एका जागी स्थिर न बसता आपल्याकडील मालाची वा सेवेची घरोघरी जाऊन विक्री करतो, तो फेरीवाला अशी माझी सोपी व्याख्या. आठवणीतल्या फेरीवाल्यांची ही जंत्री.
आमच्या लहानपणी वेगवेगळे फेरीवाले आमच्या सोसायटीत येत असत. आज यातले बहुतेक जण काळाच्या ओघात नामशेष किंवा लुप्त झाले. आजच्या पिढीला थोडीशी जुनी माहिती मिळावी या दृष्टीने हा एक माझा प्रयत्न.
१) दूधवाला: दूधवाला भैय्या दूधात पाणी मिसळतो यावर तमाम बायकांचा ठाम विश्वास आणि त्यांचा त्या भैय्याशी दिव्य हिंदीत रोजचा वाद ठरलेला (मापटा नीट बुडवके देव). कोजागिरी सारख्या दिवशी जास्तीचे दूध हवे असेल तर तेही काही दिवस आधी सांगावे लागे. आमच्या पेक्षा मोठ्या मुलांना होळीला भांग मिळण्याचा हमखास स्रोत.
२) चीक: भैया तूम्हारी भैंस कब बाळंत होनेवाली है? हमको चीक मंगताय अशी मागणी भैय्याकडे नेहमीच होत असे. या चीकातही तो पाणी घालतो, असा बायकांना संशय.
३) वसईचे भाजीवाले: वसईमधे त्याकाळी भाजीचे बरेच मळे होते तिथून हे भाजीवाले येत असत. त्यांच्याकडे वांगी, मेथी, इतर पालेभाज्या, पापडी, कच्ची केळी अशा मोजक्याच भाज्या असत. त्या उत्तम प्रतीच्या असल्याने भावही जास्त असे. केळफूल वगैरे त्यांना मुद्दाम आणायला सांगावे लागे. विशेष म्हणजे हे भाजीवाले कावडीतून भाज्या आणत.
४) कोळीण: पूर्वी कोळणी मासे घेऊन घरोघरी फिरायच्या. कोळी पद्धतीने नेसलेले घट्ट लुगडे. अंगावर भरपूर दागिने. डोक्यावर एक लांबरुंद फळी आणि त्यावर माश्यांची टोपली. त्या काही मोजकेच मासे आणायच्या. पापलेट, कोलंबी, करंदी, मांदेली, ओले बोंबील व ओले बांगडे कारण हेच मासे जास्त खपत. कोळणी स्टेशनवर पण लगबगीने चालत असायच्या. मच्छी का पानी, असे ओरडत राहिल्या की त्यांना आपोआप गर्दीत वाट मिळायची. पुढे या धंद्यात केरळी लोक शिरले आणि टोपल्यांच्या जागी प्लॅस्टीकचे टब आले.
५) पाट्याला टाकी: आमच्या लहानपणी मिक्सर नव्हतेच. घरोघरची वाटणे पाट्यावरच व्हायची. आमच्या घरी जातं पण होते. हे सगळे काही काळाने गुळगुळीत व्हायचे. मग त्याला टाके काढावे लागत. पाट्याला टाकी असे ओरडत बायका आल्या की त्यांना या वस्तू दिल्या जात. हातोड्यासारखे एक अवजार वापरून त्या अगदी नक्षी काढल्यासारखे टाके काढून देत. आमच्या सोसायटीत तशी बरीच कारवारी कुटुंबे होती आणि त्यांच्याकडे रगाडू असे. त्यालाही त्या बायका टाके काढून द्यायच्या. त्यांना काम करताना बघणे म्हणजे आम्हाला जाम मजा यायची. दगडाची कपची डोळ्यात जाईल म्हणून त्या आम्हाला जरा लांब बसायला सांगत. टाके काढताना क्वचित ठिणग्याही उडत, त्याचे तर आम्हाला कोण कौतूक.
६) बाटलीबाई: बाटलीबाई असे ओरडत या बायका यायच्या. त्यावेळी प्लॅस्टीक फारसे वापरात नव्हते. बरीच औषधे काचेच्या बाटल्यांतून मिळत. व्हीक्स फॉर्म्यूला ४४, मर्क्यूरीक्रोम (लाल औषध) ग्राईप वॉटर, द्राक्षासव, वेगवेगळे काढे, बेडेकर, कुबल यांची लोणची.. अशा अनेक बाटल्या घरात येत. त्या रिकाम्या झाल्या की या बायकांना दिल्या जायच्या.
७) भंगारवाला: सगळ्या निरुपयोगी ठरलेल्या वस्तूंची विल्ल्हेवाट लावण्यासाठी भंगारवाला कामी येत असे. या व्यवहारात पैसे फारच कमी मिळायचे पण घरातली अडगळ कमी होतेय याचे सुख. हा भंगारवाला हातगाडी घेऊन येत असे. पण त्याच्या भरलेल्या हातगाडीकडे बघणेही त्रासदायक असायचं.
७) बोहारणी: बोहारणींचा नियमित राबता असायचा. बायकांना भांड्यांची हौस त्यामुळे जुने कपडे देऊन त्या बदल्यात भांडी घेणे हा आवडता छंद. त्या भांड्यांची क्वालिटी काय हा विचारच कोणी करत नसे.
८) नंदीबैल: नंदीबैल म्हणजे सजवलेला लहानखुरा बैल. सोबत बुगु बुगु असे वाजणारे एक वाद्य. परीक्षेत पास होईन का, अमुक अमुक लग्न जमेल का अशा प्रश्नांना तो होकारार्थी (क्वचितच नकारार्थी) मान डोलावत असे. ती कशी डोलवायची हे तो नंदीबैलवालाच ठरवत असणार यावर माझा दृढ विश्वास होता.
९) दरवेशी: दरवेश्याकडे एक अस्वल असे. त्याच्या मुसक्या बांधलेल्या असत त्यामुळे ते कुणाला चावू वगैरे शकत नसे. अधून मधून दोन पायावर उभे राहण्या व्यतीरिक्त ते अस्वल फार काही करतही नसे. पण हे दरवेशी एक वेगळीच वस्तू विकत असत. अस्वलाचा एक केस एका कॅप्सूल मधे घालून त्याचा ताविज बनवत आणि तो ते विकत असत. हा केस ते आपल्यासमोरच काढत असत. असा ताविज गळ्यात घातला तर मुलांना कशाची भिती वाटत नाही, असा समज होता.
१०) कुल्फीवाला: एका मोठ्या माठात बर्फ आणि मिठाचे मिश्रण करून त्यात कुल्फीचे साचे ठेवलेले असत. हे साचे चिलीमीच्या आकाराचे असत आणि त्याचे झाकण काळ्या रबर बॅंडने बांधलेले असे. कुल्फी देतांना दोन तळव्यात हा साचा फिरवून ती मोकळी केली जात असे आणि सागाच्या पानावर दिली जायची. आटीव दूधापासून केलेल्या या कुल्फीला मस्त चव. अजूनही असे, बरेचसे सातारकर, कुल्फीवाले "कुल्फी" असे ओरडत शिवाजी पार्कला अधूनमधून दिसतात.
११) बुढ्ढी के बाल: हे अजूनही दिसतात.
१२) बर्फाचे गोळे: हे अजून खूप ठिकाणी मिळतात आणि आता श्रीमंती थाट म्हणून मलई गोळा ही नवीन ऍडिशन.
१३) बर्फवाला: पूर्वी घरोघरी फ्रीज नसायचे. बर्फाची लादी बैलगाडीतून विकायला येत असे. ही लादी लाकडाच्या भुश्यात ठेवलेली असे. आपण मागितल्यावर टोच्यासारख्या हत्याराने त्यावर एक रेघ आखून त्या लादीचा तुकडा दिला जात असे. घरात पन्हे किंवा पॉट आईस्क्रीम करायचा बेत ठरला की असला बर्फ विकत घेतला जाई. तो पण आयत्यावेळी नाही मिळायचा. त्याला एक दिवस आधी सांगावे लागत असे.
१४) कडक लक्ष्मी: उघडे शरीर, लांब केसाचा बांधलेला बुचडा, कपाळावर मळवट, कमरेला अनेक तुकडे गुंडाळलेला असा हा कडकलक्ष्मीचा अवतार येत असे. सोबत त्याची बायको ढोल वाजवत फिरत असे. तिच्या डोक्यावर एक चौकोनी देव्हारा असे. तो नाद वाजू लागला की तो आपल्याकडच्या आसूडाचे फटके स्वतःला मारून घेत असे. त्यात मार किती आणि आवाज किती, हे मला आजही न सुटलेले कोडे आहे. पण लहानपणी या माणसांची जरा भीतीच वाटत असे.
१५) डोंबारी: डोंबारी पण नियमितपणे येत असे. थोडी मोकळी जागा सापडली की चार खांबावर एक आडवी दोरी बांधून त्यांचा खेळ सुरु होत असे. त्या दोरीवरून लिलया जाणारी एक बाई हा महत्वाचा आयटम. गोलांट्या उड्या मारणे. एका मोठ्या रिंगमधून पार होणे, एका लांब बांबूला लहान मूल बांधून ती तोलणे, दोन पाटांच्या मधे बाटली ठेवून त्यावर तोल संभाळणे असे अनेक प्रकार ते करत.
१६) गारुडी: नाग, मुंगुस घेऊन येणारे हे गारुडी फिरत. नागपंचमीला तर हमखास येणार. या सापांचे बहुतेक दात वगैरे काढलेले असावेत. बिचारे असहाय्यपणे फणा काढून डोलायचे.
१७) खडे मीठवाले: टेबल सॉल्ट (Refined) बाजारात फार नंतर आले. हातगाडीवर मिठाची गोण घेऊन हे लोक येत. त्यांची आरोळी म्हणजे "मिठाची गाडी आली, बारीक मीठ चार आणे किलो, चार आणेSS"
१८) पाव बिस्किट वाले: मॉडर्न आणि ब्रिटानिया हे पावाचे ब्रँड जरी बाजारात असले तरीही खास बेकरीतले पाव विकणारे लोकही येत. गोल चपटा कडक पाव ही त्यांच्याकडची खासियत. स्लाईस ब्रेड पण ते विकत पण त्याच्या स्लाईसेस आपल्यासमोर करून देत. त्यांचेच भाईबंद म्हणजे बिस्किटवाले. पत्र्याच्या भल्या मोठ्या पेटीत, खारी, क्रीमरोल्स, नान कटाई वगैरे घेऊन ते येत असत.
१९) बाइस्कोप: एका स्टँडवर एक चौकोनी डब्बा, त्याला समोर ३ ते ४ गोलाकार छिद्रे, या डब्यावरती एक नाचरी बाहुली किंवा माकड असे या बाइस्कोपचे रुप. या छिद्रांना डोळे लावून आत बघायचे (एकावेळी ३ ते ४) आतमधे चित्रे असत आणि हा फेरीवाला ती हाताने वरखाली करत असे. सोबत एखादे गाणे. आता हसू येईल पण आम्ही ती चित्रे बघण्यात रंगून जात असू.
२०. धारवाला: धारवाला अशी बोंब मारत हा मनुष्य सायकलवरून सोसायटीत शिरायचा. त्याच्या सायकललाच धार काढण्यासाठी एक दगडी चक्र असे. बिल्डिंग मधील बऱ्याच सुऱ्या, कात्र्या धार काढून घेण्यासाठी खाली उतरत.
२१. इडलीवाला: टिपिकल मद्रासी अण्णा हा साधारणपणे शनिवारी, रविवारी सायकलवरून येत असे. त्याच्या सायकलला एक खास हॉर्न होता की जो वाजला की कोण आलंय सांगावंच लागत नसे. पेहराव सुद्धा ठरलेला; मद्रासी लुंगी आणि वर झब्बा. इडली आणि मेदूवडा मस्त असायचा. आजही असे काही लोक दिसतात. (रविवारी शिवाजी पार्क कट्ट्यावर तर नक्कीच)
२२. भेळवाला: मुख्यत्वे सुकी भेळ विकायला येणारा हा भैय्या दारोदार फिरायचा.
२३. कल्हईवाला: 'कल्हईऽ वालेऽ' अशी आरोळी ठोकत ही मंडळी यायची. कल्हईवाले साधारणपणे दर ८-१५ दिवसांत येत असत. अनेक घरांतील भांडी कल्हई लावून चकाचक करुन देत असत. आम्ही मुले घोळका करून कल्हई करण्याची गंमत बघत असू. आजकाल तांब्या पितळेची भांडी इतिहासजमा झालीत त्यामुळे घरोघरी येणारे कल्हईवाले देखील. कल्हई म्हणजे पितळेच्या वा तांब्याच्या भांड्याला आतून कथील नामक धातूचा (टिन) पातळ थर देण्याची प्रक्रिया. कथील गंजत नाही आणि या थरामुळे भांड्यांत ठेवलेले आंबट पदार्थ वा इतरही खाद्यपदार्थ खराब होत नसत.
२४. न्हावी: आता पटणार नाही पण माझ्या लहानपणी अगदी नियमितप्रमाणे हे महाशय केस कापायला यायचे. आणि बऱ्याच वेळा आमच्या खेळाच्या वेळात यायचा मग माझा चिडचिडाट. पण सांगणार कोणाला, चुपचाप गॅलरीत बसून केस कापून घ्यायचे.
२५. भाजीवाला: डोक्यावर गच्च भरलेली टोपली, दोन खांद्याला दोन पिशव्या अशा अवतारात हा भैय्या प्रत्येक घरी हजेरी लावायचा. तो किती वजन उचलत असेल हे तो भगवंतच जाणे. अपार कष्ट आणि मेहनत.
याच्या व्यतिरिक्त आठवलेले म्हणजे स्टो रिपेअर, छत्री रिपेअर, रद्दीवाला, चणेदाणे कुरमुरेवाले, गोधडी शिवून देणाऱ्या बायका, कापूस पिंजून देणारे, खेळणी विकणारे, माकडवाले. आणखीन सुद्धा काही असतील. माझ्या आधीची पिढी अजून काही गोष्टी सांगतील.
आज तर असे फेरीवाले राहिले नाहीत आणि जे काही थोडेफार शिल्लक असतील त्यांना बहुतेक सोसायटीमध्ये प्रवेशच दिला जात नाही. फेरीवाल्यांना बंदी अशा पाट्या सर्रास दिसायच्या आणि दिसतात. पण त्यावेळी या सगळ्याची एक वेगळीच मजा होती. हल्ली सुरक्षेच्या नावाखाली कोणी अशा लोकांना दरवाजाच उघडणार नाहीत. माणसाचा माणसावरचा विश्वासच उडाला आहे त्यामुळे दुसरं काय होणार?
आजचा काळ तर तंत्रज्ञानाचा काळ. माझ्या मुलांना सगळं ऑनलाईन मागवायची एवढी सवय झालीय की विचारता सोय नाही. त्यामुळे असे फेरीवाले परत दिसतील हे फक्त दिवास्वप्नच ठरेल.
यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
#StreetVendors #फेरीवाले