माझे कट्टा मित्र

सर्वसाधारणपणे कट्टा म्हणजे काय? तर ठरलेल्या काही मित्रांनी एका ठरलेल्या वेळी, ठरलेल्या जागी भेटून गप्पा मारणे, टाईम पास करणे आणि थोड्या टवाळक्या पण करणे. प्रत्येक कट्टा हे एक अजब रसायन असते आणि ते फक्त शहरातच काय तर गावोगावी फुलत असते. कट्टा ही एक वेगळीच संस्कृती आहे. सगळ्यात गमंत म्हणजे प्रत्येकाला वाटत असते आपला कट्टा सगळ्यात बेस्स. तसा आम्हां बालमोहनच्या मित्रांचा जगप्रसिद्ध कट्टा दर रविवारी सकाळी ११.३० ते १ या काळात शिवाजी पार्कला रवी वसईकर स्टॉलच्या आसपास जमत असतो. आम्ही मित्र १९७६ साली मॅट्रिक झालो आणि जरी जवळपास रहात असलो तरी सुरुवातीला शिक्षण, लग्न, फॅमिली, जॉब किंवा धंदा या व्यापातून वरचेवर काही भेट होत नसे. २००० ते २००४ ही चार वर्षे भूषण गोठोस्कर त्याच्या एका assignment मुळे बेल्जीयमहून मुंबईत आला. आणि त्याच्याच पुढाकाराने हा कट्टा १९ वर्षांपूर्वी सुरु झाला. भूषण गोठोस्कर, श्रीराम दांडेकर, अरुण तेंडुलकर, मिलिंद वैद्य, सतीश धारप हे त्या कट्ट्याचे मूळ खंदे वीर. मला काही महिन्यांनंतर साहेबांच्या (श्रीराम) कृपेने त्यांच्यात प्रवेश मिळाला.

कालांतराने आमच्याच वर्गातील (बालमोहन १० - ब) प्रशांत नाईक, परेश सुखठणकर, दीपक कानविंदे, सुनील गायतोंडे आणि संजय केळकर ह्यांना सामावून घेण्यात आले. आमचं मन इतकं मोठं की दोन वेगवेगळ्या शत्रू पक्षातील सुनील सुखठणकर (बालमोहन १० - अ) आणि मंगेश सप्रे (किंग जॉर्ज) यांचा समावेश करून घेतला; त्यामुळे मग नंतर ज्यांचा शिवाजी पार्कशी काहीही संबंध नसताना देखील अतुल नाईक आणि किरण काशीकर यांना हो म्हणणे फार कठीण झाले नाही.

या वर्षी आम्ही सर्व साठीत प्रवेश करणार (अतुल आणि किरण हे थोडे मोठे आहेत) म्हणून मग असा मनात विचार आला की या आपल्या मित्रांबद्दल काही लिहावं का? प्रत्येकाची काहीतरी एक खासियत असते आणि त्यामुळे एकत्रित वाचण्यातील एक निराळी मजा. या लेखात श्रीराम येणार नाही कारण त्या साहेबांची गोष्टच वेगळी त्यामुळे त्यांच्यावर एक स्वतंत्र लेख लिहावा लागला.

भूषण: हे एक अजब रसायन आहे. त्याची स्मरणशक्ती हा एक खास संशोधनाचा विषय ठरेल. एलआयसी पॉलिसीचा संपूर्ण नंबर लक्षात ठेवणारा हा जगातील एकच माणूस असावा. मिलिंदने संजीवनीला प्रपोज केलेला दिवस भूषण लक्षात ठेऊ शकतो. सुजाताच्या चालण्याच्या वेगानुसार शिवाजी पार्कला आतून फेऱ्या मारल्या तर किती पावलं आणि बाहेरून चाललं तर किती पावलं हे हा पठ्ठ्या बिनचूक सांगू शकतो. धन्य आहे रे बाबा! भूषण हा आदर्श मुलगा, आदर्श नवरा, आदर्श बाप तर आहेच आणि बरोबरीने प्रचंड आदरातिथ्य आहे. पण प्रॉब्लेम काय होतो की आम्हां इतरांच्या बायका कायम याच्याबरोबर तुलना करणार म्हणजे आम्ही काहीही केलं तरी त्याच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही.

अरुण: पहिल्यापासूनच अतिशय शांत. नुसताच अभ्यासू नाही तर हुशार. पण एक कला मात्र त्याला अवगत होती आणि ती म्हणजे मी, अभिजित सारख्या जरा जहाल आणि भूषण, श्रीराम आणि सतीश या सारख्या मवाळ (माझ्या दृष्टीने) अशा दोन्ही ग्रुपमध्ये लीलया मिसळण्याची. आमच्याबरोबर तीन पत्ती खेळायला येणार आणि दारू प्यायला पण येणार (पण तेव्हापासून अगदी आजपर्यंत ठरलेले २-३ पेग पिणार, याला जास्त झालेली दाखवा आणि बक्षीस घेऊन जा अशी स्थिती). बरं, एवढं करून परत शिक्षणात मार्क कमी मिळाले वगैरे गडबड अजिबात नाही. आधी डिप्लोमा, मग डिग्री आणि नंतर NITIE. त्याच्या त्या शिक्षणाच्या चिकाटीला सलाम. याच्याबरोबर तीन पत्ती खेळताना नेहमी एक मजा यायची. याला चांगले पत्ते आले की आम्ही सगळे सटासट पॅक व्हायचो. याला नेहमी प्रश्न पडायचा की आम्हांला ते कसे कळते? खरी गोष्ट म्हणजे याला चांगले पत्ते आले की याच्या नकळत हा एक शिट्टी वाजवायचा. हे त्याला कळेपर्यंत बराच काळ गेला.

आमच्या मित्रांमध्ये हा खरा आदर्श नवरा. आमच्या प्रत्येकाची बायको सांगत असते की जरा अरुणकडे बघ. पण त्याच्या सगळ्या पावलावर पाऊल ठेवायला गेलो तरी फटके मिळायची दाट शक्यता. भारती आम्हाला सगळ्यांना कौतुकाने सांगते की अरुण त्याच्या ऑफिसमधील बायकांच्या अडचणी सोडवायला कशी मदत करतो. च्यायला, आम्ही एकीला जरी नुसती मदत करायचा विचार केला तरी सुद्धा खांडोळी होण्याची भीती आणि हा साला राजरोस बायकोला सांगून अनेक जणींच्या अडचणी सोडवतो.

मिलिंद: माझ्यासारखाच मिलिंद लहानपणापासून गुटगुटीत पण जाड्या हे नाव त्याला माझ्या खूप आधी चिकटलं. वर्गात सरस्वती वंदना म्हणताना निःशेष जाड्या पहा म्हटलं की वर्गातील सर्व मुले आधी मिलिंद आणि नंतर माझ्याकडे बघायची. पण याचे कौतुक म्हणजे त्याने त्या गोष्टीचा कधीही राग केला नाही. वरकरणी अतिशय शांत असलेला मिलिंद जर कधी रागावला तर समोरच्या व्यक्तीची खैर नसे. मला अजूनही आठवतंय की त्याने सातवीत असताना एका दहावी-एकरावीत असलेल्या मुलाची कशी धुलाई केली होती ते. मिलिंद हे आमचं सुरक्षा कवच होतं; तो बरोबर असला की कोणाचीच भीती वाटायची नाही. त्याच्या आताच्या स्वभावाकडे बघून असे पटणारच नाही पण तो आमच्या वर्गाचा खऱ्या अर्थाने दादा होता. असे असून देखील त्याने कधीही कोणाला त्रास दिला नाही. अभिजीतने शाळेत असताना एकच गोष्ट अगदी बरोब्बर केली आणि ती म्हणजे मिलिंदला दिलेले जमीनदार हे नाव. मला एक दाट शंका आहे की आजसुद्धा मिलिंदला नक्की माहित नसेल की त्याची कुठेकुठे आणि किती जमीन आहे ते. पालघर, सिल्वासा, नवली आणि कुठे असली तर तो फक्त भगवंतच जाणे. आपल्याकडील पद्धतीनुसार जमीन आली की कोर्ट कचेरी आलीच पाहिजे पण हे सगळं असूनदेखील हा थंड आणि शांत.

याने प्रेमविवाह केला आहे याच्यावर माझाच कधीकधी विश्वास बसत नाही. माझ्या मते संजीवनीनेच याला प्रपोज केले असेल, लग्नाची तारीख पण तिनेच ठरवली असेल. वरती हा काय म्हणाला असेल? त्यात काय आहे, कोणीतरी ठरवायचं ना? तिने ठरवलं; काय हरकत आहे?

याला कॉन्टॅक्ट कसं करायचं हा आम्हाला सगळ्यांना पडलेला यक्षप्रश्न आहे. याच्याकडे मोबाईल किती हा याला सुद्धा विचार करायला लावेल असा प्रश्न. आणि १०-१२ फोन असले तरी त्यातील किती चालू असतात, चालू असले तर उचलले जातील का या कशाचीच खात्री नाही. हा माझा 24X7 नंबर असं सांगून जो देण्यात आला आहे त्याचीही कसलीच गॅरंटी नाही. इथे आम्हाला १-२ email ID सांभाळताना त्रास होतो तर याच्या ८-१० ID. बरं निम्या अकाऊंटचे पासवर्ड पण लक्षात नाहीत. कोणाला सांगितलं तर पटणार नाही पण या गृहस्थाने आपला ड्रायविंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर चार वर्षांनंतर रिन्यू केला तर पासपोर्ट सात ते आठ वर्षांनंतर. पण हे सगळं असलं तरी हा मित्र मात्र एकदम दिलदार यात शंकाच नाही. अडीअडचणीला out of the way जाऊन मदत करेल. कधीही वैयक्तिक किंवा धंद्यातील प्रॉब्लेम असेल तर याच्या सारखा दुसरा सल्लागार मिळणार नाही. Firstly he is very good listener, has great grasping power and usually comes up with a very sound advice.

सतीश: हा वर्गातील एक हुशार आणि कोणाच्याही अध्यातमध्यात नसलेला मुलगा. जेव्हा कळलं की बारावी नंतर इंजिनीरिंग करायला कुरुक्षेत्रला गेला तेव्हा वाटलं याचं काही खरं नाही. तेथील जाट मुलं याचं जीणं हराम करतील. पण आश्चर्य म्हणजे हा सहीसलामत परत आला. नंतर IIT मधून MTech पण केले. आता IIT म्हटलं की आपली बोलती बंद.

शाळेनंतर तसा याच्याशी संपर्क कमीच. पण एक गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही आणि ती म्हणजे हा हाताला बंद पडलेलं घड्याळ लावायचा. बरं ते घड्याळ कशासाठी तर त्याच्या पट्ट्याला पत्र्याचं महिन्याचे कॅलेंडर क्लिप करण्यासाठी. पुढची गंमत म्हणजे ते कॅलेंडर चालू वर्षाचे कधीच नसायचे. याचा म्हणणं की तारीख आणि दिवस जुळल्याशी मतलब. हे असले उद्योग करणारा हा जगातील नक्कीच एकमेव इसम असेल. याच्या विसरभोळेपणाचे किस्से किती आणि काय सांगणार? एकदा स्नेहाने त्याला फोन करून विचारले की अरे तू माझ्या मेसेजला रिप्लाय नाही केलास, तर हा म्हणतो माझा मोबाईल कुठे गेला? ती म्हणाली अरे मी मोबाईलवरच फोन केलाय. विसराळूपणाची सगळ्यात परिसीमा म्हणजे हा माणूस संध्याकाळी स्वतःची गाडी घेऊन कुणाला तरी दादर स्टेशन वरून पिकअप करायला गेला आणि गाडी तिथेच कुठेतरी पार्क केलेली विसरून त्या व्यक्तीला टॅक्सीने घरी घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी खाली उतरल्यावर गाडी नाही म्हणून चोरीला गेली की काय अशी शंका याच्या मनात आली. कम्प्लेंट करायच्या आधी लक्षात आलं हे पोलिसांचं नशीब. बरं हा सगळा प्रकार एकदा घडला तर झालं असेल चुकून म्हणायला चान्स देता येईल, पण ते एकदा नाही तर दोन तीन वेळा घडलंय. एकदा तर हा गाडी कट्ट्यावर विसरून घरी गेला. धन्य धन्य आहे हा माणूस.

