गेले काही वर्षे, खास करून महाराष्ट्रात, एक वाक्य सतत बिंबवले जाते की "ब्राह्मणांनीच 5000 हजार वर्ष आमच्यावर अन्याय केला".
नवीन संशोधनानुसार सिंधू संस्कृती इसवी पूर्व 1500 पर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर तेथेच वैदिक संस्कृती जन्माला आली. त्यामुळे मला नेहमी प्रश्न पडतो की, जर ते वाक्य पूर्णत: खरं असेल, तर आज सुद्धा फक्त दोन ते तीन टक्के जनसंख्या असलेल्या ब्राह्मणांचे पूर्वज सरसकट बाहुबली होते की काय?
आता लोकं म्हणतील की तू ब्राह्मण आहेस म्हणून त्यांचीच बाजू घेणार. परंतु माझा हेतू अगदी स्वच्छ आहे की हा चालू असलेल्या प्रचारामध्ये कितपत तथ्य आहे आणि हा आरोप सर्वोपांगी विचार करून केलेला आहे की फक्त मतांच्या राजकारणासाठी चाललेला तमाशा आहे हे पडताळून बघणे.
पुरातन काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र ही चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. आता त्यातल्या शूद्रांवर जो काही अन्याय, अत्याचार झाला तो काय फक्त ब्राह्मणांनीच केला का? तेव्हा बाकीच्या दोन वर्णाचे लोक शूद्रांना सहानुभूती देत होते का ? ते ब्राह्मणांनी केलेल्या अन्यायाचा तोंडाला काळे फडके बांधून निषेध करत होते का? की चळवळ उभारत होते??
आपण खरा इतिहास न समजून घेता जर असे मानले की, ब्राह्मण विदेशी आहेत कारण ते आर्य आहेत. पण हे खरं असेल तर मग क्षत्रिय, वैश्य पण विदेशीच झाले ना? कारण आर्यांच्या वर्ण व्यवस्थेत चार वर्ण होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अन् येथील मूळ रहिवासी किंवा कष्टकरी समाज म्हणजेच शूद्र. (अत्यंज म्हणजे अस्पृश्य.. याला पंचम वर्णही म्हणतात.. पुरातन काळात या वर्णात फक्त चांडाळांचा समावेश होता.) मग नेहमी फक्त "ब्राह्मण भगाओ देश बचाओ" हेच ऐकायला का येते? गंमत म्हणजे दक्षिण भारतीय कट्टर द्रविडी अस्मितावाले लोक महाराष्ट्रापासून वरील भागातील सर्वच लोकांना विदेशी मानतात; आता बोला!!
सामाजिक दुर्व्यवहारासाठी जितके ब्राह्यण दोषी आहेत तितकेच क्षत्रिय व वैश्य पण दोषी आहेत. क्षत्रियांच्या गुलाम मानसिकतेमुळे अथवा नाकर्तेपणामुळेच देशाला हजारो वर्षे गुलामगिरी सहन करावी लागली. बहुसंख्येने गावोगावी असणारे क्षत्रिय जमीनदार व वैश्य हे गोरगरिबांची पिळवणूक करत नव्हते असे मानायचं का? बोंब मारणारे या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करतात की त्यांना काहीच माहित नाही असे म्हणावे? आजही राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात याच स्वतःला उच्च कुळी म्हणून मिरवणार्या वर्गाच्या हातात सत्ता आहे. आजही गावपातळीवर हेच लोक दलित, आदिवासी, मागास आणि बहुजन समाजाला पिडतात. त्यांच्या सोबत दुजाभाव करतात.
खरे तर कालौघात जसजसा मनुष्य विकसित होत गेला, तसेतसे नवीन व्यवसाय निर्माण झाले; त्या प्रमाणे पोटजाती निर्माण झाल्या. असे गृहीत धरू की ब्राह्मणांनी त्या पोटजातींना शूद्र म्हणून हिणवले पण त्यांच्याबरोबर रोटीबेटीचे व्यवहार काय फक्त ब्राह्मणांनीच बंद केले? सत्तेत अथवा तिच्या जवळ आल्याने स्वतःला उच्च कुळी म्हणून कोण म्हणवून घेऊ लागले? पण आजही दलित-बहुजन, ओबीसी, कुणबी समाजाच्या लोकांच्या मनात जाहीर भाषणांतून, लेखांतून मुद्दाम हेच ठासवलं जातंय की, तुमच्यावर सगळा अन्याय हा फक्त ब्राह्मणांनीच केला. असं शक्य तरी होईल का?
एकदा नुसता तर्कशुद्ध (लॉजिकल) विचार करून पहा.
पूर्वी भारतात बहुसंख्येने ग्रामव्यवस्था होती. आता समजा गावात 100 घरे आहेत तर त्यातील एखादं-दुसरे ब्राह्मणाचे, 25 घरे स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्यांची, दलितांची 10-20 घरे आणि उरलेली असंघटीत बलुतेदार किंवा अठरा पगड जातीची असत. अशा परिस्थितीत मोठया समाजाचा किंवा सत्ताधारी वर्गाचा पाठिंबा असल्याशिवाय हे पोटार्थी भट लोक इतरांचे शोषण कसे करतील? अन् सत्तेत कोण होते हे सांगण्याची गरज नाही. जगात सगळीकडे आजतागायत बुध्दीनिष्ठ समाज इतरांच्यावर हुकूमत चालवतो. समजा आपल्या इथे ते काम ब्राह्मण करत आले पण क्षत्रिय किंवा राजसत्तेच्या जवळ राहण्यामुळे त्यांच्या साथीत व आशीर्वादानेच हे घडू शकते ना? थोडक्यात बळी तो कान पिळी!! आजच्या काळातील उदाहरण घ्या. ऍट्रॉसिटी, महिला संरक्षण कायद्याचा दुरूपयोग वाढत आहेच ना?
सम्राट अशोक व नंतरच्या कालखंडात बौध्द राजसत्तेमुळे हिंदू धर्माचे अस्तित्व धोक्यात आले होते; भारतवर्ष बुद्धमय झाले होते. कालांतराने सत्ताबदलामुळे पुन्हा हिंदू धर्माची भरभराट झाली. त्यामुळे एक गोष्ट मान्य करायला हवी की हिंदू (उच्च वर्णिय/क्षत्रिय) राजसत्तेच्या हातात ताकद होती पण तिने तिचा वापर जातपात भेदभाव मिटवण्यासाठी कधीच केला नाही. पण तो बौद्ध राजसत्तेनेही कधी केला नाही.
छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधानात सात ब्राह्मण होते. नंतरच्या काळात तर सर्व कारभारच ब्राह्मणांच्या हातात गेला ज्याला आपण पेशवाई म्हणतो. परंतु एक लक्षात घ्यायला हवे की ब्राह्मण तिथपर्यंत पोहचले ते स्वतःच्या कर्तबगारीने! आता हे वाचून कुणी असा निष्कर्ष काढेल का की छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या ऐवजी ब्राह्मणराज आणायचे होते? नाही ना?
भट व ब्राह्मण यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे.
सर्व भटजी हे ब्राह्मण असतात पण सर्व ब्राह्मण पौरोहित्य करत नाहीत. पौरोहित्य करणाऱ्यांचे प्रमाण आज अत्यल्प आहे. ज्या लोकांना वाटत असते की त्यांच्याकडून पूजापाठ, कर्मकांड करून घेतल्यानंतरच देवापर्यंत पूजा पोहचते किंवा सफल होते अश्या मानसिकतेची माणसं त्यांच्याकडे स्वतःहून जात असतात. आजही भटजींना येथेच्छ शिव्याशाप देणारे घरातील मुलांच्या जन्मापासून, लग्न, सणवार, मृत्युनंतरच्या क्रियाकर्मासाठी भटजीच्या घराचे उंबरठे झिजवत असतात.. किती हा मोठा विरोधाभास!!
आजमितीला भारतात पौरोहित्य करणार्या लोकांच्या संख्येचा विचार केला तर कर्नाटकात जंगम लोक पौरोहित्य करतात ते ST मध्ये आहेत. आंध्र प्रदेशात पंतुलू पौरोहित्य करतात ते NT मध्ये आहेत. म्हैसूर ते कन्याकुमारी भागात लिंगायत स्वतःला ब्राह्मण समजून पौरोहित्य करतात. खंडोबाला बारभाई आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठ ठिकाणी ब्राह्मण पौरोहित्य नाहीत. शिवाच्या मंदिरात गिरी अथवा गोसावी पौरोहित्य करतात. तुळजापूरला मराठे भोपे आहेत. अमरनाथ मंदिराचे पुजारी मुस्लिम आहेत. भारतातील जितकी नदीकाठची शिवमंदिरे आहेत तिथे महादेव, कोळी, बेडर लोक पौरोहित्य करतात. थोडक्यात भारतातील एकूण मंदिराच्या पौरोहित्याचे विचार केला तर फक्त 1% ब्राह्मण जातीचे पुरोहित आहेत. शाक्त, शैव, गाणपत्य अथवा लोकदेवता किंवा ग्रामदेवता यांचे किती पुजारी ब्राह्मण आहेत? आर्यसमाजात ब्राह्मण पुरोहित नसतात. आर्यसमाजाच्या जगभरातुन 7500 शाखा आहेत आणि तिथे 10% सुद्धा ब्राह्मण जातीचे पुरोहित नाहीत.
पौरोहित्य हे उदारनिर्वाहचे साधन असल्याने साहजिकच व्यवसायाशी निगडीत अवगुण त्याला पण चिकटले. यासाठी आपण आजच्या काळातील एक उदाहरण म्हणून पाहूया. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल सर्व समाज हळहळ व्यक्त करतो. पण हाच शेतकरी आरोग्याला घातक किटनाशकांचा वापर करतो, निकृष्ट माल येथे विकतो व किटक नाशकाचा वापर न केलेला माल परदेशी पाठवतो. कधी शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही तर तो गोरगरीब लोकांना, अनाथाश्रम वगैरे इथे न देता त्याची रस्त्यावर त्याची नासधूस करतो. बाजारात एखाद्या शेतीमालाचे भाव गगनाला भिडलेले असताना व्यापारी कधीही गावातील भूमिहीनाला / गरिबाला आपला माल किंमतीत विकतो का? प्रत्येक गोष्टीसारखा ह्याला पण अपवाद असणारच! इथं सरसकट शेतकरी वर्गाला नाव ठेवायचं नाहीये तर त्यातील काहींची फक्त प्रवृत्ती दाखवायची आहे. कारण, जसे पूर्वी सर्व ब्राह्मण गरीब म्हणायची पध्दत होती तशी आता तसे सर्व शेतकरी गरीब म्हणायची पध्दत रूढ होत आहे म्हणून.
अजून एका बाबतीत भारी बढाया मारल्या जातात की मराठा किंवा क्षत्रिय राजांच्या सैन्यात महार, दलित सैनिक होते. याचा अर्थ राजे लोक सेक्युलर झाले का? सेक्युलर होते तर कुठल्या राजाने स्वतःची मुलगी (राजकन्या) कुठल्या बहुजन समाजातील मुलाला लग्न करून दिल्याची घटना ऐकिवात आहे का? कुठल्या राजपुत्राने एखाद्या बहुजन समाजातील कन्येशी विवाह केल्याचं कोणी वाचलंय? त्यामुळे मग त्यांनी कुणबी, बलुतेदार, अठरापगड, दलितांशी लग्न लावून का दिली नाहीत हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
सवर्णांबरोबरच बहुजन सैन्य तर बाजीराव पेशव्यांच्या सैन्यातही होतं. किंवा तेच जास्त होते. तर मग त्याला मात्र भट, ब्राह्मणशाही वगैरे कसे संबोधणे संयुक्तिक आहे का? आणि हो, ते सुद्धा राज्यकर्ते भोसले असताना? काही स्वयंभू आणि नव इतिहासकारांनी शोध लावून असाही इतिहास मांडायचा प्रयत्न केला आहे की पेशवाईत अटकेपार झेंडे ब्राह्मणांनी नाही तर मराठ्यांनीच लावले.. परंतु पानिपत किंवा कोरेगाव या लढायांचा उल्लेख आला की मग मात्र ब्राह्मण पेशवे कसे हरले हे सांगताना ते कुचराई करत नाहीत.
तेव्हाचं जाऊ द्या. काही काळ इतिहास जरा बाजूला ठेवूया.
केवळ ब्राह्मणांना जातीयवादी ठरवणाऱ्या आजच्या बहुसंख्य 'मराठा-बहुजन भाई भाई' वाल्या संघटनांनी आजपर्यंत 96 कुळी आणि 92 कुळी अथवा 96 कुळी आणि कुणबी असा विवाह मेळावा भरविल्याचे ऐकले आहे? हा झाला स्वत:ला इतर मराठा समाजापेक्षा उच्च समजणाऱ्यांमधील भेदभाव त्यामुळे बाकीचे बलुतेदार, अठरापगड मराठा समाज तर सुधारणेच्या बाबतीत खूप लांबच राहिला, नाही का? बहुतेक जातींमध्ये उपजाती आहेत तेथे हेच लोक जातीवाद, अस्पृश्यता पाळतात. आपापसात लग्न करत नाहीत. उपजाती समाप्त करण्याचा प्रयत्न करणे लांबच राहिले. अश्याच प्रकारे अनेक OBC, ST, SC वगैरे प्रवर्गातील लोक जाती-जाती भेद विसरुन एकाच प्रवर्गातील म्हणून लग्न करत नाहीत. या सर्व जाती-जमातींना देव, महात्मा मात्र स्वजातीयच लागतो.
