दर वर्षी २७ फेब्रुवारी आला की सर्व सोशल मीडियावर मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याचे गुणगान आणि अभिमान याचा महापूर येतो. मराठीची महती, कशी मराठी भाषा लोप पावू लागली आहे, कसे तिचे जतन करायला हवे याचा वांझोट उहापोह सुरु असतो. परंतु गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी सगळे साफ विसरून जाऊन कामाला लागतात ते पुढील २७ फेब्रुवारी पर्यंत. मग पुन्हा तेच गुऱ्हाळ. गेले कित्येक वर्षे हेच चालू आहे.
मराठी भाषा दिन (जागतिक म्हणायला पाहिजे, नाही का?) कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौरव दिन म्हणून मानला जातो.
माझ्या मते प्रत्येक भाषा ही प्रवाही होती, असते आणि राहणार. गेल्या ७००-८०० वर्षात या भाषेत किती संक्रमणे झाली असतील? ज्ञानेश्वरांच्या काळातील भाषा आज बोलली तर कोणाला कळेल का? त्यांच्या ज्ञानेश्वरीचा अर्थ अजून लोक लावायचा प्रयत्न करतायेत. आपली आजची भाषा ऐकली तर त्याकाळचे लोकं बेशुद्ध पडतील इतकी ती बदललेली असेल आणि ते स्वाभाविकच आहे. मराठीच्या मृत्यूची भीती बाळगण्यात माझ्या मते काहीच अर्थ नाही कारण ही सगळी आपली शहरी भूतं आहेत. अशा बातम्या फक्त शहरात चर्चिल्या जातात. ग्रामीण भागात हीच भाषा प्रभावीपणे बोलली जाते यात शंका नाही. शहरात वेगवेगळ्या भाषांच्या संक्रमणामुळे त्यात अनेक शब्द जोडले जातात. पण गावात अस्सल ग्रामीण बाज ठेवून ही भाषा वापरात आहे आणि राहील.
दुसरा एक लाडका विषय म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत असल्याने मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडणे हा आहे. इंग्रजी शिकण्याची धडपड ही नोकरी मिळविण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे, या भावनेतून आहे. खरं सांगायचं तर ही सगळी प्रतिष्ठेची धडपड आहे. इंग्रजी हे चांगली नोकरी व पर्यायाने उच्च रहाणीमान मिळविण्याचे साधन आहे हे सर्वमान्य झाल्यामुळे हे होणे स्वाभाविक आहे. नोकरी मिळवून देण्यात मराठीला १००% मर्यादा आहेत आणि म्हणून जर इंग्रजीच्या शिक्षणाने नोकरी मिळणार असेल तर ती भाषा शिकलीच पाहिजे. पण त्याकरिता मराठीला लाथाडण्याची काहीच गरज नाही.
आणखीन गळा काढायचा मुद्दा म्हणजे लोप पावत असलेली मराठी संस्कृती. पण मला नेहमी प्रश्न पडतो - म्हणजे नक्की काय? मराठी माणूस म्हटला की तो सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय असणार असे गृहीत धरले जाते आणि ते काही फारसे चुकीचे नाही.
आता मध्यमवर्गीय याचा अर्थ खूप श्रीमंत नसलेला, कमी आकांक्षा असलेला, स्वत:च्या परिघात आनंद निर्माण करणारा, निष्ठा बाळगणारा, प्रतिष्ठा जपणारा आणि बऱ्याच अंशी मूल्यांना मानणारा मराठी वर्ग असं म्हणता येईल. या सगळ्या चौकटीत त्याची आर्थिक सुबत्ता सुस्थिर असणं हा भाग देखील महत्त्वाचा. मात्र ती त्याची पूर्व-अट नव्हती किंवा तो त्याबद्दल फारसा आग्रही नव्हता. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणताना त्याने अंथरूणाची लांबी-रूंदी गरजेनुसार स्थिर केली, प्रसंगानुरूप वाढवली देखील. परदेशी स्थायिक झालेली आपली मुले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
मध्यमवर्गीय असे म्हटलं की मला नेहमी पु.ल. देशपांडे आठवतात. पुलंचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखनातून सतत व्यक्त होणारी मध्यमवर्गीय संस्कृती. गेल्या अनेक पिढ्या मराठी माणसाने आपली म्हणून जी संस्कृती, जीवनसरणी अनुभवली, जपली आणि जोपासली आहे; तिचा इतका सर्वांगीण, संपूर्ण आणि खोलवर वेध घेणारा पुलंसारखा अन्य कोणताही लेखक गेल्या अर्धशतकात मराठी साहित्यामध्ये झाला नाही. एक लेखक आणि एक माणूस या नात्याने पुलंनी जी अपरंपार लोकप्रियता संपादन केली, त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या साहित्यातून सतत प्रकट होत राहिलेली ही मध्यमवर्गीय संस्कृती. बहुसंख्य मराठी माणूस ही या संस्कृतीचीच निमिर्ती आहे. म्हणून तिचा सातत्याने आविष्कार करणारे पु.ल. मराठी वाचकांना इतके भावले, आवडले. नुसते आवडले इतकेच नव्हे; हा लेखक त्यांना अगदी आपला, आपल्या घरातला, आपल्याच रक्तामासाचा असा वाटला. पुलंशी त्यांचे अभिन्न, उत्कट असे नाते जडले. ही आपुलकी, ही जवळीक गेल्या अर्धशतकात अन्य कोणत्याही लेखकाच्या वाट्याला आलेली नाही.
कुटुंब हा मराठी समाजाचा केंदबिंदू होता. बहुतेक मराठी माणसे कुटुंबाच्या आश्रयाने राहत. एकूण जीवनालाच कुटुंबसंस्थेची भरभक्कम बैठक होती.
कालांतराने बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीने या मध्यमवर्गाच्या स्थैर्याला गदगदा हलवले. पूर्वीच्या अनेक मूल्यांची पडझड झाली. पैसा या गोष्टीला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आणि त्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रांना बाजारूपणाची कळा आली. मराठी माणसाकडे तुलनेने पैसा कमी त्यामुळे एक प्रकारचा न्यूनगंड. आता परिस्थिती थोडीफार बदलली असेल पण मराठी व्यावसायिक फारसे नाहीत. कुठचीही सामाजिक संस्था घ्या; त्याचे देणगीदार कोण तर गुजराथी आणि मारवाडी, मराठी जवळजवळ नाहीत. त्यामुळे मराठी माणसाला कुठे महत्वच नाही.
कला, साहित्य, राजकारण सारे पैशाच्या संदर्भात मोजले आणि विकले जाऊ लागले. सिद्धीपेक्षा प्रसिद्धीला अधिक मोल आले. या महाराष्ट्राच्या मातीत किती थोर व्यक्ती जन्माला आल्या; मग ते राजकारण असो की समाजकारण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तोंडात बोट घालायला अशी कामे आणि संस्था महाराष्ट्रात उभ्या केल्या. पण इतर संस्थांप्रमाणे देणगीदार गुजराथी आणि मारवाडी त्यामुळे त्यांचा उदोउदो होतो. दुर्दैवाने त्या संस्थेसाठी रक्त आटविणाऱ्या माणसाला महत्वच नाही कारण त्यांचे कुठेच उदात्तीकरण होत नाही. काही अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास लोकांना अश्या व्यक्ती माहीतच नसतात मग त्यांचा अभिमान कसा वाटावा?
आपणच आपला इतिहास विसरलो मग तो इतर प्रांतीय का लक्षात ठेवतील? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व सुद्धा आपण मराठी माणसापुरते मर्यादित करून टाकले आहे. आपल्या पेशव्यांचे कर्तृत्व एवढे मोठं पण आम्ही त्यांना ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादात इतके संकुचित करून टाकले की त्यांना इतिहासात स्थानच राहिले नाही. त्याची आजची परिणीती काय तर देशाच्या राजकारणात गेल्या ७५ वर्षात मराठी माणसाला नगण्य महत्व.
मा. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना एकदा पानिपतला गेले होते तेव्हा त्यांनी खास करून काला आम या मराठ्यांच्या युद्ध स्मारकाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी बोललेलं वाक्य प्रत्येक मराठी माणसाने मनावर कोरून ठेवायला हवं - या भूमीत मराठे जे लढले ते हिंदुस्थानाच्या संरक्षणासाठी लढले, आपल्या स्वतःसाठी नाही.
परंतु गेल्या काही वर्षात अनेक मूल्यांची इतकी मोठी घुसळण झाली आहे की, मराठी माणसे आपली बलस्थाने विसरून गेली आहेत. सुमारे २०० वर्षांपूर्वी मराठी माणूस म्हणजे त्याग, व्यवस्थितपणा आणि लढाऊ बाणा. पण आज त्यातले काय शिल्लक राहिलंय?
‘माझी माय मराठी डोक्यावर रत्नजडित मुकुट आणि अंगावर फाटकी वस्त्रे लेवून मंत्रालयाच्या दारात उभी आहे’, असे अत्यंत तेजस्वी उद्गार कुसुमाग्रजांनी काढले यामागील त्यांची दूरदृष्टी लक्षात आली की थक्क व्हायला होते. आज काय बघायला मिळते आहे? गतकाळाचे मुकुट मिरवताना देखील मराठी माणसाच्या पराक्रमाऐवजी आपण त्यांची जात काय होती हेच शोधण्यात मग्न झालो आहोत.
इंग्रजी आले नाही तर मागे पडू या भीतीने मराठी शाळा नामशेष होऊ लागल्या. आम्ही आमची भाषा विसरू लागलो आहोत. आज दुर्दैवाने बऱ्याच मराठी घरांमध्ये सुद्धा मराठी बोलणे कमीपणाचे वाटू लागले आहे. आम्ही भाषा विसरलो तशी आमची संस्कृती आमच्यापासून विलग होऊ लागली. हे असेच चालू राहिले तर या संस्कृतीचा लोप अटळ आहे. त्यामुळे मराठी संस्कृती नेमकी कशाला म्हणावं याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. हल्ली तर स्वतःला मराठी म्हणणे म्हणजे शाप तर नाही अशी शंका येण्यासारखे वातावरण झाले आहे.
आज जगात कुठेही गेलात तरी इतर भाषीय त्यांचा प्रांतीय भेटला की त्यांच्या भाषेत बोलायला लागतात; मग ते गुजराथी, पंजाबी, तामिळ, बंगाली अथवा अन्य कुठलेही भाषिक असू देत पण दोन मराठी माणसे मात्र बऱ्याचदा इंग्रजीत बोलताना आढळतात. जोपर्यंत हा न्यूनगंड जाणार नाही तोपर्यंत नुसतं बोंबलून डोंबलाचा फरक पडणार?
हल्ली आपल्या बहुतेकांची मुले सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकली आहेत त्यामुळे पुढे मुलं काय करतील अशी शंका बऱ्याच जणांना असते. परंतु इंग्रजीच्या शिक्षणाने त्यांची व्यावसायिक उन्नती होणार असेल तर ती भाषा शिकलीच पाहिजे; त्यात काहीही गैर नाही. तसेच बरेच मराठी भाषिक आज मुख्यत्वे इंग्लंड, अमेरिकेत स्थाईक झाले आहेत; होत आहेत त्यामुळे भविष्यात काय होणार याची आमच्या पिढीला एक काळजी. पण मला असं वाटतं की आपण घरात कोणती भाषा बोलतो यावर खूप काही अवलंबून आहे. घरी मराठीतच सगळे व्यवहार चालत असतील तर मुलांची शाळा इंग्रजीत असल्याने काहीही फरक पडत नाही. आणि पुढील पिढी मराठीपासून दूर जात नाही हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून म्हणू शकतो.
सालाबादप्रमाणे मराठी मरतेय मरतेय म्हणून गळे काढणे बंद करून आपण काय करू शकतो याचा प्रत्येकाने विचार करावा. परत एकदा भरजरी इतिहासाची आणि गतवैभवाच्या अहंकाराची कात मराठी माणूस टाकेल आणि वर्तमानात त्याच्या कर्तृत्वाची सळसळ परत ऐकायला येईल याची आशा याही मराठी भाषा गौरव दिनाला जागृत ठेवू या! शेवटी आशा अमर असते, नाही का?
@ यशवंत मराठे