लेखाचे शीर्षक वाचून मी काहीतरी खिल्ली उडविणारे लिहिले असणार असा तुमचा समज होईल कारण '100 में 99 बेईमान, फिर भी मेरा भारत महान' असे ट्रकच्या मागे लिहिलेले वाचायची आपल्याला झाली आहे सवय. पण माझ्या या लेखाचा तो उद्देश अजिबात नाही; उलट काही चांगल्या गोष्टी तुम्हाला कळाव्या ही माझी प्रामाणिक इच्छा.
गेल्या वर्षी आम्ही काही मित्र मंडळी राजस्थान मधील जवई नावाच्या जंगलात गेलो होतो जे बिबट्या म्हणजेच leopards साठी प्रसिद्ध आहे. खूप मजा आली. दोन दिवसात जवळजवळ दहा बिबटे दिसले. त्यानंतर आमच्यातील काही जण मुंबईला परतले पण आम्ही दोघे पुढे उदयपूर आणि कुंभलगड येथे जायचे ठरवले.
आता राजस्थान मध्ये जायचे म्हणजे किमानपक्षी चित्तोडचा किल्ला, हलदी घाटी बघणे क्रमप्राप्त असते. चित्तोडला गाईड शिवाय इतिहास कळणे अशक्य. महाराणी पद्मिनीने जिथे जोहार केला ती जागा बघून पुढे जात असता वाटेत एक कुत्री तिच्या जवळपास आठ ते दहा पिल्लांना दूध पाजत होती.
आम्ही लांबून फोटो काढला आणि तिच्यापासून सुमारे दहा फुटांवरून जाऊ लागलो. तेथील एक पायरी जरा जास्त उंच होती म्हणून अदिती थोडी अजून पुढे जाऊन पायऱ्या उतरायला गेली पण त्यामुळे बहुदा त्या कुत्रीला काहीतरी संकट वाटलं का याची कल्पना नाही पण ती अचानक अदितीवर चाल करून धावली. तेवढ्यात एक दुसरी कुत्री पण आली आणि दोघींनी मिळून अदितीच्या पायाला जोरात चावा घेतला. तिने जीन्स घातली असल्यामुळे खूप मोठी जखम झाली नाही अथवा फारसे रक्त देखील आले नाही. आम्ही आजूबाजूच्या सर्वांनी एकदम आरडाओरड केल्यामुळे त्यांनी अदितीचा पाय सोडला आणि त्या पळून गेल्या. साहजिकच आम्ही खूप घाबरलो आणि काय करायचे तेच लक्षात येईना.
मुंबईतील आमच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला तर तो म्हणाला लवकरात लवकर अँटी रेबीसचे इंजेक्शन घेऊन टाका. आता वाटलं की चित्तोडमध्ये कसे शक्य आहे? त्यामुळे उदयपूरला जायला लगेच परत निघूया. तेव्हा गाईड म्हणाला, साहेब काही काळजी करू नका; जवळच सरकारी क्लिनिक आहे. आपण तिथे जाऊ, इंजेक्शन नक्कीच मिळेल. मनात म्हटले, नाईलाज को क्या इलाज? चला जाऊ. क्लिनिकचे बाह्यरूप अगदी यथातथाच होते. भीतभीत आत गेलो. तिथे दोन बायका होत्या. काय झाले ते सांगितले. त्यातल्या सिनियर बाईने जखमेचे निरीक्षण केले आणि आपल्या मदतनीस मुलीला जखम साफ करून औषध लावायला सांगितले. त्या बाईंनी अदितीला लगेच अँटी टिटॅनस आणि अँटी रेबीस अशी दोन इंजेक्शने दिली. ती देत असताना ती एक प्रकारे अदितीचे काउंसिलिंग देखील करत होती. मॅडम, चिंता की कोई बात नही, हमारे यहाँ कोई ना कोई तो रोज आते रेहता है. आप शांत हो जाईये. नंतर तिने पाच दिवसाच्या अँटीबॉयोटिक गोळ्या दिल्या, ताप वगैरे आला तर म्हणून पॅरासीटमॉलच्या गोळ्या दिल्या. एकंदर पाच इंजेक्शन्स घ्यायची असतात त्याचा चार्ट लिहून दिला. आम्हाला म्हणाल्या आमच्याकडे कुत्रा, माकड किंवा साप चावला तर त्याची औषधे कायम तयार असतात. सगळे झाल्यावर पैसे किती विचारले तर म्हणाली की फॉर्म के दस रुपये दे दो, बाकी कुछ नही. मी थक्कच झालो आणि तरी देखील मी पैसे द्यायचा प्रयत्न केला, तर मला म्हणाल्या साहब, ये तो हमारा काम है, कर्तव्य है, हम इसका पैसा ले ही नही सकते. मी अवाक होऊन बाहेर पडलो.
दुसऱ्या इंजेक्शनची तारीख तीन दिवसांनंतरची होती जेव्हा आम्ही कुम्भलगडला असणार होतो. आदल्या दिवशी चौकशी करून आलो आणि वॅक्सीन available आहे हे कन्फर्म केले. दुसऱ्या दिवशी गेलो, तर तेथील डॉक्टर म्हणाला, साहेब disposable syringes ची ऑर्डर दिली आहे आणि ती एक-दोन तासात येतील तेव्हा थोडे थांबावे लागले. मी समोरच्या केमिस्टाकडून syring घेऊन येऊ का असे विचारले तर म्हणाला की लेकिन उसके लिये आपको बीस रुपये देने होंगे. मी मनात म्हटलं, काय फरक पडतो. मी त्याला syring आणून दिल्यावर त्या ज्या सफाईने इंजेक्शन दिले की अदितीने त्याच्यानंतर किमान तीन चार विचारलं की त्याने नक्की इंजेक्शन दिले ना? बाकी काहीही पैसे द्यावे लागले नाहीत.
डॉक्टरच्या बोलण्यात एक मार्दवता होती आणि जी फक्त आमच्यासाठी मर्यादित होती असे अजिबात नाही. आलेल्या प्रत्येक खेडुताशी तो तितक्याच प्रेमाने बोलत होता. येणाऱ्या प्रत्येक पेशंटला धीर देत होता. मला त्याचे इतके कौतुक वाटले काय सांगू. डॉक्टरकीला noble profession का म्हणतात ते तिथे जाणवले. सगळ्या आलेल्या पेशंटच्या नजरेत तो डॉक्टर म्हणजे देवाचेच रूप.
माझा दुसरा अनुभव कोरोनाच्या पहिल्या डोसच्या वेळचा आहे. तेव्हा मी पालघरमध्ये असल्यामुळे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो. सगळा डॉक्टर आणि नर्स हा स्टाफ इतका courteous की विचारता सोय नाही. सगळी व्यवस्था एकदम चोख. बरं पालघर जिल्हा मुख्यालय म्हणून असेल असेही म्हणता येत नव्हते कारण आमच्या नीरजाच्या कामामुळे मला अनेक गावांमधील आरोग्य केंद्रात जायची वेळ आलेली आहे. मला कधीच बोट दाखवायला जागा मिळालेली नाही.
आपल्या शहरातील लोकांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची खिल्ली आणि टिंगल करण्यात मजा वाटते पण माझ्या मते खरी रुग्ण सेवा या अशाच केंद्रांमधून घडते. हो, या माझ्या म्हणण्याला अपवाद असतील पण ते अपवादच असतील अशी मला खात्री वाटते. आपल्या लहानपणापासून आठवून बघा की आपण किती आजारांच्या लशी घेतल्या आहेत ते. आणि फक्त आपणच नाही तर अगदी खेड्यापाड्यात देखील नागरिकांना त्या मिळाल्या आहेत. आपली healthcare system ही पुढारलेल्या देशांपेक्षा खूप पिछाडीवर असेल पण आज कोरोनाच्या काळात आपण जगाला दाखवून दिलंय की एवढ्या मोठ्या महामारीत सुद्धा आपल्याकडे मरणाऱ्यांची संख्या जगाच्या तुलनेत आणि टक्केवारीत खूपच कमी होती. तसेच फक्त दीड वर्षात २२० कोटी व्हॅक्सीन्स दिली आणि आज सत्तर टक्के जनता fully vaccinated आहे. जगाने अचंब्याने तोंडात बोटं घालावी अशी ही कामगिरी आहे.
त्यामुळे सरसकट डॉक्टरांना शिव्या द्यायच्या आधी जरा विचार करा. कुठलाही डॉक्टर कधीही तुमच्या मरण्याची इच्छा करणार नाही; तो तुम्हाला कायमच वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. पण तो ही शेवटी मनुष्य आहे हे लक्षात ठेवा.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com