दुतोंडी आणि दुटप्पी

राजकारणी लोकं किती सोईस्कर टोप्या बदलतात आणि स्वतःच्या किंवा आपल्या पक्षाच्या अथवा आपल्या सरकारच्या स्वार्थी मतलबासाठी कुठच्याही थराला जाऊ शकतात याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण हे गेले एक वर्ष देऊ शकेल.
 
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीची सुरुवात झाली आणि सुमारे महिन्याभरातच सुन्नी मुसलमानांच्या तबलिगी जमात या आंतरराष्ट्रीय धर्मप्रसार संस्थेचे संमेलन दिल्लीत व्हायचे होते. सुमारे पाच हजार लोकं याला उपस्थित राहणार होते. त्याच्यावरून केवढा कल्लोळ माजला होता हे आठवतंय का?
 
 
तेंव्हाची कोरोनाची परिस्थिती काय होती? दिवसाला संपूर्ण देशात सुमारे पाचशे नवीन बाधित होत होते. यांच्या या संमेलनामुळे कसा कोरोना वाढेल किंवा नंतर किती प्रचंड वाढला याच्या कहाण्या आपण तावातावाने वाचल्या आणि त्यावर काथ्याकूट केला. काही प्रमाणात केसेस जरूर वाढल्या असतील पण त्याचा अतिरंजितपणा आता लक्षात येतो आहे.
 
 
आता एप्रिल 2021 चा विचार करा. आज दिवसाला पावणे दोन लाख केसेस वाढत आहेत आणि आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडायची वेळ आली आहे. पण ते काही असले तरी कुंभ मेळा थांबवून कसे चालेल, नाही का? तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे आणि त्यात आम्ही लुडबुड खपवून घेणार नाही. त्यामुळे तिथे तीस ते पन्नास लाख लोकं येणार असले तरी काय फरक पडतो. तिथले मुख्यमंत्री तर जनतेला आवाहन करतायेत की जास्तीत जास्त लोकांनी कुंभ मेळ्याला या. तुमची श्रद्धा असेल तर कोरोना व्हायरस तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाही. यंव रे पठ्ठे!! आजच वर्तमानपत्रातील बातमी वाचली की गेल्या सहा आठवड्यात सतरा लाख मुंबईकरांनी लसीकरण केले आणि कुंभ मेळ्यात फक्त एका दिवसात पस्तीस लाख लोकांनी शाही स्नान केले. कौतुक करावे तेवढे थोडेच! आपल्याला बहुदा या जन्मापेक्षा पुढील जन्मांची जास्त काळजी आहे असे दिसतंय. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार भाजपाचे त्यामुळे कोण कोणाला बोलणार? निषेधाचा एक शब्द तरी ऐकू आला का? मी तरी नाही ऐकला. परंतु हेच जर दोन्ही ठिकाणी वेगवेगळी सरकारे असती तर कदाचित राजकीय डावपेच आणि कुरघोडी म्हणून गलका झाला असता. आता मात्र चिडीचूप कारभार.
 
 
वस्तुतः सरकारने कुंभमेळ्याला परवानगी देणे हे अत्यंत चुकीचे होते. सद्य परिस्थितीचे गांभीर्य कुणालाच कळत नाही हे शक्य आहे का? सगळ्यांना व्यवस्थित कळतंय पण राजकारण्यांसारखा कानाडोळा दुसरा कोणी करू शकतो का? कुंभमेळ्याची गर्दी पाहिल्यावर असे वाटले की गेल्या वर्षी आपण उगाचच तबलिगी मुसलमानांना शिव्या दिल्या. आपला हिंदू समाजही तसूभरही कमी नाही. आपणही तितकेच धर्मवेडे आहोत हेच या गोष्टीतून प्रतीत होते आहे. खरं तर उत्तरांचल मधील सरकार बरखास्त करून टाकायला हवे पण तसे होणार नाही.
 
आजपासून आता मुस्लिम धर्मियांचा रमझान चालू झाला. त्यांना कोणत्या तोंडाने सांगणार की गर्दी करू नका, मास्क लावा, सोशल डिस्टंसिंग पाळा. प्रत्येक राज्यातील सरकार आपला तो नैतिक अधिकार देखील गमावून बसले आहेत.
 
आता दुसरा विचार करा की महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस अचानक एवढ्या का वाढल्या? तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की जानेवारी महिन्यात सुमारे चौदा हजार ग्राम पंचायतींच्या निवडणूका झाल्या. आता निवडणुका म्हटल्या की प्रचार सभा या ओघाने येतातच. त्याच्यात सोशल डिस्टंसिंग किंवा मास्क यांची ऐशी की तैशी; काय संबंध? आणि हो, त्यात सगळ्याच राजकीय पक्षांचा समावेश; त्यामुळे कोण कोणाला दोष देणार किंवा बोट दाखवणार? तेरी भी चूप और मेरी भी चूप! सबकी मिली भगत; तो फिर अब भूगतो.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज लॉकडाऊन कसा अपरिहार्य हे पटवून द्यायचा प्रयत्न करता आहेत पण कै. बाळासाहेब ठाकऱ्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करताना त्यांनी हा विचार केला होता का? त्याचा परिणाम आज आपल्याला डोकं वर काढून दाखवतो आहे. तरीही आपण त्यातून काहीच शिकणार नाही. बघा ना, कालपासून जारी केलेल्या कठोर निर्बंधातून पंढरपूर, मंगळवेढा यांना वगळण्यात आले कारण तिथे विधानसभेची पोटनिवडणूक आहे. तिथे अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या मोठमोठ्या सभा होतातच आहेत. अहो, पण तुम्हाला कळत कसे नाही की निवडणूक ही जास्त महत्वाची आहे? सरकारच्या प्रत्येक निर्णयात, अगदी लसीकरणापासून काहीही असो, त्यात राजकारण महत्वाचे; बाकी सगळं गेले तेल लावत.. आनंद आहे!
 
आपण तरी दोष कोणा एकाला कसा देणार? महाराष्ट्रात ही परिस्थिती तर तिथे बंगालमध्ये अमित शाह आणि पंतप्रधान यांच्या सभांना काही लाख जनसमुदाय लोटतो आहे. मीडिया त्याचे गुणगान  गाते आहे आणि बंगालमध्ये आता कसे परिबोर्तन नक्की होणार याचे अंदाज वर्तवले जात आहेत. दुसऱ्या बाजूला ममता दीदी यांच्याही मेगा रॅली चालू आहेत. या सर्व राजकीय मेळाव्यांचा कोरोना प्रेमपूर्वक विचार अजिबात करणार नाहीये. त्याचा दट्या आज नाही उद्या नक्की भोगावा लागणार आणि मग त्यावेळेला दोष कोणाला द्यायचा?
 
 
बरं, यात सर्वसामान्य जनता भरडली जाणार म्हणून आपण गळे काढतो पण दुसरीकडे तीच जनता राजकीय सभांना गर्दी करणार, कुंभ मेळ्यात स्नान करायला जीव टाकणार.. कोणाला काय बोलायचे?
 
लहरी राजा; प्रजा आंधळी; अधांतरी दरबार अशी आपली केविलवाणी स्थिती आहे. मला कल्पना आहे की माझ्या या वांझोट विचारांना काडीचीही किंमत नाही. राहवले नाही म्हणून काहीतरी खरडले.
 
आपल्याला विचारतो कोण?
 
@ यशवंत मराठे

Leave a comment



सुयश वझे

3 years ago

तुम्ही लिहिलंय ते अगदी योग्य आहे. पण अंधभक्तीपुढे काहीही चालत नाही. मग ती कोणत्याही पक्षाची असो की नेत्याची.

सतीश नारायण धारप

3 years ago

Well said. I agree 100/%. Absolutely ridiculous and frustrating. आगरकर यांनी चालू केले होते तसे समाज सुधारक वृत्तपत्र काढण्याची वेळ आली आहे. लोकांच्या अंधश्रध्दा आणि आचरटपणा यांना आळा घालने अत्यंत निकडीचे झाले आहे. खरच काहीतरी केले पाहिजे.

Bharat

3 years ago

दुःखद परंतु अगदी सत्य परिस्थिती. जोपर्यंत राजकारण्यांना आपण 'आपल्या भल्यासाठी झटणारे नेते' समजत राहू तोपर्यंत ते आपल्याला असेच उल्लू बनवत राहणार. राजकारण्यांना फक्त निवडून येऊन सत्ता मिळवण्यात रस असतो, समाजाच्या भल्यासाठी झटण्यात नाही. त्यामुळे बोर्डाची परीक्षा रद्द केली जाते पण निवडणुका आणि कुंभमेळे मात्र रद्द केले जात नाहीत.

बाकी कुंभमेळ्याविषयी ही कुसुमाग्रजांची कविता अगदी समर्पक आहे.

सिंहस्थ
- कुसुमाग्रज
============
व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार, वांझ झाले

रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग, तुडुंबला

बँड वाजविती, सैंयामिया धून
गजांचे आसन, महंता‌सी

आले खड्ग हाती, नाचती गोसावी
वाट या पुसावी, अध्यात्माची?

कोणी एक उभा, एका पायावरी
कोणास पथारी, कंटकांची

असे जपीतपी, प्रेक्षकांची आस
रुपयांची रास, पडे पुढे

जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ
त्यात हो तुंबळ, भाविकांची

क्रमांकात होता, गफलत काही
जुंपते लढाई, गोसव्यांची

साधू नाहतात, साधू जेवतात
साधू विष्ठतात, रस्त्यावरी

येथे येती ट्रक, तूप साखरेचे
टँकर दुधाचे, रिक्त तेथे

यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची
चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी

येथे शंभराला, लाभतो प्रवेश
तेथे लक्षाधीश, फक्त जातो

अशी झाली सारी, कौतुकाची मात
गांजाची आयात, टनावारी

तुज म्हणे ऐसे, मायेचे माइंद
त्यापाशी गोविंद, नाही नाही.

Vidya apte

3 years ago

100 percent in agreement.

Sadhana Sathaye

3 years ago

Kharach re, bejababdarpanachi hadda zali.

Anita

3 years ago

Very true Yeshwant! Sadly we commoners just face consequences of this stupidity! Politicians irrespective of their affiliation, are just outright rude and careless towards general population! Only goal they have is to fill up their pockets! They hardly care for one’s health and well-being!

Jayant Sathe

3 years ago

Well said, my friend.
All the politicians are the same. The party affiliation doesn't make any difference.

पुरुषोत्तम काळे

3 years ago

अरे जनता गाढव आहे म्हणून ही वेळ आली आहे

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS