चोरच पोलीस झाले

हे आहे महाराष्ट्राचे राजकारण..

 
कोण कुणाची मारतो आहे आणि कोण कुणावर उडतो आहे हे कळतच नाही..
 
पण या अश्या mating करणाऱ्या सापांना पाहून प्रत्येक सामान्य माणसाला आता या राजकारणी मंडळींची किळस आली आहे..
 
जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण उभारलं तेव्हा अजित पवार आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत असा प्रमुख आरोप होता. आता तेच शिंदे अजितदादांच्या मांडीला मांडी लावून राज्य कारभार चालवणार. वाह रे पठ्ठे!! 
 
महाराष्ट्र भाजपचं डोकं ठिकाणावर आहे का? 
 
अजित पवार या टोकाच्या बेभरवशी आणि डेंजरस व्यक्तिला सत्तेत घेऊन महाराष्ट्र भाजपने राजकीय आत्मघात केला आहे.
 
70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, 25,000 कोटीचा सहकारी बॅंक घोटाळा, जरंडेश्वर कारखान्यासारखी प्रकरणे आणि त्यासाठी ट्रकभर पुरावे सादर करू हे आश्वासन भाजप विसरली असेल पण जनतेच्या लक्षात असते हे त्यांनी ध्यानात ठेवावे. भ्रष्टाचाराचा मेरुमणी म्हणून ज्यांना हिणवलेत तेच आजपासून सत्वशील होणार. 
 
 
 
 
ज्या अजितदादांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही अशा वल्गना केल्यात त्यांनाच दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री करताना कुठे थोडीशी तरी लाज वाटली का? मग आता भाजपा पुढे काय करणार? सगळा सिंचन घोटाळा बासनात गुंडाळून, सुरनळी करून कुठे सारणार? ज्या अजितदादांनी या राज्याच्या बँकेची शरेआम लूट केली त्यांना आता क्लीन चीट देऊन पवित्र करणार का? 
 
The life comes a full circle.. आज वसंत दादा स्वर्गात हसत असतील कदाचित. 
 
आज सगळ्यात आनंदी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि प्रफुल्ल पटेल असतील कारण सगळ्या चौकशा थांबणार. ते आता परत निर्धास्त होऊन नवीन घोटाळे करायला मोकळे. भ्रष्टाचार झिंदाबाद! आणि हो, ज्या प्रफुल पटेलांनी एयर इंडियाची धूळधाण केली त्यांचा दिल्लीत केंद्रीय मंत्री म्हणून शपथविधी होईल. 
 
 
 
 
सगळी नैतिकता गेली तेल लावत.
 
आता यांना पावन केलेच आहात तर पाठोपाठ नवीन तमाशे न करता अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक अशा मंडळींना देखील क्लिन चिट देऊन एकत्रच शिमगा करा.
 
पण मग किरीट सोमैय्या काय करतील? कोणाचे पुरावे गोळा करायचे? आणि गोळा केलेल्या कागदांच्या होड्या करण्याशिवाय पर्याय काय? 
 
महाराष्ट्र भाजपाला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटत असेल तर एखादा मुद्दा तरी असा ठेवावा ज्यामुळे सामान्य जनतेला त्यांना मत द्यावे असे वाटेल. भाजपने एक लक्षात ठेवायला हवे की अशा प्रवृत्तींना ते पराभूत करतील या विश्वासाने लोकांनी त्यांना मतदान केले आहे. आता आपल्या समर्थकांना पश्चाताप होण्याची वेळ येऊ देऊ नका.
 
नुसता तमाशा झालाय राव !! अहो, या राजकारण्यांना कोणीतरी सांगा की घाण साफ करायची म्हणून ती स्वतःच्या घरात आणायची नसते.
 
या सगळ्या घाणेरड्या राजकारणाचा जाहीर निषेध. हो, मी तेवढंच करू शकतो, कारण मला विचारतो कोण?
 
सगळ्या राजकीय घडामोडीतून फक्त एवढेच सांगता येईल की सर्व नैतिकतेच्या विचारांना तिलांजली देत इथून पुढे फक्त सत्ता केंद्रस्थानी ठेवून राजकीय पाऊले उचलली जाणार. कसले हिंदुत्व?? आणि कसले पुरोगामीत्व?? इथून पुढे कुठलाही पक्ष ना पुरोगामी विचारांचा, ना प्रतिगामी विचारांचा, ना सावरकरांच्या विचारांचा, ना गांधींच्या विचारांचा आणि ना शाहू, फुले, आंबेडकर किंवा शिवछत्रपतींच्या विचारांचा. फक्त सत्ता केंद्रस्थानी ठेऊन चाललेली ही धडपड आहे.
 
परंतु सध्याच्या पत्रकारितेच्या मर्यादाही कळल्या. माझ्या मते राजकारण मराठी पत्रकारांना कधी कळलेलेच नाही कारण अगदी १९७९ च्या सिंहासन सिनेमात देखील शेवटी पत्रकार वेडा झालेला दाखवलाय आणि आज देखील कुठे फरक पडलाय? सगळे पत्रकार गपगार झालेत, कारण त्यांना कळलंत नाहीये की हे काय झालं आणि कसं झालं? त्यांच्या सगळ्या सूत्रांची ऐशीतैशी झालीये; अगदी पार भुस्काट झालंय त्या सूत्रांचे. काहीजण हा सुद्धा काकांचाच डाव आहे असे केविलवाणे उसने अवसान आणतील. 
 