१) माळी समाजात जवळपास 48 उपजाती आहेत अन् त्याचे ते कट्टरतेने पालन करतात. उपजाती आपापसांत लग्न करत नाहीत.
२) महार मांगासोबत, चांभार कुंभारासोबत वगैरे लग्न होत नाहीत.
ऑनर किलिंगच्या घटना एकदा तपासून पहा; म्हणजे तुम्हाला कळेल खरे जातीयवादी कोण आहेत ते?
ब्राह्मण मुली मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह करतात. अनेक आंबेडकरवादी चळवळीतील तरुणांनी ब्राह्मण मुलींशी लग्न केलेले आहेत. तसेच OBC आणि आता तर आदिवासी समाजातील काही तरुणांनीही ब्राह्मण मुलींशी लग्न केल्याचे दिसुन येते. ब्राह्मण मुलींच्या या धैर्याला नक्कीच दाद दिली पाहिजे. तसेच ब्राह्मण पालक कधीही बहुजन समाजातील तरुणांशी विवाह केला म्हणुन खोट्या प्रतिष्ठेपायी (Honor Killing) मुलींची हत्या करत नाही. यासाठी ब्राह्मण समाजाचे कौतुक करायला हवे.
ब्राह्मणांवरील सर्व मोठा आरोप म्हणजे ब्राह्मणांनी जाती व्यवस्था निर्माण केली.
सर्व पोटजातींना कलाकारी शिकवून म्हणजे चांभाराला चांभारकाम शिकवून त्यांना तेच काम पिढ्यांपिढ्या करायला भाग पाडले? ब्राह्मणांना कसे काय हे शक्य होऊ शकते? आता ब्राह्मणानं सांगितलं आणि बाकीच्यांनी आज्ञाधारकासारखे मान्य केलं हे शक्य आहे का? आज हे प्रतिपादन करणारा त्याच्या राजकीय लबाडीपोटी करतो आहे पण त्याचं ऐकून अनुसरण करणारे एक तर बालिश असावेत नाहीतर वैचारिक दिवाळखोर असावेत. मान्य करू की पूर्वी काहीही कळत नव्हतं पण आजही कळत नाही का? सुरूवातीला चार वर्णाचे लोक एकाच घरात असत. कालांतराने बापाचाच व्यवसाय मुलाने स्वीकारले म्हणून पोटजातीत विभाजन होत गेले.. पूर्वीची अलुते- बलुतेदारीवर आधारीत ग्राम व्यवस्था, एखाद्याने आपला व्यवसाय बदलण्याचे ठरविले तरीही त्यासाठी अनकूल नव्हती. आजही हा प्रकार होताना दिसतो. नेत्याचा मुलगा नेता, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापार्याचा मुलगा व्यापारी वगैरे वगैरे. बहुसंख्येने व्यापारी असलेल्या गुजराथी, मारवाडींच्या लोकांकडे तर पिढ्यानपिढ्या एकच व्यवसाय चालू असतो.
जैन आणि बौद्ध धर्माच्या भरभराटीच्या काळात असंख्य ब्राह्मण धर्मांतरित होऊन तिकडे गेले. यामुळे या दोन्ही धर्माच्या उत्थानात व साहित्य निर्मितीत ब्राह्मणांचा सिहांचा वाटा आहे. निराकार देव मानणारी वैदिक यज्ञसंस्था लयाला गेल्यावर भाकड पुराणकथा रचून त्यांनी साकार देवतांची पुरोणक्त पध्दतीने पूजापाठ / कर्मकांड करणे चालू करून स्वत:च्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवला ही गोष्ट तितकीच खरी आहे पण ती जिवंत राहण्याच्या गरजेतून निर्माण झाली हे विसरून चालणार नाही. मुस्लिम किंवा इंग्रज शासक इथले राज्यकर्ते झाल्यानंतर क्षत्रियांबरोबरच ब्राह्मण त्यांच्या सेवेत गेले. अनेकजण धर्मांतरितही झाले व स्वतःचा कार्यभाग साधून घेतला. राजाश्रयाने जगण्याचे दिवस संपताच अनेकांनी वैदिक पध्दतीचे शिक्षण घेऊन पौरोहित्य करण्याऐवजी कालानुरूप व्यावहारिक शिक्षण घेऊन पुन्हा आपले बस्थान बसवले. ब्राह्मणांच्या ह्या काळवेळ, परिस्थितीनुरूप लवचिक भूमिका घेण्याच्या या गुणांमुळेच हा समाज टिकून राहिला. परंतु अनेक धर्मात विघटित होत गेल्याने त्यांची संख्याबळात वाढ झाली नाही. पण तरीही सामाजिकदृष्ट्या उच्च श्रेणीत तो कायम राहिलेला दिसून येतो. यातून बाकीच्या जाती-जमातींनी बोध घ्यायला हवा. उगीच त्यांच्या नावाने फालतू बरळण्याऐवजी उर्वरीत समाजाने स्वतःला सुशिक्षित, सक्षम करून स्वकर्तृत्वाने मोठे व्हावे. भूतकाळातील रुदन आता सोडून द्यावे आणि वर्तमान घडविण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रत्येक समाजात अवगुणी व गुणी लोक असतातच हे विसरु नये. खालील ही काही कर्तबगार ब्राह्मण व्यक्तींची नावे मोजून पहा आणि स्वतःच्या जातीतील राष्टीय स्तरावरील समाजसुधारक / कर्तृत्वान लोकांची यादी निदान इतकी तरी होते का ते पाहावे. तेव्हाच प्रत्येकाला या समाजाची दुसरी गौरवपूर्ण बाजू उमजेल.
छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधानांमधील सात जण, बाजीराव पेशवे, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, विनायक सावरकर, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, झांशीची राणी, संत ज्ञानेश्वर, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवे, चिमाजीआप्पा पेशवे, सदाशिवराव पेशवे, विश्वासराव पेशवे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नाना फडणवीस, सरदार पटवर्धन, सरदार पुरंदरे, सरदार मेहेंदळे, सरदार नातू, सरदार खासगीवाले, वासुदेव बळवंत फडके, न्यायमूर्ती रानडे, अण्णासाहेब पटवर्धन, गोपाळराव आगरकर, शिवराम राजगुरू, अनंत कान्हेरे, नामदार गोखले, सेनापती बापट, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, रॅगलर परांजपे, बाबा आमटे, साने गुरुजी, एस. एम जोशी, दादासाहेब फाळके, आचार्य अत्रे, बाबासाहेब पुरंदरे, गो.नि. दांडेकर, नानासाहेब गोरे, नरेंद्र दाभोलकर, रामदास स्वामी, र.धों. कर्वे, न.चिं. केळकर, कालेलकर, आचार्य धर्माधिकारी, रॅंग्लर नारळीकर, लोकहितवादी, अहिताग्नि राजवाडे, पा.वा.काणे, सरदार तुळशीबागवाले, स्वामी रामानंद तीर्थ, डॉ. मुंजे, मृणाल गोरे, अहिल्याताई रांगणेकर, अनुताई वाघ, दुर्गाबाई भागवत, मेघाताई पाटकर, डॉ प्रकाश आमटे, इतिहासाचार्य राजवाडे, ज्ञानकोशकार केतकर वगैरे काही वानगीदाखल नावे .
पण सर्वसामान्य माणसाला मात्र मुद्दाम दोनच नाव वारंवार ऐकवली आणि सांगितली जातात. एक तो कृष्णाजी कुलकर्णी व दुसरा नथुराम गोडसे; असे का? कोणत्या समाजात दुर्गुणी माणसं नसतात? धर्मांध आतंकवाद्यांना धर्म नसतो असे छातीठोक प्रतिपादन करणारे गोडसेची जात मात्र मुद्दाम उकरून काढतात. अश्या गोष्टींना काही अंशी ब्राह्यण पण तितकेच जबाबदार आहेत. त्यांना धर्मनिरपेक्ष महापराक्रमी बाजीराव पेशवेपेक्षा गोडसे आपला वाटतो; कारण काय तर ती मस्तानी. आणि दुसरे त्यांचे आवडते पौराणिक पात्र म्हणजे परशुराम..
त्यांनी म्हणे एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती. एकदा निक्षत्रिय केलेली पृथ्वी परशुरामाने २१ वेळा निक्षत्रिय केली कशी? तसे असते तर आज एकही क्षत्रिय राहिला नसता. जर परशुरामाने एकट्याने सर्व क्षत्रिय राजांना, त्यांच्याकडे प्रचंड सैन्यशक्ती असताना देखील हरवले हे जर शक्य असेल तर मग एका महाराने पाचशे ब्राह्मणांना हरवले ही अतिशयोक्ती अथवा भाकडकथा का समजायची? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्राह्मण समाजातील लोकांनी आता सार्वजनिक ठिकाणी हिंदू धर्माचे ठेकेदार असल्यासारखे आचरण करणे बंद केले पाहिजे कारण त्यातून फक्त विद्वेषाला खतपाणी मिळते.
बांडगुळं सर्वच जाती, धर्मात कमी-जास्त प्रमाणात असतातच. इतिहासामुळे वर्तमान अथवा भविष्यकाल बिघडवायचा नसतो; तर त्यातून बोध घ्यायचा असतो. इतिहासातील अन्यायाला खरोखर कोणाला जबाबदार मानायचे असेल तर त्या मानवी प्रवृतीला माना, जी स्वत:कडे सत्ता, समृध्दी आली की, इतरांना पिडण्यात आनंद शोधते. इतिहास नीट समजून न घेता ब्राह्मणांना सरसकट शिव्या देण्यात धन्यता मानणे चूक आहे. तसेही ब्राह्मण नावाचा वर्ण, जो वेदात वर्णन केलेला होता तो आज अस्तित्वात नाही. आजमितीला अस्तित्वात आहे ती ब्राह्मण जात आहे आणि त्यातील अत्यल्प पूजापाठ करणारा पुरोहित वर्ग. यातील काही जण स्वतःला वैदिक ब्राह्मण म्हणवून घेतात परंतु पूजापाठ मात्र अवैदिक म्हणजेच पोराणिक देवतांचा करतात. हा "घर का ना घाट का" प्रकार झाला. काही दिवसांपूर्वी उत्तर भारतीय ब्राह्मण महासंघाने तर आरक्षण मिळावे म्हणून स्वतःला ते हिंदू धर्मीय नसून कालौघात नष्ट झालेल्या वैदिक धर्माचे (निराकार देवता व पशूबळी देत यज्ञयाग करणारे) आहोत, असे जाहीर केले होते. मग त्यावेळी कोणत्याही एकाही ब्राह्मण व्यक्तींने त्यांचा निषेध केल्याचे निदर्शनास आले नाही.
नीट विचार केला तर असे लक्षात येईल की भारत देश फक्त म्हणायला हिंदू बहुसंख्यांक आहे. पण वास्तविक पाहता त्यात खरे हिंदू अल्प आहेत. आणि कट्टरवादी, नास्तिक, जाती / प्रांतवादी तथाकथित हिंदू जास्त आहे. सध्याच्या काळात भारतात खर्या जो अर्थाने अल्पसंख्य आहे, तो धर्म म्हणजे हिंदूधर्म!!
आज हिंदू धर्म जातीपातीच्या तकलादू अस्मितेमुळे शेवटची घटिका मोजत आहे त्यामुळे कोणी यावे आणि टपली मारून जावे या उक्तीनुसार कोणीही इतर धर्मीय तसेच काही तथाकथित हिंदू पुरोगामी बांडगुळे हिंदू देवी, देवतांची विटंबना टिंगळटवाळी करण्यास धजवतात. आता तरी आपण हिंदू म्हणून एकजूट होऊन झाले गेलं त्याला मूठमाती द्यावी. नाहीतर शेकडो वर्षे गुलामगिरीत राहून आपण काहीच शिकलो नाही असेच खेदानं म्हणावे लागेल. इंग्रज भारत सोडून जाईपर्यंत अवघे 90000 होते आणि तरीही त्यांनी 150 वर्षे आपल्याला गुलामगिरीत ठेवले याबद्दल सर्वांनीच आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ निघून जात चाललीये हे ध्यानात ठेवावे.
आपला गौरवशाली इतिहास सांगतानाच आमचे पूर्वज किती असाह्य, नाकर्ते होते हे आपण अनावधानाने सांगतो आहोत हेच कोणाच्या लक्षात येत नाही हीच खेदाची गोष्ट आहे.
पटले तर बघा नाहीतर जुन्या रडकथा उगाळत बसा!!
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
yeshwant.marathe@gmail.com