गेले काही वर्षात हे दिसून येतं आहे की अनेक घरातून मुलं मुली हे परदेशात शिकायला जातात आणि तिकडेच नोकरी पकडून सेटल होतात. नव्वदीत सुरु झालेल्या या ट्रेंडने आता चांगलाच वेग पकडला आहे. बऱ्याचदा आपण या गोष्टीकडे "आजची तरुणाई पैशाच्या मागे लागली आहे" किंवा "चंगळवाद फोफावला आहे" इतकं बोलून त्या वस्तुस्थितीची बोळवण करून टाकतो. ही तिकडे गेलेली मुलं मुली भारतात असणाऱ्या लोकांचा चेष्टेचा विषय बनतो.
बऱ्याच लोकांची कल्पना असते की युरोप-अमेरिकेत भारतीय लोक फक्त पैशांसाठी सेटल होतात. सगळेच लोक पैशांसाठी देश सोडत नाहीत. कारणे अनेक आहेत ज्याच्यात राजकीय, सामाजिक आणि इतर बाबी यांचा वेगवेगळा प्रभाव पडत असतो.
पाश्चिमात्य देशातील खालील काही गोष्टींचे आजच्या पिढीला आकर्षण वाटते.
स्वच्छता, टापटीप आणि कमालीची शिस्त - In General, पाश्चिमात्य देशातील माणसे ही प्रामाणिक आणि दिलेल्या शब्दाला जागणारी अनुभवायला मिळतात. एखादी गोष्ट माहीत नसेल तर सरळ I don't know म्हणून सांगतात. भारतात बरीच लोकं थापा मारतात, खोटी आश्वासने देतात आणि गोलगोल बोलतात. परदेशी सरकारी यंत्रणा भारतापेक्षा खूप चांगल्या आहेत आणि स्थलांतर करण्यासाठी हे एक सबळ कारण आहे. दुसरा संसार उभा करताना सरकारी किंवा इतर कामासाठी कोणत्याही प्रकारची चिरीमिरी, वशिलेबाजी हा प्रकार करावा लागला नाही. नियम म्हणजे नियम.
आवाज, वायु प्रदूषण नाही किंवा पुष्कळ कमी आणि स्वच्छ हवापाणी. इकडे Aqua Guard वगैरेची गरज पडत नाही. उघडी गटारे नसल्याने माश्या, डास जवळजवळ नाहीत. लोकांचे एकंदरीतच पर्यावरण या बाबतीत जागृती, ज्ञान, आणि सरकारचा फोकस हा कौतुकास्पद आहे.
बाकी वेल्फेअर राष्ट्र असल्याने शिक्षण, आरोग्य मोफत. इतर सुद्धा बऱ्याच सरकारच्या स्कीम्स मध्ये समाजातील दुर्बल घटकांना प्राधान्य. Disabled लोकांनी सेटल व्हावे तर याच देशांत. त्यांची वेगळी टॉयलेट, पार्किंग, प्रवेश द्वार वगैरे. अर्थात, हे सर्व मोफत वाटत असले तरी तसे नसते कारण मोठया प्रमाणात इकडे टॅक्स जातो. पण इतकेच समाधान, की आपण दिलेल्या टॅक्सचा चांगल्या गोष्टींसाठी वापर होतो आणि मुख्य म्हणजे तो होताना आपल्याला दिसतो.
उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि विचारपूर्वक केलेले टाऊन प्लॅनिंग. रस्त्यावर चालायला फूटपाथ, सायकल ट्रॅक चांगल्या स्थितीत असतात. प्रत्येक शहरात आणि टाऊन मध्ये ग्रीन झोन्स. विस्तीर्ण पार्क्स असतात.
ट्रॅफिक सेन्स आणि अत्यंत कडक नियम. सिग्नल जंप केला, स्पीड लिमिटचे उल्लंघन झाले किंवा बस लेन मध्ये गाडी नेली की घरी तिकीट येतेच येते. लायसन्स वर पॉईंट्स येतात. 12 पॉईंट्स झाले की ड्रायव्हिंग वर बंदी. मग पुन्हा टेस्ट द्या, दंड भरा. ड्रायव्हिंग लायसन्स घेणे हा एक मोठा प्रोजेक्ट आहे कारण ते मिळविण्यासाठी ३ ते ४ वेळा प्रयत्न करावे लागतात. भारतामध्ये फक्त गाडी स्टार्ट करून 50 मीटर चालविली की थेट दहा ते वीस वर्षांचे लायसन्स सहज मिळू शकते.
भारतात सुरु असलेली क्लासेस, प्रवेश परीक्षा यांची भाऊगर्दी, एकेका मार्क साठी होणारी साठमारी या सर्वांपासून आपल्या मुलांना मुक्ती मिळावी हा महत्वाचा विचार असतो.
