म्हातारा? थेरडा? की द्रष्टा?

सालाबादप्रमाणे यावेळेला सुद्धा २ ऑक्टोबरला टिंगलटवाळी नशिबी असलेल्या या निशस्त्र म्हाताऱ्याला लक्षावधी लोक मारू पाहतात पण मात्र हा मरत नाही. कोण आहे हा म्हातारा नेमका?

 

आजच्या काळात सोशल मीडिया माध्यमात महात्मा गांधींवरील कोणतीही पोस्ट बघा आणि त्या खाली अनेकांनी गांधीजींबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला दिसतो. काही काही कमेंट वाचून वाईट वाटते. फेसबुकवर दोन ऑक्टोबरला एक पोस्ट फिरत होती जी सहा हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केली, शेअर केली आणि आनंद व्यक्त केला. त्यात असे म्हटले होते की "ही बंदूक नथुरामने वापरली ज्यामुळे तुम्ही सार्वजनिक सुट्टीचा आनंद घेत आहात.

 

 

 
 
मी दुसरा एक फोटो बघितला की जिथे कोलकात्यातील नवरात्री उत्सवाच्या मंडपात दुर्गापूजेतील माँ दुर्गा गांधींना पायदळी तुडवताना दाखविण्यात आले. पोलीस तक्रारीनंतर त्यांनी गांधी शिल्पाला विग आणि मिशा जोडल्या. 
 
 

 
 

ही कसली विकृत मानसिकता?

 

आपापल्या आवडीच्या पक्षाच्या, जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या महापुरुषांची उंची मोजण्याची आणि तुलना करण्याची मोजमापाची पट्टी म्हणजे गांधी. समकालीन महापुरुषांची प्रतिमा उजळून लखलखीत करण्यासाठी शेजारच्या ज्या प्रतिमेवर चिखल फेकला जातो ती प्रतिमा म्हणजे गांधी. २० व्या शतकातली भारताच्या देवळातली अशी एक घंटा जी अपेक्षेने, इच्छेने, अपेक्षाभंगाने, रागाने, द्वेषाने, प्रेमाने, आपुलकीने, स्वार्थाने, कुठल्याही भावनेने प्रत्येक विचारवंत, राजकीय नेता एकदा तरी हमखास वाजवतो, ती घंटा म्हणजे गांधी.

 

माणसाला माणूस म्हणून जगू देण्यासाठी जगभरातल्या अनेक नेत्यांना मार्गदर्शन करणारा, प्रेरणा देणारे म्हणजे गांधी.

 

टिळक, गांधी, नेहरू, पटेल, सावरकर, बोस, आझाद, आंबेडकर, भगतसिंग, चन्द्रशेखर आझाद आणि त्यांचे समकालीन शेकडो नेते ही सगळी तुमच्या आमच्या सारखी हाडामासाची माणसं होती. वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक स्थितीत वाढलेली माणसं. प्रत्येकावर असणारे संस्कार वेगळे, जडणघडण वेगळी. प्रत्येकात असणारे गुणदोष तुमच्या आमच्या सारखेच होते. कुणी जीवनात यशस्वी होते; कुणी नव्हते. पण ह्या सगळ्यांची एकसमान गोष्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यासोबत भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी ही सगळी मंडळी पुढे आली. इंग्रज सत्तेच्या विरोधात उभी राहिली.

 

फक्त २४ तास मोबाईल पासून लांब ठेवलं तर माश्यासारखी तडफडणारी आजची तरुणाई कदाचित नवल करेल, पण टेलिफोन, तार आणि बहुतेक साधन सरकारी मालकीची असताना त्या प्रतिकूल परिस्थितीत सगळा भारत जो ५०० पेक्षा जास्त संस्थानांच्या आणि विविध प्रदेशात विभागलेला होता, तो समाज देश म्हणून उभा करून इंग्रज सत्तेच्या विरोधात आंदोलनाला तयार करणं ही सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट आहे, अंगावर शहारे आणणारी आहे.

 

हे करत असताना समोर आलेल्या अडचणी सोडवताना, राजकीय पेचप्रसंग सोडवताना त्यांनी त्या त्या काळाला अनुसरून, त्यांच्या बुद्धीला योग्य वाटले त्याप्रमाणे निर्णय घेऊन अनेक गोष्टी केल्या. त्याचे बरेवाईट परिणामही झाले, त्यांनीही ते भोगले. प्रसंगी तुरुंगवास भोगले, अनेक खटल्यांना सामोरे गेले, लाठ्या खाल्ल्या, कित्येकांनी प्राणांचं मोल दिलं तेव्हा हे स्वातंत्र्य मिळालं.

 

गांधीजींच्या राजकारणाबद्दल, निर्णयांबद्दल अनेक आक्षेप असू शकतात, आहेत. आपापल्या वकुबाप्रमाणे बरेच जण गांधीजींच्या आयुष्याची चिकित्सा करत असतातच. पण चंपारण्यापासून ते मृत्यूपर्यंत तीस-पस्तीस वर्ष (आणि मृत्यूनंतरही !) लोकांच्या मनात आदर निर्माण करणं, हे नुसतं "गिमिक" अथवा प्रचारबाजी नसते. जी लोकं एरवी नेभळट म्हणवली जातील, अशांना केवळ एका शब्दाखातर लाठ्या खायला, तुरूंगात जायला प्रवृत्त करणं, हा टेंपरवारी करिश्मा नसतो. परंतु व्यक्तीतलं चांगलं घेत पुढे जाण्याऐवजी विवादास्पद ते चिवडत बसण्यात आपल्याला अधिक आनंद आहे.

 

ज्यांच्या हाकेवर, गल्लीच काय पण घरातली चिल्लीपिल्लीही काही करायला तयार होणार नाहीत असे महानुभाव, गांधीजींनी देशाचं नुकसान केलं म्हणतात, गांधींचे विचार अपयशी ठरले-कालबाह्य झाले म्हणतात, तेव्हा वाटतं की खरंच तसे आहे का?

 

गांधींच्या विचाराबाबत मतभेद व्यक्त करण्याचा कोणालाही पूर्ण अधिकार आहे. आज अशी समजूत आहे की, गांधी मुस्लिम अनुनय आणि फाळणीचे अपराधी होते. गोडसेने गांधींची उशिरा हत्या केली. गांधींचे पुतळे काढून त्या जागी गोडसेचे पुतळे लावावेत हे म्हणण्यापर्यंत सुद्धा मजल गेलेली आहे.

 

मुस्लीम अनुनयाबाबत म्हटले जाते की, मुस्लिमांसाठी अलग मतदारसंघामुळे भारताचे दोन तुकड्यांत विभाजन करण्याची भावना पैदा झाली. विभक्त मतदारसंघांसाठी गांधी जबाबदार होते, असे मानले जाते परंतु इतिहास असे सांगतो की, अलग मतदारसंघ याबाबत १९१७ मध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग करार मुख्यत: लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नांमुळे झाला. १९१७ मध्ये गांधी भारतीय राजकारणात व काँग्रेसमध्ये मुळी नव्हतेच. टिळकांच्या मृत्यूनंतर १९२० मध्ये ते भारतभर चमकले. तत्पूर्वी १९१९ मध्ये माँटफोर्ड शासन-सुधार भारतात इंग्रजांनी लागू केले, ज्यात अलग मतदारसंघ होते. १९३५ मध्ये मुसलमानांकरिता अलग मतदारसंघ कायम ठेवून आणखी काही स्वशासनाचे अधिकार दिले गेले. गांधींनी या अलग मतदारसंघांचे ना समर्थन केले, ना विरोध केला कारण १९१७ मध्येच काँग्रेस-लीग करारात विभक्त मतदारसंघांना मान्यता दिली गेली होती. घटनेचे ३७० कलम गांधींनंतर घटनेला जोडले गेले.

 

आता फाळणीचा मुद्दा घ्या. याबाबत गांधींचा विरोध इतका प्रबळ होता की, अखंड भारताचे शासन ब्रिटनने जिनांना सोपवावे, पण भारताचे तुकडे होऊ देऊ नका, असा गंभीर प्रस्ताव गांधींनी मांडला. १९४७ मधील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेहरू-पटेलांनी सांगितले की, आम्ही गव्हर्नर जनरल माउंटबॅटनबरोबर पाकिस्तानला स्वीकृती देऊन आलो, त्या वेळी गांधी म्हणाले की, माझ्याशी सल्ला न करता अथवा मला काहीही न सांगता तुम्ही हे स्वीकृत केलेच कसे? नंतर ते म्हणाले की अजूनही तुम्ही गव्हर्नर जनरलला सांगा की, हा म्हातारा ऐकत नाही, आम्ही त्यांच्याविरुद्ध कसे जावे? आणि शेवटी म्हणाले की, हा प्रश्न तुम्ही माझ्यावर सोपवा, मी कोणता ना कोणता मार्ग काढून घेईन. खान अब्दुल गफारखाँ सोडून कोणी काही बोलेना. शेवटी गांधींनी प्रत्येकाच्या तोंडाकडे पाहिले, पण सर्व चूप होते. तेव्हा गांधी म्हणाले की, काँग्रेसचे सर्व पुढारी चूप राहिले असताना मी एकटा काय करू? जयप्रकाश नारायण यांनी ही कहाणी अनेक वेळा सांगितली आहे, कारण त्या बैठकीत ते निमंत्रित होते.

 

उपास करून ५५ कोटी रुपये भारताकडून पाकिस्तानला गांधीजींनी द्यायला लावले, याचा मोठा बाऊ केला जातो. खरोखरी काय होते व काय घडले? भारत-पाक वाटणीच्या वेळी भारताकडे नगद रक्कम अधिक राहिल्यामुळे मोबदल्यात ५५ कोटी रुपये भारताने पाकिस्तानला द्यावेत, असा भारताचा पाकशी करार झाला होता. पाकिस्तानने त्या रकमेची मागणी केली, भारत टाळू लागला. तेव्हा गांधीजींनी सांगितले की, आपल्या शब्दांचे पालन करण्यासाठी भारताने ही रक्कम देऊन टाकावी. सरकार तसे करेना. अशा परिस्थितीत आपला वचनभंग करणाऱ्या स्वतंत्र भारतात मी जिवंत राहू इच्छित नाही, अशी घोषणा करून त्यांनी उपवास सुरू केला. पाच-सहा दिवसांत सरकारने रक्कम देण्यास संमती दिली व उपवास सुटला. गांधींनी उपवास करून आपला नैतिक प्रभाव प्रशासनावर टाकला नसता तर हा विवाद राष्ट्र संघात व आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला असता आणि शेवटी भारतास ५५ कोटी रुपये द्यावेच लागले असते. अर्थात असे देखील म्हटले जाते की नेहरू आणि पटेलांच्या मते काश्मीर प्रश्न सोडविण्याशी त्या पैशांचा bargaining power म्हणून उपयोग करावा.

 

बरेच जण असेही म्हणतात की गांधी असे म्हणायचे की "बलात्कार होत असेल तर स्त्रीने जीव द्यावा पण मारहाण करून हिंसा करू नये" कारण गांधी मुस्लिमांचे पक्षपाती होते. परंतु १९४७ च्या ऑक्टोबरात पाकिस्तानने आफ्रिदी जातींना भडकावून काश्मीरवर हल्ला करविला. त्या वेळी गांधीजींनी ताबडतोब नेहरूंना सल्ला दिला की, हे आक्रमण रोखण्यासाठी भारतीय सेना काश्मिरात पाठवा. अहिंसेच्या पुजाऱ्याने पाकिस्तानविरुद्ध सेना पाठविण्यास सांगितले हे किती भारतीयांना माहीत आहे? त्यामुळे रेप करणाऱ्याला विरोध करू नका असे म्हणतील, असे वाटत नाही.

 

आणखीन एक आरोप गांधींवर केला जातो की त्यांनी सरदार पटेल यांच्याऐवजी पंतप्रधानपदी नेहरूंची निवड केली. खरं तर त्यांनी असे का केले याची इतिहासात व्यवस्थित नोंद आहे. पटेल वृद्ध होते आणि अनेक आजारांनी त्रस्त होते. त्यांच्यासमोर १४ वर्षांनी लहान असलेले नेहरू तरुण होते आणि राष्ट्र उभारणीच्या आधुनिक विचारांचे होते. पाकिस्तानकडे पाहिल्यावर गांधींचा निर्णय योग्य असल्याचे लक्षात येते कारण तिथे स्वातंत्र्याच्या काही वर्षातच मोहम्मद अली जिना मरण पावले आणि कोणताही कणखर नेता मागे राहिला नाही. त्याच्या उलट नेहरूंच्या व्यावहारिक कल्पनांमुळे अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन यांच्या मदतीने त्यांनी आयआयटीच्या माध्यमाद्वारे आधुनिक शिक्षण प्रणाली राबवली आणि स्टीलसारख्या अवजड उद्योगांमार्फत भारतीय उद्योगांची पायाभरणी केली. 

 

अटलबिहारी वाजपेयींनी एकदा जयप्रकाशजींना सांगितले की, फाळणीच्या मुद्दय़ावर गांधींना आम्ही नीट समजू शकलो नाही, याचा पत्ता आम्हाला १९६० नंतर लागला. म्हणून आज काळाची अनिवार्यता आहे की, तात्कालिक परिस्थितीतून निघालेल्या शब्दांना पकडून न ठेवता, त्या काळची परिस्थिती व इतिहासातील प्रत्येकाची भूमिका लक्षात ठेवली पाहिजे.

 

आपल्या जातीच्या, पक्षाच्या किंवा विचारसरणी असलेल्या अशा एखाद्या महापुरुषाला आदर्श मानला की त्याची प्रत्येक कृती अचूक आहे असं मानून त्याच समर्थन करणं, प्रसंगी त्याच्या चुकाही योग्य ठरवण ही आपली पहिली चूक.

 

दुसरी चूक म्हणजे त्यांनी त्या काळात घेतलेल्या भूमिका, त्यांची वक्तव्य आणि भाषण ह्यांचे संदर्भ आजच्या काळाशी जोडून डोक्यावर घेणं नाहीतर झोडझोड झोडपणं असले अडाणी उद्योग आपण करतो.

 

तिसरी घोडचूक म्हणजे असे महापुरुष आणि त्यांचं व्यक्तित्व आदर्श मानून त्यांना देवत्व प्रदान करून त्यांना भक्तीच्या मखरात बसवणे आणि मग पुतळे बांधून, पूजा अर्चा मांडून त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्यापासून आपली सोयीस्करपणे सुटका करून घेणं.

 

एवढ्या तीन चुका टाळून प्रत्येकाचं चरित्र अभ्यासा आणि मग पहा, ज्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता अश्या इंग्रज साम्राज्याशी टक्कर घेऊन, लोकांना एकत्र करून जनआंदोलन उभारणं ही किती महान आणि आश्चर्यजनक घटना आहे. 1920 ते आजपर्यंत बहुसंख्य लोक गांधीजींचे चाहते आहेत. 1920 ते 47 ह्या काळात तर अख्खा देश गांधीमय होता. त्यांनी अहिंसा आणि असहकार ह्या मंत्रांनी, स्वातंत्र्य चळवळ अतिसामान्यांपर्यंत नेली, आणि आम जनता सुद्धा मी काहीतरी योगदान देऊ शकतोय ह्या समाधानात होती.

 

हे समजलं की अजूनही इतकी वर्ष उलटली तरीही मार्टिन ल्युथर किंग पासून नेल्सन मंडेला पर्यंत सगळ्यांना ह्या आंदोलनाचं आणि गांधींच्या विचारांचं आकर्षण आणि प्रेरणा का वाटते हे लक्षात येईल.

 

अपमान आणि अन्यायाचा बदला घेण्यासाठी हिंसाचाराचा वापर करण्याची गरज नाही, हे गांधींनी शिकवले. जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी स्वत:ला जागृत करण्याचे इतर चांगले मार्ग आहेत.

 

गांधींनी शिकवले की धर्मयोगी होण्यापेक्षा कर्मयोगी असणं हे असीम सामर्थ्यवान आहे आणि ते कसे करता येईल याचा इतरांना उपदेश करा.

 

कपडे तुमची ओळख नाही, ती तुमची विचारसरणी ठरवते हे गांधींनी पटवून दिले. तुमची कृती आणि तुमचे आचरण तुमच्या अर्धनग्न खादीच्या कपड्याला फॅशन स्टेटमेंट बनवू शकते. पण त्यांना देवत्व देऊन काँग्रेस त्यांना कायम गरीब portray करत आली. यावर सरोजिनी नायडू यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे जे त्यांनी खुद्द गांधींना बोलून दाखवले होते. ते असे होते - Bapu, it is very expensive to maintain your poverty. 

 

पण हो, गांधींकडून हे ही शिकायला मिळतं की अहिंसा ही निर्दोष कल्पना नाही. जर त्यांचा अहिंसेवर एवढा विश्वास होता तर स्वामी श्रद्धानंद यांचा खून करणाऱ्या अब्दुल रशीद याला मेरे प्यारे भाई अब्दुल म्हणण्याची काय गरज होती? दुसरीकडून अहिंसेवर त्यांच्या आंधळ्या अवलंबित्वामुळे दडपशाही निर्माण झाली ज्यामुळे मानवतेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या असंघटित धार्मिक हिंसाचारात परिणीती झाली आणि त्यांचा स्वतःचा हिंसक मृत्यूही झाला.

 

वैयक्तिक सत्याचा शोध हा इतरांच्या सार्वभौमिक अधिकारांकडे दुर्लक्ष करून स्वकेंद्रित प्रवास असू शकत नाही हे पण गांधींकडून शिकायला मिळतं. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे ब्रह्मचर्याचे प्रयोग. त्यात इतरांचा विचारच केलेला नाही.

 

तरीही, जर मी गांधींच्या चांगल्या-वाईटाचे विश्लेषण केले तर मला जाणवते की त्यांच्या चांगुलपणाने त्यांच्या वाईटाला मागे टाकले. कारण गांधी हे चांगल्या आणि वाईटाबद्दल नव्हते. गांधी स्वतःच्या अटींवर जीवन जगणे आणि जगासाठी बौद्धिक आणि आध्यात्मिक मानके स्थापित करण्याबद्दल होते.

 

त्या त्या काळातले संदर्भ समजून घेऊन अभ्यास केला तर इतिहास समजून घेणं सोपं होईल. कारण स्वदेशी असो, चंपारण्य, मिठाचा सत्याग्रह किंवा कुठलीही चळवळ, जोवर सामान्य जनतेच्या आर्थिक प्रश्नांशी जोडली जात नाही तोवर ती फोल असते हे उमगलेला हा माणूस द्रष्टा होता हे आपल्याला समजून घेता येईल का?

 

 

 

 

@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com

 

 

प्रेरणा आणि संदर्भ:- आनंद शितोळे, ठाकूरदास बंग, निनाद वेंगुर्लेकर यांचे लेख.

Leave a comment



Satish Dharap

2 years ago

Very well written and thought provoking.

पूर्वाश्रमीची कु. भारती विवेकानंद मटकर आताची सौ. भाग्यश्री चंद्रशेखर पवार

2 years ago

यशवंत, खूप छान विश्लेषण केलय. नथुराम गोडसे माझ्या आजोबांच्या वाड्यात रहायचा. माझ्या आजोबांना तुरूंगात जावे लागले. माझे आजोबा जनसंघाचे मोठे काय॔कते॔ होते. त्यांच्या घरातील फर्निचरचे खूप नुकसान केले. पण मला असे वाटते की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. ते आयुष्यभर बोलल्याप्रमाणे फक्त धोती आणि उपरणे यावर आयुष्य काढले. अगदी लंडनला गेल्यावरसुद्धा हाच वेश होता.

Akshay Korlekar

7 months ago

फार सुंदर विश्लेषण ! धन्यवाद. ह्याची आज खरंच गरज आहे.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS