अजि सोनियाचा दिनु 

आपल्या पौराणिक कथांनुसार विजया दशमी म्हणजेच दसरा या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला तसेच महिषासुर या राक्षसाचा वध देवीच्या दुर्गा रूपाने केला. म्हणूनच रामलीला सोहळ्यात रावण दहन केले जाते आणि दुर्गापूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. परंतु प्रत्येक गोष्टीत वाद निर्माण करण्यात आपला हात कोणी धरणार नाही. कोणी रामायण घडलेच नाही आणि वाल्मिकींनी लिहिलेली ती एक कथा आहे असे म्हणण्यात काही जणांना भूषण वाटते. तसेच कर्नाटकातील एका संस्थेने एक दोन वर्षांपूर्वी एक नवीन वाद उकरून काढला. त्यांचे म्हणणे आहे महिष हा असुर (राक्षस) नव्हताच. तो एक बौद्ध राजा होता ज्याचा उच्चवर्णीय आर्यांनी खून केला आणि त्याची बदनामी करण्यासाठी दुर्गेची भाकड कथा रचली. आपण या जातीच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याची इच्छाच दाखवत नाही. असो, आपला आजचा विषय तो नाही. 
 
आपण दसरा या सणाकडे पौराणिक कथा जरा बाजूला ठेऊन एका वेगळ्या अंगाने पाहूया. खरं तर दसरा हा अन्नसमृद्धीचा उत्सव आहे.
 
दसरा म्हटलं की विजयोत्सव आणि त्यानिमित्ताने आपट्याची पाने (ही पाने जंगल समृद्धीचे प्रतिक म्हणून असतील का?) लुटण्याची कथा आपल्याला माहित आहे, पण त्यापलीकडेही दसऱ्याचे खूप महत्व आहे. या दिवसात निसर्ग त्याच्या सर्वोच्च आनंदात असतो. पाऊस संपून रानातल्या वनस्पतींना रंग-रंगांची फुले आलेली असतात, चकचकीत ऊन, वातावरणातील आल्हाददायकता आणि शेतीच्या कामांतून मिळालेली उसंत ह्या सर्व गोष्टी उत्सवात प्रसन्नता वाढवतात. 
 
महाराष्ट्रातील वनवासी क्षेत्रात दसरा साजरा करण्याचा प्रचंड उत्साह असतो. त्याची आणि तसेच त्यातील परंपरा याची काही प्रमाणात माहिती देण्यासाठी या लेखाचे प्रयोजन.
 
 
 
 
दसऱ्याच्या आधी नऊ दिवस स्त्री शक्तीची उपासना केली जाते. अनेक समूहात स्त्री-पुरुष असे सर्वच या दिवसात उपवास ठेवतात. स्त्रीचा सन्मान, आदर हेच यातून प्रेरित होते. या नवरात्रीच्या दिवसात घरोघरी ९-१८ धान्यांचे बीज पेरून घट बसवले जातात. हे शेती संस्कृतीच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे कारण त्यामुळे रब्बीच्या हंगामात कोणते बियाणे चांगले रुजणार, याची चाचणी होते. आजपर्यंत बीजांची जोपसना स्त्रियाच करत आल्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व शहरी-ग्रामीण, शेती करणाऱ्या, न करणाऱ्या सर्व महिला घट बसवतात. याचा फायदा म्हणजे ही सामुहिक जबाबदारी आहे याची आपल्याला जाणीव होते आणि एक प्रकारे शेतीशी आपली नाळ टिकून राहते. 
 
दसऱ्याच्या दिवशी शेतात नवीन आलेले धान्य, पिक याची कणसे, आपट्याची पाने, शेतीत वापरली जाणारी अवजारे जसे पेरण्याची पाभर वगैरे असे सर्व घेऊन घरातील कर्ता पुरुष मंदिरात पूजेसाठी घेऊन येतो, यास बऱ्याच भागात सीमोल्लंघन असे म्हणतात. जुन्या काळी लढाईला निघताना हा दसऱ्याचा मुहूर्त साधून सीमोल्लंघन होत असे. त्यानंतर हा पुरुष घरी येतो तेव्हा घरातील स्त्रिया त्याला ओवाळतात, मग गावातील मंडळी एकमेकांच्या घरी जाऊन सोने (आपट्याची पाने) वाटतात. घरोघरी आंब्याची पाने आणि झेंडूंच्या फुलांनी घराची सजावट केली जाते. तसेच वनवासी भागात घरांवर शेणाने बनवलेल्या गोळ्यांतून, रानातल्या फुलांतून, पानांतून सजावट केली जाते. घरोघरी गोड-धोड बनवले जाते. 
 
काही जिल्ह्यातील वनवासी गावातील सर्व कुमारवयीन मुली ‘भोडाई’ नावाचा खेळ खेळतात. म्हणजे या सर्व मुली गावातून तांदुळ, पैसे गोळा करतात. नवरात्रीच्या सर्व दिवसात हा त्यांचा क्रम चालतो. यांच्यासोबत एक कलश असतो, त्यात शेतात असलेल्या  नाचणी, वरईची हिरवी कणसे, भाताची कणसे, खुरासनीची फुले, कुरडूची भाजी असे सर्व ‘अन्नसमृद्धीचा’ कलश डोक्यावर घेऊन गाणी म्हणतात, हा कलश, म्हणजेच ‘भोंडाई’ डोक्यावर घेऊन नाचवतात. जमलेल्या सर्व तांदळाची दसऱ्याच्या दिवशी खीर बनवली जाते. खिरीचे इतर साहित्य जमलेल्या पैशातून जमा होतात. गावातील सर्व लोक एकत्र येऊन ती खीर खातात. वाटून खावे, एकत्र राहावे, निसर्ग जपावा हेच तर यातून प्रतीत होतं.
 
 
 
काही भागात लहान मुले - मुली एकत्र येतात, मोठे त्यांना गावाच्या सीमेवर घेऊन जातात. तिथे पाण्याने भरलेले कलश ओतून सरळ रेषा आखायची आणि त्याचे पूजन करायचे, यात मुलीही असतात. कदाचित जुन्या पिढीकडून नवीन पिढीला दिलेली आपल्या सीमेची माहितीच असावी. 
 
धुळे जिल्ह्यातील वनवासी भागात सर्व गावातील महिला पुरुष सकाळी एकत्र जमतात, वाद्यांच्या तालात हा जमाव गावातून चालू लागतो. महिलांच्या डोक्यावर पाट्या असतात. या पाटीत शेतात पिकलेल्या मोठ्या काकड्या असतात. हे सर्व गावच्या नदीवर पोहचतात. मग पुरुष नदीत अंघोळ करतात, नदीची पूजा होते व सर्वांनी आणलेल्या काकड्या कापून सर्वजण एकत्र येऊन प्रसाद म्हणून खातात. त्यानंतर सर्व स्वच्छ सारवलेल्या घरी येतात. सर्व गाव कसे प्रसन्न असतं. सर्व मिळून दोन तीन बोकड कापतात. जेवढी घरे, तेवढे त्या मटणाचे वाटे केले जातात. म्हणजे कलेजा असेल तर त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात. त्याच प्रमाणे बोकडाच्या इतर सर्व अवयवांचही तुकडे केले जातात. प्रत्येक घराच्या वाट्याला एकेक भाग. त्या दिवशी संध्याकाळी घरोघरी मटण शिजवले जाते. इथेही सर्व गाव एकत्र येते हे महत्वाचे. 
 
नंदुरबार जिल्ह्यातील वनवासी गावांत या दिवसांत गावच्या कणसरी देवीची यात्रा भरते. ही कणसरी देवी धान्यांची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. सर्व गावकरी एकत्र येतात, एकमेकांना भेटतात. सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. महिला त्यांचे ठेवणीतले पारंपरिक चांदीचे दागिने अंगावर चढवतात. गावात रोज विशिष्ट प्रकारात नाच-गाणे होते. सर्व तरुण मुले-मुली यात जास्त सहभागी होतात. घरोघरी आपल्या शेतातील गावठी चविष्ट मक्याची कणसे, शेतात निघालेल्या घुंगऱ्याच्या शेंगा भाजून खाल्ल्या जातात. खाणे, पिणे, एकत्र येणे, संगठन, चर्चा अशा सर्वच गोष्टी मोठ्या आनंदाने साजऱ्या केल्या जातात. या भागातली काठ्याची यात्रा यासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे आजूबाजूच्या गावांतील लोकही यात सहभागी होतात.
 
कोकणातील गावी देखील मंदिरात शिवलग्न लागते. या लग्नात गावातील सर्व देवताच्या प्रतिनिधी देवकाठी निघतात. त्यासाठीची कामे सर्व ग्रामस्थ आदराने, सन्मानाने करतात. वाजत गाजत काठ्या जमतात, आणि मग शिवाचे लग्न लागते आपट्यांच्या पानांच्या चुंबळीबरोबर. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व गाव एकत्र येते, संगठन होते. गावराहटी चालवायची असेल तर सर्वसमावेशकता व संगठन आवश्यकच असते. इथे मात्र नवीन अन्नपौर्णिमा त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला साजरी केली जाते. 
 
अशा प्रकारे दसरा हा सण साजरा करण्याच्या पद्धती गावोगावी खूप भिन्न आहेत. भारतामध्ये एकूण ५५० आदिवासी जमाती वास्तव्य करतात, यात किती विविधता असेल याची कल्पना येऊ शकते. पण या सर्वांत एक सामान्य दुवा आढळतो. शेतीबद्दलचे ज्ञान, अन्नसमृद्धी व त्याबद्दलचा आदर, सामूहिकता व संगठनाचे महत्व, स्त्रीशक्तीची जाणीव व सन्मान आणि निसर्गानुरूप जगण्याची जिजीविषा ! 
 
 
 
 
असा हा सोनियाचा दिनु तुमच्या आयुष्यात देखील भरभराट आणो. 
 
 
@ यशवंत मराठे 
 
 
प्रेरणा: नीलिमा जोरवर यांचा लेख 

Leave a comment



पुष्कराज चव्हाण

3 years ago

छान नवीन माहिती मिळाली.

Prashant Naik

3 years ago

तुझ्या लेखांमधून नेहमीच चांगली व आपल्या देशातील वेगवेगळ्या रुढी/ प्रथांची माहिती मिळते. हे सर्व संकलन करण्यासाठी काय मेहनत करतोस ते वाचल्यावर लक्षात येते.
धन्यवाद

Jayant D Sathe

3 years ago

Good article, Yeshwant.
I am glad that you got away from the 'political' aspect that people want to assign to Dasara.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS