पाश्चिमात्य देशात अनेक 'डे' celebrate केले जातात ज्यात फादर्स डे पण साजरा केला जातो. आपल्या देशात पूर्वी ही संस्कृती नव्हती; या सर्व गोष्टींना एक प्रकारे थेरं मानली जातात. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे वडिलांबद्दलच्या भावना सहसा व्यक्तच केल्या जात नाहीत. म्हणून कधी कधी असं वाटतं की निदान हे डे साजरे करण्याच्या निमित्ताने का होईना पण भावना अव्यक्त राहत नाहीत.
माझे बाबा म्हणजे, सुरेश सखाराम मराठे, माझ्यासाठी काय आणि कोण होते हे शब्दात सांगणे खूप अवघड आहे. माझे त्यांच्याशी नाते हे बाप-मुलापेक्षा मित्रत्वाचे जास्त होते.
बाबांचा जन्म १० सप्टेंबर १९३८ साली धुळ्याला झाला पण नंतर लगेचच २-३ वर्षात ते कराचीला गेले असावेत. पुढे त्यांची मुंज पण कराचीतील ब्राह्मण सभेत झाली. फाळणीच्या वेळी अप्पासाहेबांनी (माझे आजोबा) सर्व कुटुंबाला मुंबईला पाठवले तेव्हापासून ते मुंबईकर झाले. सुरुवातीची ३-४ वर्षे गोरेगाव आणि मग १९५२ साली सिटीझन मध्ये. माहीमला आल्यावर बालमोहन शाळेत मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झाले. माझ्या माहितीनुसार त्यांची बॅच ही बालमोहनची पहिली मॅट्रिक बॅच. नंतर पोदार कॉलेजला इंटर पर्यंत शिक्षण. फारुख इंजिनियर त्यांच्या वर्गात होता त्यावेळी. तो कसा लेडी किलर होता आणि त्याच्यामागे मुलींची कशी रांग लागायची हे बाबांच्या तोंडून ऐकण्यात मजा यायची.
परंतु अप्पासाहेबांचा व्यवसाय वाढत होता आणि त्यामानाने विश्वासातील माणसे कमी म्हणून त्यांनी बाबांना वयाच्या १९व्या वर्षी शिक्षण सोडून व्यवसायात यायला सांगितलं. बाबांनीही आपल्या वडिलांचे कराचीहून आल्यानंतरचे परिश्रम बघितले असणारच त्यामुळे एक चकार शब्द न काढता कॉलेज सोडून दिले आणि सिद्धिविनायक मंदिराबाहेरील दुकान कम गळ्यात बसायला सुरुवात केली. माझी आजी कायम आजारी असल्यामुळे बाबांचे लग्न १९५९ साली वयाच्या २१व्या वर्षीच झाले; आणि माझी आई १८ वर्षाची (आताच्या पिढीला वाचूनच फेफरं येईल).
त्या दोघांच्या चाळीस वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात माझ्या आठवणीत तरी एकही भांडण झाले नाही. Absolutely great tuning. पण गंमत म्हणजे लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांना असं लक्षात आलं की जी आईची पत्रिका होती ती संपूर्णपणे चुकीची होती म्हणून त्यांनी सहजच नवीन पत्रिका बनवून ज्योतिष्याला दाखवली तेव्हा त्याचे म्हणणे पडले की तुमचे तुमच्या बायकोशी पटणे शक्यच नाही कारण खडाष्टक योग आहे. आमच्या सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली. तेव्हा मनात आलं की लग्न ठरवताना जर so called योग्य पत्रिका असती तर त्या दोघांचे लग्न झालेच नसते. पण विधात्याची इच्छा हे लग्न व्हावं अशीच होती, तेव्हा दुसरं काय होणार?
१९६९ साली वयाच्या अवघ्या ५८ व्या वर्षी अप्पासाहेबांचे निधन झाले तेव्हा बाबांचे वय फक्त ३१ होते. नुकताच उभा केलेला मराठे उद्योग भवनाचा डोलारा, त्यावर असलेलं कर्ज, तसेच प्रिमियर आणि टेल्को या कंपन्यांकडून होणारे पेमेंट प्रॉब्लेम आणि काय काय असेल माहित नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अप्पासाहेबांची personality एवढी towering होती की बाबा त्यांचा वारसा चालवू शकतील याचीच बऱ्याच लोकांना खात्री नव्हती. परंतु त्या सगळ्या naysayers च्या नाकावर टिच्चून त्यांनी तो वारसा नुसता सांभाळलाच नाही तर यशस्वीपणे पुढे चालवला आणि वाढविला. १९७१ साली त्यांनी ऑफसेट प्रिंटिंग मशिन्स उत्पादन करण्याच्या व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि १९७४ साली प्रिमियर आणि टेल्कोचे काम पूर्ण बंद करण्याचा एक प्रकारे धाडसी निर्णय घेतला. तेव्हांपासून स्विफ्ट समूहाने जी मुहूर्तमेढ रोवली त्याचा पुढे वटवृक्ष झाला. देशभर आणि परदेशात जवळजवळ १५००० पेक्षा जास्त मशिन्स कार्यरत होती. भारतात मुद्रण व्यवसायात कोणाला स्विफ्ट माहित नाही असे झाले नसेल. त्यांच्याच कालखंडात स्विफ्टची खूप मोठी फॅक्टरी नाशिक मध्ये उभी राहिली आणि तसेच उत्पादनाकरिता दोन foreign collaborations सुद्धा झाली. राजाभाऊ केळकर यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आणि आर्थिक डोलारा सांभाळण्याची जबाबदारी मात्र बाबांच्या खांद्यावर होती.
बाबा मनाने अतिशय संवेदनशील होते आणि कुठल्याही माणसाच्या कामाचा आपण आदर केला पाहिजे ही त्यांची कायमची शिकवण होती. माझ्या लहानपणी आमच्याकडे प्रभाकर शिरोडकर नावाचा ड्रायव्हर होता आणि त्याकाळी त्याला ड्रायव्हर याच नावाने संबोधले जायचे. मला बाबांनी सांगितले की त्याला त्याच्या नुसत्या नावानेच हाक मारायची नाही तर त्याला काका पण म्हणायचं. मी मोठा झाल्यावर प्रभाकरलाच अवघडल्यासारखं झालं आणि त्यानेच मला काका या शब्दाला काट मारायला भाग पाडलं. तसेच मी एकदा ऑफिस मधील प्यून वर चिडलो आणि त्याला म्हटलं की अरे तुला एवढी सुद्धा अक्कल कशी नाही? बाबा मला शांतपणे म्हणाले की त्याला जर अक्कल असती तर तो हे काम करायला इथे आलाच नसता.
माझे आणि वसंतचे त्यांच्याशी वडील मुलापेक्षा मित्रत्वाचे संबंध अधिक होते आणि आम्ही त्यांच्याशी वाटेल ते बोलायचो. एक गंमत आठवली, माझ्या लग्नाच्या १-२ वर्षे आधी असेल, आम्ही दोघे गाडीने ऑफिसला जात होतो, गाडी मी चालवत होतो. आता केटरिंग कॉलेजच्या बस स्टॉपवर साधारणपणे चांगल्या मुली दिसायच्या. मी तिथे बघत असताना माझ्या लक्षात आलं की बाबा ही तिथेच बघतायेत. मी हसत त्यांना म्हटलं, अहो तुम्ही काय बघताय? तर मोठ्याने हसून मला म्हणाले की होणाऱ्या सुनेच्या नजरेतून बघतोय.
बाबा अनेक संस्थांशी संलग्न होते; व्यावसायिक संस्थांमध्ये महाराष्ट्र चेंबर, Printing Manufacturing Association आणि सामाजिक संस्थांमध्ये ब्राह्मण सेवा मंडळ, श्रवण साधना, मराठे प्रतिष्ठान. या बऱ्याच संस्थांमध्ये ते पदाधिकारीच नाही तर अध्यक्ष देखील होते. ब्राह्मण सेवा मंडळाच्या वृद्धाश्रमाची कल्पना त्यांचीच होती. त्यांचे सामाजिक भान वाखाणण्याजोगे होते. त्यांनी किती लोकांना काय काय मदत केली हे मला सुद्धा पूर्णपणे ठाऊक नाही. असं म्हणतात की उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला पण कळू देऊ नये आणि ते अगदी तसेच जगले.
बाबा म्हणजे एकदम शांत व्यक्तिमत्व; मी तरी त्यांना कधीही खूप चिडलेले किंवा रागावलेले बघितल्याचे आठवत नाही, आणि स्वभाव अत्यंत मनमिळावू. त्यामुळे त्यांचा मित्र परिवार सुद्धा प्रचंड मोठा; सगळ्या स्तरात त्यांचे मित्र. ते खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते.
एवढ्या सगळी व्यवधाने सांभाळून सुद्धा त्यांचे घराकडे कधीही दुर्लक्ष झाले नाही. माझी बहीण स्मिता त्यांची खास लाडकी होती आणि तिला ते तिच्या लग्नानंतर जवळजवळ रोज फोन करायचे. लहानपणी सुद्धा त्यांनी तिचे खूप लाड केले. रात्री कितीही वाजले असले तरी स्मिताने पेस्ट्री मागितली तर आणायला बाहेर पडायचे. नातवांपैकी अमेय आणि प्रणव मुंबईत असल्याने त्यांच्याशी सगळ्यात जास्त संबंध आला आणि त्यांचे खऱ्या अर्थाने लाड पुरवले गेले. प्रणवला घेऊन Lands End ला जायचं, भेळ किंवा समोसे खायचे हा त्यांचा लाडका छंद.
He also had a great sense of humour. त्याचे एक उदाहरण: अदितीला एकदा बाबांनी विचारलं की अगं, माझ्या गळ्याकडची कातडी जरा जास्त लोंबते आहे का बघ. तिला काहीच कळेना हे आता काय? तर त्याची कहाणी अशी की प्रणवला घेऊन गेल्यानंतर हा कमीत कमी २ समोसे तरी खायचाच पण बाबांच्या गळ्याची कातडी ओढून सांगायचा की आबा, तुम्हाला शपथ आहे पण आईला एकच खाल्ला म्हणून सांगा. आम्हाला हसत हसत म्हणाले तुमच्या मुलाने ओढूनओढून माझी कातडी लोंबायला लागलीय असं वाटतंय.
त्यांच्या मनात खूप होतं की मराठे उद्योग भवनच्या वास्तूत एखाद्या कार कंपनीची डिलरशिप घेऊन स्वतःची कार शोरूम असावी पण ते काही शक्य झाले नाही. परंतु त्यांच्या पश्चात भाड्याने का होईना पण उद्योग भवनच्या वास्तूत कार शोरूम झाली तेव्हा असं वाटलं की त्यांना कुठेतरी बरं वाटलं असेल.
एप्रिल १९९९ मध्ये त्यांना Cancer detect झाला. त्याच्यानंतर ८ महिने ट्रीटमेंट घेऊन ते पूर्ण बरे झाले. २६ डिसेंबरला त्यांच्या लग्नाला ४० वर्षे झाली पण आम्ही संपूर्ण कुटुंब हॉटेल लीला मध्ये जेवायला गेलो होतो. त्यांना तिथलं atmosphere आणि जेवण इतकं आवडलं की मला म्हणाले की पुढच्या प्रत्येक २६ डिसेंबरला इथेच यायचं. मी म्हटलं, जरूर, का नाही. पण आपल्याला भविष्यात काय वाढून ठेवलंय हे कुठे माहित असतं?
Chemo Therapy मुळे त्यांची immunity कमी झाली होती आणि त्यात त्यांना दुर्दैवाने Hepatitis B ची लागण झाली आणि त्याचा जोर खूपच जास्त होता. आणि त्यानेच त्यांचा बळी घेतला. ५ फेब्रुवारीला सकाळी ९.३५ ला माझ्या आणि आईसमोर त्यांनी डोळे मिटले. आजही आठवले तरी थरथरायला होते. त्यांच्या अंतिम यात्रेच्या वेळी आमच्या सोसायटीत मुंगी शिरेल इतकीही जागा नव्हती. त्यांनी आयुष्यात किती माणसं जोडली होती ते त्या दिवशी कळलं. त्यांच्या वडीलांप्रमाणेच (अप्पासाहेब) बाबांचेही निधन अकालीच म्हणजेच ६१ व्या वर्षी झाले पण तरी देखील त्यांनी समाधानाने या जगाचा निरोप घेतला असेल याची मला खात्री आहे.
बाबांचं लग्न लवकर झाल्यामुळे आम्हां भावंडांत आणि त्यांच्यात अंतर तसे खूप कमी होतं. त्यामुळे आम्हांला त्यांचे मार्गदर्शन आणि सहवास जवळजवळ ४० वर्षे मिळाला. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की वसंतची मुले ओम आणि सिया तसेच स्मिताची मुले मंदार आणि पूनम या नातवंडांना मात्र त्यांचा सहवास मात्र फार लाभला नाही.
मी, वसंत आणि स्मिता या आम्हा भावंडांना खरंच खूप अभिमान आहे की अशा सर्वगुणसंपन्न व्यक्तीची आम्ही मुलं आहोत.
मला माझ्या भावनांचे प्रदर्शन करायला फारसे आवडत नाही पण काही व्यक्ती त्याला अपवाद असतात, आणि असायलाच हवीत, नाही का?
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com