संगीत सरताज

सोमवारी आणि गुरूवारी घराचा दरवाजा उघडला जाणार नाही. इतर दिवशी फक्त तीनदा दारावरची बेल वाजवावी. दार उघडले न गेल्यास तुमचे कार्ड आणि भेटीचे कारण सांगणारा कागद अशा दोन गोष्टी आत सरकवाव्यात, धन्यवाद. - अशी पाटी वाचली की पहिलं काय वाटेल तर हे घर नक्कीच पुण्यातील असणार.

 

पण ही तर पाटी होती मुंबईतील ब्रीच कँडी या उच्चभ्रू परिसरात. कुणाचे होतं हे घर? तर ते होतं, सगळ्या जगाला आपल्या भेटीचे दरवाजे ठामपणे बंद करणारी, पद्मभूषणसारख्या नागरी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण दिल्लीमध्ये येऊ शकत नाही असे नम्रपणे राष्ट्रपतींना पत्र लिहून पुरस्कारांबद्दल सुद्धा अनासक्ती प्रामाणिकपणे व्यक्त करणारी आणि जगभरात होणारे तऱ्हेतऱ्हेचे संगीत महोत्सव, मैफिली, रेकॉर्डिंग, मुलाखती अशा वर्दळीकडे पाठ फिरवून शांतपणे फक्त आपल्या सूरबहार नावाच्या वाद्याच्या स्वरांसोबत जगू इच्छिणारी ती एक मुलखावेगळी स्त्री, अन्नपूर्णादेवी.

 

सर्वसामान्यांसाठी जणू कधीच नसलेले एक मूक अस्तित्व. अगदी शास्त्रीय संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी सुद्धा त्यांची ओळख साधारण तीन संदर्भांत संपणारी : भारतरत्न पंडित रवीशंकर यांची पहिली पत्नी... नामवंत सरोदवादक अली अकबर खान यांची बहिण... किंवा फार तर फार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची गुरु! आजच्या लिहित्या पत्रकारांचा शब्द आणि चॅनेलवाल्यांचा कॅमेरा याला कधीही नकार न देणाऱ्या माध्यमाभिमुखी जगात या बाईंनी मात्र त्यांच्या भेटीस जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला सहजपणे नकाराचा एक फटकारा दिला. नम्रतेने पण ठामपणे. आणि फोटोग्राफर नावाच्या कुणा इसमाला तर आपल्या घराच्या आसपास सुद्धा कधी फिरकू दिले नाही...

 

नम्र आणि ठाम नकार. - हे या बाईंच्या आयुष्याचे जणू सारच! त्यांच्या या नकारांच्या किती कथा सांगितल्या आणि ऐकल्या जातात.

 

इलस्टेट्रेड वीकली नावाच्या एके काळच्या अत्यंत मातब्बर पाक्षिकाने 1980 साली भारतीय शास्त्रीय संगीतावर एक विशेषांक प्रसिध्द करायचा असे ठरवले. संगीत क्षेत्रातील त्या वेळचे सगळे नामवंत कलाकार, समीक्षक, अभ्यासक यांची यादी केली गेली. त्यात पहिल्या पाचात नाव होते ते अन्नपूर्णादेवी यांचे. संपादकांकडून अन्नपूर्णादेवी यांना पत्र गेले. सोबत प्रश्नावली आणि फोटोची विनंती. मुंबईतील ‘आकाश गंगा’ अपार्टमेंटच्या सहसा बंद असलेल्या घराच्या दरवाजातून पत्र आतपर्यंत तर पोचले पण प्रश्नावलीला उत्तर देण्यासाठी सुद्धा अगदी तत्परतेने आतून नम्र नकार आला. फोटोचा तर सवालच नव्हता...! हा नकार असा सहज स्वीकारण्याची वीकलीची अर्थातच तयारी नव्हती. मग त्या अंकासाठी काम करीत असलेले मोहन नाडकर्णी यांच्यासारखे जाणते अभ्यासू अन्नपूर्णादेवींच्या भेटीस गेले. पण नकाराची धार तेवढीच तीव्र. खूप आग्रह, मनधरणी यानंतर घडले एवढेच, की ‘भारतीय शास्त्रीय संगीतातील बदलते प्रवाह’ या विषयावर बोलण्यास त्या राजी झाल्या. पण त्यासाठी एकच अट होती. कोणती? तर त्या जे बोलतील त्यातील एक शब्द सुद्धा छापून येणार नाही...!

 

असाच निग्रही नकार इंदिरा गांधी यांच्याही वाट्याला आला होता. त्यावेळी इंदिराजी पंतप्रधान तर होत्याच पण अतिशय करारी नेत्या असा त्यांचा दरारा होता. त्यांच्या भेटीसाठी गेलेल्या यहुदी मेहुनीन नावाच्या जगप्रसिध्द व्हायोलीन वादकाला इंदिराजींनी विचारले, ‘तुमच्यासाठी या भारत भेटीत मी काय करू शकते?’ तेव्हा हा कलाकार भारतात दोनच व्यक्तींच्या ओढीने आणि त्यांना भेटण्याची इच्छा मनात ठेवून आला होता. एक, योगगुरु बी के एस अय्यंगार आणि दुसऱ्या, अन्नपूर्णादेवी. त्याने इंदिराजींना विनंतीवजा प्रश्न केला, अन्नपूर्णादेवी यांची एक मैफल आयोजित करू शकाल का? मग वरिष्ठ स्तरावरून सूत्रे हलली. थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातून विनंती गेली. त्या विनंतीला सुध्दा त्या बंद दाराआडून नम्र पण ठाम नकारच मिळाला. अन्नपूर्णा देवींनी इंदिराजींसाठी उलटा निरोप धाडला की बाबा (वडील आणि गुरु अल्लाउद्दिन खान) आणि शारदा माँ यांच्या तसबिरीखेरीज अन्य कोणाच्याही समोर मी वादन करीत नाही. त्यामुळे खास मैफिलीचा प्रश्नच उद्भवत नाही! परंतु पंतप्रधानांच्या कार्यालयाकरवी पुन्हा थोडा आग्रह झाल्यावर काहीशा नाखुशीने घरी रात्री होणारा अन्नपूर्णादेवी यांचा रियाझ ऐकण्याची परवानगी यहुदी मेनुहीन यांना मिळाली पण प्रमुख अट होती की रियाझाचे रेकॉर्डिंग करायचे नाही आणि फोटोग्राफ्रर घराजवळ सुद्धा येणार नाही..! येहुदी मेहुनीन यांना काही कारणाने ऐन वेळी मायदेशी परत जावे लागले पण त्यांच्या बरोबर आलेले बीटल्सचे जॉर्ज हॅरीसन यांनी ही अट मान्य करीत अन्नपूर्णा देवींच्या दैनंदिन रियाझाला हजेरी लावली. ही गोष्ट सत्तरच्या दशकातील. अन्नपूर्णादेवी यांच्या शिष्यांखेरीज ज्या बाहेरच्या व्यक्तीने त्यांचे वादन ऐकले त्यातील शेवटची व्यक्ती म्हणजे जॉर्ज हॅरीसन.

 

यश, संपत्ती, देशाच्या सीमा ओलांडून जगभरातील रसिकांची दाद, आपल्या वाद्याच्या माध्यमातून देशोदेशीच्या मातीतील कलेशी आणि ती जपणाऱ्या कलाकारांशी जोडले जाण्याचा आनंद हे सारेच कोणाही कलाकाराला सदैव खुणावणारे असते. हे सारे सुख दोन्ही मुठी ओसंडून मिळण्याची शक्यता असतांना अशा भरल्या ताटाला हातही न लावता निर्ममपणे नाही म्हणणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही.

 

पंडित रविशंकर यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकाराशी झालेल्या विवाहानंतर ‘पती-पत्नीमध्ये श्रेष्ठ कलाकार कोण?’ असा वाद जगाच्या चव्हाट्यावर चवीने चघळला जाऊ लागल्याचे दिसताच जगासाठी आपल्या वाद्याला गवसणी घालून वानप्रस्थ स्वीकारणे, तो आयुष्यभर पाळणे आणि त्याविषयी स्वीकारलेले मौन कधीच न सोडणे ही एक अलौकिक बाब आहे.

 

संगीत नावाची अद्भुत कला तिच्या गुणसूत्रात होती पण दुर्दैवाने, त्यासोबत एक शापही या संगीताला होता आणि तो म्हणजे तिचे संगीत फक्त चार भिंतीपुरते राहण्याचा. जाणकारांपर्यंत, दर्दी रसिकांच्या कानापर्यंत न पोचण्याचा!!

 

 

भारतीय शास्त्रीय संगीताला मैहर नावाच्या एका घराण्याची देणगी देणाऱ्या उस्ताद बाबा अल्लाउद्दिन खान यांची अन्नपूर्णा ही सगळ्यात धाकटी मुलगी. घरासाठी ती रोशनआरा होती पण मैहरचे महाराजा ब्रजनाथ सिंग यांनी चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर जन्मलेल्या या मुलीचे नाव ठेवले अन्नपूर्णा... अल्लाउद्दिन खान यांच्या सारख्या विलक्षण प्रतिभावान कलाकाराच्या घरात ओसंडून वहाणाऱ्या संगीतावर रोशनआराचा हक्क नव्हता कारण रोशनआराची मोठी बहीण जहांआरा निकाह होऊन सासरी गेल्यावर तिचा तानपुरा चुलीत भिरकावून देण्याच्या धमक्या तिला ऐकवल्या गेल्या. पुढे लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यात त्या मुलीच्या धक्कादायक अकाली मृत्यूचा चरचरीत चटका अल्लाउद्दिन खान यांच्या कुटुंबाला सोसावा लागला. हे सारे नशिबाचे भोग सहन केलेल्या त्या घराने मग धाकट्या अन्नपूर्णाला अजिबात गाणे न शिकवण्याचा निर्णय घेणे स्वाभाविकच होते. तिचीही त्याबद्दल काही तक्रार नव्हती परंतु तऱ्हेतऱ्हेच्या वाद्यांचे नाद आणि त्यातून उमटणाऱ्या सुर हे त्या घराचे श्वास-उच्छ्वास होते त्यामुळे तिच्या कानावर गाण्याचे घट्ट संस्कार होत होते. सुरेल-बेसूर स्वरातील सूक्ष्म फरक त्या कानांना चांगलाच समजत होता. एक दिवस सरोदवर वाजत असलेली अशीच सपाट, बेसूर तान तिच्या कानावर पडली. तेव्हा दहा वर्षाची अन्नपूर्णा झटकन आपल्या भावासमोर जाऊन बसली आणि तीच तान कमालीच्या सफाईने गाऊन दाखवत आपल्या भावाला, अली अकबरला म्हणाली, ‘ये ऐसे सिखाया है बाबाने...’ - दारात उभ्या असलेल्या बाबांच्या कानावर ती तान पडली. इतका नितळ स्वर आणि एवढी दाणेदार तान? कोण गातंय? ते दारातून पुढे आले, आणि समोर बसलेली पाठमोरी अन्नपूर्णा बघून स्तब्ध झाले. काही क्षणातच पुढे होत अन्नपूर्णाची वेणी पकडून तिला ते आतल्या खोलीत घेऊन गेले. तिच्या हातात सतार ठेवत म्हणाले, ‘मां, आजपासून मी तुम्हाला संगीत शिकवणार. मी तुम्हाला देवी सरस्वतीच्या हातात सोपवतोय. संगीतामुळे जहांआराच्या वाट्याला जे असह्य जिणे आले ते मी तुमच्या वाट्याला येऊ देणार नाही. आजपासून मी तुम्हाला देवाला अर्पण करतोय, तुम्ही आपल्या मर्जीने स्वतंत्रपणे जगाल. लक्षात ठेवा, तुमचे लग्न फक्त संगीताच्या स्वरांशी लागले आहे’. अतिशय चोखंदळपणे, निरखून-पारखून जमा केलेले आयुष्यभराच्या स्वरांचे वैभव बाबा त्यानंतर पुढची चार वर्षे अन्नपूर्णाच्या पदरात ओतत राहीले. कारण एकच - संगीत शिकण्यासाठी लागणारा अथांग संयम, आणि कोणत्याही भौतिक वखवखीपासून दूर असलेले स्वस्थ, शांत मन आपल्या या मुलीत आहे हे त्यांना दिसत होते! अन्नपूर्णाच्या हाती आधी सतार आणि त्यानंतर सूरबहार नावाचे अनवट, फक्त चोखंदळ रसिकांनाच भावेल असे वाद्य बाबांनी ठेवले ते याच विश्वासापोटी.

 

 

 

उदय शंकर यांनी आपल्या भावासाठी बाबांकडे अन्नपूर्णाचा हात मागितला तेव्हा या आंतरधर्मीय विवाहाबद्दल बाबांच्या मनात खूप प्रश्न होते. बाबा जरी धर्माचे अवडंबर करणारे नसले तरी त्यांचे कुटुंब पारंपरिक मुस्लीम धर्म मानणारे होते. पण त्यांनी होकार दिला आणि दि. १५ मे १९४१ रोजी रोशनआरा यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि त्याच दिवशी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी वैदिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा हिमालयाच्या कुशीत असलेल्या अल्मोरा गावात पार पडला. आणि त्यानंतर अवघ्या काही वर्षातच गोष्टी बिनसत गेल्या. कारणे? खूप...! आणि ती देखील घटनांचे अर्थ लावत-लावत लोकांनी खणून काढलेली..! त्यात या नात्याचे तारू खडकावर आपटून फुटले. त्यात बळी मात्र गेला तो फक्त अन्नपूर्णा नावाच्या कलाकाराचा... जेमतेम पाच-सहा मैफली या दोघांनी एकत्र केल्या असतील पण ‘एकत्र कार्यक्रमात जमवून घेणे जरा अडचणीचे होत चालले आहे’ असे रविशंकर यांनी अन्नपूर्णा देवींना अगदी एकाएकी सुचवले. ‘आपले वैवाहिक जीवन वाचविण्यासाठी त्यांनी त्यांचे बाबा आणि शारदा माँ यांच्या तसबिरीसमोर शपथ वाहिली की त्या परत कधीही लोकांसमोर वाजवणार नाहीत. पण त्यांचा एवढा मोठा त्याग देखील त्यांचे लग्न वाचवू शकला नाही.

 

 

 

इथूनच पुढे सुरु झाला तो अन्नपूर्णादेवी यांच्या आयुष्यातील तिसरा टप्पा. एकटीने, गुरु म्हणून जगण्याचा. यासाठी तिला जसे बाबांनी शिकवलेल्या गाण्याने आत्मबळ दिले. गाणे शिकवतांना बाबा आपल्या शिष्यांना नेहेमी म्हणत, माझे संगीत हे लोकांच्या मनोरंजनासाठी निर्माण केलेले एखादे उत्पादन नाही, स्वत:चे समाधान, माणूस म्हणून उन्नयन होण्यासाठी असलेले ते दैवी साधन आहे.

 

अभिमान’ या चित्रपटाचे बीज हृषीकेश मुखर्जी यांच्या हाती लागले, ते पंडित रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्या सहजीवनातल्या वादळातून ! हा चित्रपट काढण्यापूर्वी ते अन्नपूर्णा देवी यांना भेटले होते असे म्हटले जाते. अन्नपूर्णा-रविशंकर यांचा तुटत गेलेला संसार आणि त्याबरोबर संगीताच्या जगातून एकेक पाऊल मागे जात स्वत:ला घट्ट बंद केलेल्या दाराआड कोंडून घेणाऱ्या अन्नपूर्णा यांच्यासारखी प्रतिभावान कलाकार. या कहाणीचा पडद्यावर भले सुखांत झाला असेल, पण आयुष्य सिनेमासारखी सोपी उत्तरे देत नाही...!

 

अन्नपूर्णादेवी यांच्या संगीताविषयी आणि सांगीतिक प्रतिभेविषयी बोलतांना उस्ताद अमीरखान यांनी एकदा म्हटले होते, ‘बाबांची गायकी 80 टक्के अन्नपूर्णादेवी यांच्यात, 70 टक्के अली अकबर खान यांच्यात तर 40 टक्के रविशंकर यांच्यात आली आहे’. परंतु दुर्दैवाने बाबांच्या गायकीतील अन्नपूर्णादेवी यांच्याकडे आलेली ही 80 टक्के गायकी ऐकण्याची संधी फारच भाग्यवान, मुठभर रसिकांना मिळाली. म्हणुनच पंडित निखील बॅनर्जी, हरिप्रसाद चौरसिया, नित्यानंद हळदीपूर, वसंत काबरा अशा त्यांच्या शिष्यांना ऐकताना आठवण येत राहते ती त्या 80 टक्के गाण्याची आणि रसिक म्हणून समाधान करून घ्यावे लागते.

 

अली अकबर खान यांनी स्वतःच एके ठिकाणी असं म्हणून ठेवलंय की जर तराजूच्या एका पारड्यात मला, रवी शंकर आणि पन्नालाल घोष यांना एकत्र ठेवलेत आणि दुसऱ्या पारड्यात फक्त अन्नपूर्णाला एकटीला ठेवलेत तरी तिच्या प्रतिभेचे पारडे जडच असेल.

