स. पूर्व 46 आणि इ.स. पूर्व 45 ह्या वर्षांचा तक्ता हयाप्रमाणे आहे:

महिना (इ.स. पूर्व 47), (इ.स. पूर्व 46), (इ.स. पूर्व 45)

जानेवारी: 29, 29, 31
फेब्रुवारी: 28, 29, 29

अधिक महिना: --, 23, --   Mercedonius (Work Month)

मार्च: 31, 31, 31
एप्रिल: 29, 29, 29
मे: 31, 31, 31
जून: 29, 29, 30
जुलै: 31, 31, 31
ऑगस्ट: 29, 29, 30
सप्टेंबर: 29, 29, 31
ऑक्टोबर: 31, 31, 31
नोव्हेंबर: 29, 29, 31

अधिक महिना: --, 33, --  Intercalary (Inserted)

अधिक डिसेंबर: --, 34, --  Intercalary (Inserted)

डिसेंबर: 29, 29, 30

एकूण दिवस = 355, 445, 365

 

अशा प्रकारे ज्युलियन कॅलेंडर इसवी सन पूर्व 45 मध्ये लागू झाले ज्यात वर्षाचे दिवस 365 होते आणि 366 दिवसांच्या प्रत्येक चौथ्या वर्षाला लीप वर्ष म्हणून संबोधले जात होते.

 

 

ज्युलियन कॅलेंडर मध्ये सम्राट ऑगस्टसने केलेल्या दुरुस्त्या:-

ज्युलियन कॅलेंडर इ.स. पूर्व 45 मध्ये अंमलात आले परंतु एका वर्षाच्या आत, इ.स. पूर्व 44 मध्ये ज्युलियस सीझरचा खून झाला आणि त्यामुळे कॅलेंडरच्या अंमलबजावणीची जबाबदारी धर्मगुरूंच्या समितीच्या खांद्यावर आली. जरी दर 4 वर्षांनी 366 दिवसांचे लीप वर्ष घेण्याचे ठरले असले तरी समितीने अनवधानाने किंवा हेतुपुरस्सर दर 3 वर्षांनी लीप वर्ष घेण्यास सुरुवात केली. या घोडचुकीमुळे, ज्युलियन कॅलेंडरमध्ये अचूकता राहिली नाही तरीही हे कॅलेंडर इ.स. पूर्व 45 ते इ.स. पूर्व 8 पर्यंत चालले. सीझरच्या बहिणीचा नातू आणि ज्युलियस सीझरचा दत्तक मुलगा गायस ऑक्टाव्हियस (ऑगस्टस) याने केवळ 19 व्या वर्षी, रोमन साम्राज्याची सूत्रे हाती घेतली. इ.स. पूर्व 27 मध्ये त्याने धर्मगुरुंच्या समितीच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वतःकडे घेतली आणि कॅलेंडर अंमलबजावणी करणाऱ्या समितीचा तो अध्यक्ष बनला. लीप इयरची चूक त्याच्या लक्षात आली. इ.स. पूर्व 45 ते इ.स. पूर्व 9 पर्यंतच्या 36 वर्षांत, 10 ऐवजी 13 लीप वर्षे घेतली असल्यामुळे 3 अतिरिक्त दिवस घेतले गेले. त्या विसंगतीला सुसंगत करण्यासाठी इ.स. पूर्व 4 ते इ.स. पूर्व 4 पर्यंत लीप वर्ष घेण्यास बंदी घालण्यात आली आणि ज्युलियन कॅलेंडरची गाडी रुळावर आणली गेली. दर 4 वर्षांनी लीप इयर घेण्याची प्रथा इ.स. 8 पासून ते आजतागायत पाळली जात आहे.

 

रोमन सिनेटने ऑगस्टसचा सत्कार करण्याचा ठराव मंजूर केला आणि जुलैनंतर येणाऱ्या सेक्स्टिलिस ह्या महिन्याचे नामकरण ऑगस्ट असे केले. या अगोदर ज्युलियस सीझरच्या सन्मानार्थ क्विंटिलिस महिन्याचे नाव सुद्धा बदलून जुलै असे ठेवण्यात आले होते. ज्युलियन कॅलेंडर नुसार, सेक्स्टिलिस (ऑगस्ट) महिन्यातील दिवसांची संख्या 30 होती तर जुलैमध्ये 31 दिवस होते. हे ऑगस्टसला अमान्य असल्यामुळे त्याने फेब्रुवारीमधील 1 दिवस कमी केला आणि ऑगस्टमध्ये एक दिवस वाढवून, तो महिना 31 दिवसांचा केला. या बदलामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तीन महिने सलग 31 दिवसांचे  झाले. ज्युलियन कॅलेंडर मध्ये 31 आणि 30 दिवसांचे महिने आळीपाळीने घेतलेले होते त्यामुळे सप्टेंबरमधील एक दिवस ऑक्टोबरमध्ये मिळवण्यात आला आणि क्रमवार संगती राखण्यासाठी नोव्हेंबरमधील एक दिवस डिसेंबरमध्ये वाढवण्यात आला.

 

ज्युलियन आणि ऑगस्टस कॅलेंडरनुसार महिने आणि दिवसांची यादी खालीलप्रमाणे आहे:-

महिना     ज्युलियन, ऑगस्टस                              

जानेवारी -   31      31
फेब्रुवारी -   29/30   28/29
मार्च -      31      31
एप्रिल -     30      30
मे -        31      31
जून -       30     30
जुलै -       31     31
ऑगस्ट -    30     31
सप्टेंबर -    31     30
ऑक्टोबर -  30     31
नोव्हेंबर -   31     30
डिसेंबर -    30     31  
एकूण दिवस: 365/366, 365/366

 

आज आपण ऑगस्टस कालगणनेचा स्वीकार केला आहे  आणि महिन्यांची नावेही सर्वमान्य झाली आहेत. ह्यातील सुधारणा जरी ऑगस्टसने केल्या असल्या तरी कॅलेंडरचे नाव ज्युलियन कॅलेंडर असेच राहिले. ज्युलियन कॅलेंडर हे रोमन जगतात, बहुतांश युरोपमध्ये आणि अमेरिका आणि इतरत्र असलेल्या युरोपियन वसाहतींमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे कॅलेंडर होते. हे देखील लक्षात घेतले पाहिजे ह्या कॅलेंडर मध्ये की इ.स. पूर्व 1 नंतर आलेले वर्ष शून्य वर्ष म्हणून गणले न जाता ते वर्ष थेट इ.स. 1 असे धरले गेले, ज्यामुळे कालगणनेची प्रक्रिया क्लिष्ट झाली.

 

ज्युलियन कॅलेंडर मधील त्रुटी /उणीवा

या कॅलेंडरनुसार प्रत्येक वर्ष 365.25 दिवसांचे असते. तथापि, शास्त्रशुद्ध गणनेनुसार पृथ्वीचे सूर्याभोवतीचे कक्षाभ्रमण हे  365.2422 दिवसांचे असते. हे म्हणजे एक सांपातिक वर्ष (Equinox Year). त्यामुळे ज्युलियन कॅलेंडर वर्ष हे सांपातिक वर्षाच्या तुलनेत 0.0078 दिवसांपेक्षा मोठे असल्याचे लक्षात येते. ज्युलियन सुधारणेच्या एक शतक पूर्वीपासून हिप्पार्कसच्या काळापासून जरी ग्रीक खगोल शास्त्रज्ञांना हे माहिती होते की विषुव वर्ष हे 365.25 दिवसांपेक्षा थोडे लहान आहे. ज्युलियन कॅलेंडर मध्ये ही तफावत भरुन काढण्यात आलेली नसल्याने दर 128 वर्षांनंतर 1 एक दिवसाचा फरक पडेल. आपण जर हजार वर्षांच्या हिशेबाने पाहिले, तर ऋतुचक्र (जे सांपातिक वर्षावर आधारित आहे) आणि कॅलेंडर यामध्ये बराच मोठा फरक पडेल.

 

ग्रेगोरियन कॅलेंडरची / कालमापनाची सुरुवात

इ.स. 1572 मध्ये तेरावा ग्रेगरी पोप बनला. तथापि, तोपर्यंत शास्त्रज्ञांना ज्ञात झाले होते की पृथ्वीच्या अक्षांदोलनामुळे वसंत संपात किंवा अयन बिन्दुचे प्रतिगमन होत आहे. तथापि इ.स. 325 मध्ये धर्मपरिषदेच्या निर्णयानुसार, 21 मार्च हा वसंत संपात दिवस म्हणून पाळणे बंधनकारक होते. इस्टर सण या दिवसावर अवलंबून होता. त्यामुळे कॅलेंडरमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पोपने ख्रिस्तोफर क्लॅव्हियस यांच्या नेतृत्वाखाली खगोल शास्त्रज्ञांची समिती नेमली. वसंत संपात बिन्दुचे प्रतिगमन कसे होत आहे हे दाखवण्यासाठी खालील तक्ता आहे.

वर्ष  -  वसंत संपात दिन

325 – 21 मार्च  
453 – 20 मार्च (128 years)
581 – 19 मार्च
709 – 18 मार्च
837 – 17 मार्च
965 – 16  मार्च
1093 – 15  मार्च
1221 – 14  मार्च
1349 – 13  मार्च
1477 – 12  मार्च
1605 – 11  मार्च 

ही त्रुटी 1582 मधील ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये सुधारण्यात आली. अशा तऱ्हेने ज्युलियन कॅलेंडर मध्ये सुधारणा होऊन त्याची जागा पोप ग्रेगरी 13 वे ह्यांनी 1852 मध्ये जारी केलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडरने टप्प्या टप्प्याने  घेतली. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ज्युलियन कॅलेंडरप्रमाणेच महिने आणि महिन्यांतील दिवसांची संख्या आहे, परंतु, ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये, 100 ने समान भाग जाणारी वर्षे लीप वर्षे मानली जात नाहीत, तर 400 ने समान भाग जाणारी वर्षे लीप वर्षे मानली जातात. खालील फोटोमधून असे दिसून येते की ऑक्टोबर 1582 मध्ये ज्युलियन कॅलेंडरमध्ये 11 दिवस जोडले गेले.

 

 

परिणामत: ज्युलियन कॅलेंडर सध्या ग्रेगोरियन कॅलेंडर पेक्षा 13 दिवस मागे आहे.

 

हे आता सर्वांनी मान्य आणि स्वीकार केले आहे की येशू ख्रिस्त 25 डिसेंबर रोजी जन्मला. प्रत्यक्षात, त्याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. वास्तविक पाहता, बहुसंख्य विद्वानांचे असे म्हणणे आहे की येशूचा जन्म इ.स. पूर्व  6 ते 4 मध्ये झाला आणि तो इ.स. 30 ते 36 मध्ये मरण पावला. त्याकाळी, 25 डिसेंबर हा सूर्यजन्माचा दिवस मानला जात असे. इ.स. 325 मध्ये झालेल्या धार्मिक परिषदेत येशूला देव म्हणून घोषित करण्यात आले होते, म्हणून त्याचा जन्म त्या दिवशी झाला होता असे सांगण्यात येते.

 

ग्रेगोरियन कॅलेंडरशी जोडली गेलेली एक गमतीदार आख्यायिका आहे. कॅथलिक चर्चच्या पोपने प्रकाशित केलेले हे कॅलेंडर असल्यामुळे प्रोटेस्टंट ख्रिश्चनांनी ते स्वीकारले नाही. ब्रिटिशांनी त्याचा स्वीकार सुमारे 150 वर्षांनंतर केला. ही वस्तुस्थिती लक्षात घेता शिवाजी महाराजांची, ज्यूलियन कॅलेंडरवर आधारित जन्म तारीख ही 19 फेब्रुवारी असू शकत नाही. तर ती ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्च असू शकेल.

 

(शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेवरून अजून एखादा वाद निर्माण करण्यात कोणाला स्वारस्य आहे का?)

 

ग्रेगोरियन कॅलेंडर मधील उणीवा

1. सध्या ग्रेगोरियन वर्ष आणि सांपातिक वर्षामध्ये असणारा फरक  0.0003 दिवसांचा (26 सेकंद) आहे. यामुळे 3333 वर्षांनंतर हा फरक 1 दिवसाचा होईल आणि वसंत संपात 20 मार्च रोजी असेल. सध्या हा फरक नगण्य आहे.
2. 1 जानेवारीच्या नववर्षारंभाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हिंदू कालगणनेनुसार, वर्षाची सुरुवात साधारण वसंत संपाताच्या जवळपास होते. हे कॅलेंडर चंद्रावर आधारित असल्याने गुढीपाडवा अगदी 21 मार्चला न येता, त्याच्या जवळपास येतो.
3. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये महिन्यांच्या नावाला काही अर्थ नाही. ही नावे एकतर काही देव, व्यक्ती वा एखाद्या संख्येशी निगडित आहेत. तथापि, हिंदू कालगणनेनुसार, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्राचे नाव त्या महिन्याला दिले जाते. उदा. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्र चित्रा नक्षत्रात असतो.

 

आपल्याला आता कळले असेल की इ.स.पूर्व 753 ते इ.स. 1582 या काळात परिपूर्ण कॅलेंडर बनवण्यासाठी कशा प्रकारे, किती प्रयत्न केले गेले; हा उणापुरा 2335 वर्षांचा कालखंड आहे!!!!

 

परंतु हे लक्षात ठेवायला हवे की सांपातिक वर्ष हे दशांश दिवसांमध्ये आहे आणि त्यामुळे कुठल्याच कालगणनेत अथवा कॅलेंडर मध्ये 100% अचूकता कधीही प्राप्त करता येणार नाही.

 

@ यशवंत मराठे 

@ yeshwant.marathe@gmail.com

 

Leave a comment



Hemant Marathe

1 week ago

Very very interesting and fascinating.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS