व्यवसाय करा? इतकं सोपं आहे? 

आज सर्व कॉलेजेस मध्ये आणि खास करून इंजिनियरिंग कॉलेजेस मध्ये मुलांना सांगण्याचा प्रयत्न होतो की स्वतःचा व्यवसाय करा, स्वतः मालक व्हा, दुसऱ्याच्या हाताखाली काम करू नका, नोकरदार होऊ नका. भारत सरकार सुद्धा अंदाजे आठ वेगवेगळ्या योजना राबवते ज्यायोगे नवीन उद्योजक स्वतःचा व्यवसाय करायला उद्युक्त होतील.

 

पण खरंच हे किती जणांना शक्य आहे? व्यवसायातील धोका पत्करण्याची तयारी फारच कमी जणांची असते. तसेच मला असे वाटते की कॉलेजमधील मुलांना असे सांगणे चुकीचे नसेल कदाचित पण मुलांच्या एवढ्या कोवळ्या वयात ही फार घाई तर होत नाही ना? स्वतः मालक व्हा म्हटलं की सगळं आपोआप येतं? व्यावसायिक व्हा म्हणणाऱ्यांना, मला विचारायचंय की उद्योगातील सर्व गोष्टी स्वतः करण्यासाठी बुद्धी आणि अनुभव तर असायला हवा की नको? आणि त्यासाठी निदान काही काळ तरी शहाण्या माणसाबरोबर काम करण्याची गरज असते. मालक व्हायच्या आधी कामगार म्हणून कामाची इज्जत तरी करायला शिका. गाठीशी अनुभव घ्या, आणि व्हा की मालक. उठ सुठ सगळ्यांना उद्योजक व्हा म्हणणे हे एक फॅड झाले आहे. अहो, सगळे युवक मार्क झकरबर्ग नाही होऊ शकत.

 

मी काही उद्योग क्षेत्रातील सल्लागार अथवा तज्ञ नव्हे. पण अनेक वर्षे स्वतःचा उद्योग केल्यामुळे थोडे पावसाळे जास्त बघितले एवढंच. पण ते करत असताना ज्या गोष्टी जाणवल्या त्या काही प्रमाणात शेअर कराव्या म्हणून हा लिखाणाचा प्रपंच. 

 

पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जो उद्योग करायचा आहे त्याचा सखोल अभ्यास अतिशय गरजेचा आहे. आपल्या ग्राहकांना खरंच कशाची गरज आहे ते नीट समजून घ्यायला हवे. कारण आपण अगदी खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीचा व्यवसाय सुरु केला आणि आपल्या मालाचा खपच नाही झाला तर काय उपयोग? शेवटी व्यवसाय हा मानसिक समाधानासाठी नसून पैसे कमविण्याकरिता असतो हे प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे.

 

त्यानंतरचा टप्पा म्हणजे आपण नक्की कुठल्या ग्राहकांसाठी आपला व्यवसाय करणार आहोत याची स्पष्ट कल्पना हवी कारण त्यातूनच आपल्या मालाची काय किंमत असावी हे ठरवता येते. आता उदाहरण घ्यायचे झाले तरी बायकांच्या गार्मेंटसचे देता येईल. कारण अगदी दोनशे रुपयापासून काही लाख रुपये अशी त्याची रेंज असू शकते. त्यामुळे आपण त्यातील कुठल्या श्रेणीत बसतो याचा पक्का अंदाज हवा.

 

एकदा ते ठरलं की मग महत्वाचा प्रश्न असतो की आपल्या ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे? प्रदर्शनात भाग घ्यायचा की जाहिरातींवर लक्ष केंद्रित करायचे हे ठरवावे लागते.

 

आणि हो, सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे आपण त्या व्यवसायात किती पैसे गुंतवू शकतो? मग ते स्वतःचे असतील, किंवा कर्ज असेल. व्यवसाय चालू केला की पहिल्या दिवसापासून काही नफा होत नसतो त्यामुळे भांडवल ठरवताना या अशा कालावधीचा देखील विचार करावा लागतो. जगात आणि आयुष्यात सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत.

 

वरील सर्व बाबींचा विचार करून उद्योगात पहिले पाऊल टाकावे ज्यायोगे अपयशाची शक्यता कमी करता येते. एकदा ते पाऊल उचलले की खऱ्या परीक्षेला सुरुवात होते.

 

कुठल्याही व्यवसायात स्पर्धा ही असणारच. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ती किती जीवघेणी झाली आहे ते बघूया.

 

20 वर्षांपूर्वी सकाळी उठण्यासाठी भारतीय काय वापरत होते? उत्तर आहे "अलार्म क्लॉक." गजराचे घड्याळ हे यांत्रिक स्प्रिंग्सचे बनलेले होते. ते चालू ठेवण्यासाठी दररोज फिजिकली चावी द्यावी लागत असे. गजराचा एवढा आवाज व्हायचा की तुम्हालाच काय आणि आजूबाजूच्यांना पण जाग यायची. मग क्वार्ट्ज घड्याळे आली जी अधिक आकर्षक होती. आज सकाळी उठण्यासाठी आपण काय वापरतो? सेलफोन! गजऱ्याच्या घड्याळांचा एक संपूर्ण उद्योग सेल फोनमुळे कुठलीही वार्निंग देता गायब झाला

 

 
गेल्या 20 वर्षांत भारतातून गायब झालेल्या उत्पादनांकडे लक्ष द्या. तुम्ही शेवटचा कृष्णधवल चित्रपट कधी पाहिला? तुम्ही शेवटचा फाउंटन पेन कधी वापरला होता? तुम्ही टायपरायटरवर शेवटचे कधी टाइप केले? तुम्ही संगीत ऐकण्यासाठी शेवटची रेकॉर्ड लावली? वरील सर्वांचे उत्तर आहे "मला आठवत नाही!" 
 
 
 
म्युझिक म्हटले की मला हटकून 78 rpm रेकॉर्डची आठवण होते. मग आल्या 45 rpm आणि शेवटी 33 rpm च्या LP. या रेकॉर्ड ऐकण्यासाठी प्लेयर्स होते आणि हो, रेडीयोग्राम नावाचे एक अदभूत यंत्र होते ज्यात एका वेळी पाच ते सात रेकॉर्ड एकावर एक रचल्या जायच्या ज्यायोगे एक संपली की दुसरी आपोआप खाली पडत असे. हे सर्व काळाच्या उदरात लुप्त झाले. पुढे कालांतराने कॅसेट आल्या. आधी स्पूल आणि नंतर छोट्या. त्या हमखास गुंतायच्या. पेन्सिल वापरून त्यांचा गुंता सोडवायचा आणि त्या परत चालू करायच्या अशी एक धमाल होती. सीडी आली तेव्हा काय भारी वाटलं. माझ्याकडे सुमारे तीनशे कॅसेट्स होत्या ज्या मी काही वर्षांपूर्वी सीडी वर कॉपी करून घेतल्या पण आता सीडी नामशेष झाली. पण आजची काय परिस्थिती? अगदी गाडीत संगीत लावायचे असेल तरी सीडी नाहीच, फक्त पेन ड्राईव्ह. 
 
 
काही काळासाठी मर्यादित मेमरी असलेल्या इलेक्ट्रॉनिक टाइपरायटर नावाचा टाइपरायटरला पर्याय होता. आज शॉर्ट हॅन्ड करणारे कोठेही दिसत नाहीत. मग संगणक आला आणि ते सर्व एका झटक्यात नामशेष झाले. परंतु माझ्यासारखे अनेक लोक आजही संगणकाचा वापर अपग्रेडेड टाइपरायटर म्हणूनच करतात. पण याच काळात कॉम्पुटरमध्ये (PC) झालेल्या बदलांचा विचार करून बघा. आधी डेस्क टॉप, मग लॅपटॉप, पाल्मटॉप आणि सर्व एकत्र करणारा स्मार्ट फोन.
 
 
तसेच कॉप्युटर बरोबर आपण काय काय वापरत होतो? फ्लॉपी डिस्क, आधी 5.25 इंच, नंतर 3.5 इंच, पुढे सीडी. आज पेन ड्राईव्हने सगळे गिळंकृत केले आहे. हल्ली लॅपटॉपला सीडी लावण्यासाठी स्लॉटच नसतो. कॉम्प्युटरच्या मेमरीबद्दल तर न बोललेले बरं. पूर्वीची पाच MB ची हार्ड डिस्क आणि आताची एक TB (म्हणजे दोन लाख पट मोठी) यांच्यातील फरक बघा. 
 
 
आता तुम्हाला आमच्याच व्यवसायाचे उदाहरण देतो. आम्ही सुमारे पन्नास वर्षे प्रतिरूप मुद्रण (offset printing) मशिन्स बनवत असू. त्यांचे मुख्य काम काय होते? ऑफिस स्टेशनरी, लग्न पत्रिका वगैरे. आमच्यापेक्षा मोठी मशिन्स Share Application Forms, Annual Reports छापत असत. आज सर्वच मुद्रकांचे जगणे अशक्यप्राय झाले आहे कारण ही सर्व मिळणारी कामेच बंद झाली. 
 
सुरुवातीच्या काळात मशीन इम्पोर्ट करणे बॅन होते. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. दर वर्षी धंदा वाढत होता त्यामुळे कसलीच काळजी नव्हती. धंदा वाढतच जाणार या कल्पनेने आम्ही आमचं infrastructure वाढवत राहिलो. मोठी फॅक्टरी, अनेक ठिकाणी मार्केटिंग ऑफिसेस, गलेलठ्ठ पगाराची भरपूर माणसे. आपले तंत्रज्ञान जुने आहे आणि ते कालबाह्य होऊ शकते याचा अंदाज न घेता हे सर्व करत गेलो. प्रथमतः सरकारने आयातीला परवानगी दिली तेव्हा पहिला धक्का बसला. आणि ज्याप्रमाणे नोकियाला स्मार्ट फोनचे महत्व कळले नाही तसेच आमचे डिजिटल प्रिंटिंगच्या बाबतीत झाले. आमची ती बस चुकली आणि व्यवसाय हळूहळू कमी होत बंद करायची वेळ आली. 
 
1962 मध्ये फ्रिट्झ मॅचलूपने Half Life of Knowledge ही संज्ञा मांडली ज्यानुसार एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील अर्धे ज्ञान संपुष्टात येण्यापूर्वी किंवा अप्रचलित होण्यासाठी किती काळ जातो याचा संदर्भ देते. ज्ञान ज्या वेगाने विकसित होते आणि सामायिक केले जाते ते पाहता, हे मूल्य अनेक क्षेत्रांमध्ये कमी होत आहे. हे अजिबातच आश्चर्यकारक नाही. परंतु ही घटना विद्यापीठाच्या पदवी कार्यक्रमांबद्दल मूलभूत प्रश्न निर्माण करते. नवीन पदवीधर, जग बदलण्याच्या आकांक्षांनी भरलेले असतात पण त्यांच्या प्रशिक्षणाचा महत्त्वपूर्ण भाग वेळोवेळी कालबाह्य होऊ शकतो या कठोर वास्तवाला त्यांनी कसे सामोरे जावे?
 
आपण जेव्हा ऐकतो की "UPI" कँडी व्यवसायाचा नाश करत आहे, तेव्हा थक्क व्हायला होतं... "छुट्टा नहीं है" या एका गोष्टीवर व्यवसाय कसा बांधला गेला यावर विश्वास ठेवण्यास कठीण असलेल्या तपशिलावर डोळे उघडणारे होते. 2010 च्या दशकाच्या सुरुवातीला मॉंडेलेझ, मार्स, नेस्ले, परफेटी, पार्ले आणि ITC यासह जवळजवळ सर्व मोठ्या कँडी खेळाडूंनी आश्चर्यकारक वाढ आणि भविष्यातील संभावना नोंदवल्या. पण जसजसा UPI आला, तसतसे यापैकी बहुतेक ब्रँडने टॉफीच्या विक्रीत मोठी घट नोंदवली आहे. जगातील सर्वात मोठ्या चॉकलेट आणि टॉफी निर्मात्यांपैकी एक असलेल्या Hershey's ने सांगितले की, कोविड नंतरच्या काळात भारत त्यांच्या विस्तार योजनेला सर्वाधिक फटका बसलेल्या बाजारपेठांपैकी एक आहे.
 
मग खरोखर काय बदलले? UPI च्या आधी, दुकानदार सैल रोख रकमेसाठी टॉफीचा व्यापार करत असत, असा व्यवहार जो इतर मार्गाने होत नव्हता. या लहान रकमेने दिवसागणिक मोठ्या प्रमाणात पैसे कमावले जात होते. UPI मुळे हे सर्व थांबले. लोकांनी नेमकी रक्कम भरली आणि टॉफीची विक्री संपली. कोरोनाच्या साथीने त्या आगीत आणखीन तेल ओतले. बहुतेक लोक साथीच्या रोगाने घाबरले होते, प्रत्येकाला संपर्क कमी पेमेंट करायचे होते. यामुळे डिजिटल पेमेंटकडे सगळ्यांनी धाव घेतली आणि टॉफीचा धंदा पार बंद झाला. अहो, टोल नाक्यावर सुद्धा सुट्टया पैशांच्या ऐवजी टॉफी दिली जायची. आता तिथे फास्ट टॅग आले आणि टॉफी बंद झाली. कोणत्याही चॉकलेट (टॉफी) कंपनीने कधीही फायनान्स उत्पादनांचा त्यांच्या स्पर्धा म्हणून विचार केला असेल का? 
 
कोणत्याही व्यवसायासाठी हा एक मोठा धडा आहे कारण प्रत्येक कंपनीला "आपली उत्पादने खरेदी करण्यामागे कोणती कारणे आहेत आणि ते कशामुळे बदलू शकते" यावर लक्ष ठेवणे आवश्यक असते. परंतु अशीही कारणे शोधायला हवीत जी खरोखर त्यांच्याशी थेट स्पर्धा करत नाहीत परंतु भविष्यात आपल्या उत्पादनाची जागा घेऊ शकतात. तंत्रज्ञान व्यवसायावर कसा परिणाम करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण.
 
भविष्यात Artificial Intelligence मुळे कोणकोणत्या व्यवसायांवर परिणाम होईल हे सांगणे कर्मकठीण आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपला प्रतिस्पर्धी कोणत्या झुडुपामागे लपला आहे हे आपल्याला कधीच कळत नाही. त्यामुळे "रात्र वैऱ्याची आहे, सावधान" असा इशारा स्वतःला सतत द्यायला लागेल. 
 
 
@ यशवंत मराठे 

Leave a commentअलका सुधीर जोगळेकर

12 months ago

लेख उतम आहे आजच्या नव्या पिढीतील तरुणाईला आवश्यक असे लिखाण आहे मी स्वतः बँकेत ॲडव्हान्सेसला असताना बर्‍याच उद्योजकांचा अनुभव घेतला आहे.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS