आपला वाढदिवस; बालपणी प्रत्येकाला कधी येतो हा दिवस असे झाले असते. हा दिवस आजसुद्धा आपल्याला त्या सोनेरी काळात घेवून जातो. लहानपणीचे ते वाढदिवसाचे हट्ट, नवीन कपडे, वडिलधाऱ्यांनी दीर्घायुषी हो म्हणून दिलेले आशीर्वाद, दिवसभर होणारे लाड, खास आपला आवडता जेवणातील मेनू अगदी सारे एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यासमोर तरळून जाते.
जसेजसे वय वाढत जाते तसे वाढदिवस साजरा करण्याच्या संकल्पना बदलतात आणि मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांचे फोन, कुटुंबासमवेत बाहेर जेवण, ह्यातच दिवस जातो. कधीतरी वाटतं एकदा तरी वाढदिवस बालपणीसारखाच अगदी ती लहान मुलासारखी डोक्यावर टोपी घालून तालासुरात केक कापत साजरा करून बघितला पाहिजे.
मराठीत साठीला षष्ट्यब्दीपूर्ती असा भरभक्कम शब्द आहे पण तो अतिशय जड आहे. उच्चारायला कठीण आणि लिहायला तर त्याहून कठीण. अजूनच वयस्क झाल्यासारखे वाटायला लागते. साठी झाली? खरंच पटत नाही कारण मनाने मसालेदार आणि रंगतदार होण्याचा तारुण्यात जो सिलसिला चालू झाला तो तसाच आहे; त्यामुळे वयाचा पत्ता लागत नाही. क्यूँ दोस्तो, सही फर्माया की नही? Age is all in the mind हे जरी खरं असलं तरी शरीर मात्र आता अधूनमधून जाणीव करून देते. त्यातून मित्र आणि नातेवाईक मंडळी तर टपूनच बसली असतात. अरेsss हा म्हातारा झाला बरं का आता; चंदेरी केस, चंदेरी मिश्या; hip hip hurray!!
हां, तसे 'बघणीय' असेल तर व्यवस्थित दिसते. लहानपणापासून चांगलं चुंगलं खायला तर आवडतेच त्याचा परिपाक म्हणजे मस्त 'गोलाकार शरीर'. उत्तमोत्तम 'सिंगल माल्ट व्हिस्की' हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. नशिबाने लिव्हर अजून ठणठणीत असल्याने काही चिंता नाही. मी साखर कारखानदारही नाही (म्हणजे डायबिटीस नाही).
2010 साली मी व्यवसायातून निवृत्त होऊन समाजाप्रती आपले ऋण फेडावे या ध्येयाने नीरजा ही सामाजिक संस्थेची स्थापना केली आणि संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आदिवासी परिसरात सार्वजनिक जलपुनर्भरणाची (community rainwater harvesting) कामे करण्यात येतात. या कालावधीत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या खूप लोकांनी माझे आयुष्य सघन बनविले. जानेवारी 2018 च्या अशी परिस्थिती आली की संस्थेचे काम सुरळीत चालू आहे आणि आपल्याकडे बराच मोकळा वेळ आहे. रिकामं मन जर सैतानाचे घर व्हायला नको असेल तर मन कशात तरी गुंतवायची गरज असते.
लिखाणाने माझ्या आयुष्याला कलाटणी आणि नवसंजीवनी दिली. आजच्या या दिवशी माझ्या निवडक लेखांचे पुस्तक "छपाई ते लेखणी" हे ग्रंथाली सारख्या नामवंत संस्थेच्या मार्फत प्रकाशित होणे याच्यापेक्षा मला साठीची मोठी गिफ्ट मिळूच शकत नाही. छपाई (मुद्रण) क्षेत्रातून बाहेर पडल्यावर आज दहा वर्षांनंतर माझ्या लेखणीतून उतरलेल्या शब्दांची छपाई होते आहे याची मला मोठी मजा वाटते आहे. गेल्या तीन वर्षातील लिखाणाने मला काय नाही दिले? सत्कारणी लागलेला वेळ, लोकांचे भरभरून प्रेम, काहीतरी चांगले केल्याचा आनंद, पुनश्च हरी ॐ करायची संधी आणि माझे फुकटचे ज्ञान वाटायला आणि पाजळायला WhatsApp आणि Facebook ची साथ. खरंच तृप्त झालो. धन्यवाद आणि आभार मानणे माझ्या कोकणस्थी स्वभावात बसत नाही तरी सुद्धा हा एक फुकाचा प्रयत्न.
माझा असा कायमच प्रयत्न राहिला आपलं लिखाण हे मोकळ्याढाकळ्या भाषेत असायला हवे ज्यामुळे वाचकाला जणू काही मी समोर बसून त्याच्याशी गप्पा मारतोय असे वाटावे. मला प्रवचन देणारा तत्ववेत्ता व्हायचंच नाहीये. सर्वसाधारण वाचकांशी भावनिक धाग्याने जोडले जाणे मला फार महत्वाचे वाटते कारण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळया तणावाखाली जगत असते. माझे लिखाण वाचून त्यांचा थोडा विरंगुळा व्हावा, चेहऱ्यावर निदान थोडे तरी हसू यावे ही मनापासूनची इच्छा. पण हो, त्यामुळे काही लोकांना मी माझे लिखाण गंभीरपणे घेत नाही असे वाटत असेल. वाटू दे की, आपण सगळ्यांना कुठे खुश करू शकतो. मला कोणाशीच स्पर्धा करायची नाहीये. मी माझ्या पद्धतीने आणि वेगाने पुढे जात राहणार. असो, तुम्हाला वाटेल की नाही म्हणता म्हणता मी प्रवचन द्यायला लागलो की काय? अजिबात नाही.
साहजिकच अशा वेळी लोकं विचारतात, पुढे काय? मला काही तसली काळजी नाही कारण निवृत्त होऊन मला आता दहा वर्षे झाली. सुख म्हणजे नक्की काय असतं? माझी व्याख्या फार सोपी आहे - एखाद्या संध्याकाळी एका हातात पुस्तक, दुसऱ्या हातात उत्तम सिंगल माल्ट व्हिस्कीचा ग्लास यांची मस्त मैफल, आणि साथीला भीमसेन अण्णांचा पुरिया धनश्री किंवा किशोरीताईंचा भूप किंवा कुमारजींची निर्गुणी भजने; ते नाही तर लता, आशा, रफी, किशोर यांच्या फिल्मी संगीताचा मनमुराद आस्वाद आणि उर्वरित आयुष्यात भरपूर वाचन आणि लिखाण यांची धमाल जुगलबंदी. बस्स, अजून काय पाहिजे?
सधन कुटुंबात जन्म आणि सुसंस्कृत आईवडील यात माझं कर्तृत्व काहीच नाही. मग मी आयुष्यात कमावलं काय? माझी दादागिरी प्रेमाने स्वीकारणारी भावंडे, माझ्यासारख्या माणसाला एकाच वेळी प्रेम आणि धाक याने सांभाळून घेणारी बायको, मुलांनी बापापेक्षा मित्र म्हणून स्वीकारणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व स्तरातील जिवाभावाचे मित्र. माणसाला काय पाहिजे अजून आयुष्यात?
आजच्या दिवशी मी माझ्या आयुष्यातील मोठा सेलिब्रिटी आहे. देवदयेने आज माझ्या जीवनात अश्या टप्प्यावर आहे की मी म्हणू शकतो "I have lived a fulfilled life" त्यामुळे यापुढे कधीही 'उपर का बुलावा' आला तरी 'नो प्रॉब्लेम'.
हे गाणे माझ्या आयुष्याचे ब्रीदवाक्य आहे.
मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया |
त्यामुळे आपण नेहमीप्रमाणे दर आठवड्याला भेटत राहूच. Ciao.
यशवंत