गेल्या काही वर्षात ड्राय डे हा प्रकार खूपच कमी झाला आहे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती, निवडणूका येवढ्या करता आता ते राहिले आहे. परंतु आम्ही जेव्हा प्यायला सुरुवात केली तेव्हा ड्राय डे चा सुळसुळाट होता.
१९७० आणि १९८० च्या दशकात मुंबईत खूप गिरणी होत्या आणि त्यांचा मासिक पगार कामगारांना १० तारखेला मिळत असे. आता पगार झाल्याझाल्या त्यांनी दारूत पैसे उडवू नयेत म्हणून दर महिन्याच्या दहा तारखेला ड्राय डे असायचा. त्यावेळी वाटायचं की बरोबर आहे पण आता वाटतं की जो पिणारा आहे तो आदल्याच दिवशी घेऊन ठेवेल. तेव्हा जरी खिशात पैसे नसले तरी दोन दिवसांकरता उधारी मिळणं काही अशक्य नाही आणि तेव्हाही नसेल. सरकारचं एक मानसिक समाधान.
त्याच्याशिवाय आधी म्हटल्याप्रमाणे कधी ड्राय डे असेल याची शाश्वती नसे. गांधी जयंतीच्या नंतरच्या एका आठवड्यात ४ दिवस ड्राय डे असे. बरं का? असं विचारायची सोय नसे. मुकाट मान्य करणे. त्याच्याव्यतिरिक्त सगळे महत्वाचे सण, काही जयंत्या असे होतेच. माझ्या दृष्टीने अशी मनाई करणे मूर्खपणाचे आहे. मी गांधी जयंतीला दारू प्यायलो नाही म्हणजे मला त्यांच्याबद्दल आदर आहे असे समजणे किती बालिश आहे. उलट पिणाऱ्या लोकांनी त्या आठवड्यात गांधींना जेवढी दूषणे दिली असतील ती इतर वेळी त्यांना कधीच मिळाली नसतील. असो.
१९८० चे दशक म्हणजे दारू पिण्याचा आमचा प्राईम टाईम. त्यात असे अडथळे कोणाला आवडतील? पण अडचणी आल्या की माणूस मार्ग काढतोच. आमच्या दादर, माहीम आणि शिवाजी पार्क ह्या परिसरातील कमीतकमी ५० ठिकाणी ड्राय डे च्या दारू मिळायला काहीही प्रॉब्लेम नसायचा. फक्त पुढच्या दरवाजाच्या ऐवजी मागून प्रवेश. पण मुख्यत्वे ती क्वार्टर मध्ये मिळायची कारण घेऊन जाणे सोपं. हां, पण जर तिथेच बसून प्यायचं असेल तर त्या सगळ्या ठिकाणी प्यायला मिळेलच असे नव्हते पण त्यातील ५०% ठिकाणी ती ही सोय होती. एक दोन ठिकाणी तर मागील बाजूला असलेल्या चाळीच्या चौकामध्ये खाटा टाकून बसायची सोय. थम्प्स अप मध्ये मिक्स करून पिणे तर अत्यंत कॉमन गोष्ट. पुढचा दरवाजा बंद, मागून धंदा जोरात. आणि जी गोष्ट एवढी सर्वश्रुत होती ती गोष्ट पोलीस किंवा एक्ससाईज पासून लपून राहणे शक्य होतं का? सगळा 'तेरी भी चूप और मेरी भी चूप' चा मामला. माझ्या घराच्या जवळ भोलाशेटचा सनराईज बार होता जिथे ड्राय डे च्या दिवशी सुद्धा रात्री २-३ वाजेपर्यंत धंदा जोरात आणि तो देखील मेन कॅडेल रोडवर. कधीतरी मग रेड घालण्याचे नाटक; पण गिऱ्हाईकांना कधीही त्रास नाही. रेड आली तर भोलाशेट सांगायचा, अरे बैठो, कुछ नही होगा. १० मिनट में सब ठंडा हो जायेगा.
पण नंतर बिझिनेस मध्ये असताना कोणी अचानक मोठा कस्टमर किंवा डीलर आला आणि नेमका त्या दिवशी ड्राय डे असला की मग मात्र पळापळ. त्या लोकांना घेऊन अशा बारमध्ये जाणे शक्यच नव्हते. पण आमच्यासारखा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होत असणारच त्यामुळे अनेक रेस्तराँनी त्यातून मार्ग शोधला होता. दारू स्टीलच्या ग्लास मधून पेग बनवून मिळायची. टेबलावर सर्व्ह केली जात नसे. त्यामुळे मग जिथे कमी फसवलं जाण्याची भीती तिथे तोबा गर्दी. त्यावेळचे आमचे आवडते रेस्तराँ म्हणजे वरळी मधील संजू चायनीज.
हे सगळं जुनं आठवलं की मला नेहमी असं वाटतं की अशी बंदी करून खरंच काही फरक पडतो का? पिणारे आणि पाजणारे मार्ग शोधून काढतातच मग हा सगळा सव्यापसव्य कशासाठी आणि कोणासाठी? आज ज्या राज्यात दारूबंदी आहे तिथल्या दारूच्या खपाचे आकडे पहा, डोळे गरगरतील. अशी बंदी करून साध्य काय होतं हे कोणीतरी मला समजावलं तर बरं होईल.
आज जरी कमी झाले असले तरी ड्राय डे संपलेले नाहीत. कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलला हे लागू नाहीत पण त्याचा आपल्याला काय उपयोग? अशा ठिकाणी जाऊन दारू पिणे म्हणजे शुद्ध वेडेपणा. १ पेगच्या किंमतीत बाहेर १ अख्खी बाटली विकत मिळेल. दुसरी गमंत म्हणजे ९०% ड्राय डे क्लब्सना लागू नसतात त्यामुळे अशा दिवशी तेथील बारमध्ये जागा मिळवाल तर बक्षीस अशी परिस्थिती. या सर्व गोष्टींचा पुनर्विचार व्हायला हवा असं मला वाटतं पण आपल्या देशात प्रत्येक गोष्टीचा राजकारण आणि धर्माच्या नावाखाली चोथा करून टाकतात. त्यामुळे पुढील ५० वर्षे पण काही घडणार नाही.
जाऊ दे, आपल्या देशात या पेक्षा खूप मोठे प्रॉब्लेम अजून सोडवले गेले नाहीयेत त्यामुळे ही तर अगदीच मामुली बाब आहे.
यशवंत मराठे
#DryDay #Alcohol #Drinking