 

अन्नपूर्णादेवी म्हणजे अलौकिक प्रतिभा. तिचे गुरु, म्हणजेच बाबा, जे अत्यंत कडक शिस्तीचे आणि दुराग्रही होते, तिला माँ सरस्वतीचा अवतार म्हणत असत. यापेक्षा मोठी दाद कुठली असेल? दुर्दैवाने तिचे संगीत काळाच्या ओघात लुप्त झाले. त्यांना मैफिलीत बघितलेले अथवा ऐकलेले रसिक श्रोतेच नाहीत. त्यांच्या फक्त एका जुगलबंदीचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे आणि जे सभागृहाच्या दरवाज्याबाहेर ठेवलेल्या स्पीकरवरून रेकॉर्ड करण्यात आले कारण सभागृह खचाखच भरले होते.

 

बाबांची विद्या आपल्या मुलाला देण्याची अन्नपूर्णादेवी यांची इच्छा परिस्थितीने हातातून हिरावून घेतली तेव्हा कदाचित गुरु म्हणून सुद्धा संगीताकडे पाठ फिरवणे हा पर्याय अन्नपूर्णा यांनी स्वीकारला नाही म्हणून त्यांचे प्रेम, वात्सल्य, काळजी त्यांच्या शिष्यांच्या वाट्याला आली. हरीजींसारखा एखादा शिष्य शिकण्यासाठी रात्री बेरात्री जरी आला तरी आधी माँच्या हातचे चवदार, गरम जेवण आणि मग रियाझ असा त्यांच्या घराचा रिवाज होता.

 

आणि त्यांनी फक्त सुरबहार वाद्य शिकवले असेल असं तुम्हाला वाटत असेल तर ही यादी वाचा म्हणजे त्यांची प्रतिभा लक्षात येईल.

 

सतार - निखिल बॅनर्जी, बहादूर खान, हिरेन रॉय, कार्तिक कुमार, इंद्रनील भट्टाचार्य, देबी प्रसाद चॅटर्जी, सुधीर एस फडके, संध्या फडके आपटे
सरोद - आशिष खान, ज्ञानेश खान, बसंत काबरा, प्रदीप बारोट, सुरेश व्यास 
बासरी - हरिप्रसाद चौरसिया, नित्यानंद हळदीपूर 
दिलरुबा - दक्षिणा मोहन टागोर
व्हायोलिन - सत्यदेव पवार 
सुरबहार - निलोफर खान 
गायन - विनय भारत राम 
 
 
भारतातील पहिली वाद्यवादक महिला अशी नोंद संगीताच्या इतिहासात होण्याचे दुर्मिळ भाग्य नाकारून फक्त शिष्य घडवण्याची कठोर साधना स्वेच्छेने स्वीकारणारा अन्नपूर्णादेवींसारखा एखादा गुरु आढळतो तेव्हा त्या दुर्दम्य निष्ठेला सलाम करायलाच हवा.
 
 
 
 
वयाच्या ९१ व्या वर्षी दि. १३ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांनी या इहलोकाचा निरोप घेतला आणि एक प्रकारे त्यांच्या शापित संगीताला पूर्णविराम मिळाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 
 
 
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com
 
 

प्रेरणा : वंदना अत्रे आणि आलिफ सुर्ती यांचे लेख. 

Leave a comment



अजित गोखले

3 days ago

किती विलक्षण आयुष्य.
निःस्पृह, निर्मोही, योगिनीच जणू.
रसिकांचे दुर्दैव पुरुषी अहंकाराच्या परिणामाने त्यांनी स्वतःला कोंडून घेतले... गांधारीचीही आठवण होते हे सर्व वाचताना... धन्यवाद मराठे साहेब

Rajendra Phadke

3 days ago

सुरेख , माहितीपूर्ण, भक्तिमय लेख !

Dilip Sule

2 days ago

फार उपयुक्त माहिती, पण फार वाईट वाटत. एक मत अस पण आहे की ती रविशंकर पेक्षा पण सुंदर वाजवायची आणि म्हणून तिचं वाजवण बंद करण्यात आले. खरं खोटं माहीत नाही.असो.
पण संगीत रसिक एका उच्च प्रतीचा कलाकाराला मुकली.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS