मी काही वर्षांपूर्वी नागपूर पासून 40 किमी दूर असलेल्या काटोल या गावात शेत जमीन विकत घेतली. त्यावेळी या गावाची काहीच माहिती नव्हती पण आता अनिल देशमुखांचे गाव म्हणून ते आपल्या सारख्या लोकांना ते कळू लागले.
मी एक साधासुधा माणूस ज्याने गुंतवणूक म्हणून हा व्यवहार केला. माझ्याकडे एकरी काही करोडो रुपयांचे उत्पन्न काढण्याचा फॉर्म्युला नाही त्यामुळे ती जमीन तशीच पडून होती. कोरोनाच्या काळात तर जमिनीचे भाव इतके कोसळले की जमीन तोट्यात विकावी लागली असती. गेले वर्षभर मी विकायचा प्रयत्न करत होतो पण गिऱ्हाईकच नाही. अखेरीस नुकताच एक गृहस्थ समोर आला आणि खरेदीपेक्षा थोडीशीच जास्त किंमत द्यायला तयार होता. मी विचार केला की आता बास, खूप झालं; विकून टाकावी.
नागपूर मधील एका ओळखीच्या माणसाने मदत करायचे कबूल केले आणि आम्ही दोघे काटोलला त्या व्यक्तीला भेटायला गेलो. तोंडी सौदा पक्का झाला. आता जमीन म्हटल्यावर सात-बाराचा उतारा अनिवार्य होता. म्हणून मग पटवाऱ्याकडे (म्हणजेच महाराष्ट्रातील तलाठी) गेलो तर साहेब गायब. त्यांचा कोतवाल म्हणाला की साहेब मॅडमकडे गेले आहेत. जरा चौकशी करता एक विस्मयचकित करणारी कहाणी कळली.
या मॅडम (ज्यांचे नाव शेवटपर्यंत कळले नाही) रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये टेम्पररी सेवेत होत्या. काही काळानंतर त्यांची नोकरी गेली. पण त्यांना कॉम्प्युटरमध्ये उत्तम गती आणि सर्वसाधारणपणे पटवारीला शून्य ज्ञान. त्यामुळे एक नवीन उपक्रम चालू झाला. पटवारी त्यांच्या दीड खोल्यांच्या घरी जातो; आपला लॉग ईन आयडी आणि पासवर्ड सांगतो. मॅडम जी काही डॉक्युमेंट्स हवी असतील त्याचा प्रिंट आऊट काढून देतात. त्यांची फी आपल्यासारखा माणसाने द्यायची. सरकारी फी पटवारीला द्यायची आणि कागदपत्र घेऊन जायची. आणि हो, फी काही खूप जास्त नाही.
मग आमच्या स्वाऱ्या मॅडमच्या घराकडे रवाना झाल्या. आतमधील दृश्य बघण्यासारखे होते. एका भिंतीला टेकून मॅडम जमिनीवर बसल्या होत्या. समोर पटवारी आणि अजून दोन चार माणसे जमिनीवर फतकल टाकून बसली होती. वरती एका काऊंटरवर प्रिंटर ठेवला होता आणि धडाधड कामे चालली होती. आम्ही थक्कच झालो. आम्हा शहरी माणसांकडे बघून पटवारी उठला आणि बसायला दोन स्टुलं दिली. लगेचच त्या मॅडमना म्हणाला, अहो सगळ्यांना चहा द्या की. त्या उठल्या आणि दहा मिनिटात चहा घेऊन आल्या आणि परत कामाला सुरुवात.
आमचा सात-बारा मिळाला आणि उठणार तेवढ्यात त्या मॅडम म्हणाल्या, अहो या जागेवर स्टेट बँकेचे लोन आहे; ते क्लियर झाल्याशिवाय तुम्ही जागा विकूच शकत नाही. मी त्यांना सांगितले की आधीच्या मालकाने आम्हाला काहीही लोन नाही असे सांगितले होते आणि तो सात बारा आमच्याकडे आहे. मॅडम म्हणाल्या, अहो तो हाती लिहिलेला सात बारा आहे त्यामुळे त्याच्यात गडबड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझा माणूस म्हणाला, साहेब तुम्ही फसलात.
काय करावे तेच कळेना. स्टेट बँकेची काटोलमध्ये शाखा आहे त्यामुळे विचार केला की बँकेत जाऊन तर येऊ; बघू काय होते ते. बँकेत गेलो आणि एका माणसाला आमचा प्रॉब्लेम सांगितला तर त्याने बाजूच्या मुलीकडे जायला सांगितले. तिने कागदपत्र घेऊन दहा मिनिटे शोधाशोध करून सांगितले की लोन होते पण ते पूर्ण फिटले आहे. आता हुश्श करावे तर पुढील विवंचना की बँकेने नो ड्यूज सर्टिफिकेट द्यायला हवे आणि त्यातून वरती स्टेट बँक. म्हटलं आपलं काही खरं नाही. त्या मुलीला विचारलं की पुढे काय? तर म्हणाली, तुमचे ओरिजनल आधार तुमच्याजवळ आहे का? मी लगेच दिले तर म्हणाली पाच मिनिटात सर्टिफिकेट देते. आम्ही बेशुद्ध पडायचे बाकी. पंधरा मिनिटात सर्टिफिकेट घेऊन परत पटवाऱ्याला भेटायला गेलो तर तो ही चकित झाला. म्हणाला, तुमचे काम झाले; पुढील दोन आठवड्यात फेरफार पूर्ण करून लेटेस्ट सात-बारा मिळेल.
मी गेल्या आठवड्यात परत एकदा काटोलला जाऊन डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करून परत आलो.
पण मला या सगळ्यातून एक खूप मोठा धडा मिळाला आणि बोध झाला. आपण बऱ्याचदा गुंतवणुकीच्या नावाखाली अशा जमिनीचे सौदे करत असतो परंतु जर आपण तिथे रेग्युलरली जाणार नसलो आणि आपला तिथे काहीही आधार नसेल तर अशा जागा म्हणजे धोक्यांना आमंत्रण आहे. नशिबाने माझ्या जागेवर अतिक्रमण झाले नव्हते अन्यथा मी काय केले असते? जमीन बळकावली गेली असती. कित्येक वेळा असेही लक्षात येते की जमीन ओलेती दाखविण्यासाठी विहीर अथवा बोअर आहे असे अग्रीमेंट मध्ये लिहिलेले असते. आपण नीट वाचत नाही आणि नंतर फसवणूक झाली म्हणून दैवाला दोष देत बसतो.
परंतु आपल्या देशातील डिजिटलायझेशन बघून खूप छान वाटले. पूर्वी याच कामांना कित्येक महिने लागले असते जे आमचे काम काही तासात झाले.
मेरा भारत महान
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com