२०१४ साली झालेल्या निवडणुकीत मी भाजपाला म्हणजेच पर्यायाने मोदींना मत दिले होते.. परंतु गेले ३-४ वर्षे सोशल मीडियावर एका बाजूला मोदी भक्त आहेत ज्यांच्या दृष्टीने असा पंतप्रधान भारतालाच काय पण जगातील दुसऱ्या देशाला सुद्धा मिळणार नाही आणि ते करतात ती प्रत्येक गोष्ट एकदम बरोबर असते (परफेक्ट) कारण ते चुकूच शकत नाहीत.. तर ह्याच्या उलट मोदी द्वेषाने कावीळ झालेले काही लोक असेही आहेत ज्यांना मोदींची प्रत्येक गोष्ट फक्त वाईटच दिसते.. सोशल मीडिया बरोबरच आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा मीडिया (प्रसार माध्यमे) कडून सुद्धा पक्षपातच होताना दिसतो.. काही वर्तमानपत्रे, न्यूज चॅनल्स ही सरळसरळ मोदींची तळी उचलताना दिसतात आणि काही संपूर्ण विरोधी.. मोदी द्वेषाने पछाडलेले किंवा मोदी भक्तीत उन्मत्त झालेले सोशल मीडिया विद्वान यांची मते आणि मैदानावरील परिस्थिती यांचा काहीही संबंध नसतो..
परंतु त्यामुळे माझ्यासारखा माणूस जेव्हा एकप्रकारे तटस्थ किंवा नि:पक्षपातीपणे सध्या घडणाऱ्या गोष्टींकडे पाहायचा प्रयत्न करतो तेव्हा खरं काय, खोटं काय हेच कळेनासे होते.. मग माझ्या मनात विचार येतो की मी मोदींना निवडून दिले हे बरोबर का चूक? आणि पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मी काय करेन?
मग विचार आला की कुठल्याही देशात आणि खास करून भारतात, जनता काय अपेक्षा ठेऊन नवीन सरकार निवडत असेल? माझ्यासारखे शहरात राहणारे आणि सुखवस्तू असणारे लोकं हे एका थोड्या वेगळ्या जगात असतात पण तरी देखील त्यांची प्रगतीपथावर असणारी अर्थव्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा आणि स्वच्छ शहरे ही अपेक्षा असतेच.. परंतु बाकी सर्व ठिकाणी, जिथे जिथे माझे माझ्या सामाजिक कार्यामुळे जाणे झाले (हे भारताचे प्रतिनिधीत्व आहे असे मी नक्कीच म्हणू शकत नाही), तिथे मी खूप लोकांना भेटलोय आणि त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी विकास हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट असल्याची बोलून दाखवली.. जेव्हा मी त्यांना म्हणजे काय असे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की चांगली नोकरी, चांगले घर (आणि चांगले याच्या त्यांच्या व्याख्या अजिबात अवास्तव नाहीयेत), त्यांच्या मुलांसाठी योग्य शाळा आणि स्वतःच्या आयुष्यात समृद्ध भारत बघणे हे आहे असे बोलून दाखवले..
कदाचित हीच गोष्ट मोदींनी ओळखली असावी आणि त्यांनी २०१४ साली विकासाचा नारा पुकारला.. सबका साथ, सबका विकास या एका वाक्यावर त्यांनी अख्खा भारत पिंजून काढला आणि ३० वर्षांनंतर एका पक्षाची एकहाती सत्ता या देशात आली..
स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ७० वर्षांचा, अगदी आजपर्यंत, विचार केला की या देशासमोरील अडचणी, कमतरता, आणि लागलेले रोग काय आहेत तर ढोबळमानाने खालील गोष्टी प्रामुख्याने जाणवतात..
१. भ्रष्टाचार
२. अमाप लोकसंख्या
३. प्रदूषण
४. प्रादेशिकीकरण
५. जातीयवाद
आपल्या देशाची पाळंमुळं खिळखिळी करणारी ही पाच महाभूते आहेत..
तसेच खालील गोष्टी गेली अनेक वर्षे नुसत्याच बोलल्या जातात पण त्यात खरा बदल फारसा आजही घडलेला नाही..
१. न्यायालयीन, प्रशासकीय आणि सुरक्षा व्यवस्था (संरक्षण, निमलष्करी, पोलीस, गुप्तचर संस्था) यांचे परीक्षण आणि आढावा
२. कायदा आणि प्रशासकीय सुधारणा ज्यायोगे जुने, अकार्यक्षम कायद्यातील बदल
३. ग्रामीण अर्थव्यवस्थेत वाढ होणे
४. शेतीविषयक कायदे आणि सुधारणा
५. सिंचन प्रणाली
६. शिक्षण प्रणाली
७. समुद्र किनारपट्टी विकास - बंदरे, बोटी बांधणे
८. पर्यटन क्षेत्र विकास - जगातील कित्येक देशांची अर्थव्यवस्था या एका क्षेत्रावर चालते; आपल्या देशात याला एवढी प्रचंड संधी आणि वाव आहे की कल्पनाही करणे कठीण आहे..
९. सार्वजनिक आरोग्य क्षेत्र - दिवसेंदिवस सामान्य माणसाला उपचार करून घेणे कठीण होत चालले आहे आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्य सेवा त्यांना परवडण्याच्या पलीकडे आहे..
गेल्या ७० वर्षात काहीच घडले नाही असे काही नाही परंतु जे घडले त्यापेक्षा खूप जास्त होऊ शकले असते जर भ्रष्टाचार हा आपल्या व्यवस्थेचा भाग, खास करून गेल्या २५-३० वर्षात, झाला नसता तर..
मग आता मनात प्रश्न येतो की गेल्या जवळजवळ ४ वर्षात मोदी सरकारचे यश किंवा सफलता काय? आणि तसेच याच कालावधीतील त्यांचे अपयश काय? याचा विचार व्हायला हवा.. सर्वप्रथम अपयशांचा विचार करू..
१. व्यवसायातील सुलभता (Ease of Doing Business) - सरकारच्या म्हणण्याप्रमाणे जरी भारताचा हा क्रमांक सुधारला असला तरी वास्तव काही तसे दर्शवत नाही..
२. मेक इन इंडिया चे अपयश
३. स्मार्ट सिटी - संपूर्ण अपयश
४. भ्रष्टाचार जरी थोड्याफार प्रमाणात सिनियर लेव्हलला कमी झाला असला तरी तळागाळात फारसा फरक पडलेला नाही
५. नवीन रोजगार निर्मिती मधे मोठा प्रॉब्लेम
६. व्यवसायातील नवीन गुंतवणुकीचा अभाव
तसेच या अपयशांबरोबरच खाली नमूद केलेल्या गोष्टींची कारणमीमांसा कळत नाही.. पण ज्याचे पुढे झाले तर नुकसानच होईल..
१. एकीकडे दुसऱ्या पक्षातील भ्रष्ट नेत्यांचा भाजपात सुलभ प्रवेश.. आणि दुसरीकडे सत्तेत यायच्या आधी ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिणवले गेले आणि आम्ही आल्यावर कशी या लोकांची पाळंमुळं खणून काढू अशी दर्पोक्ती करण्यात आली, त्यातल्या एकाही व्यक्तीच्या नखाला देखील धक्का लागला नाही, आणि गंमत म्हणजेत त्यातल्याच एका व्यक्तीबद्दल मोदी म्हणतात की ते माझे राजकीय गुरु आहेत आणि त्यांचेच बोट पकडून मी राजकारणात आलो.. धन्य आहे!!
२. मोदी म्हणाले होते की बाते कम, काम ज्यादा परंतु तसे होताना मात्र दिसत नाही.. वाचाळ नेत्यांचीच भाऊगर्दी झाली आहे.. सतत दुसऱ्याला वाईट दाखवून आपण चांगले होत नाही याची जाणीव ठेवण्याची गरज आहे..
३. नोटबंदी यशस्वी झाली की फसली हे अजूनही नीट कोणालाही कळलेले नाही.. दीड वर्ष होत आले तरी अजून सरकार ते सांगू शकत नसेल तर ते फसले असावे अशी दाट शंका आहे.. ह्यातच एक दुसरा मुद्दा असा की सरकार जे आकडे जाहीर करते त्याच्या विश्वासाहर्तेबद्दलच शंकास्पद वातावरण निर्माण होते..
४. एकूणच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची घमेंड आणि अहंकार दिसून येतो जो कदाचित पाठोपाठ मिळणाऱ्या यशामुळे आला असेल पण त्यांनी एक लक्षात ठेवायला हवे की यशाचे रूपांतर अपयशात व्हायला हाच अहंकार कारणीभूत ठरेल.. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे विरोध करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देशद्रोही म्हणून हिणवणे हा मूर्खपणा आहे..
५. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर मे २०१४ मध्ये $ १०० होता तेव्हा मुंबईतील पेट्रोलचा भाव रु ८० होता.. मे २०१५ मध्ये $ ५५, मुंबईतील भाव रु ७२; मे २०१६ $ ४०, मुंबईतील भाव रु ७०; मे २०१७ $ ५०, मुंबईतील भाव रु ७५; फेब्रुवारी २०१८ $ ६०, मुंबईतील भाव रु ८०.. हे अजिबात न कळणारे गणित आहे.. जरी सरकारचा दावा खरा मानला की सबसिडी कमी करण्यात आली पण त्यात पारदर्शकता नसल्याने विश्वास ठेवणे कठीण जाते..
६. भारतीय जनता पार्टीमध्येच हिंदुत्व म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, व्याप्ती काय या बाबतीतच पराकोटीचा गोंधळ दिसतो.. वन्दे मातरम किंवा भारतमाता की जय म्हणणे ही हिंदुत्वाची ओळख कोणी आणि कधी बनवली? एकीकडे विनय कटियार सारखे नेते जे मनाला येईल ते बरळत असतात.. १-२ वर्षांपूर्वी निवृत्त हायकोर्ट जज्ज, राजस्थान यांनी तोडलेले अकलेचे तारे वाचल्यानंतर तर बोलतीच बंद व्हायची वेळ आली होती.. सध्या हिंदुत्वाच्या नावाखाली जो गाईच्या आडून जो वेडेपणा भारतभर पसरतो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होऊन जाते.. तंबाखूसारखे वर्षांला ८ लाख भारतीयांच्या मृत्यूला कारण ठरणारे व्यसन जिथे सरकार कायद्याने बंद करू शकत नाही तिथे गोहत्या बंदी कायदा करणे व सर्व ताकद लावून त्याची अंमलबजावणी करणे ह्या बाबत सरकारने अतिउत्साह दाखवू नये.. पण जरी असे गृहीत धरले की गोहत्या बंदीचा कायदा आहे तरी हा गौरक्षक काय प्रकार आहे? कोणी कायदा मोडत असेल तर त्यावर खटला भरा पण त्याला मारहाण करण्याचा अधिकार या लोकांना कोणी दिला? सरकार कायदा हातात घेणाऱ्यांची गय का करते? बरं, गोहत्या नाही करायची मग त्या भाकड गाईंचे काय करायचे? त्यांना कोण आणि कसे पोसणार? आज भटक्या गाईंचा गावागावात किती उपद्रव झाला आहे हे शहरात बसून कधीच कळणार नाही.. ती गाय कसायाला विकून गावकऱ्याला जे पैसे मिळाले असते ते त्याला सरकार देणार आहे का? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा कायदा जर नीट पद्धतीने मांडला नाही तर म्हैस सुद्धा खाटीकखान्यात पाठवणे जिकिरीचे होऊन बसेल.. आणि त्यानंतर होणारा अभूतपूर्व गोंधळ कल्पनाच न केलेला बरा.. लोकशाहीमधे अशा गोष्टी पोषक ठरत नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळे भाजपा पासून मुसलमान आणि मागासवर्गीय दुरावत आहेत.. मोदींचे या सर्व बाबतीत मौन धारण करणे धोकादायक आहे.. ह्या सगळ्या समाजविघातक लोकांना त्यांचीच फूस आहे अशी एक प्रकारची भावना निर्माण होऊ शकते आणि ही भावना दूर करण्याचे काम फक्त तेच करू शकतात आणि त्यांनी ते करायला हवं..
७. ज्या पार्टीबद्दल भाजपा कडून कायम शंका व्यक्त करण्यात आली की ती देशविघातक शक्तींना मदत करते किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती तरी ठेवते तरी अशा पीडीपी पार्टीशी ते गठबंधन करूच कसे शकतात? म्हणजे सत्तेसाठी काहीही तडजोड करण्याची तयारी? आणि मग आता काश्मीर मधे काही घडले तरी काय बोलणार? तोंड दाबून बुक्क्यांचा मार.. जे काश्मीर मधे घडले तसेच थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात पण झाले आणि काही समाजविघातक माणसांना मानाने जवळ केलं गेलं..
आता मोदी सरकारची त्यांच्या चांगल्या गोष्टीबद्दल पाठही थोपटायला हवी..
१. बहुतांश भारतीयांना आपला देश आणि सांस्कृतिक वारसा याबद्दल अभिमान निर्माण केला.. भारतीय म्हणून एक राष्ट्रीय व्यक्तित्व दिले..२. २०१४ च्या आधी १० वर्षात नवनवीन घोटाळे बाहेर येण्याची स्पर्धाच झाली होती, पण गेल्या ४ वर्षात त्याचे प्रमाण जवळजवळ नाही असे झाले.. ३. रेल्वे ट्रेन्स, प्लॅटफॉर्म्स इथे कचऱ्याचे प्रमाण खूपच कमी झाले आणि स्वच्छता जाणवू लागली.. ४. लोड शेडिंगचे प्रमाण खूप कमी झाले.. ५. माझ्या सुदैवाने मला आर्मीमधील सिनिअर ऑफिसर्सशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि असे लक्षात आले की त्यांच्या एकूण वृत्तीत एक सकारात्मक बदल झालाय आणि त्यांनी तो मान्य देखील केला.. ६. आधार कार्ड अमंलबजावणीमुळे अनेक बेनामी गोष्टी उघडकीस येऊ लागल्या.. ७. वस्तू सेवा दर (GST) मुळे अनेक गोष्टी सुकर होणार आहेत.. ८. बऱ्याच वर्षांनंतर आज भारताचे पंतप्रधान जागतिक नेते म्हणून ओळखू जाऊ लागले.. ९. पाकव्याप्त काश्मीर आणि म्यानमार मधील सर्जिकल स्ट्राईक मुळे भारतीय सेनेचा उंचावलेला दबदबा.. १०. डोकलाम मध्ये पहिल्यांदाच भारताने चीनच्या डोळ्याला डोळा भिडवला आणि मान खाली घालायची वेळ आणली नाही.. ११. पाकिस्तानला जगभरात आणि मुस्लिम जगतात सुद्धा एकाकी पाडण्यात मिळालेलं बऱ्यापैकी यश.. १२. येमेन देशातील झालेल्या गदारोळात भारतीय नागरिकांना परत आणण्यात मिळालेलं यश आणि त्याचबरोबर इतर देशांच्या नागरिकांसाठी केलेले प्रयत्न जगभरात कौतुकास्पद ठरले.. १३. सीरिया मध्ये अडकलेल्या भारतीय नर्सेसची यशस्वी मुक्तता.. १४. एकूणच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची अतिशय कौतुकास्पद कामगिरी.. आता २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणूका होतील तेव्हा मोदी सरकारच्या वरील यशापयशाची कसोटी लागेल.. काही गोष्टी आधीच नमूद केल्या आहेत की ज्या वर्षानुवर्षे प्रलंबित किंवा अपूर्णच आहेत किंवा ज्या भाजपा सरकार यशस्वी करू शकलेले नाहीत..परंतु अशा काही गोष्टी जाणवल्या की ज्या जरी कुठलेही सरकार आले तरी त्यांनी विचार करण्याजोग्या आहेत की ज्यांचा भारत प्रगतीशील बनण्यास हातभार लागेल.. १. कला, कौशल्य यांच्या विकासाला जास्तीत जास्त प्राधान्य ज्यायोगे स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळेल.. २. क्रिमी लेअर आरक्षण हा एक अत्यंत हळवा मुद्दा आहे पण तो कधी तरी सोडवावाच लागेल.. ३. प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची जबाबदारी स्वीकारण्यास सक्ती करणे.. (Accountibility) ४. प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याला मिळणाऱ्या सुविधांच्या बदल्यात काही गोष्टी सक्तीच्या करणे आवश्यक आहे.. उदा. ६ महिने ते एक वर्ष लष्करी प्रशिक्षण किंवा देशसेवेचे कार्य, मतदान करणे (भले NOTA असेल) आणि काही अजून गोष्टी.. ५. स्वातंत्र्यानंतर पहिली २५ वर्षे ही बऱ्यापैकी ध्येयाने भारावलेल्या राजकारण्यांची, प्रशासकीय अधिकाऱ्यांची तसेच जनतेची पण होती.. परंतु ह्या काळानंतर राजकारण्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी देशातील विशिष्ट संस्थांचा खूप ऱ्हास केला.. उदा. रिझर्व्ह बँक, सुरक्षा व्यवस्था (CBI, पोलीस), सर्वोच्च न्यायालय आणि पर्यायाने संपूर्ण कायदे व्यवस्था.. एक प्रकारे त्यांची खुशामत करणारे होयबा असणे ही प्राथमिक गरज झाली.. दुर्दैवाने असा ऱ्हास भरून निघायला फार काळ जावा लागतो आणि जो आपण आज अनुभवतो आहे.. त्याकाळी प्रत्येक मनुष्य हे काम माझे आहे आणि ते मी चोखच करेन ही भावना बाळगत असे परंतु आज ती भावनाच लुप्त झाली आहे.. देशाची प्रगती व्हायची असेल तर ही भावना परत येणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात राजकारण्यांपासूनच व्हावी लागेल.. सुदैवाने सध्या निदान काही मंत्र्याच्या बाबतीत तरी ही सुरुवात झाली आहे असं वाटतंय उदा. पियुष गोयल, सुरेश प्रभू, सुषमा स्वराज परंतु ही ठराविक साच्यातील राजकारणी मंडळी नाहीत.. गेल्या ४०-४५ वर्षात झालेला विचका किंवा गोंधळ मोदींनी ४ वर्षात पूर्ण सुधारावा ही अपेक्षा अवास्तव आहे.. तसेच या कालावधीत त्यांनी अगदीच काही पार चुथडा केलेला नाही त्यामुळे त्यांना अजून एक संधी २०१९ मध्ये मिळायला हवी असे वाटते.. परंतु त्याचबरोबरीने भाजपाने वर नमूद केलेल्या काही गोष्टींचा फेरविचार किंवा सुधारणा करण्याची नितांत गरज आहे..
यशवंत मराठे
५ मार्च २०१८
(A edited version of this article was published in Loksatta on 15th March 2018)
#modibhakt #loksatta