भारतातील खटकणाऱ्या काही व्यावसायिक गोष्टी:
भारतात कर्मचार्यांच्या वैयक्तिक वेळेचा आदर न करणे ही अत्यंत सामान्य गोष्ट समजली जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याचे वैयक्तिक आयुष्य आणि priorities असतात परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. कर्मचार्यांना इतर गोष्टींप्रमाणे चक्क वापरले जाते आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी किंवा आठवड्याच्या शेवटी देखील उपलब्ध असणे अपेक्षित असते. बहुतेक कंपन्या फक्त सोमवार ते शुक्रवार काम करण्याचा दावा करतात पण तरी देखील नेहमीच त्यांच्या कर्मचार्यांना आठवड्याच्या शेवटी काम करण्यास भाग पाडले जाते. त्याचाच परिणाम म्हणजे काही लोक त्यांच्या संपूर्ण सुट्टीत आम्ही कसे काम केले हे अभिमानाने सांगतात आणि नंतर कंपनीने त्यांना "dedicated employee" म्हणून पुरस्कार दिला तर त्यात त्यांना गौरव वाटतो. यात भर म्हणजे, अनेक कंपनीतील वरिष्ठ नेहमी त्यांच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त तास कामाला लावतील यांच्यासाठीच्या वापरल्या जाणार्या विविध तंत्रांबद्दल बोलतात.
आठवड्याच्या दिवसाची संध्याकाळ देखील त्रासदायक असते. वेगळ्या टाइम झोनमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या सोयीनुसार कॉल सेट केले जातात. रोज रात्री साडेनऊ ते रात्री बारा असे कॉल चालू राहणे कोणालाच गैर वाटत नाही मध्यरात्रीनंतर फॉलो-अप ईमेल. एकूण, सरासरी कामाचा दिवस सुमारे 12 तास आणि त्यामुळे कुटुंबाकडे होत असलेले दुर्लक्ष. आणि हे सर्व अतिरिक्त काम कुठलाही ज्यादा पगार देत नाही कारण आजच्या संगणक जगात ओव्हरटाइमची संकल्पनाच नाही.
त्याच्या उलट पाश्चिमात्य देशात कॉर्पोरेट जीवन खूप वेगळे आहे आणि ते माणसांचा खूप जास्त विचार करते. शनिवारी आणि रविवारी त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी, छंदांसाठी आणि सर्व वैयक्तिक गरजांसाठी पुरेसा वेळ मिळतो.
भारतात "वर्क इज गॉड" ही संकल्पना एक जीवघेणी rat race तयार करते आणि त्यामुळे प्रत्येक कर्मचारी त्याच्या मॅनेजरला प्रभावित करण्यासाठी अथक धडपडत असतो. यातून सहकाऱ्यांमध्ये एक तीव्र स्पर्धात्मक युद्ध निर्माण होते. खरं सांगायचं तर प्रत्येक जण या रॅट रेसमध्ये इतरांपेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखविण्याचा फक्त एक केविलवाणा आटापिटा करत असतो कारण प्रत्यक्षात त्यातील फोलपणा त्याला जाणवलेला असतो.
मुंबई/पुण्यातील बहुतांश आयटी कंपन्या त्यांच्या परदेशातील ग्राहकांसाठी service centres or body shops आहेत. क्लायंटला सेवा देण्यासाठी ते त्यांच्या कर्मचार्यांचा वेळ विकत असतात. त्यामुळे या व्यवसायात एक चांगला "अनुयायी" (follower) असण्याशी संबंधित आहे आणि काहीतरी नवीन करण्याच्या धडपडीला (creativity) खीळ बसते. त्यामुळे लोक लादलेल्या परिस्थितीत त्यांचे काम काटेकोरपणे करण्यास सज्ज होतात. परिघाच्या बाहेर विचार नाही, सर्जनशीलता नाही आणि प्रामाणिकपणा नाही. वेगळा विचार करायला वावच नाही. शेवटी, भूक आणि तहान यांप्रमाणेच आपल्या सर्वांच्या सर्जनशील बाजू असतात. याउलट, परदेशातील मोठ्या कंपन्यांकडे पाहिल्यास, हे आपलेच भारतीय लोक उच्च पदांवर आहेत.
त्यामुळे जेव्हा मुलांना जाणवते की मी यांच्यात बदल करू शकत नाही आणि माझ्याकडे असलेल्या मर्यादित वेळेत सर्वकाही बदलणे मला शक्यही नाही. त्यामुळे मला जे हवे आहे ते देणारी जागा शोधणे उत्तम. तुम्हाला वाटेल की हा बरा उंटावरून शेळ्या हाकतोय! पण तसं काही नाहीये. मला दोन मुलगे आहेत; ज्यातील एक अमेरिकेत काही वर्षांपूर्वीच स्थायिक झाला आहे. दुसरा आता ऑस्ट्रेलियात स्थायिक होऊ घातला आहे. आणि आम्ही दोघे तिसऱ्या खंडात. मी माझ्या मुलांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं आणि त्यांच्या निर्णयाचा मी आदर करतो.
सामाजिक व्यवस्था:
मंडल आयोगाने जाती निहाय आरक्षणाची व्याप्ती, खोली आणि उंची वाढवून घटनाकारांच्या मूळ विचारांना हरताळ फासला. तिथेच हिंदू समाजातील मतभेदाची दरी रूंदावण्यास आणखी जोमाने सुरवात झाली. एकेका जातीच्या संघटना उभ्या राहिल्या, मोर्चे निघू लागले, आणि सामाजिक समरसतेचे स्वप्न धूसर होऊ लागले. सवर्ण असणे म्हणजे शतकानुशतकाच्या पापाचे वाटेकरी असणे, सवर्ण असणे म्हणजे ह्या देशातील जाती आधारीत गुन्ह्याला कारणीभूत असणे अशा चष्म्यातून सर्व काही बघायला सुरवात झाली. एक प्रकारे सवर्ण हा वैचारीक दृष्ट्या अस्पृष्य झाला.
सरकारी नोकर्या, शाळा व कॉलेजातील प्रवेश इथे "गुणवत्ता" दुय्यम ठरली आणि जातीचा दाखला अव्वल ठरला. काही वर्षांनंतर सरकारी नोकरीतील बढती देखील जाती दाखल्यानुसार होण्याचा अजब फतवा त्यावेळच्या सरकारने काढला आणि सरकारी कचेरीमधे सहाय्यक असणारा मनुष्य त्याच्या साहेबाचा साहेब बनू लागला. ह्या गोष्टीलाही नियतीचा न्याय असे संबोधले जाऊन, देशबांधवामधली तेढ वाढण्याचे पर्व सुरू झाले.
काळ असाच पुढे गेला आणि मग स्वतःला मागास ठरवून घेण्याची व त्याद्वारे आरक्षण पदरात पाडून घेण्याची अहमहमिका सवर्णातील जातबांधवांमध्ये सुरू झाली. अत्यंत जहाल भाषेतील पत्रके, वक्तव्ये विशिष्ठ जातसमूहाला लक्ष्य करून मांडण्याचे उद्योग पुरोगामी महाराष्ट्रात सुरू झाले. त्याला राजकीय आश्रय, पाठींबा आणि उत्तेजन महाराष्ट्रातील सगळ्यात वजनदार नेत्याकडून मिळाले. पाहता, पाहता द्वेषाचा आणि स्वतःच्या जातबांधवांना आरक्षण मागण्याचा हा कर्करोग वाढत जाऊन, आज एका निर्णायक वळणावर आला आहे.
बिघडलेलं सोशल इंजिनियरिंग जर आपण बदललं नाही तर हा प्रश्न दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. . राष्ट्रप्रथम ही भावना खऱ्या अर्थाने मनात रुजवायची असेल तर शैक्षणिक, मनुष्यबळ विकास, सामाजिक विकास या मूलभूत गोष्टीवर अगदी मुळापासून काम करत प्रगल्भ समाज बनवणं ही काळाची गरज असणार आहे. असा प्रगल्भ समाज हा सशक्त राष्ट्र बनवतो.
आपल्या इथलं असलेलं क्वालिटी ऑफ लाईफ, जाती व्यवस्था, धार्मिक भावनेचं झालेलं उन्मादीकरण, मग त्यामध्ये रस्त्याची कंडिशन, सार्वजनिक स्वच्छता, या आणि यासारख्या अनेक गोष्टी कारणीभूत होत असतात. घरापासून कॉलेजपर्यंत जाताना फ्लेक्सवर दिसणारे भावी नेते जे गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून मिरवत असतात, कानावर सातत्याने पडणाऱ्या भ्रष्टाचाऱ्याच्या बातम्या, शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात राजकारण्यांचा झालेला शिरकाव या सगळ्यांचा तरुणांच्या मनावर सुप्त परिणाम होत असतो. त्यामुळेच दर वर्षी सुमारे चार लाख तरुण हा देश सोडत आहेत.
त्याच प्रमाणे ब्राम्हण समाजाला देखील आता ह्या देशात राहायचे का स्वदेश सोडून जातीविरहित देशात स्थलांतर करायचे का? ब्राम्हण संपला पाहिजे ह्या भावनेत असणार्या समूहाला बळी पडायचे का स्थलांतर? ह्याचा निर्णय घ्यायचा आहे.
ब्राम्हण समाजाने देशहिताचा विचार सोडण्याचा विचार करणे, हेच ह्या भारतमातेच्या नशिबी लिहिले असेल, तर कालाय तस्मै नमः!!!
शेवटी जाणारे जातातच; राहणारे राहतातच. ह्यात कोण चूक कोण बरोबर ह्याचा संबंध नाही. बेटर लाईफ स्टाईलची इच्छा बाळगणे आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणे ह्यात काहीही गैर नाही. परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की तसं केल्यानंतर मग 'जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी' वगैरे गळे काढू नयेत अथवा बाहेर बसून शिव्याही देऊ नये. जिथे राहतो त्या देशाशी एकनिष्ठ रहावे.
जाता जाता एक वैधानिक इशारा: पूर्वीची युरोप अमेरिका बदलते आहे. तिथे दुय्यम दर्जाची वागणूक मिळण्याचा धोका वाढत चालला आहे आणि तिकडचे सुरक्षेचे धोके फारच जास्त डेंजरस लेव्हलचे बनत चालले आहेत.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
संदर्भ: राजेश मंडलिक आणि श्रीराम दांडेकर यांचे लेख