लोकमान्य टिळकांनी 1893 च्या आसपास महाराष्ट्रात गणपतीच्या सणाला सार्वजनिक स्वरूप दिले असले तरी त्यावेळी त्याला आजच्या सारखे बाजारी स्वरूप नव्हते. आजचा उन्माद बघून आपण चूक तर केली नाही ना असा विचार लोकमान्यांच्या मनात येऊन जाईल. असो.
आपल्याला गणपती हा सण किंवा उत्सव म्हणून साजरा करण्याची सवय इतकी अंगवळणी पडली आहे की तुम्हाला जर मी सांगितले की शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळात हे एखाद्या व्रताप्रमाणे केले जात असे तर तुम्ही नक्की गोंधळून जाल. गणपती व्रत म्हणजे काय? हा स्वाभाविक प्रश्न पडेल.
कसे होते हे व्रत!!
आपल्याच शेतातील साधी माती अथवा नदीकाठची माती, (शाडू माती सुद्धा नाही), आपल्याच पाटाबरोबर मूर्तिकाराकडे द्यायची. तुम्हाला माती द्यायला जमली नाही तर तो स्वतःच्या शेतातील माती घेऊन त्यात थोडी वारुळाची माती आणि शेण घालून मूर्ती बनवायचा. ती सुद्धा एक किंवा फारतर दोन दिवस आधी. याचे कारण त्या मातीत असलेले जीवजंतू तसेच जिवंत राहावेत.
मग त्याची फार वारा येणार नाही अथवा माणसांची अति वर्दळ नसेल अशा कोपऱ्यात अथवा देवघरात त्याची प्राणप्रतिष्ठा केली जायची. ते करतानाचे मंत्र जर नीट ऐकून समजावून घेतलेत तर ते काय म्हणतात? हृदयाला तूप लावतो ज्यायोगे त्याच्यात जीव येवो, हृदयाला मध लावतो ज्यायोगे त्याच्यात जीव येवो, मी माझ्या मनातून इच्छा धारण करतो की या मूर्तीमध्ये प्राणांचा संचार व्हावा. (आज काय होते? गुरुजी सांगतात दुर्वेच्या टोकाने तूप आणि मध लावा नाहीतर मूर्तीचा रंग खराब होईल. असो.)
तूप आणि मध लावले आणि मग पंचामृती अभिषेक केला केला की त्या सजीव मातीला एक प्रकारे अन्नपुरवठा होतो. त्यातील जीव लक्षावधी पटींनी वाढतात. या वाढलेल्या कल्चरची मूर्ती चांगली राहावी म्हणून सोवळे खूप होते. कल्चर वाईट होऊ नये म्हणून खूप स्वच्छता राखली जायची. चारी बाजूस पणत्या, समया लावायच्या आणि त्या मूर्तीला त्या काळातील ऋतूप्रमाणे पत्र, पुष्प यांनी झाकून ठेवायचे. जेवढी हवेतील आर्द्रता जास्ती तेवढे गणपतीचे विसर्जन लवकर करायचे. कारवार मधील काही सारस्वत किंवा ब्राह्मण कुटुंबांमध्ये त्याच दिवशी संध्याकाळी विसर्जन, म्हणजे एक दिवसाचा गणपती. गोवा, रत्नागिरी या भागात दीड दिवसाचा. आणखीन उत्तरेकडे आलात तर पाच दिवसाचा; पूर्वेकडे गेलात तर निश्चित पाच दिवसाचा. मराठवाड्यासारख्या कोरड्या हवेच्या ठिकाणी पाचचा सात, दहा किंवा अगदी एकवीस दिवसांचाही असू शकतो. दिवसांची संख्या ही हवेतल्या आर्द्रतेवर आणि पर्यायाने मूर्तीतील कल्चर चांगले वाढण्यावर अवलंबून होती हे लक्षात येतंय का?
त्यामुळे दरवर्षी रंगणारा कोकणस्थ विरुद्ध देशस्थ म्हणजेच दीड दिवस विरुद्ध पाच दिवस हा सामना किती अज्ञानापोटी आहे ते लक्षात येऊ द्या.
विसर्जन पाण्यात केले की पाणी सुधारतं ही आपल्या पूर्वजांची धारणा बरोबर होती कारण गणपतीची पूर्ती हीच चांगल्या बॅक्टेरियाचे कल्चर असायची. फक्त माझ्यासाठी असा आपल्या जुन्या भारतीय संस्कृतीत उद्देश नव्हताच. द्विवचन, अनेकवचन वापरणारे आपण लोक आहोत. गुरु-शिष्य, पती-पत्नी अशा दोघांनी करण्याची अनेक व्रते आहेत तसेच अख्ख्या समाजाने करण्याची व्रते आहेत. गणपती हे सामाजिक व्रत त्यामुळे ही मूर्ती सार्वजनिक पाणवठ्यावर विसर्जन करायची म्हणजे सगळ्यांनाच फायदा. सर्वांच्या उन्नतीचा किती उदात्त विचार!!
अजून एक आठवलं म्हणून सांगतो. बोडणाच्या व्रताच्या कहाणीत काय सांगितले जाते? व्रत केले आणि भरभराट झाली; प्रचंड सोनं नाणं मिळालं. म्हणजे नक्की काय झाले? बोडणात जो काही काला तयार केला जातो तो अत्यंत पौष्टिक (nutritive) असतो आणि तो जर शेतात पसरला तर शेती खूप सुधारते. त्याचाच अर्थ आर्थिक उत्पन्न वाढले; म्हणजे आर्थिक भरभराट. तीच गोष्ट गोपाळकाल्याच्या दिवशीचा दही-भात अथवा दूध-भात. तो शेतात पसरला की शेती सुधारलीच म्हणून समजा.
आज मात्र त्या गणपतीच्या व्रताला बाजाराचे रूप आले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या उंचच उंच मूर्ती, ज्याचा कोणालाच काहीच फायदा नाही. झालाच तर फक्त मूर्तिकारांना आणि सार्वजनिक गणेश मंडळांना.
गणपती व्रताचे मूळ स्वरूप सर्वांना कळावे म्हणून हा खटाटोप. मला कल्पना आहे की ज्याचा काहीही उपयोग होणार नाही.
© यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com