यावर भाजप काय म्हणणार तर राजकारणात शिरल्यानंतर राजकारण करावंच लागतं, ठकास ठक व्हावे लागते आणि राजकारणात अशा तडजोडी कराव्या लागतात. करा करा, कारण तुमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे काय तर सत्ता!!! हो की नाही ??? 
 
मग निदान नैतिकतेचे पाढे तरी आम्हाला ऐकवू नका. शेवटी असं वाटतं की मी ही अशी भडास काढणार आणि काहीतरी खरडणार. प्रश्न मोठा भविष्यातील आहे की यापुढे कोणाला मत देणार? सगळे राजकीय पक्ष संधिसाधूच आहेत. एकही अपवाद संपूर्ण भारतात सापडणार नाही.
 
 
सगळेच महालोभी आणि सत्तालंपट.
 

एकच अपेक्षा की निदान तरुण पिढीने आता तरी हे सर्व लक्षात घेऊन कुठल्याच पक्षाचे भक्त होऊ नये किंवा कुठल्याच पक्षाचे वैरी होऊन वाद/भांडण करू नये. कारण हे राजकारणी कोडगे आहेत; त्यांना कशाचाही फरक पडत नाही.

कोण कोणत्या पक्षात जातो, कोण कुणाशी युती करतो आणि कोण सत्तेची फळे चाखतो यात आता सामान्य माणसाला शून्य रस उरला आहे कारण महाराष्ट्रातील सगळे राजकीय पक्ष समान चरित्रहीन आहेत आणि ते सामान्य लोकांना मूर्ख बनवत आहेत याची प्रत्येक नागरिकाला १०० टक्के खात्री पटली आहे.. 

पुढील विधानसभा निवडणुकीत ३५-४० टक्के च्या वर मतदान होणार नाही आणि भाजपाचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार यावेळी मतदान करायला येईल याबद्दल अजिबात शाश्वती देता येणार नाही. गंमतीत बोलायचं म्हणजे जर पुढील काही महिन्यात काँग्रेसचा गट फुटून जर या सरकारमध्ये सामील झाला नाही, तर पुढील विधानसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त संधी काँग्रेसला मिळेल असे मला वाटते 

सगळेच जर नंतर एकत्र येऊन हातात हात घालून बागडणार असतील तर आपण आपण का मुर्खासारखे मतदान केंद्र शोधत, उन्हातान्हात उभे राहून घाम गाळत मतदानाचा हक्क आणि अधिकार बजावण्याचा वेडेपणा का करायचा? आणि नंतर बावळटासारखे  नखाला लावलेल्या शाईचं बोट नाचवत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे???

एकदा सांगा, की आम्ही मतदान करायचे आहे की तुम्ही आपापसातच ठरवणार आहात? कारण असे सगळेच पक्ष जर नंतर एकत्र येणार असतील तर आपल्यासारखे गाढव आपणच. आणि मग कोण जाईल यापुढे राज्याच्या मतदानाला?? आणि उद्या मतदान समजा कंपल्सरी केलंच तर "NOTA" चं बटन सगळ्यात बेस्ट उपाय. 

 

आता नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी एकत्र आले म्हणजे आपण डोळे मिटायला मोकळे !

 

@ यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

 

Leave a comment



पुष्कराज चव्हाण

1 year ago

फार छान लिहिलंय.

Dinesh N Patankar

1 year ago

Really no need for BJP to do this.

Hemant Marathe

1 year ago

हे सगळं फार किळसवाणं चाललंय. ह्या तमाशाला मोदी - शहांचे आशिर्वाद आहेत असं समजायचं कां?

Amita Nawathe

1 year ago

मनातले विचार लिहिले आहेत.

भाई देवघरे

1 year ago

शंभर टक्के मान्य. राजकीय सूड उगवण्याच्या दृष्टीने खेळली गेलेली ही खेळी आज जरी गोड वाटत असली, शरद पवार वर मात वाटत असली तरी हा आत्मघातकी निर्णय निश्चितच आहे.
मतदारांवर ह्याचे दूरगामी परिणाम होतील हे निश्चित.
महाराष्ट्र भाजपने आपले महत्त्व कमी केले नी पकड ढिली केली आहे

Bharat

1 year ago

So true and so disgusting!

Prafulla Agnihotri

1 year ago

अगदी खरं. मीही पुढच्या निवडणुकीत मतदान करावं का, हाच विचार करतोय. प्रत्येक निवडणुकीसाठी माझ्या खर्चाने विमानाने येऊन या xxxxx नां मत देऊन काय फायदा?

Raj Joshi

1 year ago

सामान्य माणसाला उल्लू बनवणे चालू आहे. त्यातल्यातात मात्र समाधान आहे की आमचे मत वाया गेले नाही. आम्ही मत दिलेला उमीदवार सत्तेत् आला.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS