1966 साली आलेला मेरा साया हा सिनेमा आठवतो का? मदन मोहनचे अतिशय सुरेल संगीत आणि साधनाची दिलफेक अदा यामुळे तो माझ्या कायम स्मरणात राहील. हा सिनेमा मराठी चित्रपट पाठलाग याचा हिंदीतील रिमेक होता.
तुम्हाला प्रश्न पडेल मला अचानक या सिनेमाची का आठवण झाली? त्यातील सुप्रसिद्ध गाणे "झुमका गिरा रे बरेली के बाजार में...!" आपण नेहमीच गुणगुणतो. गंमत म्हणजे उत्तर प्रदेश मधील बरेली हे काही मोठे अथवा नावाजलेले शहर नाही पण संपूर्ण भारतात ते या एका गाण्यामुळे सर्वश्रुत झाले. पण तुम्हाला माहित आहे का की 54 वर्षांनंतर तो झुमका अखेरीस सापडला. परंतु तो बघायला तुम्हाला बरेलीला मात्र जावे लागेल.
बरेली विकास प्राधिकरण यांनी NH 24 च्या झिरो पॉईंटवर या झुमक्याची स्थापना केली आहे. झुमक्याची उंची 14 फूट आणि वजन आहे 200 किलो. पितळ आणि तांबे यांचे मिश्रण करून हा झुमका बनविण्यात आला आहे. गुरगाव येथील कारागिराने तो तयार केला आणि त्याची किंमत आहे फक्त रु. अठरा लाख. या झुमक्याचे स्मारक 2020 मध्ये तयार झाले आणि या जागेला झुमका तिराहा असे नाव देण्यात आले. आज ते पर्यटकांचे खास आकर्षण झाले आहे.
आता पुढची मजा वेगळीच आहे.
मेरा साया या चित्रपटाचा दुरान्वयाने देखील बरेली या शहराशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे प्रश्न पडतो की गीतकार राजा मेहंदी अली खान यांना हे सुचले कसे?
तुम्हाला ऐकून धक्का बसेल की "बरेली में झुमका गिरा" ही गोष्ट सत्य आहे आणि त्याचा अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाशी थेट संबंध आहे.
अभिताभचे वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी (पूर्वाश्रमीची तेजी सूरी) यांची प्रथम भेट बरेलीमध्ये कुणा नातलगाच्या लग्नात झाली. लग्न समारंभात हरिवंशराय यांना कविता म्हणण्याचा आग्रह झाला. त्यांनी ज्या सुंदर रीतीने काव्य सादर केले त्यामुळे तेजी यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि थोड्या वेळाने ते घळाघळा वाहू लागले. त्यांची ती अवस्था बघून हरिवंशराय यांचेही डोळे भरून आले. या प्रथम कविताभेटीचे रूपांतर प्रेमकथेत झाले. बहुदा कभी कभी सिनेमातील अमिताभ आणि राखी यांच्या कविताभेटीचे मूळ या घटनेत असावे.
परंतु बराच कालावधी लोटला तरी काहीच घडले नाही. दोघांचे दुसरीकडे पण लग्न काही ठरत नव्हते. गीतकार राजा मेहंदी खान दोघांचेही चांगले मित्र होते. त्यांनी एकदा तेजी यांच्याकडे त्यांच्या लग्नाचा विषय काढला तेव्हा विषयांतर करण्याच्या हेतूने त्यांनी सांगितले की “मेरा झुमका तो बरेली के बाजार में गिर गया है..!”. तेजींचे हे विधान राजा मेहंदीच्या डोक्यात फिट्ट बसले.
ज्यावेळी मेरा साया चित्रपटाची गाणी लिहिण्याची वेळ आली तेव्हा राजा मेहंदी यांना त्या वाक्याची आठवण झाली आणि त्यांनी त्या एका वाक्यावर पूर्ण गाणे लिहून काढले. अशा प्रकारे या एका गाण्यामुळे बरेली शहर जगप्रसिद्ध झाले.
@ यशवंत मराठे