जन्म आणि मृत्यू रूढी

सगळ्यात जास्ती जर कुठल्या रुढींबद्दल गैरसमज अथवा विरोध असेल तर तो ह्या रूढींना. कारण व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याच्यासाठी काही रूढी आणि परंपरा पाळायच्या हे बऱ्याच जणांना वेडेपणाचे वाटते त्यामुळे त्याचा विचार केल्याशिवाय ही मालिका पूर्ण होऊच शकत नाही. तसेच जन्म ही आनंदाची गोष्ट असताना त्याच्यासाठी सोयर का पाळायचे?

सोयर: मुलाच्या जन्मानंतर साहजिकच नातेवाईक येणार; त्यांची सरबराई करायला हवी पण तेवढा वेळ हवा. किंवा काहीतरी गोष्ट कमी करायला हवी. घरातील टाळण्याची सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे देवपूजा. त्यामुळे या सुतकात देवघरात जायचे नाही, देवपूजा करायची नाही, देवळात जायचे नाही एवढीच बंधने होती. हे तीन दिवस पाळण्यात येई.

प्रेताला आंघोळ घालावी: ही आंघोळ घरच्या लोकांनी नाही तर शेजाऱ्यांनी अथवा नातेवाईकांनी घालायची आणि ती देखील कपडे काढून. ही का अशी अघोरी पद्धत? कपडे काढायचे ते शरीरावर कुठलीही इजा अथवा आघात नाही ना हे पडताळून बघण्यासाठी. भांडणाला वाव ठेवायचा नाही. बरं जी आंघोळ घालायची ती थंड अथवा गरम पाण्याने; याचे कारण बऱ्याचदा मनुष्य गतप्राण झाला असे वाटते पण त्याच्यात थोडीफार चेतना असण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे तसे असल्यास गार अथवा गरम पाण्यामुळे मृत्यू झाला आहे हे पडताळणे (verification) हा प्रमुख उद्देश.

प्रेताला अग्नी पुरुषांनी द्यावा तसेच स्त्रियांनी स्मशानात देखील जाऊ नये: आजच्या काळात स्त्री पुरुष समानतेमधील हा प्रमुख अडथळा आहे. परंतु शास्त्राने हे सिद्ध झाले आहे की बायकांची मानसिक जडणघडण मूलतः नाजुकपणाची असते. जे पुरुष अंत्यविधीसाठी जातात ते हे मान्य करतील की तिथे गेल्यावर एक प्रकारचे नैराश्य अथवा स्मशानवैराग्य येते. आता जर असे नैराश्य घरच्या स्त्रीला आले तर सगळ्या कुटुंबाचा समतोल बिघडू शकतो. हे पूर्णपणे मानसिकतेवर आधारलेले आहे आणि ज्यात स्त्रीला कमी लेखण्याचा काहीही संबंध नाही.

मृत्यूनंतर समाचाराला जाणे: बऱ्याच जणांचा असा सूर असतो की असे जाणे म्हणजे अमानुषता आहे कारण जाऊन लोकं काय बोलतात तर कसे झाले? काय झाले? वगैरे आणि याचा त्या कुटुंबातील व्यक्तींना किती मानसिक त्रास होतो याचा कोण विचार करणार? जरा लक्षात घ्या, की पूर्वी माणूस मेल्यावर त्याच्या मृत्यूचे नक्की कारण माहित नसे. ते माहित करून घेतले तर काही प्रतिबंधात्मक उपाय (preventive measures) करायला हवे असतील तर ते समजतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कुटुंबाला मृत्यूचे आणि वास्तवाचे भान आणणे (reaffirming the death).

सुतक पाळावे: सुतकाबद्दल अनेक गैरसमज आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे माणूस मेल्यावर त्याच्या मृत्यूचे नक्की कारण माहित नसे. संसर्गजन्य रोग असला तर? त्यामुळे मृत्यू घरचे पाणी देखील प्यायचे नाही. आणि जर एखादा गावातील अथवा बाहेरचा मनुष्य त्या घरी त्या दिवशी राहिला तर त्याने तेरा दिवस तिथेच राहायचे. याचा अर्थ लक्षात येतोय? हे दुसरं तिसरं काही नसून विलगीकरण, म्हणजेच Quarantine होते; जे आज सुद्धा तेरा ते चौदा दिवसांचे आहे. ज्या दिवशी घरातील व्यक्ती मरण पावली असेल त्यावेळी जर घरात शिजलेले अन्न असेल तर ते फेकून देण्यात येत असे. आणि शेजाऱ्यांनी जेवण बनवून आणून द्यायचे. असे का? जर चुकूनमाकून माणसाचा मृत्यू विषबाधेने झाला असेल तर तो अन्नातून होण्याची शक्यता सगळयात जास्त. घरातील इतर लोकांना काही होऊ नये म्हणून अन्न फेकून देणे. शेजाऱ्यांनी बनविलेल्या अन्नात ही शक्यता अत्यल्प.

पण जर मृत्यू शस्त्राघाताने झाला असेल, म्हणजेच मृत्यूचे कारण नीट ठाऊक असेल, तर सुतकाचे नियम पाळण्याचे बंधन नव्हते.

पूर्वी शेतकऱ्याच्या अथवा कामकाऱ्याच्या घरी मृत्यू झाला तरी गाईला चारा द्यायलाच हवा, शेतीची कामे व्हायलाच हवीत, जेवायला तर हवेच मग सगळ्यात टाळून चालणारी गोष्ट कोणची? सोप्पं आहे - देवपूजा. त्यातून दुसराही महत्वाचा संदेश दिला गेला की पूजेचे अवडंबर करू नका. पण रुढीची परंपरा कशी होते तर आज गावाला कोणीतरी नातेवाईक मृत्युमुखी पडला तर शेकडो मैल दूर असून देखील सुतक पाळले जाते.

श्राद्ध केल्यामुळे जीवात्म्याला गती मिळते: श्राद्ध करणे हे एक प्रकारे मानसशास्त्र आहे. मनावर आलेले मळभ दूर करणे हा महत्वाचा उद्देश. तेराव्या दिवशी तर मेजवानी केली जाते ज्यायोगे असा संदेश दिला जातो की आता शोक पुरे, कामाला लागा. तुम्ही शोकातून बाहेर येऊन कामाला लागलात की त्या जीवात्म्याला गती मिळालीच!!

याशिवाय पिंडदान अथवा वर्षश्राद्ध अशाही काही रूढी आहेत ज्याची कारणमीमांसा मला काही शोधता आली नाही. त्यातील वर्षश्राद्ध हे त्या व्यक्तीचे स्मरण व्हावे यासाठी असावे असे वाटते. पिंडदानाचे मी स्वतः अनुभवलेले काही प्रसंग आहे पण मला त्यावर काहीही भाष्य करता येणार नाही. अहो, एखादी गोष्ट तरी सोडून देऊया की.

मालिकेचा समारोप

रूढी आणि परंपरा या आपल्या पूर्वजांनी कमीतकमी भांडणे होऊन समाज आनंदी राहावा आणि वैयक्तिक जीवनातील त्रास कमी व्हावा या संकल्पनेतून निर्माण केल्या. त्यांच्याकडे इतके ज्ञान होते की सार्वजनिक सलोख्यासाठी समाजाला कुठल्यातरी गोष्टींमध्ये बांधून ठेवण्याची गरज आहे.

परंतु संपूर्ण समाजाला बांधणारे सूत्र कसे अमंलात आणायचे? तेव्हा काहीतरी व्यवस्थापन तत्व वापरल्याशिवाय ते अशक्य होते. त्यात परत आपला समाज अठरापगड जाती तसेच धर्मामुळे विभागलेला; त्याला बांधायचे कसे? त्यांना मानसशास्त्र इतके छान कळले होते जोपर्यंत ते करण्यासाठी भीती किंवा आमिष, म्हणजेच प्रतिबंध अथवा प्रवृत्त (deterrent and incentive), दाखविल्याशिवाय ते अशक्य आहे.

आता भीती म्हटली तर सगळ्यात मोठी भीती मरणाची असते आणि सगळ्यात मोठे आमिष आर्थिक भरभराटीचे असू शकते. त्यामुळे प्रत्येक रुढीला अशा गोष्टींचे बिरुद चिकटवले की लोक त्याचा मनापासून अंगीकार करतील. सगळ्या रूढींचा अभ्यास केलात तर काय लक्षात येते? अपमृत्यु येईल, दारिद्र्य येईल, भरभराट होईल. त्यामुळे या प्रथा इतके हजार वर्षे टिकून राहिल्या.

आता प्रश्न येतो या रूढी आजच्या युगात समयोचित आहेत का? दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण शहरात बसून या सर्व रूढी अंधश्रद्धा आहेत असे बेधडक विधान करतो. शहरात बऱ्याच रूढी कालबाह्य झाल्या असतील पण यातील काही रूढी खेडेगावात अजूनही तितक्याच लागू आहेत याचा विचार व्हायला हवा. पण दुसरीही एक गोष्ट खरी की काही रूढी जरी कालबाह्य झाल्या असल्या देवाचा कोप होईल या भीतीने लोक मनाविरुद्ध करत राहतात. इतका त्यांचा पगडा आपल्या मनावर झाला आहे.

अहो, देवाला काहीच नको आहे; तो काहीही मागत नाहीये. ज्या रूढी कालबाह्य झाल्या असतील त्या जरूर झुगारून द्या पण त्यांची टिंगल करू नका. खूप विचारपूर्वक त्या आपल्या पूर्वजांनी निर्माण केल्या त्यामागील करणे समजून घ्या आणि त्यांचा अपमान करू नका.

आनंदी जगा हेच सूत्र खरे महत्वाचे.

मला आशा आहे की ही लेख मालिका तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या पुढच्या पिढीला समजावून सांगा. धन्यवाद.

© यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#History #Culture #Tradition #Death #Quarantine #Custom #Tradition

Special thanks to Dr. Ajit Gokhale for his invaluable inputs.

Leave a comment



मेधा पुरव सामंत

4 years ago

So very practical@ Yashwant Marathe

Dilip Sule

4 years ago

Very practical thinking

Madhuri gawande

4 years ago

Very appealing and totally agree with your thoughts

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS