कै. जयंतराव चितळे उर्फ डॅडी
(24 सप्टेंबर 1932 - 12 जून 2021)
हरफन मौला याचा शब्दशः अर्थ म्हणजे ऑलराउंडर (Jack of all Trades). आपल्या आयुष्यात अशी काही माणसे येतात की ज्यांना अनेक विषयांची आवड असते. But they are master of none. परंतु आवड असल्यावर तो छंद जोपासणे आणि त्या विषयाचे सखोल आणि इत्यंभूत ज्ञान असणाऱ्या अष्टपैलू व्यक्ती अति विरळा; त्यामुळेच अशा व्यक्तींची गणना असामान्य व्यक्तिमत्व म्हणून होणे स्वाभाविकच; नाही का? आणि त्यातून ती व्यक्ती आपला सासरा असावी हे म्हणजे सोने पे सुहागा.
नागपूरमध्ये ऑल इंडिया रिपोर्टरचे चितळे माहित नाहीत अशी व्यक्ती मिळणे जरा कठीणच. त्यातून पुन्हा त्याचे संस्थापक वामन वासुदेव चितळे (अप्पा) म्हणजे कुशाग्र बुद्धीचा मेरुमणी. भारताच्या घटना निर्मितीच्या कार्यात हातभार लावलेला हा कायदेतज्ज्ञ. माझे सासरे, कै. जयंतराव चितळे उर्फ डॅडी हे वामनरावांचे शेंडेफळ. त्यांच्यापेक्षा सहा मोठे बंधू आणि एक थोरली बहीण. शेंडेफळ असल्यामुळे आईच्या गळ्यातील ताईत तरी देखील अप्पांच्या कडक शिस्तीमुळे कुठल्याच मुलाचे लाड झाले नाहीत. काम कर आणि स्वतः पैसे कमव हे त्यांचे ब्रीदवाक्य. अशा वातावरणात वाढून देखील डॅडींनी जे काही छंद जोपासले त्याला माझ्या माहितीत तरी तोड नाही.
शिकार:
बाळ महाजन, श्याम पाध्ये आणि अजून काही मित्र यांच्यामुळे डॅडींना शिकारीचा चस्का लागला. आजूबाजूच्या गावात कोणी वाघ नरभक्षक झाला आहे हे कळले की डॅडी निघालेच म्हणून समजा. त्यावेळी वाघ मारायला बंदी नव्हती. बरं, कधीही मचाणावर बसून शिकार केली नाही. त्यांचे म्हणणे असायचे की वाघाच्या शक्तीला हाणून पडण्याची बंदूक जर माझ्या हातात असेल, तर वाघाला देखील माझ्यावर हल्ला करण्याचा चान्स मी द्यायला नको? काय साला धाडस पाहिजे!! रानात मुक्त फिरणारा वाघ बघण्याची वेळ आली तर आपली चड्डी पिवळी व्हायची गत.
परंतु कालांतराने वाघ मारण्याची बंदी भारत सरकारने आणावी म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधींपर्यंत प्रयत्न करणारे डॅडीच. एकदा बंदी आणल्यावर मात्र परत बंदूक हातात घेतली नाही. चिल्लर प्राणी काय मारायचे म्हणे!! डॅडींच्या तोंडून शिकारीच्या गोष्टी ऐकणे हा त्यांच्या सर्व नातवंडांच्या लाडका छंद. त्यांनी मारलेल्या काही प्राण्यांची ट्रॉफी रूम त्यांनी AIR च्या ऑफिसमध्ये अनेक वर्षे जतन केली होती. त्यांच्या सर्व नातवंडांनी त्यांचे नामकरण "शिकारी शंभू" असे केले होते.
क्रिकेट:
डॅडी हे उत्तम खेळाडू तर होतेच परंतु नंतर त्यांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशन द्वारा आपला दबदबा कायम ठेवला होता. टायगर पतौडी, हनुमंतसिंग, जयसिंहा, राजसिंह डुंगरपूर, माधव आपटे हे ह्यांचे जिवलग मित्र. यातील कोणीही नागपूरमध्ये आले तर डॅडींकडे मुक्काम ठरलेला. त्यांची पतौडीबद्दल एकच तक्रार असे; अरे ह्याचे चार काळे दास आणि चार गोरे दास, त्यामुळे त्याला सांगायचो की Pat, I can’t manage your paraphernalia. मग तो ही हसत म्हणायचा, Jayant, don’t worry about them. I am here only for your company.
पतौडीला शिकारीत देखील प्रचंड उत्साह; त्यामुळे मग गहिरी दोस्ती. पुढे कालांतराने जरी सतत भेट होत नसली तरी ह्या सर्वांमधील भावनिक बंध मात्र तसाच घट्ट होता. एकदा मी डेक्कन क्वीनने पुण्याला जात असताना बाजूलाच राजसिंह डुंगरपूर बसले होते. मी पुढे होऊन त्यांना जयंतचा जावई अशी ओळख दिल्यावर त्यांनी आधी एक प्रेमाने दणदणीत शिवी हाणली; म्हणाले, where the hell that guy is? Tell him that I am very angry. पुणे आल्यावर उतरताना मात्र म्हणाले, I miss him a lot. खरी जिवाभावाची मैत्री!! 1975 साली वेस्ट इंडिजची टीम खेळायला नागपूरला गेली पण एक जेवण चितळ्यांच्या घरी ठरलेले. सगळी टीम स्वयंपाक घरापासून सर्वत्र संचार करत होती. माझ्या सासूबाई पुरी तळत असताना ती अशी फुगते कशी अशा आश्चर्यचकित चेहऱ्याने आल्वीन कालिचरणने टुणकन उडी मारून ओट्यावर बसकण मारली. हे सर्व डॅडींच्या तोंडून ऐकण्यात धमाल असायची.
अंगी नाना कळा:
- डॅडींकडे पुरातन नाणी, स्टॅंप्स यांचा नुसता साठाच नव्हता तर त्यांची खडानखडा माहिती होती. एवढा दुर्मिळ साठा कसा काय बनविला हे तो भगवंतच जाणे. ग्रीक, रोमन, मौर्य, शिवकालीन आणि काय काय!!
- कित्येक वर्षांचे बाईंड केलेले National Geographic, Indrajal Comics यांचे खंड. पुस्तकांची प्रचंड मोठी लायब्ररी आणि ती नुसती दाखवायला नाही तर त्याबरोबरीने अफाट वाचन देखील होते.
- टीव्ही वरील रामायण आणि महाभारत यांचे सगळे एपिसोड्स आधी व्हिडियो रेकॉर्ड करणे आणि नंतर मग सीडीज बनवून ठेवणे.
- बऱ्याच हिंदू लोकांना उर्दू भाषेचे आकर्षण असते पण डॅडींनी चक्क मौलवीला शिक्षक म्हणून नेमला आणि त्याच्याकडून उर्दूचे पद्धतशीर शिक्षण घेतले आणि कुराणचा पण अभ्यास केला. कदाचित त्याच्यामुळे असेल पण त्यांना शायरी आणि गझलची खूप आवड आणि माहिती.
- लोकांना कुत्र्यांची आवड असते पण डॅडींचे सगळंच भन्नाट. घरात सात ते आठ कुत्री. ग्रेट डेन, डॉबरमन, गोल्डन रिट्रिव्हर, तिबेटियन मॅस्टिफ.. मला सगळी माहित पण नाहीत. त्या पाळीव प्राण्यांवर पण पुत्रवत प्रेम.
अपार मेहनत:
आपला कौटुंबिक व्यवसाय जरी नावाजलेला असला तरी तो भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा म्हणून डॅडींनी प्रचंड मेहनत केली. भारतातील प्रत्येक राज्यात ते बहुदा गेले असावेत. देशभर एजंटसचे जाळे उभे करताना प्रत्येकाशी अगदी घरोब्याचे संबंध; मग दिल्लीतील सेठ असोत, कलकत्त्यातील शाळीग्राम असोत वा हैदराबादमधील हसीन अहमद असोत. संपूर्ण चितळे कुटुंबच जणू त्यांचे नातेवाईक असतील असे वाटण्याएवढे संबंध. चितळ्यांचा जावई असून देखील माझ्या कामानिमित्त फिरताना या लोकांच्या घरी राहून त्यांचा पाहुणचार झोडला आहे. त्या लोकांचे एकच पालुपद, अरे यशवंत आप हमारे जमाई हो! आप कही और ठेहरे, ये हो ही नही सकता. पुढे काळाची पावले ओळखून व्यवसायाची धुरा आपल्या पुतण्यांच्या हाती सोपवताना त्यांच्या मनाचा मोठेपणा मात्र प्रकर्षाने उठून दिसला.
मित्र परिवार:
अफाट हा शब्द सुद्धा अपुरा पडेल असा मित्रांचा गोतावळा. त्यांचे सगळ्या क्षेत्रात मित्र. नागपुरातील प्रसिद्ध कायदेपंडित व्ही आर उर्फ अरुण मनोहर, बांभूरकर, पांडे, महाजन, आणि इतर अनेक जे मला माहित सुद्धा नसतील. या सगळ्या मित्रांचा लाडका छंद काय तर रोज सकाळी भेटायचे आणि भरपूर शिव्या देऊन तोंड आणि मन साफ करून टाकायचं. डॅडी खऱ्या अर्थाने जगन्मित्र होते.
कुटुंबवत्सल:
डॅडींनी आपल्या प्रेमळ स्वभावाची चुणूक सुमारे 67-68 वर्षांपूर्वीच दाखवून दिली होती. कॉलेजमध्ये आपल्यापेक्षा दोन वर्षे ज्युनियर असलेली शैला पाध्ये आपल्याला आवडते असे लक्षात आल्यावर तिच्या मोठ्या भावामार्फत (जो सुदैवाने त्यांचा मित्र होता - श्याम पाध्ये) तिला सरळ मागणीच घातली आणि वयाच्या बाविसाव्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावर चढले.
डॅडी आणि आई यांना मीनल, मंजुश्री, नंदिनी, अदिती आणि राधिका अशा पंचकन्या. त्यांचे मुलींवर आणि नातवांवर निरतिशय प्रेम. आम्हा जावयांवर नव्हते असे अजिबात नाही पण आता उन्नीस बीस तर होणारच ना? स्वाभाविकच आहे ते.
परंतु चितळे कुटुंब एवढे मोठे पण डॅडींचा सर्वांना आधार होता. सगळ्या नातवंडांचा आजोबांबरोबर आवडता कार्यक्रम काय तर त्यांच्यांशी WWF ची मारामारी करायची आणि आजोकडून शिव्या ऐकायच्या. ते ती त्यांना खास वऱ्हाडी शिव्या ऐकवून खुश करायचे. त्यांचे अगदी खास मित्र म्हणजे अरुणकाका मनोहर. पुढे त्यांची मुलगी वासंती आणि मुलगा शशांक यांच्यावर अगदी मनापासून प्रेम. एवढंच कशाला, शशांकची बायको वर्षा हिला नेहमी सांगायचे की तू माझी सहावी मुलगी आहेस हे लक्षात ठेव. एकदा आमच्या कौटुंबिक कार्यक्रमात मी बायकोची आणि मेव्हण्यांची टिंगल करायची म्हणून म्हटले, ऐ तुमचा डॅडी काही एवढा ग्रेट नाही हां; झालं, पाच; नाही नाही, सहा वाघिणी माझ्यावर चाल करायला सरसावल्या.
अदितीच्या सांगण्यानुसार त्यांची सर्व भावंडे, पुतणे, पुतण्या, भाचे यांच्यावर नुसता त्यांनी वर्षाव केला. त्यांच्या सख्ख्या बहिणीएवढेच त्यांची आत्येबहीण ताराताई काप्रे आणि त्यांचा मुलगा मदन हा खास लाडका भाचा.
राजकारण:
डॅडी जरी बालपणापासून संघाशी निगडित असले तरी तसा त्यांचा राजकारणाशी काही थेट संबंध नव्हता. परंतु 1976 साली आणीबाणीच्या कालखंडात संघवाले म्हणून त्यांनी तब्बल अठरा महिने तुरुंगवास भोगला. त्यामुळे असेल कदाचित पण संघाच्या पहिल्या फळीतील अनेकांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध प्रस्थापित झाले. ते पहिल्यापासून हिंदुत्ववादी असले तरी राजकारणातील सर्व स्तरातील आणि विचारधारणेतील बऱ्याच लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. एकदा दिल्लीहून परत येत असताना माझ्या बाजूला मोहन धारिया बसले होते. गप्पांच्या ओघात त्यांना कळले की मी जयंतरावांचा जावई; तशी पटकन म्हणाले, तो खरा राजा माणूस आहे.
सामाजिक क्षेत्र:
वसंतराव देशपांडे, पु ल देशपांडे, लता मंगेशकर (लतादीदी तर मंजुश्रीच्या लग्नाला आवर्जून उपस्थित होत्या) ते दादा कोंडके, प्रभाकर पणशीकर आणि इतर अनेक कलावंत ते अगदी अलीकडच्या अवधूत गुप्ते, सचिन पिळगावकर, अमृता सुभाष पर्यंत त्यांचे सगळ्यांशी सूत जुळलेले होते. ते कसे काय त्यांना जमायचे ते त्यांचे त्यांनाच माहित.
सामाजिक भान आणि जाणीव:
किती सामाजिक संस्थांना त्यांनी मदतीचा हात दिला असेल याची गणती ते देखील विसरले असतील. पण त्याचबरोबर तळागाळातील किती अनंत लोकांना त्यांनी निरपेक्ष बुद्धीने मदत केली त्याला तोड नाही. कुणाचे शिक्षण पूर्ण करायला मदत केली, कुणाला वैद्यकीय उपचाराची मदत, आणि किती आणि काय काय.. आणि ती करताना ना त्या व्यक्तीची कधी जात बघितली ना कधी धर्म बघितला. आज त्यांच्या पश्चात घरातील प्रत्येक नोकर माणूस पावती देतो आहे की आम्हाला कधीही कमी लेखले नाही. एक माणूस या नात्याने आम्हाला वागवले आणि अपार मदत केली.
एकच उदाहरण देतो - मुख्तार हा त्यांचा चक्रधर (ड्रायव्हर). धर्माने मुसलमान असला तरी त्याने जणू डॅडी श्री राम असावेत अशी त्यांची हनुमानासारखी सेवा केली. डॅडींनी देखील त्याला लहानसे घर घेऊन दिले; त्याच्या दिव्यांग मुलीचे हाल होऊ नयेत म्हणून तिला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवल्या. मनुष्यधर्म हीच एक भावना.
स्वतः कोकणस्थ ब्राह्मण असल्याचा अभिमान असला तरी तो त्यांच्या या कार्यात त्यांनी तो कधी आडवा येऊ दिला नाही. आज त्यांच्या पश्चात इतक्या लोकांचे फोन आणि मेसेजेस येता आहेत की त्यांनी आम्हाला कशी मदत केली होती. त्यांच्या बायकोला, मुलींना सुद्धा त्या गोष्टींची कल्पना नव्हती.
स्वतः खेळाडू असल्याने तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देणे, आर्थिक मदत, खेळाचे मैदान तयार करून देणे, बास्केटबॉल क्लब प्रस्थापित करणे अशा अनेकविध गोष्टी त्यांनी क्रिकेट व्यतिरिक्त केल्या.
स्वभाव विशेष:
अतिशय मिश्किल, हसतमुख, आनंदी, उत्साही, दिलदार, दिलखुलास आणि जिंदादिल व्यक्तीमत्व म्हणजे डॅडी. कोणालाही एकदा भेटले की त्याच्या मनात घर झालेच म्हणून समजा. चांगले चुंगले खाण्याची मनापासून आवड आणि गोड पदार्थ म्हणजे जीव की प्राण. एक वेळ जेवणार नाहीत पण दिवसाला दोन तीन बाउल भरून आईसक्रीम खाल्ले नाही असा दिवसच कधी उगवला नसेल. गेले दोन तीन महिने तर रात्री अडीच-तीन वाजता त्यांना आईसक्रीमचीच भूक लागायची. डोक्याशी एक दोन चॉकलेट बार नसतील तर अस्वस्थ व्हायचे. कधी तब्येत बरी नाही म्हणून फोन केला तर म्हणायचे अरे, काळजी नको, मी फर्स्ट क्लास आहे. Amazing positive attitude. If one had to describe him in one line, then that would be Living Life, King Size.
Daddy was very cheerful, caring person who lived his life to the fullest! What a majestic innings he played !! डॅडींच्याच भाषेत सांगायचे तर बहुत बढियां..
मी किंवा माझे साडू श्रीकांत भिडे आणि सुधीर दांडेकर ह्यांच्याशी त्यांचे खूप बोलणे व्हायचे असे नाही. पण बोलण्याचे त्यांचे कप्पे ठरलेले होते. काहीही सल्ला हवा असेल तर श्रीकांत, इतिहासाबद्दल काही सत्यता पडताळायची असेल तर सुधीर आणि हिंदी चित्रपट, गाणी, क्रिकेट ह्यासंबंधी काहीही शंका असली की मग हटकून यशवंत.
अशा अनंत गोष्टींमधे रस असलेला 89 वर्षांचा आमच्या सर्वांचा चिरतरुण डॅडी दिनांक 12 जून 2021 रोजी अतिशय शांतपणे, कोणालाही त्रास न देता आणि सगळ्या आवडत्या लोकांच्या सहवासात असताना, चुटकीसारखा त्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेला. त्याच्या सर्व मुलींना आणि आमच्या सासूबाईंना वटवृक्षाचा आधार निखळून पडल्याचे दुःख नक्कीच झाले पण डॅडींच्या तालमीत वाढल्याने त्या सर्वांनी अतिशय धीराने आणि खंबीरतेने ते झेलले आहे. त्यात देखील सासूबाई, शैलाताई चितळे यांचे विशेष कौतुक.
कधी नागपूरला आलो, किंवा परत निघताना त्यांना नमस्कार केला की ते नेहमी देणारा आशीर्वाद - "देवा, देवा मोठे व्हा; may God bless you" - यापुढे ऐकायला मिळणार नाही. परंतु तो आवाज आम्हा सर्वांच्या मनात कायम रुंजी घालत राहील.
एक अध्याय संपला.. विनम्र श्रद्धांजली.. शतश: नमन..
@ यशवंत मराठे