मित्र

आज काय म्हणे फ्रेंडशिप डे.

 

च्यायला, आमच्या तरुणपणी ही असली थेरं नव्हती. आता तर काय या "डे" चे पीकच आलंय. फादर्स डे, मदर्स डे, सिबलिंग डे आणि सुद्धा बरेच काही असतील. काहीच माहित नसलेले आम्हीच मूर्ख, नाही का? सकाळपासून सोशल मीडियावर मैत्रीचा महापूर आला आहे. मी एक अत्यंत प्रॅक्टिकल मनुष्य आहे आणि अशा खोट्या भावनातिरेकाची मला ऍलर्जी आहे.

 

कित्येक जण मला माहित आहे जे अगदी छातीठोकपणे सांगतात की मला इतके मित्र आणि तितके मित्र. आमचं खूप पटतं, WE ARE VERY CLOSE. खरं सांगू मला ही वाक्यं बऱ्यापैकी खोटी वाटतात. यावरून मला एक खूप जुना किस्सा आठवला. आमच्या अत्यंत जवळचा एक नातेवाईक माझ्या वडिलांना सांगत होता की खूप नाटकात काम करणारा कलाकार (नाव महत्वाचे नाही) माझ्या खूप जवळचा मित्र आहे; माझा खास दोस्त आहे. आम्हाला सगळ्यांना कौतुक वाटलं आणि मला तर थोडा हेवाच वाटला. कर्मधर्मसंयोगाने काही दिवसांनंतर आम्ही सर्व त्या कलाकाराचे नाटक बघायला गेलो. आमचा तो नातेवाईक मध्यंतरात म्हणाला, चला आपण सर्व भेटून येऊ. आत गेलो तर त्या कलाकाराने ह्याला ओळखलंच नाही. मग सारवासारव करत हे गृहस्थ म्हणाले, अहो आपण फलाणा जागी भेटलो होतो तेव्हा त्या स्टारने मान हलवली पण ती आपली उगाचच असे मला वाटून गेले. आता सांगा, काही अर्थ आहे का तो माझा मित्र ह्या म्हणण्याला?

 

सलमान खान हा काही विचारवंत नसलेला आणि माझा नावडता अभिनेता. पण, त्याच्या एका मुलाखतीनं मला हलवून सोडलं. त्याला विचारलं: "तुझं दुःख तू कोणाशी शेअर करतोस?" त्यावर सिनेमात पोरकट जोक्स मारणारा सलमान एकदम थबकला. गंभीर झाला, म्हणाला, "कोणाशीच नाही! कारण समजा मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर दुःख शेअर केलं, तर ते मला समजावतील. पण, खासगीत हसतील. माझा रडका चेहरा बघून खुश होतील. माझ्या काही मित्रांशी मी ते शेअर करू शकतो. पण, मला भीती आहे की माझ्या खांद्यावर हात ठेऊन, मला समजावताना काही लोकांचा इगो सुखावेल."

 

आज आजूबाजूला काय दिसतंय? चिंताग्रस्त चेहरे परंतु मुखवटे मात्र हसत असतात. पण कोणीही कुणाला आपलं दुःख सांगत नाही, त्यात कमीपणा मानतात, स्वत:चं अपयश समजतात. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक अंधार आहे. पण, हा अंधार दाखवणारी कोणती 'इमोजी' नाही. आणि तो व्यक्त करण्याची कोणाची तयारी नाही. तुझ्या अंधाराशी माझं काही नातं नाही आणि, माझ्या अंधाराशी तुझा काहीही संबंध नाही! आपल्या नकळत या अंधाराचं मोठं साम्राज्य तयार झालं आहे. मनातला हा अंधार खरंच कोणासोबत शेअर करायचा? आज आपल्या आजूबाजूला आपण ज्यांना मित्र म्हणून सहजगत्या संबोधतो त्यातील अनेक लोक निराश आहेत, खोल डिप्रेशनमध्ये आहेत. हे आपल्याला समजत नाही, असं नाही. पण, उलटपक्षी अनेकदा त्याचं 'गॉसिप' होतं, थट्टा होते. अगदी साधं उदाहरण घ्या; आपल्यासमोर आपला एखादा मित्र चालता चालता घसरून पडला, तरी 'रिफ्लेक्स ॲक्शन'सारखे आपल्याला आधी हसू फुटते. मग आपण त्याला उठवण्यासाठी हात देतो!

 

पार्टी अथवा Get-together मध्ये शेक हॅन्ड, मिठ्या, दारू पिणे, खाणे-पिणे, हसणे-खिदळणे किंवा एखाद्या गाण्यावर सर्वांनी मिळून डान्स करणे याच्यातच इतिकर्तव्यता झाली आहे. दोन चार वेळा अशी भेट झाली की लगेच सगळे एकमेकांना मित्र म्हणायला मोकळे. सर्वजण हिरीरीने आपलं यश सांगतात, खरं तर त्याचं आवर्जून प्रदर्शन करतात. ही मैत्री नाही, हा फक्त मैत्रीचा आभास निर्माण करण्याचा लटका प्रयास आहे. या गोष्टी करू नयेत असं अजिबात नाही पण ओळख आणि मैत्री यातील रेषा इतकी पण धूसर असू नये.  जोपर्यंत माणसं खरं दुःख एकमेकाला सांगणार नाहीत, मनमोकळं रडणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला कधीही हलकं वाटणार नाही..! पण आपल्या दुःखाला कुणी हसणार नाही, माघारी टिंगल टवाळी करणार नाही हा विश्वास कोणालाच नाही. आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू फुललं, याचा आनंद एकदा घेऊन बघा म्हणजे त्याची मजा काय न्यारी असते ते कळेल. असे जेव्हा होईल तेव्हा त्या Get-together ला खरा अर्थ प्राप्त होईल.

 

मित्रांमधील संवाद किती निर्मळ असतो त्याचे एक खास उदाहरण:

"काय रे, xxx आहेस कुठे? इतके दिवस कुठे उकिरडे फुंकत होतास?" ह्या बोलण्यात किती प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आहे हे ज्यांना जिवलग मित्र आहेत त्यांनाच कळेल.

"अरे डुकरा, xx व्या, तुला सांगितलं होतं ना टूरवर जातोय, तुझ्या डोक्यात बिघाड झालाय तेव्हा आता एखाद्या डॉक्टरच्या मढ्यावर काही हजार घालून टेस्टस् करून घे!"

"आयचा घो, च्यायला खरंच विसरलो की"

 

किती प्रेमळ वाटतात हे संवाद! अर्थात ज्यांना शिव्या आणि प्रेम ह्यातलं नातं कळेल त्यांनाच!

 

आता तूम्हीच सांगा इतकं भाषेचं सौंदर्य वाढवणारे शब्द मित्रांच्या बरोबर नाही वापरायचे तर कुठे वापरणार?? नाही का? आणि जर त्या शिव्या न वापरता एकदम शुद्ध बोलायला लागलो तर हमखास आपल्याला ऐकू येणार, का रे xxxच्या तुझ्या xxx रेहमानी किडा घुसला काय रे?

 

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे "मैत्री"बद्दलचे सुंदर वाक्य.

'ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत, ज्यांना मित्र नसतील त्यांनी ते शोधावेत, मित्राशिवाय जगण्याची वेळ शत्रूवरही येऊ नये'. आपल्या तोडीचाच किंवा त्यापेक्षा थोडा वरचढ सेन्स ऑफ ह्यूमर असणारे मित्र लाभणं ह्यासारखं दुसरं भाग्य नाही.

 

त्यामुळे नुसती ओळख आणि मैत्री यात गल्लत करू नका. माझ्या मते कोणालाही खरे मित्र एका हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढेच असतात आणि तेवढे जरी कमावलेत तरी हे आयुष्य सार्थकी लागले असे समजा. कारण मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे.

 

मित्र कोणाला म्हणायचे?

ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लाज किंवा संकोच वाटत नाही. खोटे बोलावेसे वाटत नाही. फसवावेसे वाटत. पापपुण्याची कबुली द्यायला मन कचरत नाही. ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही. ज्याच्या सुखदुःखाशी आपण एकरूप होऊ शकतो तो खरा मित्र.

 

 

माझ्या जवळच्या मित्रांना (कोण? हे ज्यांना सांगण्याची गरज नाही) हे अर्पण. Thanks for being there for me. Cheers!

 

@ यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Shubhada jahagirdar

4 years ago

Very well brought out the double standards we live with.
Congratulations

Shrikant

4 years ago

Nice Post

Milind

4 years ago

सुंदर

पुष्कराज चव्हाण

4 years ago

छान लिहिलंयस. मित्र कोणाला म्हणावं ईथून सुरुवात होते. ज्यांना आपण आयुष्यात फार मोठी मदत केलेली असते आणि जे आपण केलेल्या मदतीचा उल्लेख चार चौघांत अगदी अभिमानाने करतात तेच जीवलग म्हणवणारे मित्र आपली पाठ फिरल्यावर आपल्याला शिव्या घालून आपली जातपात काढून मोकळे होतात अश्यांना मित्र म्हणावं की जे जन्मापासून मैत्रीचा अभिनय करुन अनेकदा पाठीत खंजीर खुपसतात त्यांना मित्र म्हणावं? बरं यातल्या पहिल्या वर्गवारीत मोडणारे मित्र माझा मैत्री या प्रकारावर विश्वास नाही म्हणून निर्लज्जपणे जाहीर करुनही मोकळे होतात.
अतुल परचुरेने एका मुलाखतीत "कानाला खडा" या कार्यक्रमात मैत्रीची व्याख्या फार सोपी करुन सांगितली आहे. त्याचा प्रत्यय आयुष्यभर येऊनही वयाच्या साठी पर्यंत ते लक्षात आलं नाही.
असो, लेख मात्र छान झालाय हे पुन्हा एकदा सांगावंसं वाटलं.

स्नेहा धारप

4 years ago

यशवंत , लेख खूपच आवडला. खरंच आनंद व दुःख मनमोकळेपणी share करता येतील असे मित्र म्हणजेच सच्चे मित्र. हेच आपल्याला खंबीरपणे जगण्याची उमेद देतात. Too good.

Dilip Sule

4 years ago

Very true

akshay13ratnaparkhe

4 years ago

खूप सुंदर लेख सर.
अप्रतिम.

शुभेच्छा.

Yeshwant Marathe

4 years ago

Thanks

cmajoshi

4 years ago

मस्त लिहिलय

पुष्कराज चव्हाण

2 years ago

जरुरी नाही की प्रत्येक ओळखीचा माणूस मित्र असेल. मित्र आणि ओळखीचा हे ओळखायला शिका सरमिसळ करु नका.

Paresh

2 years ago

Absolutely perfect

Pushkaraj Chavan

5 months ago

माझे वडील नेहमी मला सांगत असत की मित्र कोण आणि ओळखीचा कोण हे समजायला शिक. आता प्रत्येक माणूस उत्तम अभिनेता असतो, मित्र होण्यापेक्षा तो स्पर्धक होतो. आणि आपल्या आणि त्याच्याही नकळत तो तुलनात्मक रित्या आपण व तो कुठे आहोत ते सतत पहात असतो. यापेक्षा एकटं राहून स्वतःशीच मैत्री करायला काय हरकत आहे?

स्नेहा धारप

5 months ago

अप्रतिम लेख. सर्वच मुद्दे 100% पटतात. .

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS