आज सर्व कॉलेजेस मध्ये आणि खास करून इंजिनियरिंग कॉलेजेस मध्ये मुलांना सांगण्याचा प्रयत्न होतो की स्वतःचा व्यवसाय करा, स्वतः मालक व्हा, दुसऱ्याच्या हाताखाली काम करू नका, नोकरदार होऊ नका. भारत सरकार सुद्धा अंदाजे आठ वेगवेगळ्या योजना राबवते ज्यायोगे नवीन उद्योजक स्वतःचा व्यवसाय करायला उद्युक्त होतील.
पण खरंच हे किती जणांना शक्य आहे? व्यवसायातील धोका पत्करण्याची तयारी फारच कमी जणांची असते. तसेच मला असे वाटते की कॉलेजमधील मुलांना असे सांगणे चुकीचे नसेल कदाचित पण मुलांच्या एवढ्या कोवळ्या वयात ही फार घाई तर होत नाही ना? स्वतः मालक व्हा म्हटलं की सगळं आपोआप येतं? व्यावसायिक व्हा म्हणणाऱ्यांना, मला विचारायचंय की उद्योगातील सर्व गोष्टी स्वतः करण्यासाठी बुद्धी आणि अनुभव तर असायला हवा की नको? आणि त्यासाठी निदान काही काळ तरी शहाण्या माणसाबरोबर काम करण्याची गरज असते. मालक व्हायच्या आधी कामगार म्हणून कामाची इज्जत तरी करायला शिका. गाठीशी अनुभव घ्या, आणि व्हा की मालक. उठ सुठ सगळ्यांना उद्योजक व्हा म्हणणे हे एक फॅड झाले आहे. अहो, सगळे युवक मार्क झकरबर्ग नाही होऊ शकत.
मी काही उद्योग क्षेत्रातील सल्लागार अथवा तज्ञ नव्हे. पण अनेक वर्षे स्वतःचा उद्योग केल्यामुळे थोडे पावसाळे जास्त बघितले एवढंच. पण ते करत असताना ज्या गोष्टी जाणवल्या त्या काही प्रमाणात शेअर कराव्या म्हणून हा लिखाणाचा प्रपंच.
पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जो उद्योग करायचा आहे त्याचा सखोल अभ्यास अतिशय गरजेचा आहे. आपल्या ग्राहकांना खरंच कशाची गरज आहे ते नीट समजून घ्यायला हवे. कारण आपण अगदी खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीचा व्यवसाय सुरु केला आणि आपल्या मालाचा खपच नाही झाला तर काय उपयोग? शेवटी व्यवसाय हा मानसिक समाधानासाठी नसून पैसे कमविण्याकरिता असतो हे प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे.
त्यानंतरचा टप्पा म्हणजे आपण नक्की कुठल्या ग्राहकांसाठी आपला व्यवसाय करणार आहोत याची स्पष्ट कल्पना हवी कारण त्यातूनच आपल्या मालाची काय किंमत असावी हे ठरवता येते. आता उदाहरण घ्यायचे झाले तरी बायकांच्या गार्मेंटसचे देता येईल. कारण अगदी दोनशे रुपयापासून काही लाख रुपये अशी त्याची रेंज असू शकते. त्यामुळे आपण त्यातील कुठल्या श्रेणीत बसतो याचा पक्का अंदाज हवा.
एकदा ते ठरलं की मग महत्वाचा प्रश्न असतो की आपल्या ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे? प्रदर्शनात भाग घ्यायचा की जाहिरातींवर लक्ष केंद्रित करायचे हे ठरवावे लागते.
आणि हो, सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे आपण त्या व्यवसायात किती पैसे गुंतवू शकतो? मग ते स्वतःचे असतील, किंवा कर्ज असेल. व्यवसाय चालू केला की पहिल्या दिवसापासून काही नफा होत नसतो त्यामुळे भांडवल ठरवताना या अशा कालावधीचा देखील विचार करावा लागतो. जगात आणि आयुष्यात सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत.
वरील सर्व बाबींचा विचार करून उद्योगात पहिले पाऊल टाकावे ज्यायोगे अपयशाची शक्यता कमी करता येते. एकदा ते पाऊल उचलले की खऱ्या परीक्षेला सुरुवात होते.
कुठल्याही व्यवसायात स्पर्धा ही असणारच. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ती किती जीवघेणी झाली आहे ते बघूया.
20 वर्षांपूर्वी सकाळी उठण्यासाठी भारतीय काय वापरत होते? उत्तर आहे "अलार्म क्लॉक." गजराचे घड्याळ हे यांत्रिक स्प्रिंग्सचे बनलेले होते. ते चालू ठेवण्यासाठी दररोज फिजिकली चावी द्यावी लागत असे. गजराचा एवढा आवाज व्हायचा की तुम्हालाच काय आणि आजूबाजूच्यांना पण जाग यायची. मग क्वार्ट्ज घड्याळे आली जी अधिक आकर्षक होती. आज सकाळी उठण्यासाठी आपण काय वापरतो? सेलफोन! गजऱ्याच्या घड्याळांचा एक संपूर्ण उद्योग सेल फोनमुळे कुठलीही वार्निंग न देता गायब झाला.