याच्या जन्माच्या आधीपासूनच ह्याचे वडील (दादा) एका अपघातामुळे paraplegic स्थितीत. आज आता ६० वर्ष होत आली त्यांच्या अशा असण्याला. त्याच्या आईचं तर कौतुक आहेच की ज्या पद्धतीने तिने हिमतीने घर सांभाळलं पण तितकंच ते सतीशचे देखील आहे. त्याचे लग्न झालं तेव्हा त्याचे आजी आजोबा, आई वडील आणि सतीश स्नेहा अशा तीन पिढ्या एकत्र राहत होत्या. बरं घरही तसं काही फार मोठं नाही. तसेच घरी माणसांचा कायम राबता. बऱ्याच वेळा असं ऐकलं आहे की आज घरी २० जण रहायला आहेत आणि सगळे मजेत असतात. आता आजी आजोबा नसले तरी निरंजन, त्याची बायको धनश्री, मिहीर आणि स्नेहाची आई आहेतच. तीन पिढ्यांचा सिलसिला चालूच आहे.

प्रशांत: आमच्या वर्गाचा दुसरा अनभिषिक्त दादा म्हणजे प्रशांत. एकदम तंदुरुस्त आणि घट्ट शरीर. मला तर त्याची शाळेत भीतीच वाटायची. मी आपला त्याच्यापासून चार हात दूरच असायचो. याच्याशी पंगा कोण घेणार? शाळेनंतर फारसा संबंध राहिला नाही. काही काळानंतर अचानक कळलं की प्रशांत Anti Narcotics मध्ये आहे. तेव्हा त्याच्याकडे म्हणे पिस्तूल असायची. त्याकाळी एकदा अचानक मला रस्त्यात भेटला तेव्हा म्हणतो कसा "काय रे, तुला कोणाला खूप मारावंस वाटतंय का? तर चल माझ्याबरोबर; कालच दोन नायजेरियन लोकांना पकडलंय आणि आम्ही त्यांना मारून मारून दमलोय. आता हे मारून दमले तर मी काय मारणार त्यांना? उगाच आमच्या सारख्या लिंबू टिंबूंची टिंगल, दुसरं काय? मला कल्पना आहे की याच्याकडे तेंव्हाच्या सुरस, चमत्कारी आणि shocking गोष्टींचा भरमसाठ साठा आहे पण तो काही सांगत नाही. He maintains the departmental secrecy even today. हे खरंच कौतुकास्पद आहे.

परत काही वर्षांनी याने उडी मारली ती एकदम बँकेत. Fraud Detection करत करत ते बँकेच्या पायऱ्या चढत गेला. अहमदाबाद, लखनौ आणि मग सातासमुद्रापार The Big Apple, New York. भारतात परत आला तो थेट रायपूरला. याने छत्तीसगढ सारख्या राज्यात असे काही काम केले की जे भल्याभल्यांना जमले नव्हते. त्यामुळे नंतर त्याची बदली पुण्याला झाली. मी माझे एक कर्ज बँक ऑफ इंडियातून घेतलं तेव्हा माझा त्याच्या बराच ज्युनियर स्टाफशी संबंध आला. प्रत्येकाचं म्हणणं एकच, आम्हाला असा बॉस कधी मिळालाच नाही. नंतर गोवा आणि तिथे देखील बँक ऑफ इंडियाचा गोवा झोन प्रशांतने ५१व्या नंबरवरून पहिल्या पाचात नेला. त्याच्या स्टाफ बरोबर जेव्हा केव्हा संवाद झाला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट जाणवत होती; नाईक साहेबांसाठी काही पण. आपल्यातील किती लोकांना ही गोष्ट साध्य झालीये?

मात्र हा साधाभोळा असल्याचा जो एक मस्त आव आणतो तसा तो नक्कीच नाहीये. पक्का आतल्या गाठीचा आहे. पण साला तोंडून एक शब्द बाहेर पडेल तर शप्पथ. जरा सुद्धा इकडचे तिकडे न जाऊ देण्याची कला मात्र त्याने छान आत्मसात केली आहे.

परेश: हा खऱ्या अर्थाने आमच्या वर्गाचा हिरो. आम्ही साईड प्लिज करत असलो तरी याचे सर्व मुलींशी याचे संभाषण असे. क्रिकेट खूप चांगलं खेळायचा, शाळेच्या टीमचा कॅप्टन. त्यामुळे काही विचारायचीच सोय नाही. आम्ही तर त्याला कृष्णच म्हणायचो; असतं बाबा एकेकाचं नशीब. पण शाळेत असताना याचा जाम हेवा वाटायचा. मी कोकणस्थ ब्राह्मण आणि आमच्या घरी अंडं सुद्धा कधी बनलं नाही पण शाळेत असताना मला मासे आणि नॉन व्हेज खायची चटक लागली ती प्रामुख्याने अभिजित, संजय आणि परेशच्या घरी जाऊन. शाळेनंतर बराच काळ संबंध पार तुटला होता जो परत प्रस्थापित झाला जेव्हा तो १०-१२ वर्षांपूर्वी माझा Financial Advisor झाला.

२०१४ च्या जून मध्ये माझा मुलगा, अमेयने मला सांगितले की he is going steady with Romeeta Sukhtankar (परेशची मुलगी). माझा आधी विश्वासच बसला नाही कारण ते एकमेकांना भेटले आहेत हेच मला माहित नव्हते. त्याच दिवशी रोमिताने पण तिच्या घरी सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याचा आणि माझा प्रॉब्लेम अगदी सारखा. फोन करून बोलायचं काय? साहजिकच लग्नाचं सगळं ठरवताना सारखीच भेट होऊ लागली. पण बालपणीचे मित्र असण्याचा फायदा हा की कसल्याही बोचणाऱ्या बारीकसारीक सुद्धा अडचणी आल्या नाहीत आणि एकदम थाटामाटात लग्न झाले. नंतरची गंमत म्हणजे परेशला अख्खा कट्टा ग्रुपच व्याही म्हणू लागला.

आजही परेश हिरो आहेच कारण एक गोष्ट खरी की बायकांशी कसं बोलावं हे knack परेशला मस्त जमलीय. त्यामुळे सगळ्या बायका याच्याशी एकदम comfortable. परेशने बायकोलाही असे काही पटवलंय की विचारता सोय नाही. नवऱ्याचे एवढं कौतुक करणारी बायको माझ्या तरी माहितीत नाही.

दीपक: दीपक. सतीशप्रमाणे हाही सातवीत आमच्या वर्गात आला. पण त्याच्याशी तारे फार लवकर जुळले. आम्ही दोघे प्रबोधच्या आईकडे गणित नावाचा एक राक्षस समजावून (शिकायला म्हणत नाहीये) घ्यायला जायचो. श्री सिनेमाच्या डोअरकिपरला पटवण्यात आमच्याच तिघांचा हात. त्याला एक रुपया देऊन सरळ बाल्कनीत जाऊन सिनेमा बघायचा जेव्हा बाल्कनीचे तिकीट २.५० रुपये होते. दीपकचे वडील खूपच लवकर गेले, बहुदा १९८० मध्ये. पूर्वी त्याच्या Alice Court मधील घरी खूप वेळा जाणं व्हायचं पण त्यानंतर एकदम कमी झालं.

कॉलेज नंतर दीपक बँक ऑफ इंडियात जॉईन झाला आणि ते ही हेड ऑफिसमध्ये. मी, अभिजित आणि संजय फोर्टला गेलो की याला बँकेत जाऊन भेटायचो, हा आमच्याबरोबर खाली उतरायचा, मग आम्ही कुठल्यातरी सिनेमाला जायचो (इरॉस, रिगल किंवा स्ट्रॅन्ड). ह्याला मी एक दोन वेळा विचारलं की अरे तुला बँकेत कोणी शोधणार नाही का? तेव्हा हसत सांगायचा, अरे एवढी मोठी बिल्डिंग, आजूबाजूचे लोक म्हणतील असेल इथेच कुठेतरी. कोणाला काय कळतंय? (प्रशांत, बघा तुमच्या बँकेत ३५ वर्षांपूर्वी काय चालायचं ते)

मला जर नीट आठवत असेल तर त्यानंतर दीपक Cathay Pacific मध्ये नोकरी मिळवण्याचा खूप प्रयत्न करत होता पण काय झालं नक्की माहित नाही. नंतर अचानक कळलं की तो जॉन्सन अँड जॉन्सनला जॉईन झाला. त्याचा फार्मा इंडस्टीमधील प्रवास तेव्हा जो चालू झाला तो आजपर्यंत चालूच आहे. जर्मन रेमिडीज, नंतर निकोलस आणि आता स्वतःची फार्मा कन्सल्टिंग. शाळेत असताना आपल्या वर्गात असे काही जण होते की त्यांच्याबाबत ते आज ज्या ठिकाणी पोहोचले आहेत ते तेव्हा अशक्य वाटलं असतं आणि त्यापैकी एक दीपक आहे. It is really unbelievable how he has reinvented himself and I feel really proud of him.

शाळेपासून दीपक तास लहान चणीचा त्यामुळे आजही आपल्या सगळ्यांपेक्षा तो ५-६ वर्ष लहान असं म्हटलं तरी सहज लोकांना पटेल. पण सगळीच लहान चणीची माणसं बारीक राहत नाहीत आणि मग ते फार बेढब दिसतात. But Deepak has maintained himself phenomenly well. गेले काही वर्ष तर त्याला मॅरेथॉन धावण्याचा किडा चावला आहे. त्यामुळे तर काय बघायलाच नको. He must be one of the fittest guy in the group. च्यायला, आत्ता गेल्या वर्षी हा New Zealand ला जाऊन Bungi Jumping करून आला. मला तो व्हिडिओ बघूनच चक्कर आली, असं करण्याचा विचार मनात येण्याची पण भीती वाटते, करणे तर फारच लांबची गोष्ट. हा कधीतरी धावत, कधीतरी सायकलिंग करत कट्ट्यावर पोहोचतो तेव्हा त्याला पहिला नमस्कारच करावासा वाटतो.

सुनील गायतोंडे: हा वर्गातील अत्यंत हुशार मुलगा. एकदा दीपकने ह्याचा पूर्णच्या पूर्ण पेपर कॉपी केला. पण झालं काय, दीपकला पूर्ण मार्क आणि ह्याला मात्र copied म्हणून शेरा. केवढा चिडमीडा झाला होता; साहजिकच म्हणा. हा परत एक IIT वाला म्हणजे आमचा काही संबंधच नाही. नंतर आता गेली ३५ वर्षे अमेरिकेत. स्वतःची कंपनी चालू केली, विकली, खूप पैसे कमावले. आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे त्याचा. शिकागोला काय सुरेख घर आहे. आता श्रीधर बरोबर K Point & GS Lab हा व्यवसाय. हुशार असला तरी चावट गोष्टींचे वावडं तर नाहीच; उलट आवड, त्यामुळे भेटला की मस्त जमतं.

मंगेश: हा पूर्णपणे शत्रू पक्षातील, किंग जॉर्ज शाळा. हा देखील दीपक प्रमाणे fitness fanatic. रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळचा व्यायाम चुकवत नाही. मला फार कौतुक वाटतं त्याचं. आणि हो, दुसरं म्हणजे भयंकर उत्साही प्राणी; कुठेही जायला, भेटायला एका पायावर तयार. आता हा डॉ सप्रे (PhD) म्हटल्यावर हुशार हे सांगायलाच नको. व्यवसाय ही जोरात चालू आहे.

सुनील सुखठणकर: हा मंगेश नंतर दुसरा PhD. हा सगळ्यात उशीरा कट्टा मेंबर झाला. तसा शत्रू वर्गातील (१० वी अ) पण आमच्या सगळ्यांशी चांगलं जुळलंय. याचा उत्साह दांडगा आणि वाखाणण्याजोगा आहे. पुण्याला श्रीरामकडे जमलो असता वाशीहून संध्याकाळी पोचला, रात्री १२ ला निघून घरी जाऊन सकाळी सहाची दिल्ली फ्लाईट. मी तर बहुदा टाळलंच असतं. हॅट्स ऑफ. आणि हो याची दुसरी खासियत म्हणजे हा आणि सुजाता एकदम lovey dovey couple.

किरण: ही एक वल्ली आहे. साध्यातल्या साध्या गोष्टी तो ज्या शिताफीने अश्लील बनवू शकतो त्याला तोड नाही. तसं याचं सगळं घराणंच शिवराळ; याच्या लग्नानंतर दुसऱ्या दिवशी आजी (वडिलांची आत्या) काय प्रश्न विचारते, काय रे, सगळं नीट केलेस ना? हे त्याच्या तोंडून ऐकण्यात जी मजा आहे त्याला तोड नाही पण पहिल्यांदा ऐकले तेव्हा आम्ही खल्लास. पण त्याला नक्की काय करायचं असते आणि तो काय बोलतो याचा दरवेळी मेळ असेलच याची खात्री नसते.

अतुल: हा सोळा वर्षे बँकॉकला होता. पण आश्चर्य म्हणजे तसा सोवळाच. सध्या मुंबईत असला तरी कामात इतका बिझी की भेटतच नाही. हा कट्टा मेंबर आहे हे आठवायलाच लागतं. पण हा पाहुणचार मात्र अगदी मनापासून करतो. आजपर्यंत जो कोणी त्याच्याकडे बँकॉकला जाऊन आला असेल त्याला ही गोष्ट नक्की पटेल.

संजय: हा खऱ्या अर्थी माझा शाळेतील फास्ट फ्रेंड. आम्ही सातवी ते दहावी तर एका बेंचवर बसायचो. त्याच्याबरोबरच्या किती आठवणी आहेत याला काही गणतीच नाही आणि त्या सगळ्या इथे लिहिणे अशक्य आहे. याला खरं आर्किटेक्ट व्हायचं होतं पण काही प्रमाणात अभिजीतच्या प्रभावामुळे असेल, हा मर्चंट नेव्हीत गेला आणि अजूनही त्याच क्षेत्रात आहे. त्याचे वर्सोव्याला राहणे आणि सतत फिरतीची नोकरी यामुळे भेटी कमी होतात पण जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा we start off where we had left. त्याची आठवण आली नाही असे कधीच होत नाही. He is my true man for all seasons!

जसे मी ह्या कट्टा मित्रांबद्दल लिहिले तसेच भविष्यात जेव्हा जमेल तेव्हा मला माझ्या बालमोहनच्या (दहावी ब) वर्गातील काही मित्रांचे व्यक्तिचित्रण लिहायला आवडेल. सगळ्यांच्या बाबतीत नाही लिहिता येणार पण अजून ७-८ जणांबद्दल बहुदा लिहिता येऊ शकेल. उदा. अद्वैत पाटील, प्रबोध मनोहर, अजित रेडकर, श्रीधर शुक्ल, प्रफुल्ल केळकर, विद्याधर प्रभुदेसाई, मिलिंद कुलकर्णी वगैरे. बघू कधी आणि कसे काय जमतंय ते.

तुम्हालाच काय पण माझ्या या कट्टा मित्रांनाही प्रश्न पडला असेल की असं त्यांचे व्यक्तिचित्रण लिहिण्याचे कारण काय? Frankly, what I wanted to achieve was a time machine, friendship glue (fevicol), and a wake up call to live life more & more fully whilst we are here as we are indeed blessed to have each other. I don’t know whether I am really successful in achieving that or not. Even if I have managed that on a very minuscule level, I will be very happy.

So, my friends, here is toast 🥂🥂 to all of us, as we all slide down the bannister of life, may all the splinters point in the right direction.

Thanks to you all for being there.

Cheers!!

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Ashok Prabhu

5 years ago

Simply superb.

nitin nadkarni

5 years ago

Yashwant you are really lucky to have so many friends who you have maintained contacts with.
Very well written
Nitin

aroundindiaghansham

5 years ago

खुपच छान

Madhuri Gawande

5 years ago

It was wonderful to know your friends and happy that you have enjoyed your journey with such wonderful people
Asiii dosti aur dostonko salaam 🙏

Vishakha Bhagvat

5 years ago

Yashwant, well description of personalities!

Vinita

5 years ago

वा यशवंत खूप सुंदर लिहिले आहेस.!!

स्नेहा धारप

5 years ago

यशवंत, मित्रांविषयीचं प्रेम लेखणीतून खूपच छान व्यक्त झालंय.

Pushkaraj Chavan

5 years ago

अरे मस्त लिहिलंयस, जवळपास सर्वांचेच चेहरे लक्षात आहेत. काहींची आडनावं लिहिली नाहीस. शाळेत बहुधा आडनावानेच बरेचसे जण एकमेकांना ओळखत असत. तेव्हा आडनावं लिहिली असतीस तर बरं झालं असतं. तू, परेश, दिपक, प्रशांत, मंगेश, भूषण यांना "साळसूद" मुलं म्हणून सारेजण नाव, आडनाव, रहाण्याच्या ठिकाणासहित "ओळखून" होते.
असो, आजही मैत्री टिकवून नियमितपणे भेटता याचे कौतुक आहे. गंमत म्हणजे तुमच्या धाकट्या भावंडांशीही माझी ओळख आहे.
लेख वाचून सारेजण शाळेच्या गणवेशात डोळ्या समोर आलात.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS