मेजर जनरल ए.एस. नरवणे (भूतपूर्व लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचे काका) त्यांच्या “ए सोल्जर्स लाइफ इन वॉर अँड पीस” ह्या आत्मकथनात, पीजी 63 कॅम्पमधील त्यांचे अनुभव कथन करताना सांगतात की कुमारमंगलम (त्याचे कुटुंबिय आणि मित्र त्याला ‘के’ म्हणत) या सर्वात वरिष्ठ भारतीय अधिकार्याची, कॅम्प सिनियर ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली होती आणि त्यांचे कॅम्प अॅडज्युटंट याह्या खान होते. टिक्का खान कॅम्प क्वार्टरमास्टर होते. पीजी 63 मध्ये भारतीय वैद्यकीय सेवेतील अनेक तरुण डॉक्टर होते. त्यापैकी एक होते कलकत्त्याचे डॉ. सत्येन बसू, ज्यांनी 1960 मध्ये त्यांच्या युद्धकाळातील अनुभवांवर आधारित, “ए डॉक्टर इन आर्मी ” ह्या शीर्षकाअंतर्गत काही लेख लिहिले होते जे प्रकाशित नाही झाले. PG 63 मधील वास्तव्यादरम्यान, लेफ्टनंट 'Y' शी त्यांची मैत्री झाली आणि लेफ्टनंट 'Y' बद्दलचे त्यांचे मत (आणि ते साहबजादा याकूबच्या संदर्भात बोलत आहे ह्याचा काहीसा अंदाज लावावा लागतो) असे होते: “ले. 'Y' हा मला भेटलेल्या सर्वात हुशार तरुण मुलांपैकी एक होता. त्याचा जन्म भारतातील एका शाही कुटुंबात झालेला असून प्रारंभिक शिक्षण R.I.M.C. राष्ट्रीय लष्करी महाविद्यालयात झाले होते. त्यामुळे त्याची लष्करात कारकीर्द होणे हे सुनिश्चित होते. तो ज्या घोडदळ रेजिमेंटमध्ये कार्यरत होता त्यात त्याने स्वत:ला एक सक्षम अधिकारी म्हणून सिद्ध केले होते. पण त्याच्या प्रतिभेला हे पूरक क्षेत्र नव्हतं असं मला खात्रीपूर्वक वाटे. 22 व्या वर्षी तो उत्तम पोर्ट्रेट काढत असे. संगीत आणि नृत्याचा तो दर्दी होता. दोन महिन्यांत त्याने फ्रेंच भाषेचे ज्ञान वाढवले होते व तो आता अस्खलितपणे बोलत होता आणि जर्मन भाषेतही त्याने प्रभुत्व मिळवले होते. ज्ञान प्राप्ती हा जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे ह्या अॅरिस्टॉटलच्या विधानाशी तो सहमत होता असे दिसते, कारण बहुतांश वेळ तो त्याच्या खोलीत काहीतरी पुस्तक किंवा इतर वाचण्यात घालवत असे. आणि तरीही त्याची विनोदबुद्धी तीव्र होती. त्यांच्या पूर्वीच्या छावणीतील एका प्राध्यापकाने दिलेल्या मानसशास्त्रावरील व्याख्यानांचा एकत्र अभ्यास करताना माझी त्यांच्याशी मैत्री झाली. पण तो त्याचा प्रेमळ स्वभाव होता ज्यामुळे मी त्याचा मित्र बनलो. जेव्हा मी या घोडदळातील अधिकारी, लेफ्टनंट 'Y' बरोबर मनमोकळ्या गुजगोष्टी करीत असे, त्यावेळेस त्याला कसे काय वाटते ते विचारले असता, या तुरुंगातील काही क्षण हे त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी असल्याचे त्याने मला संगितले. यापूर्वी, इतका चिंतामुक्त तो कधीही जगला नाही आणि पुस्तकांच्या माध्यमातून आत्मशोध घेता आला असे त्याने व्यक्त केले. इतर पुस्तकांव्यतिरिक्त, साहबजादा यांनी जर्मन भाषेतील फॉस्ट आणि टॉल्स्टॉयचे ‘युद्ध आणि शांती’ हे रशियन भाषेतील पुस्तक, समजण्यास सोपे जावे म्हणून जवळ इंग्रजी अनुवाद ठेवून वाचून काढले .
18 व्या घोडदळाचे आणखी एक अधिकारी ज्याला साहबजादा याकूबसह पकडण्यात आले, ते होते लेफ्टनंट अभय सिंग. कोटा संस्थानातील मंत्री KCIE, मेजर जनरल सर ओंकार सिंग यांचे ते धाकटे चिरंजीव, सुरुवातीला त्यांना अवेर्सा येथील PG 71 मध्ये ठेवण्यात आले होते, परंतु मे 1943 मध्ये, रोमच्या पूर्वेला 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या Avezzano (अवेझानो) मधील PG 91 ह्या तळावर हलवण्यात आले. अखेरीस ते इटलीच्या ईशान्य किनार्यावरील रिमिनीजवळील छावणीत इतरांसोबत सामील झाले. सप्टेंबर 1943 मध्ये इटलीने शरणागती पत्करल्यावर उडालेल्या गोंधळात, इतर शेकडो जणांप्रमाणे, एफेंडी, याह्या, अभय, ‘के’ आणि याकूब यांनी सुटका करून घेतली. जर्मन सैनिकांची गस्त टाळत, जंगलात लपत छपत ते किनारपट्टी आणि अल्पाईन पर्वतराजींच्या उतारा दरम्यांनच्या भागात गेले. साहबजादाला इटालियन भाषा अवगत असल्याने, त्यांना काही सहृदय शेतकऱ्यांकडे आश्रय मिळू शकला. मध्येच एकदा याह्या आणि एफेंडी इतरांपासून वेगळे झाले आणि सुमारे 400 किलोमीटर अंतर पायदळी तुडवल्यावर पुढे गेल्यावर, आगेकूच करणार्या भारतीय बटालियनशी त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी याह्या यांच्या फक्त एका पायात बूट शिल्लक होता. हिसाम अखेरीस त्याच्या रेजिमेंटमध्ये सामील झाला, जी भारतात परत पाठवली होती आणि तेथून मग बर्मामध्ये लढाईवर गेला. याह्या दिल्ली येथे लष्कर मुख्यालयात तैनात झाला.
इतर तिघांना एका परोपकारी इटालियन शेतकरी कुटुंबाने काही महिन्यांसाठी आश्रय दिला होता. त्यांच्यावर कोणी पाळत ठेवून आहे हे कळून येईपर्यंत त्यांना ठेवून घेतले होते आणि येऊ घातलेल्या संकटाचा इशाराही पाहुण्यांना दिला. ते निसटून जाण्यापूर्वी, घरातील महिलेने तिचा सोन्याचा हार काढला आणि शुभेच्छा म्हणून त्यांना भेट दिला. काही दिवसांनंतर, एका अंधाऱ्या रात्री ‘के’ घसरून पडला आणि त्याच्या पायाचा घोटा फ्रॅक्चर झाला. त्याने साहबजादा आणि अभय सिंग यांना, त्याला तिथेच सोडून पुढे जाण्याची विनंती केली, मात्र ते त्यांच्या मित्राला सोडण्यास तयार नव्हते - आणि जानेवारी 1944 मध्ये जर्मनांनी त्यांना पुन्हा ताब्यात घेतले. त्या सर्वांना जर्मनीतील PoW छावणीत स्थानांतरित करण्यात आले आणि ‘K’ ला लुफ्टवाफे (जर्मन वायुसेना) द्वारे चालविल्या जाणार्या, बर्लिनच्या आग्नेय दिशेला 160 किलोमीटर अंतरावर असणार्या स्टॅलाग लुफ्ट III मध्ये ठेवण्यात आले. द वुडन हॉर्स (1950) आणि द ग्रेट एस्केप (1963) या चित्रपटांमध्ये, दोन जगप्रसिद्ध पलायनांचे चित्रिकरण झालेले ठिकाण म्हणून ही छावणी प्रसिद्ध आहे. (द ग्रेट एस्केप मध्ये प्रसिद्ध अभिनेते स्टीव्ह मॅक्वीन ह्यांची भूमिका होती.) तीन वर्षे बंदिवासात राहिल्यानंतर युद्ध संपल्यावर हे तीन अधिकारी भारतात परतले.
या कथेला पुढे दोन मजेदार कथांची जोड आहे.
याचे मुख्य कारण की हा अशा काळाचा चित्रदर्शी वृत्तांत आहे जेव्हा भारतीय आणि पाकिस्तानी, हिंदू आणि मुस्लिम, पठाण आणि तमिळ ह्यांच्यात केवळ मैत्री नव्हती तर अतूट ऐक्य होते. हाकाळ असा होता जेव्हा आपण एक होतो, एकच सैन्य म्हणून लढलो होतो आणि सर्वात जवळचे मित्र होतो. दुर्दैवाने, ते जग कायमचे हरवले, दूर गेले.फाळणीने आपल्याला दुभंगले, त्यात राजकारणी सतत अंगार फुलवीत आग पेटती ठेवत आहेत. नवीन पिढ्या मोठया झाल्या पण त्या केवळ एकमेकांना दुर्लक्षून नव्हे तर एकमेकांचा तिरस्कार आणि द्वेष करीत.